गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

चव्हाटा

मुक्काम पोस्ट मान्याचीवाडी गावातील पारावर गावकरी बसले होते. मान्याच्यावाडीतील ग्रामस्थ म्हणजे अतरंगी लोक होते. त्यांची किर्ती पार लांबवर पसरली होती. त्यांच्या कथा आणि किस्से अनेकदा पुन्हा पुन्हा ऐकल्या जात होत्या. कारण गावातील प्रत्येक माणूस म्हणजे इरसाल असाच होता. पारावरती माणसं जमली म्हणजे नक्की काहीतरी भानगड आहे, असे म्हणून लोक जमत आणि कानोसा घेत.


कसलीही दवंडी न पिटता आबुराव, बाबुराव, रामराव पारावर आले की, आपोआप मागच्या आळीतून छबुराव येत, पल्याडनं रामराव येत. जगन्या, छगन्या असे सगळे आलटून-पालटून येत आणि पारावर हजेरी लावत; पण ही एकदा सुरू झालेली बैठक तासन्तास चाले. सुरू करून देणारा निघून जायचा आणि ती सभा तशीच चालू राहायची दिवसभर. चक्री उपोषण असते, तसे कोणीतरी खो देणार आणि पहिला गेला की, दुसरा आपली मतं मांडणार. अशा चव्हाट्यावर आज विषय रंगला होता लॉकडाऊनचा.

‘पर कायबी म्हना, सरकार आपल्यासाटी लय करतंय.’ आबुरावनं तंबाखु मळत बोलायला सुरुवात केली तसे बाबुराव म्हणाले, ‘अय... लय सरकारची बाजू लावून धरू नको, समदा इस्कोट केलाय तुझ्या सरकारनं’ या दोघांत हा संवाद सुरू असतानाच छबुरावनं नाक खुपसलं अन् म्हणाला, ‘आरं शिंदळीच्या, तुजंमाजं काय करतोस? सरकार समद्यांचं असतं.’


तसा बाबुराव म्हणाला, ‘व्हय, पर हे सरकार काय आपलं नाई.’

आता बाबुराव पेटला म्हणल्यावर गावातली समदी त्याला चढवायला सरसावलीच. तसा मान्याच्यावाडीचा शिरस्ताच होता हा. एखाद्यानं साप सोडायचा आणि सगळ्यांनी निसती पळापळ करायची. आज मैदानात बाबुराव सापडला म्हणल्यावर समदी जमा झालीच.


आता छबुरावनं तोंड उघडलं, ‘पर तुझा सरकारवर येवडा राग कशापायी?’

बाबुराव तावातावानं म्हणाला, ‘सरकारचं डोकं ठिकाणावर हाय का? देवळं बंद, शाळा बंद, व्यायामशाळा बंद आणि दारूची दुकानं तर सत्ताड उगडी. काय म्हणायचं या सरकारला?’


तसं बराचवेळ गप्प असलेले रामराव उठले अन् म्हणाले, ‘अरं तुला जर येवडं कळतं, तर सरकारला नक्कीच जास्त समजत असंल ना? आपले सीएम अर्धे डॉक्टर झाले आहेत. त्यांना समदं समजतं. आपण त्यो कोरोना हु नाय म्हणून काय करतो? सांग ना काय करतो आपण?’

आता बाबुराव गडबडला. काय उत्तर द्यावे ते त्याला समजेना. तसे रामराव पुन्हा म्हणाले, ‘आता का? बोलती बंद झाली का? काय करतो आपण ते सांग अगुदर.’


बाबुराव म्हनाला, ‘हेच की, ते...आपलं हात धुतो.. अंतर ठेवतो... ते काय फुसफुस करून औषद फवारतो...’

तसा छबुराव म्हणाला, ‘ फुसफुस काय म्हणतोस? शॅनिटायजर म्हणायचं.. काय? शॅनिटायजर... समजलं?’


त्याची री ओढत आबुराव म्हनाला, ‘हा... शनिटायजर अन् तोंडावर शॅनिटरी नॅपकीन गुंडाळायचं.’

आता रामराव खळखळून हसला अन् म्हणाला, ‘ ए सुक्काळीच्या... त्याला शॅनिटरी नॅपकीन नाय म्हणायचं, मास्क म्हणायचं. शॅनिटरी नॅपकीनची जागा वेगळी असते... ख्यॅख्य्यय्यख्या...’


रामरावच्या हसण्यात सगळेच सामील झाले, तसा बाबुराव चिडला अन् म्हणाला, ‘तुमी ना इषयाला बगल देताय.... मंदिर बंद अन् दारूची दुकानं चालू का ठिवली? हा माजा सवाल होता.’

आता समजावणीच्या सुरात रामराव म्हनाले, ‘आरं दारूची दुकानं, बार चालू ठेवली हे फार मोटं काम सरकारनं केलं हाय. आता आपण हातावर ते शॅनीटायजर मारतो... मारतो का नाय? त्यात काय असतं? सांग ना काय असतं? ’


‘काय असतं?’ सगळे तोंडाचा चंबू करून विचारू लागले. तसे रामराव आपल्या बुद्धिमत्तेवर प्रचंड खूश झाले अन् सांगू लागले, ‘आरं... त्या शॅनिटायजर मदी ना आल्कोल असते आल्कोल... म्हजी जे दारूत असते ना तसंच अगदी. आता आपण हातावर शॅनिटायजर मारला, तर हातावरचा जंतू मरेल. पण पोटात गेला असंल, तर काय करणार? प्या लेको दारू आन लावा पळवून तो कोरोनाचा जंतू. त्यासाटी दारूची दुकानं सुरू हायत. आता मला सांग देवळातलं तीर्थ पिऊन काय होणार तुज्या? त्यापेक्षा बाहेरून शॅनिटायजर आणि आतून दारू घ्या आणि आंतरबाह्य स्वच्छ, निर्जंतुक व्हा, असं सरकारला सुचवायचं आहे.’

रामरावचं बोलणं झाल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ‘लई बेस.. लई बेस बोलला बगा तुमी रामराव. आवं आपल्या गावात जिवडं पेशंट सापडलं, त्यात जास्ती बायकांची संख्या आहे. का विचारा, विचाराना का?’ छबुराव उत्साहात बोलत होता. तसे सगळ्यांनी एकसुरात विचारले, ‘का?’


तसा जोरात सात मजली हसत छबुराव म्हणाला, ‘कारन, आपल्या गावात बायका दारूच पित न्हाईत. मग आतून स्वच्छ हुनार कशा?’ यावर सगळे जण खो-खो हासले. ते हासणं अगदी गावभर पसरलं.

बराचवेळ पारावर या सगळ्या गप्पा ऐकत बसलेल्या गण्यानं मग तपकिरीची चिमुट काढली आणि नाकात सरकावली. पाच-सहा जोरात शिंका दिल्या, तसे सगळे त्याच्यापासून लांब झाले. येक जण म्हणाला, ‘आरं गन्या, तुला काय अक्कल-बिक्कल काय हाय का नाय? आरं शिंकायला खोकायला बंदी हाय. तोंडावर, नाकावर रूमाल तरी धरायचास ना?’


तसा शांतपणे गण्या म्हणाला, ‘आरं म्या भी कोरोनाशी लढा देतोय. नाकात तपकीर कोंबून इतक्या शिंका देतो की, तो आत जंतू घुसला असेल, तर तपकिरीने पार निघून गेला पाहिजे. आता तोंडावर रूमाल ठेवून तो रूमालात न्हाई घुसायचा? आरं असलं काही जंतू राहू नाहीत, म्हणून तर आपल्या पूर्वजांनी तपकिरीचा शोध लावलाय.’

आता सगळ्यांनीच कपाळावर हात मारला आणि गर्दी पांगायला लागली; पण जाता-जाता पेदाड दत्तू म्हणाला, ‘पन काय बी म्हणा, या शॅनिटायजरनं लईच फायदा झाला.’


आता त्यो आणि कंचा? सगळ्यांनी विचारलं तसं दत्तू म्हणाला, ‘पिऊन घरी गेलो, तरी बायकोला वास येत न्हाई. आला तरी शॅनिटायजर शॅनिटायजर म्हणलं की शांत बसते. द्या टाळी.’

अन् चव्हाट्यावरची सभा टाळी देऊन विसर्जित झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: