झी मराठी वाहिनीवरील येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका प्रेक्षकांना आवडते आहे; पण त्यातील या आठवड्यातले काही भाग इतके विचित्र होते की, एक आई आपल्या मुलीशी अशी वागेल का? एक मुलगी आपल्या आईशी अशी वागेल का?, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. प्रेक्षकांची करमणूक करण्याच्या नादात काही तरी पोरकटपणा दाखवण्याचे या मालिकेन ेटाळले तर ही मालिका चांगली पकड घेऊ शकेल, कारण यातील स्वीटू आणि ओम प्रेक्षकांना आवडत आहेत.
स्वीटूचे मोहितशी लग्न लागावे म्हणून आईचे चाललेले प्रयत्न, मोहितच्या जाळ्यात तिने अडकणे आणि मोहितने तिला बाहेर घेऊन जंगलात घेऊन जाणं, तिथे जंगलात सोडून पळून जाणे हे सगळं स्वीटूसारखी भारदस्त भक्कम मुलगी कशी काय सहन करू शकते? तिला कारमधून जंगलात उतरवतो तेव्हा तिची पर्स, मोबाईल सगळं मोहित घेऊन जातो. त्यानंतर आवाज बदलून जंगलात स्वीटू चुकल्याचे ओमला कळवतो. ओम कुत्र्याला बरोबर घेऊन रात्रीचा तिला शोधायला येतो. मोहित मालविकाला स्वीटू आणि ओम जंगलात मजा करायला गेले आहेत, असे सांगतो. रात्रीचे तीला जंगलात घेऊन येतो. त्यांना स्वीटू-ओम दिसत नाहीत म्हणून जोकरसारखे तू रहायचे असे मोहितला मालविका धमकावते; पण त्याला नंतर जोकर केलेले दाखवले नाही. शिक्षा केलेली दाखवली नाही. विशेष म्हणजे स्वीटू-ओमचा पाठलाग करत त्या ठिकाणापर्यंत पोहोचतात; पण त्या वाटेत मध्येच सोडलेली ओमची कार मालविका आणि मोहितला कशी काय दिसत नाही? रस्ता तर डोंगरातला छोटासा असतो, एकच असतो. स्वीटूचे मोबाईल आणि पर्स जर मोहितने पळवले होते, तर ती रात्री घरी परत येते तेव्हा तिच्या हातात ती पर्स अडकवून येते. ती बॅग तिला कोणी दिली? कशी मिळाली? मोहित तिच्या पुढे घरी येऊन तिच्या विरोधात सांगतो, तरी ती कशी काय गप्प बसते?
जंगलात तिला तिच्या जाडीवरून वाटेल तसे बोलून गाडीतून उतरवून मोहितने आपला अपमान केला हे स्वीटू का सांगू शकत नाही? हे न पटणारे आहे. या मालिकेत सौंदर्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याचा विचार दिला आहे, म्हणून अगोदर कौतुक वाटले. जाड असणे, काळे असणे यावर सौंदर्य ठरत नाही, तर मनावर, समाधानावर ते सौंदर्य असते; पण त्या स्वीटूची किती निर्भत्सना केलेली दाखवली आहे. ती मालविका स्वीटूला जाडीवरून बोलते. भोपळा काय म्हणते, बेडुक काय म्हणते. अशामुळे धष्टपुष्ट खात्या पित्या मुलींच्या मनावर काय परिणाम होईल याचा कुठेतरी विचार करायला हवा.
स्वीटूची आईपण खाण्यापिण्यावर बंधने घालते. एकच इडली खा आणि चालत जा म्हणजे जाडी कमी होईल. तुझ्या अंगाला काहीही मानवतं म्हणून कमी खा असे आई कसे काय सांगू शकते? मुलीच्या लग्नाची चिंता आईला असणे स्वाभाविक असली, तरी आई तिला पोटावर मारू शकणार नाही; पण ती इतकी अगतीक का झाली आहे? वारंवार जाडीमुळे येणाºया नकारामुळे मुलीला ताईत बांधणे, वचन घेणे या प्रकारात मुलीला काहीच बोलू न देणे हे न पटणारे आहे. अर्थात झी मराठीच्या मालिकांचा लपवाछपवी हा फॉर्म्युलाच आहे. नायिकेने किंवा नायकाने काहीतरी लपवून ठेवले, तरच त्यांचे कथानक पुढे सरकते.
तू या जंगलात काय करत होतीस, इथे कशी काय आलीस हे ओम तिला विचारत नाही. जंगलात असे उघडे छान बंगले कुठे मिळतात हा प्रश्नच आहे; पण त्यातही रॉकेलने भरलेला कंदी, काडेपेटी, शेकोटी करायला संधी, छानशी सायकल कशी काय मिळाली? या सगळ्यात दोघांची छान मैत्री फुलून येते, तर त्यात तू इथे कशी काय आलीस हे जाणावेसे ओमला का वाटले नाही? रॉकीला तो सांगतो की, तिथे कशी गेली हे तिला आठवत नाही. तिच्या काय डोक्यावर परिणाम झाला होता का?
या सगळ्या मालिकेत रॉकी मात्र भाव खाऊन जातो. ओम आणि स्वीटूचा छान मित्र म्हणून त्याने चांगले काम केले आहे; पण ओम जेव्हा तिला प्रपोज करणार आहे, त्यावेळी तिला साजेसा ड्रेस ड्रेस डिझायनर का बनवला नाही?खरच तो पांढरा ड्रेस त्यात कमरेभोवती अधिक घोळ आणि फुगवलेला तिची जाडी अधिकच अधोरेखीत करणारा होता. हा डॉल ड्रेस तिला कसा काय दिला होता? त्यापेक्षा छानशी साडी दिली असती तरी चालले असते.
खानविलकर उद्योगात पार्टीशिवाय काही कामे नाहीत का? दर आठवड्याला पार्टी आहेच. मागच्या आठवड्यात सर्वांनी काळे कपडे घालून यायचे पार्टीला असा मालविकाचा आदेश असतो. त्यावेळी मायलेकींचे सत्कार होतात, तेव्हा सगळे जण काळ्या कपड्यात. सुरुवातीला लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी झालेली आहे, आता या आठवड्यात मार्च एंडला बिझनेस चांगला झाला म्हणून, असे दर आठवड्याला खानविलकर पार्ट्या करताना दाखवले आहेत. या पार्ट्यांना बिझनेसचे लोक कमी आणि इतर जास्त असेच दिसतात. त्यामुळे मालविकाने आईचा बिझनेस मोठा केला, सेट केला, म्हणजे नक्की काय केले? या काही विसंगती सोडल्या, तर ही मालिका पुढे रंजक बनेल यात शंका नाही. कारण आता मालविका सासू असणार आहे आणि शकू आई होणार आहे. यात ओमची ओढाताण यातून नेहमीप्रमाणे समज गैरसमजांची मालिका सुरू होणार; पण त्यापूर्वी काही कच्चे दुवे सुधारणे आवश्यक आहे; पण सध्या तरी ही मालिका मुलगी आईला जड झाली म्हणून की जाड झाली म्हणून त्रास होत आहे हे दाखवण्यात गुंतलेली दिसते.
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा