आपली संस्कृती आणि अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान आहे. सगळे सणवारही कृषीप्रधान आहेत. त्यामागे शास्त्र म्हणजे विज्ञान आहे. पंचांगाप्रमाणे किंवा कालगणनेनुसार दरवर्षी 7 जूनला मृग नक्षत्र लागते. मृग नक्षत्राचा पाउस पडला की शेती चांगली होते हा आपला सिद्धांत आहे. त्यामुळे सात जूनला चार थेंब तरी पडावेत अशी शेतकरीवर्गाची अपेक्षा असते. आता सात जून ही पावसाच्या आगमनाची तारीख तशी नुकतीच दोन दिवसांपूर्वी मागे पडली. काही ठिकाणी पाउस पडला पण तो मृगाचा आहे की मानसूनपूर्व आहे हे समजले नाही. पण तरीही पावसाळी तयार झालेले वातावरण हे सवार्र्ना आनंद देणारे असेच आहे. यावर्षी पाउस चांगला होणार आहे आणि तो सरासरीच्या 102 टक्के पडणार आहे असे भाकीत नुकतेच हवामान खात्याने आणि स्कायमेटने केले होते. अर्थात आपल्याकडचे हवामानाचे अंदाज नेहमीच चुकतात. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाउस पडेल, 90 ते 97 टक्के पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. पण पावसाने गेल्यावर्षी इतका हाहाकार माजवला की महाराष्ट्रात अतिवृष्टीने कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे उद्ध्वस्त झाले. त्यामुळे या अंदाजावर तसे विसंबून राहता येणार नाही. पण मोसमी पाऊस अंदमान, केरळ व कर्नाटक किनारपट्टीवर पोहोचला आहे पण, अद्याप मुंबई, महाराष्ट्र, कोकणात दाखल झाला नाही. त्यामुळेच 7 जूनचा मृग काही ठिकाणी कोरडा गेल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकी लागली. आता येत्या दोन दिवसात तो सर्वत्र पोहोचेल आणि यंदा चांगला बरसेल. देशात यंदा खरीप हंगाम यशस्वी होईल. सारी संकटे, अडचणी, मंदी यावर खरीप हंगामाची यशस्विता मात्रा ठरेल असे सांगितले जाते आहे आणि हवामान खात्याचा तोच अंदाज आहे. गेले चार दिवस निसर्ग वादळ घोंगावत होते. या वादळाचा मुंबईला तडाखा बसणार अशी भीती होती. सावधगिरीचे उपाय योजण्यात आले होते. नैसर्गिक आपत्तीचा तडाखा मोठा असू शकतो. वित्तहानी, प्राणहानी प्रचंड होण्याची शक्यता असते. गेेले वर्षभर आपल्याला संकटांशी सामना करण्याची सवयच लागली आहे. सध्या कोरोना महामारी, लॉकडाऊनमुळे सारेच हबकले आहेत,अडचणीत आहेत. त्यात ही वादळाची भर म्हणून अवघा महाराष्ट्र चिंतीत होता. पण थोडक्यात निभावले. या वादळाने कोकण, उरण परिसराला धडक दिली. तेथे घरांचे, झाडांचे, बागांचे, कलमांचे नुकसान झाले पण, वादळ मुंबईत शिरले नाही. वादळात प्राणहानी झाली नाही. जे काही नुकसान झाले त्यासाठी ठाकरे सरकारने शंभर कोटींचे पॅकेज दिले आहे. तुर्त वादळाचा धोका टळला आहे. या वादळाचा फायदा मानसूनला होईल असेही सांगितले गेले होते. आता त्याही अंदाजाचे काय होणार हाही एक प्रश्नच आहे. पण गेल्या ऐशी वर्षात आपण हवामान खात्याचा अचूक अंदाज वर्तवणारी यंत्रणा निर्माण करू शकलेलो नाही. पावसाचा किवा हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारी यंत्रणा आपल्याकडे असेल तर आपण संगळी संकटे सहज पेलू शकू. त्यावर मातही करू शकतो. पण नेमकी तीच यंत्रणा आपली कुचकामी आहे. त्यामुळे कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांना तोंड देण्याची वेळ येते. आता कोरोना या मानवनिर्मित संकटातून बाहेर पडण्याची तयारी असताना प्रत्येकाला यावर्षीचा मानून कसा असेल याची ओढ लागली आहे. मानसून चांगला झाला, पाउसपाणी छान झाले तर अर्थव्यवस्थेला ते पोषक असणार आहे. कोरोनाच्या संकटात, लॉकडाउनमध्ये झालेली हानी भरून काढायला हा पाउस धावून येईल अशी माफक अपेक्षा सर्वांची आहे.पण, एकीकडे कोरोना महामारीचा धोका वाढतोच आहे. आता सोमवारपासूनच सावधानता बाळगून अनेक गोष्टी ‘पुनश्च हरिओम’ या धोरणाने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे हॉटस्पॉट नाही तेथे काही प्रमाणात जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी पावले टाकली जात असली तरी कोरोना दहशत संपलेली नाही आणि कोरोनावर परिणामकारक इलाज, औषध, लस सापडेपर्यंत संपणारही नाही. अनेक ठिकाणी एसटी वाहतूक जिल्हांतर्गत सुरू आहे. पण, माणसे घराबाहेर पडायला तयार नाहीत. दुकाने, हॉटेल्स वगैरे गोष्टी काही अटींवर सुरू आहेत. पण म्हणावा तसा प्रतिसाद नाही. एकतर कोरोनाची धास्ती व दहशत आहे,जोडीला लोकांचे बजेट कोलमडले आहे. अनेकांना रोजगार नाही, पगार निम्म्यावर आले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. व्यवहार ठप्प आहेत. पुढे काय वाढून ठेवले आहे याची सर्वांना चिंता आहे. या साऱया अडीअडचणी, चिंता, समस्या, प्रश्न असले तरी पाऊस आला आहे. पावसाचे शेतीसाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगात इतरत्र पावसाचे वेगवेगळे ऋतु आहेत. भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर हा वर्षा ऋतु असतो. नैर्त्रुत्येकडून येणारे वारे पावसाचे ढग घेऊन येतात. हिंदी महासागर व अरबी समुद्रात पाण्याने भरलेले ढग हे वारे घेऊन येतात आणि या पावसाचा लाभ भारतीय शेतीला होतो. हा पाऊस परत जातानाही बरसतो. या परतीच्या पावसातही गहू, हरभरा, शाळू अशी रब्बीची पिके येतात. ओघानेच पावसाचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळेच रविवारी 7 जूनला मृग नक्षत्राचा पाउस पडेल आणि सगळे काही ठिक होईल अशी स्वप्न प्रत्येकजण पहात होता. पावसाची वाट पाहण्याचे प्रत्येकाचे कारण वेगळे असते. कवीला कविता करायला बहर येतो, तर प्रेमिकांना भिजायला आवडते, कोणाला पावसाळी पर्यटनाची आवड असते तर आमचा बळीराजा काळी आई भिजली म्हणजे सर्वाना तृप्त करेल या आशेने पावसाची वाट पहात असतो. कोरोनोचे संकट धुवून काढायला हा पाउस येईल अशी भोळी आशा प्रत्येकाच्या मनात आहे. यंदा वेळेत आणि चांगला पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता. गेली काही वर्षे चांगला पाऊस या शब्दाचीही भीती वाटावी अशी स्थिती झाली आहे. सांगली-कोल्हापूर हे जिल्हे आणि सीमाभाग महापुराच्या तडाख्यातून अजून सावरलेला नाही. सन 2005 चा आणि 2019 चा महापूर आणि पाठोपाठ कोरोना व आता पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता. यामुळे नागरिक विशेषतः कृष्णा, वारणा, पंचगंगाकाठ हादरला आहे. पावसाळयाची सरकारी पातळीवर आणि व्यक्तीगत पातळीवर जो तो तयारी करतो आहे. पूरपट्टयातील गावे, वस्त्या, नदीकाठची गावे, घरे चिंतेत आहेत. सरकारी पातळीवर त्यांना सावधानतेचे इशारे व नोटीसा दिल्या जात आहेत. यावेळी महापूर येऊ नये म्हणून धरणातील पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन केले जाते आहे. पण अलीकडे ढगफुटीसारखे पावसाचे प्रकार उद्भवताना दिसत आहेत. बंधारे फुटणे वगैरे दुर्घटना आहेत. मुंबईपासून बेळगावपर्यंत आणि पुण्यापासून सांगली, कोल्हापूर पंढरपूरपर्यंत सर्वत्र हा धोका आहे. पण सावध राहणे योग्यवेळी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. माणसे पार्किंगमध्ये पाणी आले तरी घर सोडत नाहीत. हा गतवर्षीचा अनुभव चांगला नाही. यावेळी महापूर येऊ नये आणि चांगला पाऊस यावा, खरीप हंगाम यशस्वी व्हावा अशी अपेक्षा आहे. निसर्ग वादळाने काही भागात पाऊस झाला आहे. ओघानेच खरीप पेरण्यांना सुरूवात झाली आहे. बांधावर खत, बांधावर बियाणे अशा सरकारी घोषणा असल्या तरी बियाणे,खते यामध्ये लिकींग व लूट असते हे वेगळे सांगायला नको. यंदा हमीभाव आधी जाहीर होतील असे वाटते आहे. पण तेलबिया, डाळी यांची कमतरता आहे. शेतकऱयांनी पारंपरिक ज्वारी, बाजरी या पलीकडे जाऊन तेलबियांचे व वेगवेगळया डाळी, भाज्या यांचे चांगले वाण घेऊन नेमकेपणाने शेती केली पाहिजे. लॉकडाऊनमुळे हवा, पाणी, नद्या, यात सुधारणा झाली आहे. शेतीला त्याचा फायदा होईल. पण टोळधाडीसारखी धास्ती आहेच. जोडीला अनेकांचे रोजगार गेल्याने आणि शहरी मंडळींचे गावाकडे स्थलांतर झाल्याने नवे काही प्रश्न उभे राहणार आहेत. शेतकऱयाला पाऊस, रोगराई याच जोडीला चोरी, पळवापळवी याचाही फटका असतो. उघडया शेतात बियाणे, खते घालून तो नशीब आजमावतो. खरीपासाठी सर्वांची तयारी झाली आहे. पीककर्ज व बियाणे, खते यांची टंचाई नाही. यंदा चांगला पाऊस झाला आणि खरीप हंगाम यशस्वी झाला तर मंदी संपवण्याची शक्ती बळीराजात आहे. शेतकऱयाचे उत्पन्न वाढवणार अशी मोदी सरकारची घोषणा होती. ठाकरे सरकारही माझा शेतकरी माझा शेतकरी असा जप करते. यंदा पावसाच्या रूपाने होणारी चैतन्याची बरसात साऱया चिंता नष्ट करेल अशी अपेक्षा आहे. लॉकडाऊन संपून पुन्हा जनजीवन सुरळीत होते आहे. पण, धोका संपलेला नाही. अशावेळी अधिक सतर्क राहून पावले उचलायला हवीत. सारी जबाबदारी सरकारची नाही. आपणही कर्तव्य आणि जबाबदारीचे पालन करायला हवे. पण पावसाळी वातावरण तयार झाले तरी जोपर्यंत तो बरसत नाही तोपयर्ंत त्याचे काही खरे नसते. त्यामुळेच या पावसाची प्रतिक्षा प्रत्येकजण करताना दिसतो आहे. गेल्या वर्षभरात निर्माण झालेली सगळी संकटग्रस्त परिस्थिती धुवून टाकण्यासाठी त्याने आता यावे हीच प्रत्येकाची अपेक्षा आहे. म्हणूनच आपली पारंपारीक कविता ये रे येरे पावसा म्हणून त्याची आळवणी करायची वेळ आलेली आहे. फक्त त्याला कसलेही आमिष दाखवून खोटा पैसा कोणी देउ नका. नाहीतर तो गेल्यावर्षीसारखा धोधो धुवून काढेल सर्वांना. पावसाची ओढ सर्वांना लागलेली आहे. पण तो जास्त प्रतिक्षा करायला न लावता वेळेवर येईल आणि हवामानखात्याचा अंदाज यावर्षी तरी खरा ठरेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. यावर्षी आषाढी वारी नसली तरी पावसाच्या सरी झाल्याच पाहिजेत. शेतीची कामे करून वारीला जायचे आणि परत येईपर्यंत शेती वाढलेली असते. तो शेतकरी वारकरी त्या विठ्ठलावर सगळे सोपवून मोकळा होतो आणि शेतीची कामे, पेरण्या करून पायी वारीला निघतो. तू परत जाशील तेंव्हा तुझे पिक कमरेएवढे वर आले असेल असा संदेश विठोबा आपल्या कमरेवर हात ठेवून देतो. यावर्षी वारीला ब्रेक लागला आहे. पण पावसाने मात्र वेळेवर आलेच पाहिजे.
सोमवार, ८ जून, २०२०
आता पावसाची प्रतिक्षा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा