कोरोना रूग्णांचा वाढता आकडा, लोकांची होणारी गर्दी पाहता पुन्हा लॉकडाउन घोषीत केला जाईल अशी भिती सध्या निर्माण केली जात आहे. कोणी नेतेमंडळीही तसे संकेत देत आहेत तर आतल्या आवाजात अनेक लोक तशी शक्यताही व्यक्त करत आहेत. पण राज्याला आणि देशाला आता पुन्हा कठोर लॉकडाऊन परवडणारा नाही, याचे भान केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्यासोबतच नागरिकांनी ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्याला यातून बाहेर पडायचे आहे आणि नव्याने सुखी जीवन सुरू करायचे आहे याचे भान प्रत्येकाने राखले पाहिजे. त्यामुळे मिळालेल्या किरकोळ सवलतीत कधी नवे ते मिळालं आणि गटकन गिळालं अशी अवस्था न करता थोडा संयम बाळगणे गरजेचे आहे. आज जी गर्दी दिसत आहे त्याकडे पाहिल्यावर अनावश्यक लोकच खूप गर्दी करत असल्याचे दिसून येते आहे.
जगभरात कोरोनाचे संकट अजूनही घिरटया घालत आहे. जागतिक महासत्ता सोडाच, परंतु बडया बडया विकसित देशांनाही कोरोनावर निर्णायक मात करता आलेली नाही. आपल्याकडे औषधे निघाल्याचे, लसी सापडल्याचे दावे अनेकांनी केले आणि ते फोलही ठरले. कोणत्या महिन्यात, कोणत्या वर्षात यावर लस सापडेल, हा रोग आटोक्यात कधी येईल याबाबत रोज नवे दावे केले जात आहेत. पण सारेच कोरोना लसीच्या शोधात आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनांनी काही अटी नियम घालून दिले आहेत. तोंडावर मास्क बांधा, सुरक्षित अंतर ठेवा, वारंवार हात साबणाने धुवा अशा उपाययोजना करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनांनी दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारने वारंवार केले आहे.किंबहुना कोणालाही फोन लावला तर अगोदर दीड मिनिटापर्यंत ती रिंगटोन ऐकूनही आता लोकांना कंटाळा आला आहे. गेले दोन अडीच महिने आपण कोणालाही फोन लावला तर त्याच सूचना ऐकायला मिळत आहेत. कुठेही रस्त्यावर टीव्हीवर तेच विषय चघळले जात आहेत. त्याच्याच जाहीराती होत आहेत. टीव्ही सुरू केला की कोरोनापासून संरक्षण करण्याच्या जाहीराती अन फोन लावला की त्या सूचना तोंडी ऐकायला मिळतात. म्हणजे यासाठी आम्ही लॉकडाउन झालो का? लोकं टिव्ही पहात नव्हते म्हणून सक्तीच्या जाहीराती पाहण्यासाठी हा लॉकडाउन करून आम्हाला डांबून ठेवले आहे काय? असंख्य प्रश्न आहेत. कारण माणसं लॉकडाउनला जाम वैतागली आहेत. त्या वैतागाचा विस्फोट झाला तर तो रोखणे अवघड आहे. म्हणूनच आता लॉकडाअन नको रे बाबा म्हणायची वेळ आलेली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. दोन महिन्यांच्या काटेकोर अंमलबजावणीनंतर हळू हळू लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न आहे. या कोरोनाने नागरिकांचे केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आणले नाही तर त्यांचे आर्थिक आरोग्यही धोक्यात आणले आहे. या दुहेरी संकटांची कोंडी फोडण्याचे प्रयत्न सर्वच स्तरातून सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लॉक डाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने सूट देण्याची भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घेतली आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे आपल्याला खूप सावध राहावे लागणार आहे. जे सरकार अतिशय सावधतेने पावले टाकत असून कुठेही गडबड न करता लॉक डाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथीलता आणण्यात येत आहे. तथापि, अनलॉक होताच रस्त्यावर, बाजारांमध्ये लोकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. ही उघडीप जीवघेणी ठरतेय असे वाटले तर नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा लागू शकतो, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. म्हणूनच आता कोंडून घेण्याची वेळ येउ नये असे वाटत असेल तर विनाकारण घराबाहेर पडणारांनी, गर्दी करणारांनी थोडा संयम ठेवला पाहिजे.
घराबाहेर पडताना मास्क वापरणे, शारीरिक सुरक्षित अंतर राखणे आणि स्वच्छता राखणे ही त्रिसूत्रीच कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, मुंबईकरांची गरज लक्षात घेता, उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्याची अपेक्षाही त्यांनी रेल्वे मंत्रांकडून व्यक्त केली आहे. राज्यात आणि देशात कोरोना मुक्तीची पहाट व्हावी, याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. राज्यासह देशात कोरोना मुक्तीची पहाट होत असताना, नागरिकांना भेडसावणार्या प्रश्नांकडेही डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. आज माणसं घरी आहेत, मुलं घरी आहेत. शाळा कॉलेजचा पत्ता नाही. अशा अवस्थेत किती दिवस आपण बसणार आहोत? म्हणूनच लॉकडाउन पूर्णपणे उठण्यासाठी आता अनावश्यक फिरणारांनी याची काळजी घेतली पाहिजे. राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना नोकरीत रुजू होण्याचे आदेश एकीकडे देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या अत्यावश्यक सेवेतील कामगार, कर्मचार्यांनी आपल्या कार्यालय आणि कचेरीत पोहोचायचे कसे, हाच रोकडा सवाल आहे. मुंबईतल्या नरिमन पॉईंट भागात मंत्रालय, विधानसभा आहे. फोर्ट भागात महानगरपालिकेचे मुख्यालय आहे. बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली कल्याण, वसई विरार या भागात राहत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना मुंबईच्या दक्षिण टोकाकडे असलेल्या या कार्यालयांमध्ये पोहोचण्यासाठी बेस्ट बसेस आणि एसटीला दोन - दोन चार - चार तास लागणार असतील, या प्रवासात सुरक्षित अंतर राखले जाणार नसेल तर त्याचा फायदा ना कामगारांना ना सरकारला. उलट अशा द्राविडी प्राणायामातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक. अत्यावश्यक सेवा क्षेत्रातील कामगारांना त्यांचे घर आणि कार्यालय यामध्ये ये जा करण्यासाठी बेस्ट आणि एसटी बसेस अपुर्या ठरत आहेत. या बसेसमध्ये अत्यावश्यक सेवा क्षेत्रातील कामगारांची प्रचंड गर्दी उसळत आहे. त्यामुळे सुरक्षित अंतराच्या नियमांचे तीन-तेरा वाजत आहेत. अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलीस यांना एकीकडे कोविड योद्धा म्हणून गौरवायचे आणि दुसरीकडे त्यांच्या येण्याजाण्याच्या हाल-अपेष्टांकडे दुर्लक्ष करायचे, हे काही बरोबर ठरणार नाही. अत्यावश्यक सेवेतील कामगार-कर्मचार्यांना भेडसावणार्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कोरोना विरुद्धची लढाई लढता येणार नाही. एकीकडे नोकरी जाण्याचे तर दुसरीकडे कोरोना होण्याचे भय अत्यावश्यक सेवेतील कामगार कर्मचार्यांना परवडणारे नाही. अत्यावश्यक सेवेतील या कर्मचार्यांना आपला जीव धोक्यात घालून गर्दीतून प्रवास करण्याची काही हौस नाही, हेही सत्ताधार्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवा क्षेत्रातील कामगार आणि कर्मचार्यांसाठी मुंबई उपनगरीय लोकल सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करणे हाच योग्य उपाय आहे. तेव्हा केंद्र सरकारने विशेषतः रेल्वे मंत्रालयाने या उपायाची तातडीने अंमलबजावणी करणे देशहिताचे ठरेल. त्याच बरोबर तोंडावर मास्क आणि शारीरिक सुरक्षा न पाळणार्या चुकार नागरिकांवर कठोर कारवाई केली जाणे आवश्यक आहे. राज्याला आणि देशाला आता पुन्हा कठोर लॉकडाऊन परवडणारा नाही, याचे भान केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्यासोबतच नागरिकांनी ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण आता पुढचे लॉकडाउन लागले तर फार वाईट अवस्था असेल. तीच ती परिस्थिती पुन्हा नको असेल, नव्या संकटांना तोंड द्यायला नको यासाठी आता आपण सावध राहिले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा