तशी कोणत्याही संकटाची संधी आपल्याला मिळते का याचा फायदा काही करून घेता येतो का असा विचार विरोधकांच्या मनात सतत घोळत असतो. म्हणजे एखादी नैसर्गिक, मनुष्यनिर्मित किंवा कसलीही आपत्ती आली तर त्यात सरकार कसे निष्क्रिय आहे आणि काही काम करत नाही हे आपल्याला दाखवता आले तर आपल्याला संधी मिळेल असा भाव विरोधकांमध्ये असतो. पण हा भाव म्हणजे कोल्ह्याला द्राक्षे आंबट का कथेतील भागाप्रमाणेच असतो.
आज कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आहे. या परिस्थितीत सरकार काही ना काही उपाययोजना, प्रयत्न करत आहे. मग ते केंद्र सरकार असो वा राज्य सरकार. प्रत्येकजण याची जाणिव आपल्या राज्याला लागू नये यासाठी प्रयत्न करत आहे. पण या दोनही सरकारांचे विरोधक मात्र टीका करण्याशिवाय काही करत नाही हेच दुर्दैव म्हणावे लागेल. केंद्रात मोदी सरकार सतत प्रयत्नशिल आहे. तर त्यावर टीका करण्यापलिकडे काँग्रेसचे नेते, राहुल गांधी, सोनिया गांधी हे काहीही करताना दिसत नाहीत. तोच प्रकार राज्याच्या बाबतीत आहे. ठाकरे सरकार या परिस्थितीत उत्तम कामगिरी करत आहे. जनहितासाठी धडपडत आहे. पण त्यांच्यावर टीका करण्याचे काम भाजप नेत्यांकडून होताना दिसते आहे. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस हे त्यासाठी एकही संधी सोडत नाहीत. पण केंद्रातील असो वा राज्यातील असो विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध हा प्रकार थांबवला पाहिजे. या संधीचा फायदा आपल्याला सरकार स्थापन करण्याची संधी मिळेल असे पाहण्यात काहीही अर्थ नाही .
एकीकडे कोरोनाचे महासंकट आणि दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळ’ यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे असे भासवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. पण सरकार पाडण्यासाठी किंवा सरकार विरोधी वातावरण निर्माण करण्याची ही ती वेळ नाही हे विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे. कारण महाविकास आघाडीला अपयश आल्याचे वाटत असले तरी सरकार पडत नाही. अर्थात सत्तेत असलेल्या काँग्रेसनेच काही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काही अर्थ नाही. कारण आपल्याला निर्णय प्रक्रियेत स्थान नाही हे टुमणे गेली कित्येक दिवस काँग्रेस नेत्यांनी लावले आहे. त्यामुळेच नेमके काय होणार हे समजत नाही. काँग्रेसला आपण सत्तेत आहोत की विरोधात आहोत हेच समजेनासे झालेले आहे असे दिसते.
महाराष्ट्रात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षाच्या महाआघाडीचे सरकार आहे. सध्या काँग्रेस पक्षात अस्वस्थता असली तरी तो दबावाचा एक भाग आहे. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार या काँग्रेसच्या अस्वस्थतेमुळे कोसळणार नाही, शेवटी सत्ता ही तिन्ही पक्षांना हवी आहे. सध्या ठाकरे सरकार राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या रिमोट कंट्रोलवर चालत असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसत आहे. याची जाणीव मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना असल्याने त्यांनी रायगड जिल्हयाच्या निसर्ग वादळ नुकसानीची पहाणी करण्यासाठी काँग्रेसचे मंत्री अस्लाम शेख यांना बरोबर नेले होते.
खरं तर महाराष्ट्रात सहा महिन्यापैकी पहिले दोन महिने तर राज्य सरकारची सत्ता संपादनासाठी गेले, तर 80 ते 85 दिवस कोरोना विषाणू महामारीत चालले आहेत. अशावेळी काँग्रेसने धोक्याची घंटी वाजवली आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील काँगेस नेत्यांना सरकारात मंत्री म्हणून रहावे असेच वाटते, सत्ता गेल्यानंतर 5 वर्षात किती वाताहत झाली याची पुर्ण जाणीव महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना आहे. दिल्लीत काँग्रेसश्रेष्ठी शिवसेनेबरोबर सत्तेत जाण्यासाठी मुळीच तयार नव्हते.परंतू राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे सेनेकडून सर्व सहयोग लेखी आश्वासन घेतल्यानंतर काँग्रेस सत्तेत सहभागी झाली. काँग्रेसची निती आतापर्यंतची पाहिली तर अशीच आहे. सरकार बनविण्यासाठी पाठींबा द्यायचा, वेळप्रसंगी सत्तेतही सहभागी सामील व्हायचे आणि नंतर सरकार पाडायचे ही खेळी दिल्लीत सन 1977 ते 1980 मध्ये झाली. त्यानंतर कर्नाटक व इतर राज्यातही काँग्रेसच्या भरवश्यावर जी सरकारे राहिली ती फार महिने टिकली नाही. त्यामुळे आपल्या परंपरेला साजेसा कावा करण्यासाठी आणि हे सरकार कोसळवण्यासाठी आज काँग्रेस आतूर झाली आहे. मुख्यमंत्र्यंना कोंडीत पकडण्याचे डाव चालले आहेत. पण हे काही चांगले नाही. ही ती वेळ नाही हे काँग्रेसने लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे जर काँग्रेसने सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी केली आणि हे सरकार अल्मतात आले तर त्यामुळे काँग्रेसची आणखी कमी किंमत होईल. गेल्या सहा सात वर्षात काँग्रेसची वाताहात झाली आहे ती आणखी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अशा संकटग्रस्त परिस्थितीत सरकारला अडचणीत आणण्याची संधी कोणीही पहात असेल तर ती आंबट द्राक्षांची गोष्ट ठरेल. वेलावर उंच असलेली द्राक्षे कोल्ह्याला उड्या मारूनही तोडता येत नाहीत तेंव्हा ती द्राक्षे आंबट आहेत, खायला नको असे म्हणून त्याचा नाद सोडण्याची वेळ येते. तशीच परिस्थिती काँग्रेसची झाल्याशिवाय राहणार नाही.
काँग्रेसची मूळ धर्मनिरपेक्षतेची परंपरा पाहता, एका कट्टर हिंदूत्वावर उभी राहिलेल्या शिवसेनेबरोबर जाणे हे केवळ भाजपला बाहेर ठेवण्यासाठी असले तरी यात आमचे (काँग्रेस) नुकसान आहे हे हेरूनच काँग्रेस आपली चाल खेळत आहे. मग संजय निरूपम सरकार विरूध्द बोलतात त्यानंतर त्या पाठोपाठ राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण आपली नाराजी व्यक्त करतात. त्यावर उध्दव ठाकरे फोनवर बोलून कसे बसे सरकार टिकवतात आता तीच रि ओढून पुन्हा महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सरकारविरूध्द सुर लावतात. विदर्भाचे दोन वजनदार नेते विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उर्जामंत्री नितीन राऊत हे राहुल गांधींना दिल्लीत जाऊन भेटतात, त्यानंतर राहुल गांधी उध्दव ठाकरे फोनवर चर्चा होते आणि म्हणे संकट टळले, आता खरा प्रश्न आला आहे. राज्यपाल नामनियुक्त 12 जागांचा, यामुळे काँग्रेसला समान वाटा हवा आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेन त्यांना दोन जागा देण्याचे म्हटले आहे. त्यास काँग्रेस नेत्यांचा विरोध आहे. राज्यसभेच्यावेळी राष्ट्रवादीने दोन जागा घेताच, विधानपरिषदेच्या 9 जागांच्यावेळी काँग्रेसला केवळ एकच जागा दिली. यामुळे पक्षांतर्गत नाराजी उघडपणे आहे. पण नाराजी व्यक्त करण्याची ही ती वेळ नव्हे. समसमानचा मुद्दा काढत आता राज्यपाल नियुक्त आमदारात आपल्याला समान हिस्सा मिळावा यासाठी काँग्रेसने आग्रह धरला आहे. पण हट्ट करण्याची ही वेळ नाही हे काँग्रेसने लक्षात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे देश संकटात असताना सरकारला मदत करण्याऐवजी विनाकारण टीका करण्याऐवजी केंद्रातही काँग्रेसने सहकार्य केले पाहिजे. तसेच राज्यात भाजपनेही मागितली तर मदत करू, हवे तर सहकार्य करू अशी भूमिका न घेता, आपणहोउन मदतीला गेले पाहिजे. कारण ही सरकार पाडायची वेळ नाही. पाडायला जातील तर त्यांचेच दात घशात जातील. अन द्राक्षे आंबट आहेत म्हणून नाद सोडावा लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा