चोरपोलिसकोणता धंदा केव्हा तेजीत येतो याचे व्यावसायिक गणित प्रत्येक व्यावसायिकाचे असते. मालाचा साठा करणे, माल केेव्हा मार्केटमध्ये आणणे, कोणते दिवस चांगले, टंचाई केव्हा निर्माण होते याचे नेमके वेळापत्रक प्रत्येक व्यावसायिकाकडे असते. हे गणित ज्याला जमते तो व्यवसायात यशस्वी होतो. मग धंदा तो कोणताही असला. रात्रीचा, काळा धंदा असला तरी कोणते काम केव्हा करायचे याचे गणित ठरलेले असते. अर्थात काळ्या धंद्यांचे हे गणित ठरवण्याचे काम करतात ते पोलिस. अमूक एकावेळी तमूक इकडे दुर्लक्ष करायचे. बस पोलिसांनी दुर्लक्ष केले म्हणजे सगळे धंदे मोकाट चालतात. कोणत्यावेळी माणसे बेसावध असतात हे पोलिस जाहीर करतात आणि त्याचा लाभ सामान्य माणसांना न होता चोराचिलटांना होतो असे वास्तव आहे. असाच पनवेलमधील सध्या तेजीत असलेला धंदा म्हणजे साखळी आणि मंगळसूत्रे चोरणार्यांचा. सुसाट मोटरसायकलवरून यायचे आणि एकट्यादुकट्या महिलांच्या गळ्याला हात घालायचा. काही कळायच्या आत साखळी, मंगळसूत्र तोडून पलायन करायचे. कोणत्या भागात गस्त केव्हा घालायची नाही याचे संगनमत पोलिस आणि चोरट्यांचे झालेले असते. सध्या पनवेलमध्ये कोणत्या भागात मोठ्या प्रमाणात लग्न कार्ये आहेत, कोण या निमित्ताने दागिने घालून बाहेर पडणार याचे संपूर्ण वेळापत्रक हे चोरांचे आणि पोलिसांचे तयार असते. या भागात दागिने घातलेली माणसे येणार. तीथे अमुक इतकी लग्न आहेत. त्या गर्दीत पोलिस कशाला. सगळे जागेच असणार. या उदात्त हेतुने पोलिस आपला मोर्चा दुसरीकडे वळवतात आणि चोरांना रान मोकळे करून देतात. आत्ता लग्नाचा सिझन असल्यामुळे आणि गेल्या आठ दिवसात अनेक मुहूर्त आणि लग्नांची संख्या खूप असल्यामुळे चोरांचा धूमाकूळ वाढला आहे. त्यांचा धंदा तेजीत आहे. लग्नाचा सीझन नसला की मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते. याशिवाय मोबाईल चोर, पाकीटमारी असे अन्य धंदे फावल्या वेळात केले जातात. या सगळ्यांचे नियोजन करणे तेवढे सोपे नाही. पण आमचे पोलिस खाते मात्र ते नियोजन यशस्वी होण्यास हातभार लावतात. आधी मोटरसायकली चोरी करायची मग त्याच मोटरसायकलवरून येउन मंगळसूत्र खेचायचे. डोळ्यादेखत मंगळसूत्र, चेन खेचण्याचे प्रकार होतात पण त्याबाबतची तक्रार घेण्यास पोलिस टाळाटाळ करतात. आज हे शक्य होते ते केवळ पोलिसांच्या सहकार्यामुळेच. पोलिसांनी जर मनात आणले तर हे चोर पकडणे अवघड नसते. कोणत्यावेळी कोणता पोलिस कुठे हप्ते गोळा करायला जातो याचे वेळापत्रक जसे रस्त्यावरचे विक्रेते, अवैध वाहतुक करणारे, चोरटे यांच्याकडे असते तसेच कोणता चोर कशा पद्धतीने चोरी करतो, त्याची चपळता कशी आहे, तो मोटरसायकल कशी वाकडी करून मधून घुसवतो, तोंड झाकण्यासाठी कसे नाटक करतो, चेन मंगळसूत्र कसे खेचतो याची सगळी माहिती पोलिसांकडे असते. म्हणजेच पोलिसांच्या इच्छाशक्तीने हे प्रकार घडत असतात. पोलिसांची इच्छाशक्ती असेल तर ते या चोरांना पकडूही शकतात. पण ती इच्छा होत नाही याचेमागचे चालणारे अर्थकारण फार महत्त्वाचे आहे. कोणता भुरटा चोर, साखळीचोर कोणत्या एरियात काम करतो, कोणता पाकीटमार कुठे काम करतो, कोणता मोबाईलचोर कुठे असतो, बाईक चोरांचे लागेबांधे कोणत्या गॅरेजवाल्यांशी आहेत याचे सगळे तपशील हे पोलिसांकडे असतात. त्यामुळे पोलिस हे सामान्य माणसांसाठी नाहीत, खलनिग्रणाय, सदरक्षणाय नाहीत तर खलरक्षणार्थ सदनिग्रणाय असे काम करताना दिसत आहेत. सामान्य माणसाला अडचणीत आणण्यासाठी पोलिस किती प्रकारे छळतात हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. सर्वात प्रथम आपले मंगळसूत्र किंवा चेन खेचली गेली म्हणून तक्रार देण्यासाठी सामान्य माणूस गेला तर त्याला पोलिस इतकी हिडीस फिडीस करतात की या माणसाची चेन चोरीला गेलेली नाही तर ती याने चोरली आहे अशा अविर्भावात पोलिस वावरतात. आधी तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात. मग विचारतात, किती तोळ्याचे होते तुमचे गंठन? जर त्यांना उत्तर दिले की, तीन तोळ्यांचे होते. तर लगेच विचारतात पावती आहे काय? पावती घेउन कोणी हिंडतो काय? कोणीतरी आज माझे मंगळसूत्र मारणार आहे. चला पावती बरोबर घेउन गेलेले बरे असा विचार करून महिलांनी बाहेर पडले पाहिजे असे आर. आर. पाटील यांच्या गृहखात्याला वाटते काय? असे पोलिसांना वाटते काय? कशी शुक्लकाष्ट काढायची आणि सामान्य माणसाला जेरीस आणायचे याचे चांगले ज्ञान पोलिसांना असल्यामुळे ते बरोबर सामान्य माणसांची छळवणूक करतात आणि या चोरट्यांना पाठीशी घालतात. माणूस चोरी झाल्या झाल्या पोलिसांकडे जाणार ना? की ते काहीतरी मदत करतील म्हणून? पण जर पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे आधी पोलिस ठाण्यात न येता पावती घेउनच मग आला तर लगेच का नाही आला? आता तो कुठल्याकुठे लांब गेला असेल की म्हणून छळणार. पावती बघू? तुमचे नाव काय? त्या महिलेने सांगितलेले नाव आणि पावतीवरचे नाव वेगळे असते. ती सांगते अहो साहेब, हे गंठन माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी घातले होते त्यामुळे त्यांच्या नावाने ही पावती आहे. मग बोलवा तुमच्या वडिलांना. किंवा म्हणजे हुंडा घेतला काय? तुमची कुठे चोरी झाली आहे? वडिल का तक्रार करीत नाहीत? असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण करून त्या माणसाला अक्षरश: पिळून काढतात. जर एखादी महिला म्हणाली, पावती मिस्टरांच्या नावावर आहे. तर पोलिस म्हणतात मग तक्रार त्यांना करू देत. त्यांचे मंगळसूत्र तुमच्याकडे कसे आले? आता एक पतीच आपल्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो याचे ज्ञान असूनही असे निरर्थक प्रश्न विचारून पोलिस त्या सामान्य माणसाला छळतात. याचे कारण असे की चोरांना आणि चोरीचा माल विकत घेणार्या दोघांनाही पाठीशी घालण्यासाठी ही पोलिसांची सारी धडपड चाललेली असते. बुरखा लावून मोटरसायलवरून फिरणार्यांना पोलिस का अडवत नाहीत? तोंड का झाकून घेतले आहे? मग हेल्मेट का घातले नाही? असे का पोलिस विचारत नाहीत? तोंडावर रूमाल बांधून झाकून गेलेली मोटरसायकल जवळून गेली की ओळखायचे की इथून दहा किलोमीटर अंतरापर्यंतचा मार्ग हा चोरांसाठी सुरक्षित आहे. एकही पोलिस इथे आत्ता येण्याची शक्यता नाही. हे सगळे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली चालते. सध्या पनवेलमध्ये हा धंदा तेजीत आहे. सगळ्या पोलिस ठाण्याचे निरीक्षक नुसतेच बघ्याची भूमिका घेउन बसलेले दिसतात. निरीक्षक म्हणजे फक्त चोरी कधी, कुठे आणि कशी होती आहे हे निरखत बघायचे. मग आम्ही निरीक्षक आहोत. आम्ही फक्त बघत बसणार. तपास करायचा संबंध काय? वरून सांगतील तेव्हा आम्ही तपास करतो एरवी फक्त बघ्याचेच काम करतो. उपनिरीक्षक आपला बॉस काय करतो ते बघत बसतो. तो कसे कमवत आहे याचे निरीक्षण तो करत राहतो. ते जमले की त्याचे प्रमोशन होते. पुर्वी चोर पोलिस हा खेळ असायचा. या चोर पोलिस खेळातही मुले एकमेकांना पकडण्याचा प्रयत्न करायची. ज्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण घेतले आहे ते पोलिस मात्र चोरांना पकडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळेच चोर पोलिसांचा हा खेळ सुरू आहे. या चोर पोलिसांच्या खेळात आणि लहान मुलांच्या खेळात हाच फरक आहे. लहान मुलांच्या खेळात पोलिस चोरांना पकडतात आणि चोर पोलिसांपासून पळण्याचा प्रयत्न करतात. पण इथे चोर पोलिस एकत्रितपणे सामान्य माणसाला पकडण्याचा प्रयत्न करतात. त्याला लुटल्यावर चोराला पळायला पोलिस मदत करतात असे वास्तव आज जाणवू लागले आहे.
सोमवार, १४ एप्रिल, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा