सोमवार, १४ एप्रिल, २०१४

खरंच महाराष्ट्रात महाराष्ट्र आहे काय?

मंगलदेशा, पवित्रदेशा, महाराष्ट्रदेशा।प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्रदेशा।राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा।नाजुक देशा कोमल देशा फुलांच्या देशा।गोविंदाग्रजांनी आपल्या गौरवगीतातून महाराष्ट्राचे सार्थ वर्णन केले आहे. पण आज महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानंतर इथल्या सत्ताधिशांनी या गौरवाला हरताळ फासून हे राज्य अमंगल, अपवित्र करून टाकले आहे. देशाच्या स्वातंत्र्याला सहा दशके उलटली आणि महाराष्ट्राच्या निर्मितीची पाच दशके  पूर्ण झाली तरी अजून आम्ही आमच्या राज्याचा मंगलदेशा, पवित्रदेशा असा नावलौकीक टिकवू शकलो नाही ही आमची प्रगती आहे की अधोगती आहे याचा विचार करावा लागेल.    गोविंदाग्रजांच्या कवितेत राकट देशा, कणखर देशा दगडांच्या देशा असा उल्लेख हा महाराष्ट्राचे शौर्याचे, धैर्याचे आणि स्थीतप्रज्ञतेचे वर्णन करणारे शब्द आहेत. पण सत्तेवर आलेल्या आमच्या नेत्यांनी या शब्दांची वाट लावत शब्दश: दगडांचा देश निर्माण करायचे धोरण आखले आहे.     सध्या बेरोजगारीचे सर्वाधिक प्रमाण हे महाराष्ट्रात आहे. मराठी माणसाचा इतिहास अटकेपार झेंडा लावण्याचा आहे हे केवळ सांगण्यापुरते उरले आहे. पण नोकरीसाठी आमचा तरूण आपल्या सोयीच्या गावापलिकडे जाण्यास तयार नाही. मुंबईत नोकरी मिळत असेल तर घाटावरचा माणूस नोकरी लागायच्या आधीच आणि अर्ज करायच्या तीथं रहायचं कुठे? जेवायचं कुठे  या चिंतेत अडकून पडतो. त्याचवेळी उत्तर प्रदेश, बिहारचा तरूण मुंबईत कसलाही विचार न करता येत असतो. महाराष्ट्राबाहेर  दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगलोर अशा शहरात नोकरीसाठी जाण्याचे धाडस केले जात नाही. कारण आम्ही तशी मनोवृत्ती तयार करण्यास असफल ठरलो आहोत. शिक्षणातून जो आत्मविश्‍वास मिळणे अपेक्षित असते तो आत्मविश्‍वास न मिळाल्यामुळे आमचा तरूण शिक्षणाची डिग्री घेउन दगड होउन पडला. बेरोजगारांच्या यादीत त्याचे नाव सतत वेटिंगलिस्टवर राहीले. दगडांच्या देशा म्हणजे आमच्या व्यवस्थेने दगड निर्माण करणारे शिक्षण देण्याचे धोरण राबवले.    मराठी संस्कृतीचा र्‍हास होत गेला. आमच्या लोककला, आमची वेशभुषा, आमचे राहणीमान, आमची भाषा, आमचे खाणे या सगळ्यावर परकीय, परप्रांतीय आक्रमणे झाली आणि आम्ही आमचे स्वत्व विसरलो ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.      एक काळ असा होता की महाराष्ट्राची ग्राम्य संस्कृती ही विविधता आणि वैभवसंपन्न अशी होती. प्रत्येक जिल्ह्याची, शहराची, खेड्याची एक संस्कृती होती. या संस्कृतीचे अवशेष आज शिल्लक असले तरी त्यावर प्रचंड प्रमाणात सांस्कृतिक अतिक्रमणे झाली आहेत. बलुतेदारीच्या पद्धतीत खेडी ही स्वयंपूर्ण होती. पण आज इथल्या लोकांच्या रोजगारावर गंडांतर आले ेआहे. नोकर्‍याही आमच्या आळसामुळे, बाहेर न पडण्याच्या प्रवृत्तीमुळे आम्ही मिळवण्यास अपात्र ठरलो आणि आमचा स्थानिक पारंपारीक व्यवसायही आम्ही धोक्यात आणला आहे ही वस्तुस्थिती आहे. त्या दृष्टीने सरकारचे धोरण परक्यांना घुसखोरी करण्यास मदत करणारे तर स्थानिकांवर अन्याय करणारे असेच आहे. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षातील महाराष्ट्राचे चित्र हे अतिशय वाईट अवस्थेकडे घेउन जाणारे आहे. महाराष्ट्राचे गौरवगीत आम्हाला काल्पनिक वाटू लागते आहे.    इथल्या ग्राम्य संस्कृतीत भाग घेणारा प्रत्येक बलुतेदार हा  सन्माननीय घटक होता. आज तोच बेरोजगारीच्या खाईत लोटला जात असताना त्याला संरक्षण देण्यासाठी काही नियंत्रणे आणणे शासनाचे कर्तव्य आहे. पण राकट प्रवृत्तीचे लाचार राज्यकर्ते मतांसाठी स्वकीयांना दूर लोटणारे धोरण सरकारचे आहे.     आज शहरातील जेण्टस पार्लर, सलून एअर कंडीशन्ड झाली आहेत. शेकडो हजारो रूपये घेउन चकाचक आणि मोक्याच्या जागेत भव्य दुकाने थाटुन कमाई करत आहेत. पण हे कमाई करणारे मराठी लोक नाहीत. उत्तर प्रदेश, बिहारचे कारागीर आहेत. अतिशय तरूण आणि नवनवे प्रकार करणारे कारागिर आहेत. ग्राहकांच्या खिशातून गोड बोलून पैसा काढण्याचे कसब त्यांना जमले आहे. पण आमचा नाभिक तरूण मात्र आपल्या परंपरागत व्यवसायाची लाज वाटून कुठे नोकरी मिळते का म्हणून भरकटत राहतो. खोट्या प्रतिष्ठेच्या नादी लागून आपले स्वत्व गमावून बसला आहे.    हाच प्रकार आमच्या मुर्तीकार, कुंभारकाम करणार्‍या माणसांचा झाला आहे. गुजरात राजस्थानातले मुर्तीकार, कुंभार आमच्या कुंभार समाजाच्या लोकांवर अतिक्रमण करत आहे. त्यासाठी संरक्षण देणे गरजेचे असताना या समाजाला वर येउ न देण्याचे सरकारी धोरण आहे.     आमचा सुतारही आजकाल दिसेनासा झाला आहे. सुतार, पांचाळ हा कारागीर न राहता तो आता कुठे तरी नोकरी धंद्याच्या मागे लागलेला दिसतो आहे. आमच्या लाकूडकामाचे, घरच्या फर्निचर, सजावटीचे काम करण्यासाठी गुजरातधील जांगिडलोक आम्ही वापरू लागलो आहे.    टप्प्या टप्प्याने महाराष्ट्राची संस्कृती पुसून टाकत इथल्या संस्कृतीला निर्जीव दगड बनवण्याचे काम आमचे सरकारी धोरण करत आहे. दगडांच्या देशा म्हणून सर्वांना दगड करण्याचे काम सरकार करते आहे.    इथला शेतकरीही आज आत्महत्या करताना दिसतो आहे. इथल्या लोककला घटका मोजत आहेत. इथला चित्रपट चालतो तो अनुदानाचे भरवशावर. संपूर्ण भारताला दादासाहेब फाळके या मराठी माणसाने चित्रपटाचे वरदान दिले. दादासाहेब फाळके, व्ही शांताराम, असे असंख्य मराठी दिग्गज एकेकाळी संपूर्ण हिदी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवत असताना आम्हाला आमचा मराठी चित्रपट काढण्यासाठी अनुदान घ्यावे लागते हे सरकारचे कलाकारांना अपंग करण्याचे धोरण आहे. जोपर्यंत चित्रपटांचे अनुदान बंद होत नाही तोपर्यंत दर्जेदार चित्रपट निर्माण होणार नाहीत. जे चित्रपट गाजले ते अनुदानाची अपेक्षा ठेवुन काढलेले नव्हते.    आमचा हापूस आंबा हा कोकणचा राजा. पण आज त्या हापूसची विक्री करणारे दारोदार फिरतात ते भैय्ये आहेत. मराठी माणसाला हा हापूस आहे का आणखी कुठला बनावट आंबा आहे ते कळत नाही. पण हा हापुस आंबा आहे हे बेधडकपणे भैय्या सांगतो. कोकणातील आंबा उत्पादक आंब्याचे उत्पादन घेतो ते काय भैय्याला मोठे करण्यासाठी काय?       आता तर प्राथमिक शिक्षणातही पहिली ते आठवीपर्यंत मुलांना अभ्यास येओ न येओ त्यांना वरच्या वर्गात ढकलायचे असले बावळट धोरण आखले आहे. त्यामुळे अजून दहा वर्षांनी या महाराष्ट्राची अवस्था किती दयनीय झाली असेल याची कल्पनाच करणे सामान्य माणसाची झोप उडवणारे आहे.     आज महाराष्ट्र फक्त नकाशात शिल्लक आहे. महाराष्ट्राचे अस्तित्व पुसण्याचे काम मात्र राज्यकर्त्यांनी इमाने इतबारे करून स्वत:चा स्वार्थ साधला आहे. अर्थात एक दिवस याचा अतिरेक होउन इथली जनता या लोकांना रस्त्यावर खेचून तोंडाला काळे फासायला कमी करणार नाही यात शंका नाही. सरकारचे चुकीचे धोरण आणि मंत्रीगण फक्त आणि फक्त भ्रष्ट मार्गाने पैसा कमावण्यात गुंतलेले दिसत आहेत. त्यामुळे सगळीकडून महाराष्ट्र पुसुन टाकण्याचे काम आमचे राज्यकर्ते करीत आहेत ही वस्तुस्थिती आहे.    पोलिसांचा वापर भ्रष्ट कामासाठी केला जातो आणि भ्रष्टाचारासाठी केला जातो यासारखे दुर्दैव महाराष्ट्राचे काय म्हणायचे? अशोक चव्हाणांसारखा मुख्यमंत्री आपल्या सासुला  फ्लॅट घेउन देण्यासाठी एका वाहतुक शाखेच्या बर्वे नामक अधिकार्‍याच्या खात्याचा वापर करून आदर्श घालून देतो. 65 लाखांचा गैरव्यवहार करून उजळ माथ्याने हिंडतात यासारखे दुर्दैव ते काय?    त्यामुळे महाराष्ट्राचे गौरवगीत गाताना आमची जीभ आता अडखळली तर त्यात आश्‍चर्य वाटायचे कारण नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: