रविवार, १८ एप्रिल, २०२१

आरोग्य क्षेत्राला लागलेला रोग


गेल्या वर्षभरात सर्वात लूट कोणी केली असेल, तर ती आरोग्य क्षेत्राने. माणसांना घाबरवून त्यांच्यावर अनावश्यक टेस्ट लादून आणि भरमसाट महागडी औषधोपचाराची पद्धती वापरून जास्तीत जास्त कसे लुटता येईल तेवढे या क्षेत्रात गैरप्रकार झालेले आहेत. आजही इंजक्शनचा काळाबाजार करणारे एखाददुसरे डॉक्टर पकडले जातात तेव्हा त्यात एकटा कोणी नाही, तर हे फार मोठे रॅकेट असणार हे लक्षात घेतले पाहिजे, पण सापडला तर चोर नाहीतर देवाहून थोर अशी अवस्था आहे. त्यामुळेच लॉकडाऊन आणि रोगापेक्षा या लुटमारीला सामान्य जनता घाबरली आहे. कोरोनाच्या नावाखाली बेड, रेमडेसिवीर आणि अन्य उपचारातून जी लूट होणार आहे तेवढा पैसा सामान्यांकडे नाही. त्यामुळे रोग झाला तरी लोक गप्प बसून राहतील अशी अवस्था आहे. वर्षभरात आर्थिक घडी विस्कटलेली असताना सामान्य माणूस उपचाराला पैसे कुठून आणणार? बेड कुठून मिळवणार? त्यामुळे लपून बसून रोगाचा प्रसार झाला तरी बेहतर अशी अवस्था होताना दिसत आहे. यासाठी या आरोग्य क्षेत्रातील लूटमार थांबवून सर्व उपचार मोफत करेपर्यंत हा रोग या देशातून जाणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आज आरोग्य क्षेत्राला लागलेला भ्रष्टाचाराचा रोग ही फार मोठी समस्या आहे. कोरोनावर विजय मिळवण्यासाठी या रोगातून बाहेर पडणे आवश्यक आहे.

देशातील आणि महाराष्ट्रातील कोरोना महामारीच्या संकटाच्या पाश्‍र्वभूमीवर आरोग्य यंत्रणेशी संबंधित समोर येणाºया विविध बाबींचा तुटवडा आणि टंचाई लक्षात घेता देशातील आरोग्य यंत्रणेला आता जागे होण्याची वेळ आली आहे. या एका गोष्टीवरून राज्य सरकारने केंद्र सरकारवर टीका करणे आणि केंद्र सरकारने राज्य सरकारच्या कार्यक्षमतेला दोष देणे अशा प्रकारचे राजकारण करून आता काहीही साध्य होणार नाही. महाराष्ट्रासह सर्वच राज्यांतील आरोग्य यंत्रणा कमकुवत, अपुरी आणि काही प्रमाणात निष्क्रिय आहे हे मान्यच करावे लागेल. यात काही डॉक्टर, फार्मास्युटिकल कंपन्या, दलाल आपले उखळ पांढरे करून घेताना दिसत आहेत. त्यातून होणारी सामान्यांची ससेहोलपट थांबवली तरच या रोगाचे समूळ उच्चाटन होईल, नाहीतर माणसं उपचार न करता हे दुखणे अंगावर काढतील आणि त्याचा प्रसार सुरू राहील हे लक्षात घेतले पाहिजे.


भारतामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध नाहीत, हे या महामारीच्या संकटाने दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यविषयक योजनांवर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असला, तरी तो संकल्प प्रत्यक्षात येण्यास बराच काळ उजाडणार आहे. त्यापूर्वी संपूर्ण देशातील सध्याचे आरोग्यविषयक विदारक चित्र लक्षात घेण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात आणि देशाच्या कानाकोपºयात प्रसिद्ध होणाºया विविध बातम्यांवर नजर टाकली तर सर्वत्रच या महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेल्या साधनांची टंचाई लक्षात आल्याशिवाय राहात नाही. मुंबईतील नालासोपारा येथे एका रुग्णालयामध्ये आॅक्‍िसजनची कमतरता असल्यामुळे काही रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. नंतर हे वृत्त फेटाळून लावले, पण डझनभर माणसे उपचारातील कोणत्या तरी कमतरतेमुळे दगावली हे विसरून चालणार नाही. हे कशामुळे झाले आहे? वैद्यक क्षेत्रातील लालसा, लुटण्याची प्रवृत्ती, लोकांना घाबरवून टाकण्याचा प्रकार यांमुळे सगळे घडते आहे. म्हणूनच यावर अंकुश ठेवण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत. रुग्णांना जमिनीवर झोपवून किंवा जागा मिळेल तेथे उपचार केले जात आहेत. आॅक्‍िसजन व्हेंटिलेटर या जीवरक्षक साधनांची टंचाई तर प्रचंड प्रमाणात आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले रेमडेसिवीर नावाचे इंजेक्‍शनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे आपल्याकडे लॉकडाऊन आणि संचारबंदी एवढेच पर्याय उपलब्ध असल्याचे दिसून येते, पण औषधांचा पुरेसा साठा, ते योग्य दरात किंवा मोफत देणारी यंत्रणा निर्माण केली, तर ही लूट थांबेल आणि रोगावर नियंत्रणही आणता येईल. गेल्या चार-पाच दिवसांत रेमडेसिवीर या इंजेक्‍शनचा अनेक ठिकाणी काळाबाजार होत आहे हे दिसून आले. सरकारने गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या संकटाला प्रारंभ झाल्यानंतर सरकारी आरोग्य यंत्रणा या संकटावर मुकाबला करण्यासाठी पुरेशी ठरणार नाही म्हणून काही खासगी रुग्णालयांनाही रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी दिली. शिवाय काही नवीन कोविड सेंटर्सही उभारण्यात आली. अनेक खासगी रुग्णालयांनी या संकटात संधी मानून रुग्णांना लुबाडण्याचे काम केले. ते प्रकार आजही चालू असल्याचे दिसते. म्हणून मोफत उपचार आणि उपचारासाठी दिले जाणारे अनुदान बंद केले तर पेशंट पकडण्याचे आणि त्यांच्या नावाची नोंद करून पैसे मिळवण्याचे प्रकार थांबतील. आज रोगापेक्षा यातील गैरप्रकार थांबवण्याचे सरकारपुढे फार मोठे आव्हान आहे.

आजकाल फॅमिली डॉक्टर हा प्रकारच अस्तित्वात राहिलेला नाही. जो तो स्पेशालिस्ट आणि मल्टीस्पेशालिस्ट, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल काढून आरोग्याचे, औषधोपचाराचे फाइव्ह स्टार मॉल उभे करत आहे. या मॉलमध्ये गेल्यावर माणूस रिकाम्या हाताने येतच नाही. मॉलमध्ये फेरफटका मारल्यावर जसे शॉपिंग होते तसेच या हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्यावर रोग बरोबर घेऊनच माणसे येत आहेत हे कटू सत्य आहे. त्यामुळे यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. आज कोरोनाच्या रूपाने सामान्यांना लुबाडायची फार मोठी संधी या क्षेत्राला मिळाली आहे, पण हा होत असलेला ज्ञानाचा दुरुपयोग थांबवला पाहिजे. याने माणसांचे आरोग्यच नाही, तर अर्थव्यवस्था आजारी पडणार आहे. माणसांचा अन्य खरेदीचा पैसा फक्त औषधावर जात असेल तर बाकीचे व्यवसाय बंद पडतील. देशात आर्थिक विषमता तयार होईल इतका हा भयानक रोग आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: