गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

विच्छा माझी पुरी करा


एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले. कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल किंवा स्थानिक पातळीवरील असते, तितकेच तिला ग्लोबल अपील करणे सहज शक्य असते, कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन: पुन्हा कराविशी वाटणाºया ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने सिद्ध केली आहे! आणि हेच या नाटकाचं सर्वात मोठं बलस्थान आहे! पन्नास वर्षांपूर्वी या नाटकाने तमाशा आणि नाटक यांतील भिंत पाडून टाकत नाटकाचा प्रेक्षक तमाशा या कलाप्रकाराकडे वळवला. त्यामुळेच नंतर ‘गाढवाचं लग्न’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, अशी ही साताºयाची तºहासारखे काही नाट्यप्रयोग रंगभूमीवर गाजू लागले. म्हणून ‘विच्छा माझी पुरी करा’ हे रंगभूमीवर बदल घडवणारा मैलाचा दगड आहे.

तमाशातील अश्लिलता वाढत गेली होती. त्यातील पांचट विनोद यामुळे सभ्य समजल्या जाणाºया नाट्यगृहात याचे प्रयोगही होणे बंद झाले होते. तमाशाला वाईट दिवस आले होते. तमाशा हा फक्त जत्रेतल्या फडात चालणारा प्रकार अशी अवस्था होती. त्या काळात खरे तर काळू बाळू, रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर, विठाभाऊ नारायणगांवकर यांचे दर्जेदार तमाशे होत असत, पण नंतर तमाशा या शब्दावरच आक्षेप आला आणि त्याला लोकनाट्य म्हणून संबोधले जाऊ लागले, पण ही एक लोककला आहे. त्याचा एक फॉर्म आहे. तो टिकला पाहिजे. यादृष्टीने वसंत सबनीसांनी ‘विच्छा माझी पुरी करा’चे लिखाण केले. त्याची निर्मिती झाली आणि त्यात महाराष्ट्राला एक अजरामर कलाकार मिळाला तो म्हणजे दादा कोंडके. वसंत सबनीस, दादा कोंडके, उषा चव्हाण यांनी हे नाटक महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून मोठे केले. शहरी प्रेक्षकही या नाट्यप्रयोगाला म्हणजे तमाशाला येऊ लागला. विशेषत: महिलावर्ग हा प्रयोग पाहू लागला हे विशेष.


तमाशा म्हणजे गण, गवळण, बतावणी आणि मग वग. वगामध्ये मुख्य कथानक, पण गण गवळण बतावणी ही प्रत्येक खेपेला वेगळी असते. त्यासाठी बतावणीतील कलाकारांचा अभ्यास, निरीक्षण फार महत्त्वाचे असते. ती ताकद दादा कोंडके यांच्यात होती. दादा कोंडके विच्छाचा जिथे प्रयोग लावला आहे तिथल्या बाजारपेठेत, त्या गावात संध्याकाळच्या सुमारास जाऊन फेरफटका मारून येत आणि सामाजिक, राजकीय परिस्थितीची कुजबूज ऐकत. त्यावर हमखास कोटी करण्याचे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे दादा कोंडकेंची बतावणी ऐकायला, पहायला प्रेक्षक पुन: पुन्हा या नाटकाला येत असत. सर्वाधिक रिपीट आॅडियन्स मिळालेले हे वगनाट्य होते.

सुरुवातीच्या काही प्रयोगांत स्वत: वसंत सबनीस या नाटकात काम करत होते. या नाटकाचे अनेक संच झाले. अनेकांनी या नाटकात काम करून लोकप्रियता मिळवली. दादांनी चित्रपटसृष्टीकडे लक्ष केंद्रित केल्यावर या नाटकाचे प्रयोग राम नगरकर करू लागले. यात त्यांच्या जोडीला नर्तकी म्हणून रजनी चव्हाण होती. उषा चव्हाणची धाकटी बहीण रजनी चव्हाणला दादांच्या काही चित्रपटांतून संधी मिळाली होती. दादांनी उंचीवर नेऊन ठेवलेले हे नाटक तेवढ्याच ताकदीने राम नगरकरही करत असत. त्यानंतर १९९० च्या दशकात विजय कदमने या नाटकाचे प्रयोग सुरू केले होते, पण कायम एव्हरग्रीन असलेल्या या वगनाट्यावर दादांचा शिक्का मात्र कायम राहिलेला आहे.


दादा कोंडकेंची विच्छा पाहण्यासाठी एकदा आशा भोसले आल्या होत्या. आशा भोसले यांना हा प्रयोग इतका आवडला आणि त्यातील दादांचे काम पाहून त्या प्रचंड खूश झाल्या. त्या आनंदात त्यांनी दादा कोंडकेंना एक घड्याळ भेट दिले होते. ते घड्याळ दादांनी अखेरपर्यंत हातात घातले होते.

गेल्या काही वर्षांपूर्वी या नाटकाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम प्रभाकर पणशीकरांनीही केले होते. वसंत सबनीस लिखित विच्छा माझी पुरी करा हे नाटक नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेतर्फे पुन्हा रंगभूमीवर आणण्यात आले होते. छपरी पलंगाचा या मूळ वगावर हे नाट्य आधारित आहे! प्रख्यात मराठी चित्रपट अभिनेते दिवंगत दादा कोंडके आणि राम नगरकर या द्वयीनी हे नाटक एकेकाळी महाराष्ट्रभर गाजवलं होतं. ते आव्हान सांभाळणं सोपं नव्हतं, पण दिगंबर नाईक आणि संजय मोहिते यांनी या नाटकाची धुरा सांभाळली. फय्याजनी या नाटकासाठी पार्श्वगायन केलेलं होतं. यातील पाडाला पिकलाय आंबा हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे! अत्यंत लवचिक फॉर्म असलेल्या या लोकनाट्यात त्या त्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील घटनांवर विनोदी पण मार्मिक टीकाटिप्पणी केली जाते. आत्तापर्यंत या नाटकाचे सय्यां बने कोतवाल या नावाने भोजपुरी हिंदीमध्ये आणि टेम्प्ट मी नॉट या नावाने इंग्रजीमध्ये यशस्वी प्रयोग झालेले आहेत! हे या नाटकाचे फार मोठे यश होते.


दादा कोंडके आणि शिवसेना हे नाते सर्वांना माहिती होते. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांसमोर त्यांनी विच्छाचा प्रयोग केला तेव्हा शिवसेनेवर केलेली एक कोटीही फार महत्त्वाची होती. त्यामुळे हा प्रयोग पाहताना शिवसेनाप्रमुखही खळखळून हसले होते. राजा, प्रधानाच्या प्रसंगात कशी काय हालहवाल विचारल्यावर आता शिवसेना आहे असे सांगून त्यांनी जोरदार टाळ्या घेतल्या होत्या. पण या नाटकाने तमाशा लोककलेला जीवदान दिले, प्रतिष्ठा दिली आणि सभ्यता जपली तर चांगला प्रेक्षक इकडे येतो हे दाखवून दिले हाते. म्हणून विच्छा माझी पुरी करा हे एक दर्जेदार लोकनाट्य म्हणून गौरवले गेले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: