वारीमध्ये भक्तीमार्ग आहे. या भक्तीमार्गाचा पाया प्रेम आहे. प्रेमाचे सर्वोत्कृष्ठ स्थान म्हणजे आई. म्हणूनच आपल्याकडे विठोबा असेल नाहीतर ज्ञानोबा दोघांनाही माउली म्हटले जाते. दोन वारकरी एकमेकांना माउली म्हणतात. प्रत्येक ठिकाणी तो माउलीचे दर्शन घेत असतो. आईचे प्रेम त्याला जाणवत असते. हे प्रेम निरपेक्ष, निस्वार्थ आणि त्यागाने भरलेले असते. म्हणूनच आमची विठाई असते. या विठूमाउलीच्या दर्शनासाठी निघालेली ही वारकर्यांची दिंडी, वारी म्हणजे माहेरी जाण्यासाठी आतूर झालेल्या माहेरवाशिणीसारखी असते. माहेरी गेल्याने जो एका माहेरवाशिणीला आनंद होतो, किंवा माहेरी जाण्याच्या कल्पनेनेच जो आनंद होतो तसाच आनंद आम्हा वारकर्यांना वारी करताना होत असतो. म्हणूनच या वारीतील हे छान भजन आहे, भक्ती गीत आहे, ते म्हणजे जाते माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला । माझ्या मुळच्या घराला ।धृ । माझे मुळचे तिन सासरे ।दोन वाईट आहेत खरे ।एक होता गरीब बिचारा ।मानीत नाहि मी त्याला । ।माझे मुळचे सहा दिर ।काय सांगु त्याचा कुविचार ।काम क्रोध मद मस्तर ।दंभ अंहकार मजला । ।माया मोठी सासू धागंङी ।तिला आहे प्रपंचाची गोङी ।येता जाता हानीती थापङी ।मारिते गालाला । ।आशा मनशा तृष्णा कल्पनेने ।घात केला चोघी जनिने ।वासना मोठी ननंद चावटी ।गांजीताती मजला । ।मोठ्या होसेने पति म्या केला ।परी तो बोलत नाही मजला ।जाउनी मोन रूपी राहीला ।जाते तयाच्या घराला । ।ऐसी मुक्ताई गान्जली । साधू संताशी शरण गेली ।जाउनी मिळाली । आपुल्या स्वरूपाला । ।सासरी आल्यावर जे तीन सासरे भेटले त्यातले दोन अतिशय दुष्ट आहेत, वाईट आहेत त्यांना सोडण्यासाठी आणि उरलेल्या एका सासर्याला जवळ करण्यासाठी ही वारी करते आहे. म्हणून मला माहेरी यायचे आहे, हा आहे भाव. सत्व, रज, तम यातील सत्व हा सासरा जवळ करायचा आहे बाकी तम आणि रज हे दोन बाजूला सारायचे आहेत. यासाठी मी माहेरी चाललेली आहे, म्हणून ही वारी आहे. या वारीच्या मार्गाने प्रवास करताना आम्ही दुर्गुण सोडणार आहोत आणि निर्मळ मनाने भगवंतापाशी जाणार आहोत त्याचीच ही तयारी आहे.या वारीच्या मार्गावरून मी माहेरी का जाते आहे? मी माउलीला भेटायला, विठाईला भेटायला का जात आहे तर इथे माझ्याकडे सहा दीर आहेत. हा सहा दीर म्हणजे षडरिपू आहेत. त्या षडरिपुंवर विजय मिळवण्यासाठी मला वारीचा मार्ग स्विकारायचा आहे. माझ्या सासरी काय आहे तर माया नावाची सासू आहे. ही महामाया मला मोहात अडकवून सतत अडचणीत आणते आहे. त्या मायारूपी सासूला सोडून मला सत्याकडे जायचे आहे.या सासरी कोण आहे आणखी? तर माझी नणंद आहे. ही नणंद म्हणजे वासनारूपी गांजणारी वृत्ती. या वासनेपासून मला दूर व्हायचे आहे आणि माझ्या माउलीला भेटायचे आहे. किती सुरेख वर्णन आहे या अभंगात. वारीला जाण्यासाठी नेमका कोणता भाव मनात असला पाहिजे याचे अत्यंत समर्पक आणि साधेसोपे वर्णन. कोणालाही कळेल असे हे वर्णन या अभंगांमधून आपण वर्षानुवर्ष ऐकतो आहोत म्हणून तर हे अभंग कायम अभंग राहिले आहेत. असे अभंग म्हणत, माउलीचे नामस्मरण करत आनंदाने या वारीत आपण सामील होणार आहोत. आज माहेरी जाण्याचा हा आनंद घेणार आहोत.पायी केल्या जाणार्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती.त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म आहे. याचे आचरण होताना आपोआप आत्मशुद्धी होते. आज ही अनेक शतकांची परंपरा कोरोनासारख्या संकटाने, महामारीने खंडीत पडण्याची वेळ आली आहे. पण ती खंडीत करण्याचे काम कोणीही करू शकणार नाही. अहो चिखलापासून पाणी वेगळे करता येते का? पाण्याचा प्रवाह काठीचा वार करून खंडीत होतो का? तसेच हा भक्तीभाव, ही भक्तीगंगा कोण तोडू शकणार? शतकानुशतके ही परंपरा या महाराष्ट्रात आहे ती खंडीत करण्याची ताकद कोणातच नाही. व्हॉटसअपवर एक मेसेज फार छान पडला होता. कोरोनाचा विषाणू त्या परेश्वराला, देवाला, माउलींना म्हणतो की, पाहिली का माझी ताकद? केली ना तुझी मंदीरे बंद? पण माउली हसत त्या विषाणूला सांगतात की, अरे तू फक्त मंदीरे बंद केलीस, पण मी तर या देशातील प्रत्येक घराचे मंदीर केले. म्हणूनच तर लोक या लॉकडाउनच्या काळात वेळ मिळाला म्हणून का होईना देवाची पूजा करू लागले. ग्रंथ पठण करू लागले. वाचन करू लागले. एकमेकांशी कुटुंबियांशी प्रेमाने विचारपूस करू लागले. नाहीतर एरवी घरच्या माणसांना वेळ देण्यासाठी वेळ होताच कुठे? घरातील एकोपा वाढला, स्वच्छता वाढली. जिथे स्वच्छता आहे तिथे देव आहे. जिथे शांतता आहे तिथे देव आहे. त्यामुळे कोरोनाने मंदीर बंद केली पण प्रत्येक घर आज पवित्र झाले आहे. त्याचप्रमाणे ही वारी बंद पाडली असे जर या विषाणूला वाटत असेल तर या वारीची रांगच एवढी वाढली आहे की आज प्रत्येकजण विष्णूमय, विठ्ठलमय होउन घरात बसला आहे. ती वारी खंडीत करण्याची ताकद नाही हो कोणातच. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे. ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला; परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते. म्हणून तर आमची पहिली घोषणा आहे ती पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल।... श्री ज्ञानदेव तुकाराम.... पंढरीनाथ महाराज की जय....पुंडलिक हा परम मातृपितृभक्त होता. या मातृपितृ भक्ताने आई वडिलांची सेवा करण्यात धन्यता मानली. त्यामुळेच साक्षात विठोबा त्याला दर्शन देण्यासाठी आला. नको रे बाबा विठोबा, मला तुझे दर्शन घेण्यासाठीही वेळ नाही. मला माझ्या आईबापांची सेवा करायची आहे, ती झाल्यावर वेळ मिळाला तर तुझे दर्शन घेईन. हाच कर्मयोग आहे. हाच खरा कर्मयोग आहे. आपले जे कर्म आपण करणार आहोत, ते महत्वाचे असते. कर्म हाच धर्म आहे. कर्मयोग्यालाच ईश्वर जवळ करतो. त्यालाच विठ्ठल भेटतो. हाच सिद्धांत आम्हाला वारीत समजतो. म्हणून एक तरी वारी प्रत्येकाने करावी. वारीचा हा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे. कारण प्रत्येकाला आपल्या आईचे प्रेम हवे आहे. ही विठाई, ज्ञानाई, तुकाई सगळ्या आमच्या आया इथे भेटतात. कृष्णाला फक्त एकच आई नव्हती. देवकी होती, यशोदा होती, तशाच गोकुळातील प्रत्येक गवळण ही कृष्णाची आई होती. तसेच आपल्यातील आत्म्याला, आपल्यातील परमेश्वराला अशाच अनेक आयांचे दर्शन घडवण्यासाठी या माउलीबरोबर आपण पालखी वहात ही वारी घेउन चाललो आहोत. जाताना म्हणतो आहोत की जाते माहेराला जाते माहेराला... प्रफुल्ल फडके/9152448055..................
रविवार, २१ जून, २०२०
जाते माहेराला जाते माहेराला
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा