गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

कठीण समय येता कोण कामास येतो?


तदितर खग भेणे वेगळाले पळाले।

 उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।।


स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।

 कठिण समय येता कोण कामास येतो।।

अशी एक बालभारतीच्या पुस्तकात कविता होती. नलराजाने राजहंसाला पकडल्यावर मला सोड, बंदी बनवू नकोस अशी विनवणी करताना तो हंस हे विचार व्यक्त करत असतो. जर सर्वशक्तीनीशी सर्व हंसाचा थवा मदतीला धावून आला असता, तर मी संकटात सापडलो नसतो; पण कठीण समय येता कोण कामास येतो? आज अशीच परिस्थिती देशाची राज्याची झालेली आहे. सध्याचा काळ कठीण आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर आहे. देशभर हाहाकार माजला आहे. रुग्णालयांमध्ये पुरेशा संख्येत खाटा उपलब्ध नाहीत, प्राणवायूचा पुरेसा साठा नाही, कोरोनाग्रस्त रुग्णांना लवकर बरे करण्याची क्षमता असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा आहे, शेवटचा उपाय म्हणून डॉक्टर्स जे स्टेरॉईडचे इंजेक्शन्स लावतात, तेही उपलब्ध नाहीत. कुठे चुकून उपलब्ध असेलच, तर त्यासाठी दुप्पटीने पैसे घेऊन रुग्णांच्या नातेवाईकांची लूट केली जाते. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता आहे, अशांचे नातेवाईक अक्षरश: वणवण भटकत आहेत. ज्यांची ओळख नाही, ज्यांच्या खिशात पैसे नाहीत, त्यांचे फारच हाल होताना दिसताहेत. वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकांचे प्राण जात आहेत. अनेक शहरांमध्ये घाटांवर मृतदेहांवर अन्त्यसंस्कार करण्यासाठी वेळेत जागाही मिळत नाहीय, अशी दयनीय स्थिती होऊन बसली आहे. अशा परिस्थितीत जो मदतीला धावू न येतो तो आपला म्हणावे लागेल. म्हणजे एकीकडे स्वत:ला जुगाराच्या पणावर लावणारे आयपीएलचे शेकडो खेळाडू की ज्यामध्ये ८० टक्के भारतीय खेळाडू आहेत. त्यांना आपले म्हणावे का असा प्रश्न पडताना दिसतो आहे. याचे कारण आॅस्ट्रेलियन खेळाडू लाखो रूपयांची मदत या संकटग्रस्त परिस्थितीत भारताला करत आहेत. कालच ब्रेट लीने ४० लाखांपेक्षा जास्त रक्कम भारत सरकारला मदत दिली. पण आपला कोटयवधींचा लिलाव करून विकल्या गेलेल्या भारतीय खेळाडूंकडून अजून कोणी मदत दिलेली दिसत नाही. त्यामुळे कठीण समय येता कोण कामास येतो असे म्हणावे लागेल.


जे देशबांधव आपल्यावर भरभरून प्रेम करतात तेच अडचणीत असताना, आपण काही जबाबदारी घेतली पाहिजे हे खेळाडू, सेलीब्रेटिंनी जाणले पाहिजे. एक सचिन तेंडुलकर आपले नाव गुप्त ठेवून सातत्याने कुठे ना कुठे धर्मादाय मदत करत असतो. पण सचिनचा विक्रम मोडण्यासाठी प्रयत्न करणारे बाकीचे खेळाडू या कामगिरीची बरोबरी करत नाहीत याचे आश्चर्य वाटते. तोच प्रकार बॉलीवूडबाबत आहे. सलमान खान, सोनू सूद यांच्यासारखे काही कलाकार वगळता किती जण देशवासीयांच्या या काळात मदतीचा ओघ घेऊन आले आहेत? त्यामुळे जनतेने लक्षात घेतले पाहिजे की, कठीण समय येता कोण कामास येतो?

या कठीण काळात जात-पात-धर्म-पंथ-भाषा असा कुठलाही भेद न करता प्रत्येकाने जमेल तेवढी मदत इतरांना करण्याची आवश्यकता आहे. ज्याला कोरोनाची लागण झाली आहे, त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना धीर देण्याची गरज आहे. त्यांना घाबरवून सोडत वा-यावर सोडणे हे माणुसकीला धरून नाही. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये ज्या मोठमोठ्या सोसायट्या आहेत, त्या सोसायट्यांमध्ये जर कुणाला कोरोनाची लागण झाली, तर ज्या फ्लॅटमधील तो रहिवासी असतो, त्याला प्रचंड त्रास होतो. शेजारपाजारी दारं बंद करून घरातच बसतात. कुणाच्या घरी मृत्यू झाल्यास त्या अगदी शेजारच्या घराजवळ जाण्यासही कुणी तयार नाहीत. आपल्यालाही कोरोनाची लागण होईल, ही भीती जरी त्यामागे असली, तरी असे वागणे योग्य नाही. कोरोना होऊ नये यादृष्टीने जी काळजी घेणे आवश्यक आहे, ती संपूर्ण काळजी घेऊन शेजारपाजारच्यांना वा गरजूंना मदत करणे हाच खरा मानवता धर्म आहे. समाजाचा एक घटक म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडणे, ही आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे. या कठीण काळात मदतीसाठी आपण धावले पाहिजे हे शिकवावेलागत असेल तर किती वाईट आहे हे? ही भारतीय संस्कृती आहे का? पण आज लोक मदतीला जाताना दिसत नाहीत हे वाईट आहे. चांगले वाइट दिवस प्रत्येकावर येत असतात. पण प्रत्येकाने प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे हे गरजेचे आहे.


मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे. आपल्या बुद्धीचा वापर नेमका कशासाठी करायचा, याचा विचार करून निर्णय करणे अपेक्षित आहे. आज आपल्या शेजारच्यावर जी वेळ आली, ती उद्या आपल्यावरही येऊ शकते आणि त्यावेळी जर कुणी मदतीला आले नाही तर काय होईल, याचा एकदा तरी विचार प्रत्येकाने करायलाच हवा. आज आयपीएलच्या सगळ्या भारतीय खेळाडूंनी आपण वर्षभर आयपीएल, अन्य सामने, जाहिराती यातून प्रचंड पैसा कमावतो. त्यातील काही भाग जनहितार्थ सरकारला दिला तर काय हरकत आहे? खेळाडू, कलाकारांनी आणि समाजातील मोठ्या व्यक्तींनी धावून आले, तर हे संकट हाहा म्हणता दूर होईल. ही टंचाई संपेल. लसीसाठी लागणारा पैसा, आॅक्सिजनसाठी लागणारा पैसा जमा करण्यासाठी या लोकांच्या सहभागाची गरज असताना ही मदत केली पाहिजे हेआॅस्ट्रेलियन खेळाडूंकडून आम्हाला शिकावे लागत असेल तर काय म्हणायचे? कठीण समय येता कोण कामास येतो असेच म्हणावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: