जेव्हा त्यांची पाठ दुखते
जेव्हा त्यांची पाठ दुखते
राम ठाकूर जेव्हा शेतकरी कामगार पक्षात होते, तेव्हा त्यांना अचानक पाठदुखी सुरू झाली. राम ठाकूर यांना पाठदुखी सुरू झाली की समजायचे त्यांना आता पक्ष सोडायचे वेध लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची पाठ दुखत आहे. ते कारण सांगून म्हणे त्यांनी खजीनदारपदाचा राजीनामा दिला. वास्तविक हाकलूनच काढलं होतं त्यांना. पण लाज वाचविण्यासाठी राजीनामा दिल्याचा बहाणा केला. त्यासाठी पाठदुखीचं कारण पुढे केलं.लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की राम ठाकूर यांची पाठ दुखायला लागते. म्हणजे बाळंतपणापूर्वी एखाद्या गरोदर महिलेला जशा प्रसववेदना सुरु होतात त्याप्रमाणे राम ठाकूर यांना पक्ष बदलताना अशा पाठवेदना सुरू होतात. 2004 निवडणुकीत राम ठाकूर हे शेतकरी कामगार पक्षात होते. त्यावेळी त्यांनी शेकाप बरोबर असूनही अंतर्गत गटबाजी, गद्दारी असे प्रकार करून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न केले. जसे आज राहुल नार्वेकरांना पाडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत तसे. शेकापशी गद्दारी करून थोडेच दिवसात ते काँग्रेसवासी झाले. त्यावेळी राम ठाकूर यांची पाठ दुखत होती. लोकांना दाखवण्यासाठी म्हणून ते दवाखान्यात गेले. पाठीत नेमकी कसली उसण भरली आहे की, हाडं सरकली आहेत की आणखी काय समस्या आहे हे डॉक्टरांच्या लक्षात येत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी एक्स रे काढण्यास सांगितले. राम ठाकूर यांनी पाठीचा एक्स रे काढून घेतला. एक्सरेच्या फोटो प्रिंट आपल्या खाटेखाली ठेवल्या. दुसरे दिवशी डॉक्टरांना फोन केला. ‘अहो मी एक्स रे काढला आहे तरी मला अजून बरे वाटत नाही.’ डॉक्टर म्हणाले, ‘अहो, एक्सरे काढायचा असतो तो आत काय बिघाड झाला आहे हे पाहण्यासाठी. तो एक्सरेचा फोटो मला दाखवायला नको का? ’पण राम ठाकूर यांना काही केल्या पटत नव्हते. त्यांना वाटत होते एक्सरे च्या मशिनपुढे नेल्यावर पाठीला काही ट्रीटमेंट केलेली आहे. त्याने आपल्याला बरे वाटले पाहिजे. या अडाणी समजुतीमुळे त्यांनी ती ट्रीटमेंट अर्धवट सोडून दिलेली होती.आता अधून मधून निवडणुकीच्या टायमाला ही पाठदुखी उसळून येते. तेव्हा ते एक्सरेची ती फिल्म आपल्या पाठीवरून फिरवतात आणि त्यांना बरे वाटते. आताही त्यांची पाठ दुखते आहे. त्यामुळे त्यांना आता पुन्हा एकदा लोकसभा उमेदवाराला पाडण्याचे वेध लागले आहेत. जुनाच एक्सरे दाखवत सध्या फिरत आहेत. एक्सरे नी म्हणे त्यांना बरे वाटते. शरीरातील रचना बिघाड शोधून काढण्याचे, अंतरंगातील छायाचित्रण करण्याचे कौशल्य क्ष किरण यंत्रात असले तरी अंतर्मनाची छबी उमटवण्याचे मशिन अजून तयार झालेले नाही. तोपर्यंत राम ठाकूर यांना अशा बेडुक उड्या सर्वत्र मारता येतील. आता मोदी लाट आहे. काँग्रेसचे सरकार जाणार आहे. त्यामुळे अजून दोन महिन्यांनी उसण भरलेली ही पाठ कुठे गेली असेल याचा अंदाज आज तरी लावता येत नाही. मात्र, जाता जाता राहुल नार्वेकरांच्या पाठीत गुद्दा मारून जाणार हे मात्र निश्चित.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा