रविवार, २१ जून, २०२०

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी

  युगे अठ्ठावीस विटेवरी उभा असलेल्या या पंढरपुरच्या विठोबा माउलीकडे जाण्याची, वारीने जाण्याची, भक्तीमार्गाने जाण्याची परंपरा फार जुनी आहे. म्हणूनच ती खंडीत करणे केवळ अशक्य आहे. ही वारी केंव्हा सुरू झाली हे सांगणेच तसे अवघड आहे. म्हणजे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या ऋतुचक्राप्रमाणे ही वारीही सनातन आहे असेच वाटते. वर्षातील सहा ऋतू जसे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे एकापाठोपाठ येतात तशीच आमची वारीही आपसूक येते. तरीही या वारीचा इतिहास असल्याचे अनेकजण सांगतात.यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे ज्ञानदेवपूर्व काळ-भक्त पुंडलिकाचा काळ हा पहिला टप्पा मानला जातो. भक्त पुंडलिकाने विठोबा माउलींना वीटेवर उभे राहण्याची विनंती केली आणि तिथपासून निर्माण झालेला हा भक्तीसंप्रदाय. त्यामुळेच तर युगे अठ्ठावीस वीटेवरी उभा अशी आरती तयार झाली. विठ्ठलाची पंढरपुरात कीर्ती झाली. त्या किर्तीला पुंडलीकाच्या पायरीचा इतिहास जोडला गेला. म्हणजे किती जुना काळ आहे हा? अशी शतकानुशतकांची नाही तर युगानुयुगांची ही वारी कशी थांबेल? आम्ही मनाने ती पूर्ण करू शकतो.या वारीच्या इतिहासातील दुसरा काळा जाणकार सांगतात तो म्हणजे ज्ञानदेव-नामदेव काळ. म्हणजे 14 व्या शतकातील साधारण सातशे वर्षापूर्वीचा काळ. म्हणजे पुंडलिकाची पताका ज्ञानोबा माउलींनी पुढे वाहिली. अज्ञानी राहिलेल्या, अंधश्रद्धेत अडकून पडलेल्या समाजाला ज्ञानभांडार उघडून दाखवल्यानंतर ज्ञानोंबांनी ही ज्ञानंगगा पंढरीच्या दिशेने चालवली. या ज्ञानगंगेचे वारीचे भोई नामदेवही होते.त्यानंतरचा तिसरा कालखंड या वारीचा आहे तो म्हणजे संत भानुदास आणि संत एकनाथांचा काळ. संत एकनाथांनी भागवत संप्रदायाची पताका अत्यंत आक्रमकपणे, बंडखोरपणे, दांभिकपणा हल्ले करत, डोळ्यात अंजन घालत चालवली. यातूनच हा वारीचा संप्रदाय, ही वारी अंधकारातून उजेडाकडे नेणारी आहे हे स्पष्ट होते. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेले तमसोमां ज्योतिर्गमयं हे अंधकारातून प्रकाशाकडे घेउन जाणो तत्वज्ञान या वारकरी संप्रदायाचे आहे. कोणाला अंध:कारात जाउ न देता प्रत्येकाच्या मनात ज्ञानदीप लावण्याचे काम आमची वारी करत असते. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असे ही वारी आम्हाला सांगते.    यानंतरचा आमच्या वारीचा कालखंड आहे जो जाणकार या वारीच्या इतिहासाबाबत सांगतात तो म्हणजे आमच्या संतश्रेष्ठ तुकोबा-निळोबा यांचा काळ. परकीयांची आक्रमणे होत असताना, भोंदुगिरीचा, दांभिकतेचा कळस गाठलेला असताना प्रबोधन करण्यासाठी ज्ञानगंगेत उतरलेल्या तुकोबारायांनी समाजाला जाणते केले. कर्मठ समाजातून अडकून पडलेल्या, कर्मकांडात अडकलेल्या समाजाला कर्म करायला लावणारा हा कर्मयोग्यांचा कालखंड होता. त्यानंतरचा आमचा वारीचा इतिहास सांगतो तो गेेल्या तीनशे साडेतीनशे वर्षांचा काळ. या सर्व संतश्रेष्ठांनी घालून दिलेल्या मार्गावरून जाण्याचा हाच तो वारीचा मार्ग. जो आज कोरोनासारखा विषाणू बंद पाडू पहात आहे. पण हा मार्ग इतका पक्का आहे की तो बंद पाडण्यासाठी असे कितीही विषाणू आले तरी त्यांना ते सोपे नाही. साथीचे रोग यापूर्वीही आलेले आहेत. पण आमचे वारकरी त्यातून तरून गेलेले आहेत.    आषाढीची आणि कार्तिकीची अशा दोन वार्‍या आमच्याकडे असतात. यातील आषाढी वारीला महत्व अधिक आहे. आषाढी वारीला सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपापल्या गावाहून पंढरपुरात येतात. फार मोठा उत्सव आणि उत्साह असतो. चातुर्मासाची सुरूवात असते. देव झोपले आहेत आता आपण जागायचे आहे. म्हणून हरीजागर करत चार महिने विठ्ठलाचे स्मरण केले जाते. त्यानंतर कार्तिकी वारीला संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात. ही वारी म्हणजे नुसतीच गर्दी नसते. तर ती एकरूप झाल्याची साक्ष असते. सगळेजण विठ्ठलमय झालेले असतात. आपलेपण विसरलेले असतात. चंद्रभागेच्या तिरावर जाउन त्या वाळवंटातील कणाप्रमाणे लहान होतात आणि माउलीसारखे मोठे होतात. हा छोट्या मोठ्यांच्या एकरूपतेचा सोहळा म्हणजे आमची वारी असते. या वारीला मग कोणते भय असणार?वर्ण अभिमान विसरली याती, एकेका लोटांगणी जाती रे ।निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे ॥5॥अशा तर्‍हेने या वारीत सगळेजण आषाढी एकादशीला एकरूप होण्यासाठी जात असतात. हा कोरोनाचा विषाणू आम्हाला दूर करू पहात आहे. माणसांना लांब लांब ठेवू पहात आहे. अंतर राखून वागायला सांगत आहे. पण आमच्या मनात हा जो भक्तीचा देवाणू आहे, विठ्ठल नामाचा अणू आहे, भक्ती मार्गाचा वारू आहे तो या विषाणूला कशी दाद देणार? तो त्याला जवळ फिरकूही देणार नाही. तू आमचा मार्ग रोखलास, पण आम्ही मनाने केव्हाच तिथे पोहोचलो आहोत. केंव्हाच तिथे एकरूप झालो आहोत. म्हणूनच आम्हाला येत्या 1 जुलैंला येणार्‍या आषाढी एकादशील पांडुरंगाचा या भागवत धर्माचा जयजयकार करण्यासाठी तिथे जायचे आहे.होतो जयजयकार गर्जत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे ।तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे ॥6॥अहो ही वारीची पायवाट तुकोब्बारायांनी इतकी सोपी करून टाकली आहे की कसलेही खाचखळगे, काटेकुटे आम्हाला टोचत नाहीत. त्यामुळेच या विषाणूचीही आम्हाला बिलकूल भिती वाटत नाही. म्हणूनच आपण ही पालखी घेउन मोठ्या आनंदाने मनाने तिथे पोहोचणार आहोत.ही वारीची पालखी आम्ही अभेद्यपणे तिथे घेउन जाणार आहोत. कारण आमच्या मनातला विचार ठाम आहे. कोरोनासारख्या संकटाला बळी पडतात ते लेचेपेच पडतात. पण आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत. पाठीत भुंगा घुसला तरी आई बापाची सेवा करण्यापासून वंचित न होणारा पुंडलिक आमचा आदर्श आहे. समाजाने छळले, वाळीत टाकले तरी सर्वांना बरोबर घेणार्‍या ज्ञानोबा माउलींचा कणखर भाव आमच्या मनात आहे. आम्हाला हा कोरोनाचा विषाणू दिसतच नाही. अहो हा तर आमच्या पांडुरंगाने आमची परिक्षा घेण्यासाठी केलेला डावच आहे. आई वडिलांच्या सेवेपासून डळमळीत होतो का हे पाहण्यासाठी तो कृत्रिम भुंगा पांडुरंगानेच सोडला होता. तसाच आमचा भक्ती भाव पाहण्यासाठी हा विषाणू येणे हीपण त्या भगवंताचीच काहीतरी योजना असेल. तोच निर्माता आहे, तोच रक्षणकर्ता आहे मग चिंता कसली? त्याची ही पालखी त्याने घेउन जायची आहे. आपण त्या पालखीचे फार फार तर भोई असू. पण ही पालखी मनाने, शब्दरूपाने आपण दृढ निश्चयाने घेउन जाणार आहोत.देहुतून तुकोब्बारायांची आणि आळंदीतून ज्ञानोबा माउलींची पालखी निघाली आहे. या पालखीला पंधरा दिवसांच्या या काळात अनेक मुक्काम असतात. या प्रत्येक मुक्कामात माउली निरनिराळे दर्शन घडवत असतात. सगळे जगत विष्णूमय होते आणि हा वैष्णवांचा पंथ एकरूप झालेला असतो. आळंदीतील कळसाने मान हलवून जाण्याचा होकार दिला की ही वारी निघते. पालखी पुण्याच्य दिशेने जाते आणि पहिला मुक्काम पुण्यात होतो. या मुक्कामात ज्ञानोबा तुकोबा भेटतात. त्यांना भेटायला आणि दर्शनाला अनेक संतमंडळी येत असतात. त्याने ही पुण्यनगरी पावन होते आणि पुढच्या प्रवासाला माउली निघतात. असा हा पावन करत जाणारा वारीचा मार्ग तयार होतो.प्रफुल्ल फडके/ 9152448055......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: