मंगळवार, ३० जून, २०२०

‘भ़क्तीचा उमाळा वेगाने होण्याचा काळ


वारीच्या नियोजनानुसार आता सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात वारी पुढे सरकत आहे. विठ्ठलाच्या अधिकाअधिक जवळ वारी पोहोचत आहे. जसजसा एकादशीचा दिवस जवळ येवू लागतो तसतसा हा आनंद, ही विठ्ठल भेटीची ओढ वेगाने वाढत जाते. कधी एकदा या विठ्ठलाच्या पायावर डोकं टेकून आपल्या आयुष्याचं सार्थक करून घेवू अशी ओढ लागते. तुकारामांच्या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे भेटी लागी जीवा, लागलीसे आस म्हणजे नेमके काय ते या आठवड्यात वारकरी अनुभवताना दिसेल. मजल दरमजल करत एकेक गांव, शहर, तालुका, जिल्हा मागे टाकत आता पंढरपुराच्या दिशेने पावले पडत आहेत.
 वारकर्यांच्या दींडीचा मार्ग म्हणजे प्रेमभक्तीचा मार्ग. समर्पणाचा मार्ग. हे समर्पण म्हणजे आपल्यातील अहंकार, गर्व, मत्सर या भावनांचा त्याग करण्याचा मार्ग. जे काही आहे ते या वारीत आहे. जे काही घडते आहे ते या पांडुरंगामुळे घडले आहे. कर्ता करवता तो आहे हे समजण्याचा मार्ग. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी अर्जूनाला गीता सांगताना जे काही घडते आहे ते माझ्या इच्छेने सांगितले. सगळं काही माझ्यामुळे आहे, माझ्या इच्छेने घडते आहे. जे तू करत नाहीस त्याचा शोक का करतोस असे सांगून आपल्या कर्तव्यापासून च्यूत होणार्या अर्जूनाला मार्गावर आणले. तोच हा मार्ग. प्रत्येक वारकर्याला त्याचा अर्थ समजला आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जूनाला ज्याप्रमाणे सांगतात की तुझे नी माझे नाते हे जन्म जन्मांतराचे आहे. आपण सतत एकमेकांबरोबरच आहोत. तसेच आपले या पांडुरंगाशी नाते जोडले गेलेले आहे याची जाणिव प्रत्येक वारकर्याला आहे. त्यामुळे आपण वारीच्या मार्गावरून चालायचे आहे, आपल्याला दरवर्षी वारी करायची आहे आणि त्या भगवंतावर प्रेम करून त्याच्या सानिध्यात रहायचे आहे हे वारकर्याला समजले आहे. त्यामुळे भगवंतभेटीची ही ओढ फार महत्त्वाची असते.
    भगवंताच्या या भक्ताला, या वारकर्याला भगवत प्रेमाची एवढी भूक आहे की ती काही केल्या संपत नाही. याचे कारण एकदा प्रेमाची गोडी चाखल्यानंतर तितकं प्रेम त्याला मिळत नाही. म्हणून त्याला प्रेमाची भूक आहे आणि त्याचाच त्याला दुष्काळ आहे. याचे वर्णन संत तुकाराम एका अभंगात करतात. ते म्हणतात-
थोर प्रेमाचा भुकेला। हाचि दुष्काळ तयाला।
पोहे सुदाम देवाचे। फके मारी कोरडेची।
न म्हणे उचिष्ट अथवा थोडे। तुका म्हणे भावापुढे॥
 आपल्या वाट्याला जे आलेले आहे हे थोडं आहे का, उष्टं आहे याचीही पर्वा त्या भगवंताला नसते. शबरीची उष्टी बोरेसुद्धा तो आवडीने खातो. कारण त्यामध्ये भक्ताचे प्रेम त्याला दिसते आहे. कारण त्यात प्रेम आहे, भाव आहे. ही भावाची महती प्रत्येक वारकर्याला समजली आहे. त्यामुळे कधीही तोंडात घास घेताना पांडुरंगाचे स्मरण केल्याशिवाय तो घेत नाही. केवळ वारीतच नाही तर त्याच्या जीवनातच प्रत्येक श्वास, प्रत्येक घास हा तो पांडुरंगासाठी घेत असतो. हे प्रत्येक संतांना समजले होते. त्यामुळे वारकर्यांच्या या भगवत भक्तीची माहीती असल्याने संत एकनाथ महाराजांनी म्हटले आहे की,
भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा। अभिमान नित्य नवा तयामाजी।
प्रेम सूख देई प्रेम सूख देई्। प्रेमावीन नाही समाधान॥
 म्हणजे ज्ञानापेक्षाही प्रेमाचं महत्त्व आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, ‘भावाशिवाय भक्ती करणं म्हणजे शक्तीशिवाय बळ दाखवण्यासारखं आहे.’ अगदी बळ जरी असलं तरी प्रेमापुढे बळाचा वापरही होऊ शकत नाही. त्यामुळे खर्या अर्थाने भगवंतावर प्रेम करत, प्रत्येक गोष्टीत भगवंताचे दर्शन घेट हा वारकरी ही वारी करत असतो. त्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी परमेश्वर दिसत असतो, पांडुरंग दिसत असतो. कारण तो आहे यावर त्याचा विश्वास गाढ असतो.
विश्वास, श्रद्धा, भक्ती असल्याशिवाय याची अनुभूती मिळणे शक्य नसते.
  पदरी घाली पिळा। बाप निर्बळसाठी बाळा।
  एखादा अगदी हिंदकेसरी पैलवान आहे. संपूर्ण देशात त्याला तोडीस तोड असा कोणी नाही, असा दांडगा पैलवान घराबाहेर पडू लागतो. तेव्हा त्याचा दोन वर्षाचा मुलगा त्याला पायाला धरून सांगतो. बाबा तू बाहेर जाऊ नको. मी तुला सोडणार नाही. मोठमोठ्या पैलवानांना सहज आडवा करणारा तो हिंदकेसरी मग बाहेर जायचे सोडतो आणि मुलांच्या आग्रहाखातर घरात जाऊन बसतो. बाप निर्बळासाठी बाळा. भगवंतही तसाच शक्तिमान आहे. परंतु भक्तांच्या प्रेमापुढे तो त्यांच्यासारखा होऊन राहतो. मात्र भावावीन केलेल्या भक्तीचा कोणताही उपयोग होणार नाही. तशा भक्तीने कोणतंही दैवत प्रसन्न होऊ शकत नाही, असं ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. त्यामुळे या दिंडीत येणार्या प्रत्येक वारकर्यांच्या मनात अत्यंत भक्तीभाव असतो म्हणूनच त्यांना त्याचे दर्शन होते. दूध जसे जास्त उष्णता मिळाल्यावर वर वर येवू लागते, तसा हा भक्तीभाव उफाळून येतो. कारण आता सोलापूरच्या हद्दीत शिरताना त्या भगवत प्रेमाची उब वाढत असते. दुधाप्रमाणे हे प्रेमाचे, भक्तीचे उतू जाणे हा खरा आनंद आता इथून पुढच्या प्रवासात मिळत असतो. कधी एकदा एकादशीचा दिवस उजाडतो, कधी एकदा चंद्रभागेत डुबकी घेतो आणि आणि पुंडलीक पायरीचे दर्शन घेउन पुडे पांडुरंगाकडे कसे जातो याचा विचार प्रत्येकाच्या मनात असते. ही भगवतभेटीची ओढ, हा ध्यास बरेच काही शिकवून जातो. कोणतीही गोष्ट विशिष्ट प्रकारचा ध्यास घेतल्याशिवाय साध्य होत नाही. त्यासाठी हा ध्यास घेण्याची शिकवण या वारीत मिळते. आता हा ध्यास पराकोटीला पोहोचला आहे कारण आता चार दिवसांवर आता माउलीचे दर्शनाचा दिवस आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: