रविवार, २१ जून, २०२०

पाउले चालती पंढरीची वाट

यावर्षी जागतीक पातळीवर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आषाढी वारीला विराम मिळाला आहे. निवडक लोकांनी फक्त प्रस्थान करायचे ठरले आहे. दशकानुदशकांची आमची वारी ही या कोरोनामुळे खंडीत झाल्यामुळे दरवर्षी वारी करणार्‍या वारकर्‍यांमध्ये दु:ख, नाराजी निर्माण झालेली आहे. आमच्या पांडुरंगाचे दर्शन आम्हाला घ्यायला मिळणार नाही, यावर्षी पंढरीची वारी चुकणर म्हणून  मनामध्ये खंत आहे. म्हणूनच आपण आजपासून एकादशीपर्यंत ही शाद्बिक वारी करणार आहोत. आषाढी वारीचा आपल्या पाठीशी असलेला वर्षानुवर्षांचा अनुभव आठवून आपण त्याचा पुन:प्रत्ययाचा आनंद या वारीतून घेउया. ही वारी खंडीत करण्यासाठी त्या माउलींची, विठूरायाचीच काही योजना असल असा द़ृढ विश्वास ठेवून आज आपण मनाने प्रस्थान करूया. शेवटी आपल्याकडे मानसपुजेचे महत्व फारच मोठे सांगितलेले आहे. तशीच ही मानस आषाढी वारी आपण करून एक संकल्प पूर्ण करूया. भगवंताशी, त्या विठूरायाशी आपण मनाने भेटूया.    आमची आषाढी वारी(पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणार्‍या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच गेल्या काही वर्षांपासून परदेशी लोकही या वारीचे दर्शन घेण्यासाठी येताना दिसतात. आळंदी ते पंढरपूरची वारी करणे म्हणजे आपल्या जन्माचे सार्थक होणार हे नक्की. त्यामुळे आयुष्यात येउन प्रत्येकाने किमान एकदा तरी पंढरीची वारी करावी. देव काय आहे, विठोबा काय आहे याची अनुभूती या वारीतून येते. वारी हा एक आनंद सोहळा असतो. दरवर्षी ती देहु आणि आळंदीतून निघते. तुकोब्बाराय, ज्ञानोबा माउलींची भेट होते आणि राज्याच्या कानाकोपर्‍यातून विविध संतांच्या पालख्या, दिंड्या या वारीत सामील होतात. गंगेत सगळीकडचे स्त्रोत समाविष्ठ होउन पवित्र होतात तसेच या वारीत सगळीकडचे भक्तांचे प्रवाह, भक्तीचे स्त्रोत येत असतात. एकरूप होउन जातात. वर्ण अभिमान विसरून जाती, एकरूप होती सर्वजण अशी या वारीची ख्याती आहे. म्हणूनच भेदभावर विरहीत जीवनाची शिकवण देणारी ही वारी म्हणजे ज्ञानगंगा आहे. आषाढी वारी ही आमची संस्कृती आहे. आमचे वैभव आहे. या वैभवाची कीर्ती इतकी थोर आहे की कोणतेही संकट या वारीला रोखू शकत नाही. आज कोरोनासारख्या विषाणूला वाटते आहे की मी ही वारी रोखली आहे. पण ही वारी रोखण्याचे सामर्थ्य कोणत्याही दुष्ट शक्तीत नाही. कारण अहंकाराचा नाश करणारी, सर्वसमावेशक अशी ही वारी आमच्या जीवनाचे सार्थक करणारी अशी आहे. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा असते. पदयात्रा म्हटल्यावर आपल्याला निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी नेतेमंडळींनी केलेल्या आठवतात. पण राजकीय पदयात्रा या फक्त स्वार्थासाठी, काहीतरी मागण्यासाठी असतात. पण आमची ही वारकर्‍यांची पदयात्रा ही स्वत:साठी मागणारी नाही. या पदयात्रेत ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान आहे. सर्वांच्या सुखाची, विश्वकल्याणाची मागणी ही वारी करते. म्हणूनच या वारीत फक्त प्रत्येकाच्या डोळ्यातून प्रेमाच्या धारा वाहतात आणि नेत्राची आणि शरीराची शुद्धी होते. आत्म्याचे त्या परमात्म्यात विलीनीकरणाचे संकेत मिळतात. त्याचा संवाद साधला जातो. आत्मज्ञानाचा साक्षात्कार देणारी ही वारी आम्हाला भगवंताचे दर्शन घडवते.  म्हणूनच वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा बनली आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. यावर्षी पालखीच्या प्रस्थानाचा हा आजचा दिवस आहे. कोरोनाने आज पालखीला रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तो पालखीचा मार्ग पुसण्याची ताकद कोणातच नाही हे ही पालखी एकादशीला पंढरपुरात पोहोचेल तेंव्हा समजेल. तोच कोरोनाचा शेवटचा दिवस असेल. पालखीच्या मार्गावरून आमच्या मागून जर कोरोनाचा विषाणू येत असेल तर त्याचे स्वागत आहे, कारण वारी ही मुक्ती देणारी असते. या कोरोनाला मुक्त करून या महाराष्ट्राला निरोगी करण्याची ताकद या वारीत आहे. या आषाढी एकादशीला जी शरीराची मनाची शुद्धी होते त्यामध्ये कोरोनाला मुक्ती दिल्याची बातमीही येईल असा वारकरी संप्रदायात आता विश्वास आहे. कारण आम्ही देहाने नाही तर मनाने माउलीपर्यंत पोहोचणार आहोत.  संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत आहेत. अशा असंख्य संतांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यावर आम्हाला वारी घडणार यात शंकाच नाही. कारण आमच्या मनीचा भाव हा शुद्ध आहे. त्याला कोरोना कधीच बाधा आणू शकत नाही, शिवू शकत नाही. मास्क लावून आमच्यात पडदा टाकण्याचा कोणी प्रयत्न केला तरी हा पडदा दूर करण्याची ताकद आमच्यात आहे. आम्ही वारीला एकमेकांना आलींगन देतो तेंव्हा समोरून आलींगन देणारा आमचा विठोबा आहे, आमची माउली आहे, आमचे ज्ञानोबा आहेत, तुकोब्बा आहेत हाच भास आम्हाला होत असतो. आम्ही वारीत फुगडी खेळून आनंद साजरा करतो तेंव्हा एकमेकांचे हात हातात घेउन आनंद लुटतो. आज चार हात दूर व्हा सांगणारा हा कोरोना आला आहे. तो आमच्यात नवी अस्पृश्यता निर्माण करत आहे. पण शेकडो वर्षापूर्वीच आम्ही अस्पृश्यतेचा नाश करून ही समरसतेची वारी पंढरीची वारी म्हणून घेउन जात असताना या नव्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या अस्पृश्यतेचे काय घेउन बसलात? तुम्हालाही ही वारी संपवल्याशिवाय राहणार नाही हा संदेश ही वारी कोरोनाला देत आहे. भेदभावाच्या भिंती दूर करणारी वारी माउलींनी निर्माण केली. सर्वजण त्या पांडुरंगाच्या चरणी समान आहेत. असे असताना कोणी एक कोरोनाचा विषाणू आमच्यात फूट पाडेल, आम्हाला थांबवू शकेल हे कसे शक्य होणार आहे? उलट या एकादशीला आम्ही आमचे जीवन पूर्ववत आनंदाने सुरू करण्याचा संकल्प करू असा विश्वास मनात ठेवूनच आज प्रस्थान करायचे आहे.आपल्या या वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे. त्या श्रद्धेनेच आपण आजपासून मनाने प्रस्थान करणार आहोत. या वारीत सातशे वर्षापूर्वी समाधी घेतलेले ज्ञानेश्वर आपल्या भेटतात. आळंदीतून कळसाने होकार देतात असे आपल्याला दिसते. आपण त्याची अनुभूतीही घेतो. आळंदीतील कळसाने होकार दिल्याशिवाय आपले प्रस्थान होत नाही. ज्याच्या मनात शुद्ध भाव आहे त्याला तो होकार दिसतो आणि पालखी पुढे निघते. आज त्याच शुद्ध भावनेने आपण ही शाब्दिक वारी सुरू करत आहोत. या वारीतही आपण पंढरीच्या वारीची अनुभूती घेउया.वारी करणार्‍या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे/विठ्ठलाचे हे भक्त असतात. आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. ह्या माळेच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय, ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो. त्याप्रमाणे आपण घरात नामस्मरण करायचे आहे आणि मनाने दररोज काही किलोमीटर चालत ही वारी पुढे न्यायची आहे. दरवर्षी आपली ही वारी पाच सात लाख वारकर्‍यांची असते. पण ही आपली पालखी वारी इतकी मोठी असेल की तिचे एक टोक आळंदी आणि दुसरे टोक पंढरपूरात असेल इतका मोठा हा संप्रदाय वाढणार आहे. त्या भक्तिभावात कोरोनाचा अंत होणार आहे. या विश्वासानेच आपण आज प्रस्थान करूया.वारी पंढरीची/ प्रफुल्ल फडके-1

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: