गुरुवार, २५ जून, २०२०

अहंभाव गळून जाण्याचा सोहळाः पंढरीची वारी


जेंव्हा सगळे  जीवन विठ्ठलमय होते तेंव्हा मी पण उरतच नाही. पंढरीच्या वारीत आपले मी पण गळून पडते आणि जीवनाचे सार्थक होते. हा मी पण गळून पडण्याचा, अहंभाव नष्ट करण्याचा सोहळा म्हणजे पंढरीची वारी असते. या लेखमालेच्या निमित्ताने एका वाचकाने प्रश्न विचारला होता की, तुमच्या पांडुरंगाचे स्वरूप तर आहे कसे नक्की? कोणी त्याला सावळा म्हणतो, कुणी त्याला पांडुरंग म्हणजे गोरा म्हणतो. मग हा विठ्ठल आहे तरी कसा? तर याचे उत्तर हेच आहे वारीत तर्‍हतर्‍हेची माणसं येत असतात. लाखो वारकरी असतात. पण एकसारखा दुसरा दिसत नाही. सगळ्यांचा वेष एकसारखा असतो, पण चेहरेपट्टी प्रत्येकाची वेगळी असते. त्याचप्रमाणे ज्याला जसा हा भगवंत दिसतो तसा तो त्याचे वर्णन करतो. या वारीत प्रत्येकजण विठ्ठल असतो, प्रत्येकजण माउली असतो. प्रत्येकात ईश्वरी अंश असतो. प्रत्येक आत्मा हा ईश्वराचा कण असतो. आत्म्याचे परमात्माला भेटणे हेच तर जीवन असते. हीच तर खरी वारी असते. म्हणूनच आत्मा वेगळा पण परमात्मा एक. तसा विठ्ठल, नारायण, पांडुरंग, विष्णू, ईश्वर एक पण त्याची नावे वेगवेगळी. तसेच त्याचे स्वरूप वेगळे. पण त्याच्यातील शक्ती, चैतन्य हे समानच असते. मग तो सावळा विठ्ठल असो वा पांडुरंग त्याच्या भेटीने मिळणारी अनुभूती, आनंद हा रंगविरहीत, वर्ण विरहीत, भेदभाव विरहीत असा एकच असतो. सर्वांना तो सारखाच भेटतो. कारण इथे काळा गोरा, गरीब श्रीमंत, उच्च नीच असे काहीच नसते. सगळो अहंभाव नष्ट झालेला असतो. सर्व जगत विष्णूमय झालेेले असते. म्हणून या सोहळ्याला अहंभावर गळून पडणारा सोहळा म्हणतात. इथे कसलेच मी पण उरत नाही.
   टाळी वाजवावी ।
गुढी उभारावी।  वाट ती चालावी, पंढरीची॥
   पावसाळा सुरु झाला की आषाढात पालख्यांचे वेध लागतात. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकर्याचं व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पादूका मिरवत या दिंड्या कैवल्याच्या पुतळ्याला भेटायला येतात.
  आषाढी-कार्तिकीला ’पंढरपुरा नेईन गुढी’ म्हणत. सर्व महाराष्ट्रातून दिंडया येतात. अगदी कर्नाटकातून, गोव्यातूनही दिंडया येतात. नदी अनंत अडचणी आल्या तरी सर्वांना जीवन देत पुढे सागराशी एकरूप होण्यास आतुर झालेली असते तशीच ही विठ्ठल भक्त्तीची गंगा, चंद्रभागेच्या काठाशी असणार्या पंढरीच्या विठ्ठलाशी एकरूप होते ती वारकरी सोहळ्याच्या रूपात.
   वारी हा अध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हे एक व्रत आहे. संस्कार आहे. अट्टहासाने जोडलेला सदगुण आहे. एकात्मतेची गंगोत्री आहे. वारी हा भगवतभक्तीचा नुसता अविष्कार असून मुक्तीतील आत्मनंदाचा आणि भक्तीतील प्रेमसुखाचा अनुभव आहे. कारण वारकरी हा भागवत संप्रदाय आहे. या संप्रदायाची शिकवण अगदी साधी-सोपी आहे. प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा, स्वधर्माचे पालन करावे पण हे करतांना पांडूरंगाचे स्मरण करावे हीच भक्ती. त्यात कोणी उच्च नीच नव्हते, कोण्या एका जातीचे संत नाहीत. संतकवी कोण्या एका गावाचे नाही घराण्याचेही नाहीत.
 प्रत्येक जातीत संत होउन गेले. यामध्ये सेना-न्हावी, सावता ’माळी’, नामा ’शिंपी’, गोरा ’कुंभार, नरहरी ’सोनार’ कान्होपात्रा तर ’वारांगना’, एकनाथ ’ब्राह्मण’, तर चोखा ’महार’! अशी एकात्मतेती शिकवण. विठ्ठलाच्या गावा जावे! विठ्ठलरूप व्हावे हेच सत्य. विठ्ठलाला माऊली मानणार्या या संताच्या मनात विठ्ठल ही प्रेम-वात्सल्याची मुर्ती आहे. इथे सगळेच सारखे असतात. कोणी कोणत्या जातीचा नसतो, सर्व समान असतात. म्हणून हा सर्वात सुंदर असा मार्ग आहे.
 म्हणूनच लेखमालेच्या सुरवातीलाच म्हटले आहे त्याप्रमाणे, सासुरवाशीण मुलगी माहेराला जाते. तिला जो आनंद होत असतो तसाचा आनंद आम्हाला वारीला जाताना होतो, हीच खरी अनुभूती आहे. कारण प्रत्येकाचे  ध्येय हे परमेश्वराची प्राप्ती. परम म्हणजे अत्युच्य प्रतिचे असे. परमानंद, परमसुख म्हणतो किंवा आपण सुपर कॉम्प्पुटर, परमकॉम्प्युटर म्हणतो, तसेच हे परम ईश्वाराशी संधान साधण्याचे साधन म्हणजे आमची वारी.
 प्रतिवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी सकल संताची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघते. जागोजाग मुक्काम करीत पायी पंढरपुरास पोहचते. एका अर्थी ही संत साहित्य संमेलने होतात. चर्चा होतात. अनुभवी, अभ्यासू वारकर्यांची कीर्तने होतात. त्यातून टाळकर्यांचे सहज शिक्षण होते. वारीची ही वाट संतानी दाखविली. आणि याच मार्गावरून वाटचाल करीत जीवनालाच सदाचारी बनविले. हा मार्ग अनुभवसिद्ध आहे.
 आपल्याला पिकनीकसाठी जायचे म्हटले, एखादी सहल काढायची तर किती तयारी, विचार करावा लागतो जेवढी सहलीला येणार्यांची संख्या जास्त तेवढा तणाव अजून वाढतो. पण वारीचं तसं नाही वारी ठराविक तिथीला निघते आषाढीला पोहचते. कोणाला निमंत्रण नाही. वर्गणी नाही. सक्ती नाही. पण विणेकर्‍याच्या भोवती दिडींचा आराखडा. रांगा किती, महिला किती, महिला वारकरी कुठं, सगळं काही ठरवल्यासारखं.  या दिंडीत, वारीत दहिहंडी असते, गोपाळ काला असतो. काल्याचे कीर्तन असते. गोपालकाल्यात’ सर्वांच्या शिदोर्या एक करतात आणि नंतर वाटून घेतात, नकळत एकमेकांची प्रांपचिक दु:खेही वाटून घेतात. हे तर कृष्णाने सांगितलेले तत्वज्ञान आहे. सगळ्या गोपाळांनी आणलेली शिदोरी एकत्र करून कालवून खायची. भेदभाव नष्ट करण्याची हीच तर खरी रीत आहे. म्हणून तर आजकाल गेल्या दहा बारा वर्षांपासून आषाढीच्या निमित्ताने हे लोकशिक्षण शाळांमधूनही दिले जाते. शिक्षणाचे भगवीकरण केल्याचा आरोप अनेकजण करतात पण या वारकरी शिक्षणातच तर खरे समानतेचे रूप असते. म्हणून तर वारीच्या परंपरेची माहिती मुलांना विशेषतः पुढील पिढ्यांना होण्यासाठी बालगटाच्या शाळा ते माध्यमिक शाळा यांमध्ये आषाढी एकादशीच्या आधी वारीचे आयोजन केले जाते. विद्यार्थी-विद्यार्थिनी वारकरी पोशाख घालून येतात आणि पालखी सजवून त्यात विठ्ठल-रखुमाई यांची पूजा करून पालखी सोहळा साजरा करतात. शहरातील निवडक माध्यमिक शाळांतील मुले प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होतात आणि वारकरी भक्तांशी संवाद साधतात, ठरावीक अंतर पायी चालून वारीचा अनुभव घेतात. हे सामाजिक शिक्षण शिकवणारे तत्वज्ञान आहे. यासाठी प्रत्येकजण आपल्या पेशाला, छंदाला शोभेल असे योगदान देण्याचाही प्रयत्न करत असतो. त्याप्रमाणे कलाकार, क्रीडापटूही यासाधी काही योगदान देत असतात. इथे योगदान म्हणजे काहीही देण्याची गरज नसते, फक्त चार पावले वारीबरोबर चालत जाउन माउलीचे दर्शन घेण्याचा आनंद असतो. या वारीतील विविध सुविधांची पाहणी करण्यासाठी 2000 युवक सायकल वारी करतील अशी योजना 2017 साली करण्यात आली. ही सेवाही फार महत्वाची असते. तसेच वारीतील गर्दीमुळे होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी वारीनंतर पंढरपुरात, तसेच वारीमार्गावर स्वच्छता अभियान केले जाते. त्यामुळे वारीने अस्वच्छता पसरवली, गर्दीने कचरा केला हा कलंक लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो पुसून टाकता येतो. कारण इथे परमेश्वर प्राप्ती आणि अहंभाव नष्ट होणे हेच अपेक्षित असते. म्हणूनच आपल्यापासून कोणालाही त्रास होणार नाही याची प्रत्येकजण काळजी घेत असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: