गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

इथे शंकेला वाव आहे

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे शरद पवार कोणत्याही कारणास्तव कुठलीही कृती करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीचे संशोधन हे करावेच लागेल. गेल्या चार दिवसांपूर्वी ते आजारी पडले आणि त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलला दाखल व्हावे लागले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तरीही रुग्णालयात फावल्या वेळात वर्तमानपत्र वाचून राज्यातील, देशातील घडामोडींचा आढावा घेतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. म्हणूनच त्यांची आणि अमित शहांची झालेली भेट आणि त्यानंतर झालेली ही शस्त्रक्रिया म्हणजे नेमके काय आहे? हा योगायोग आहे का?, असा प्रश्न अनेकांना पडणे साहजिक आहे. त्याचप्रमाणे पवार आणि अमित शहा यांची भेट म्हणजे नव्या समीकरणाची नांदी आहे का?, अशा शंकेला इथे वाव निर्माण केलेला आहे.


तसा विचार केला, तर शरद पवार हे कारण नसताना कोणाला भेटणार नाहीत, हे सत्य आहे. मग जर ही भेट झाली असेल, तर त्यात नेमकी कशावर चर्चा झाली आणि त्यात काय ठरले? याबाबत चर्चेची गुर्हाळे सुरू होणारच. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेगवान घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावरील पूजा चव्हाण संदर्भातील आरोप आणि नंतर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सचिन वाझे यांनी ठेवलेली स्कॉर्पिओ, त्यातील जिलेटीनच्या कांड्या, धमकीचे पत्र, स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनची हत्या. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपला सरकारविरोधात आयतेच कोलीत हातात मिळाले. या संधीचा पुरेपूर फायदा विरोधक म्हणून भाजपने उचलला. त्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ झाली. राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. अनिल देशमुख यांनी यात काही चुका झाल्याचे सांगत मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बदलले. सरकारविरोधातील या वातावरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शंभर कोटी रुपयांच्या टार्गेटचा लेटरबॉम्ब फोडला. साहजिकच आधीच गर्तेत अडकलेल्या महाविकास आघाडी सरकारला घाम फुटला. देशमुख यांच्या राजीनाम्याचा विषय राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अख्यत्यारित असल्याचे पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर दुसºयाच दिवशी त्यांनी देशमुख यांचा राजीनामा घेण्याची गरज नाही. संबधित प्रकरणाची समितीमार्फत चौकशी होईल, असे सांगत एका अर्थाने गृहमंत्र्यांना अभय दिला. शरद पवारांचे असे गूढ वागणे नेहमीच सर्वांना धक्का देणारे असते.

आधी धनंजय मुंडे आणि नंतर आर्थिक आरोपांमध्ये गुंतलेले अनिल देशमुख यांचाही राजीनामा घ्यावा, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी पक्षीय बैठकांमध्ये धरला होता. त्याची कुणकुण राष्ट्रवादीला होतीच; पण सिल्व्हासाचे खासदार मोहन डेलकर यांच्या मुंबईत झालेल्या आत्महत्या प्रकरणात भाजपच्या काही बड्या नेत्यांची नावे गुंतल्याची माहिती मुंबई पोलिसांकडे होती. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत भाजपच्या नेत्यांचा जोर कमी करण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न केल्याची एक शक्यता पवार-शहा भेटीबाबत राजकीय सूत्र व्यक्त करत आहेत. अर्थात पवार-शहा भेट झाली की नाही, हेच खरे मानले जात नाही. राष्ट्रवादीने ती भेट नाकारली तर भाजपने त्याबाबत नरो वा कुंजरोवा अशी भूमिका घेतली. त्यामुळे शरद पवार आणि शहा भेटले का? भेटले असतील तर का भेटले? त्यात प्रफुल्ल पटेल यांची मध्यस्ती का होती?, असे अनेक प्रश्न निर्माण केले गेले.


अमित शहा यांनी या भेटीचे वृत्त नाकारले नाही, तसेच त्यांचा गुजरात दौरा त्यांनी आयत्यावेळी एक दिवस आधी केला, असे अनेक संदर्भ भेट झाल्याचे वर्तवत आहेत. कोणा नेत्याने कोणा नेत्याची कोठे आणि कशी भेट घ्यावी हा त्यांचा व्यक्तिगत मामला असला, तरी देशाच्या राजकारणातील दोन मोठे नेते तिसºयाच ठिकाणी भेटतात आणि त्याची बातमी होते, ही राजकीय भेट नक्कीच भविष्यातील घटनांची नांदी ठरू शकत असल्याने त्याची चर्चा तर होणारच. गेल्या काही दिवसांत केंद्रातील विरोधी पक्षांचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे अशी चर्चा आहे. तशा विरोधी पक्षांच्या बैठकाही दरम्यानच्या काळात झाल्या; पण वाझे प्रकरणात शिवसेनेकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत आग्रही राहू नये म्हणून दबाव तंत्र निर्माण करण्याचा हा काही प्रकार आहे का? पवार-शहा भेटीनंतरच शिवसेना नेते संजय राऊत यूपीए आघाडीतील नेतृत्वाचा विषय घेऊन शरद पवारांचे कौतुक करत आहेत. त्यामुळे हे नेमके काय गौडबंगाल आहे हे समजणे आवश्यक आहे.

जेव्हा कोणत्याही राज्यातील विधानसभा निवडणुका होतात, त्यातील निकालानंतर भाजप आपण गमावलेले एखादे राज्य उलथापालथ करून मिळवतो हा आजवरचा इतिहास आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांनंतर भाजपने आॅपरेशन लोटस करून कर्नाटकात उलथापालथ केली. गेल्यावर्षी मध्य प्रदेशात अशीच उलथापालथ केली. आता नंबर महाराष्ट्राचा आहे का? २ मेला पाच राज्यातील निकाल आल्यानंतर महाराष्ट्रात काही गडबड करण्याची ही नांदी आहे काय?, अशा शंकांना यामुळे वाव निर्माण झालेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: