सोमवार, १ जून, २०२०

अनलॉक व्हायचे आहे....

माणसाला कोणत्याही गोष्टीची पटकन सवय लागते. अगदी आपण कुठे चार दिवस प्रवासाला गेलो तरी तिथली सवय होते. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळे त्याला सहवासाची सवय पटकन होते. अगदी मुंबईच्या गर्दीतही आम्हाला तशी सवय असतेच असते. म्हणजे आपले लोकलमधले सहकारी, ऑफीसचे सहकारी, सहप्रवासी, रस्त्यावर दिसणारे, दुकानात दिसणारे, हॉटेल रेस्टॉरंट बारमध्ये नेहमी दिसणारे लोकही आपले पटकन ओळखीचे होतात. तिथले विक्रेते, वेटर, सर्व्हीस बॉय, पेट्रोल पंपाचवरचा माणूस हे सगळे आपल्या सवयीचे झालेले असतात. कारण त्यांच्यासोबत आपले आयुष्य अगदी यंत्रवत होउन गेलेले असते.पण या यंत्राची गती गेल्या दोन महिन्यात बदलली होती. म्हणजे पिठाच्या गिरणीत नेहमी गव्हावर गहू दळले जातात. पण एखादवेळी ज्वारीचे दळण आले तर? मग अजून कोणाची ज्वारीची दळणे येतात का याची वाट तो गिरणीवाला पाहतो आणि एकदम दळतो. मग त्या गिरणीला थोडा चवीत बदल मिळतो. गव्हाची चव बदलून ज्वारी पिसायला मिळते तेंव्हा सुरवातीला थोडी कुरकुर होते आणि नंतर पुन्हा पट्टा नेहमीसारखा सुरू होतो. या दोन महिन्यात माणसाची अवस्था तशीच झालेली दिसली.विशेष म्हणजे या काळात त्याला अनेक गोष्टींचा उलगडा झाला. आपल्या आयुष्यात इतके छान दिवस येतील असे वाटले नव्हते असेही कोणाला वाटले असेल. म्हणजे वर्षानुवर्ष जे लोक आपल्या घरच्यांना वेळ देवू शकत नव्हते त्यांना या कोरोनाने, लॉकडाउनने एकत्र आणले.  घरात सारखा टिव्ही पाहून कंटाळा आल्याने आणि बाहेर पडता येत नसल्याने अनेकांच्या नसलेला संवाद सुरू झाला. जे बायकोला कायम ऑर्डर सोडत होते तेच लोक स्वयंपाकातही बायकोला मदत करू लागले. आपल्या जोडीदारांचे माहित नसलेले गुण एकमेकांना कळले ही तर त्या कोरोनाची कृपाच म्हणावी लागेल. त्यामुळेच निरोप घेताना जसे डोळ्यात छुपे अश्रू निर्माण होतात तसे या कोरानाच्या लॉकडाउनमधून बाहेर पडताना कोणाच्या डोळ्यात उभे राहिले तर आश्चर्य वाटायला नको. पण निरोपाचे अश्रू आपल्याला पुनरागमनायचे असे सांगत असतात. पण या अश्रूंना तसे सांगायला नको हे लक्षात घेतले पाहिजे. फक्त एकच करायचे आहे की कोरोनाला स्मरून शक्य तितका वेळ या लॉकडाउनमधून बाहेर पडल्यानंतर अधूनमधून आपल्या जोडीदाराला दिला पाहिजे हे समजण्याची हीच वेळ आहे. याची समज या लॉकडाउनने दिली आहे.आपल्या जोडीदाराच्या अंगात किती गुण आहेत हे अनेकांना या लॉकडाउनने दाखवले असेल. म्हणजे आपल्या नवर्‍याला स्वयंपाकातील काही छान पाककृती येतात याचे आकलन अनेकांना यातून झाले असेल. एकमेकांच्या कलागुणांची कदर करण्याची संधी या लॉकडाउनने दिलेली आहे. त्यामुळे अनेकजण थॅक्स लॉकडाउन असेही म्हणत असतील. म्हणजे आपली पत्नी इतकी छान गाणे म्हणते याचीही जाणिव अनेकांना झालेली असेल. आपली मुले आपल्या आईवडिलांची काळजी करतात, त्यांना त्यांचे प्रेम हवे असते हेही अनेकांना यातून समजले असेल. पण आता आपल्याला अनलॉक व्हायचे आहे. अर्थात अनलॉक फक्त कोरोनापासून व्हायचे आहे. एकमेकांत गुंतागुंत तशीच असली पाहिजे. हीच तर या लॉकडाउनची शिकवण असणार आहे.    संकटात माणसं जवळ येतात. एकमेकांना मदत करतात, हे आपण मुंबईत नेहमीच पाहतो. 26/11 असो, 26 जुलैचा महाप्रलय असो वा बाँम्बस्फोट असो. माणसं एकमेकांना मदत करत असतात. म्हणून तर त्यांना मुंबईकर म्हणतात. पण ही मदत आपण घरच्यांना करायची असते, घरच्यांपासूनही आपण खूप तुटक असतो याची जाणिवही कधीतरी होणे आवश्यक असते. तसे या संकटाने करून दाखवले आहे. या संकटाने बरंच काही बदलून गेले आहे. म्हणजे नेहमी काय करायचे हा प्रश्न गृहीणींना भेडसावत असतो. आज डब्याला भाजी कोणती द्यायची? जी करणार ती त्यांना अवडेल का? नवर्‍याला वांग्याची आवडत नाही. मुलाला दुधभोपळा नको. मुलीला पालेभाजी नको. उसळी दिल्या तर त्यावरून कुरूकुर. मग करायचे काय? खरंच त्या गृहीणीची स्वयंपाक म्हणजे कसरतच असते. सर्कसच असते. म्हणजे सर्कस पाहताना प्रेक्षक नेहमी टाळ्या वाजवतात. पण त्या आतल्या रिंगणातून पाहणारा असतो तो विदूषक असला तरी त्याच्या डोळ्यात पाणी असते. कारण हा जीवघेणा प्रकार करताना आपला सहकारी सुरक्षित राहिल का? काही अपघात तर होणार नाही ना? अशा अनेक विवंचना त्याला छळत असतात. हाच प्रकार गृहीणींच्या बाबतीत असतो. आपण केलेली कसरत या मंडळींना आवडेल का? नवरा खूष असेल का? त्याच्या कपाळावर आठी तर नाही ना उमटणार? मुलं चीडचीड नाही ना करणार? या विचाराने स्वयंपाक करणार्‍या गृहीणीची हीच कसरत घरात बसलेल्या नवरोबांनी या साठ दिवसात पाहिली. घरात काय आहे काय नाही याचा विचार न करता आपण ऑर्डर सोडतो पण हे करणे किती अवघड आहे हे त्याला समजून चुकले, थॅक्स कोरोना. हो असेच म्हणावे लागेल. कारण  घरात अडकून पडलो होतो दोन महिने. सुरवातीला काहीच मिळत नव्हते. जीवनावश्यक वस्तू म्हणजे काय तर फक्त गहू तांदूळ डाळच होती. भाजीपाल्याचा विचार नंतर आला. मग दारावर येईल ती भाजी घेण्याची तयारी झाली. मानसिक तयारी झाली. दारात शेपू विकायला आळु आला, न आवडणार्‍या अनेक भाज्या विकायला आल्या. वांगी, फ्लॉवर, टोमॅटो पाहून कंटाळा आला. तरी त्या असूदेत. उपयोगाला येतील म्हणून खरेदी केल्या गेल्या. आपल्याला आवडत नसतानाही खरेदी केल्या गेल्या. त्याच जेवताना गोड वाटू लागल्या. तुझ्या हातची वांग्याची भाजी खूप छान आहे म्हणून कौतुक झालं. पण  वांग्याची भाजी इतकी मसालेदारा, खमंग आहे हे समजायला कोरोनाचे संकट यावे लागले. शेपूची भाजी वाईट नसते, उग्रपणा घालवूनही आई ती छान करते हे कळायला मुलांना घरात थांबावे लागले. म्हणजे बाहेरची हॉटेल बंद झाली. चायनीज कॉर्नर बंद झाले. कोपर्‍यावरचा वडापाव, पावभाजी, मिसळ सारे बंद झाले आणि आईच्या हातचा शेपूही किती चवीष्ट आहे हे समजून चुकले, थॅक्स कोरोना.  वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली आपल्या नवर्‍याला काय काय कामे करावी लागतात. कशी बोलणी खावी लागतात. काय काय प्रसंगांना तोंड द्यावे लागते आणि तरीही हसत मूड ठेवण्याचा त्याचा चाललेला आटापिटा आपल्या घरकामापेक्षा  खूपच मोठा आहे हे तिलाही कळून चुकते. बाहेरून आल्यावर कधीतरी त्रासून येणारा नेमका का त्रासत होता? लोकलप्रवासात त्याला काही झाले का याची जाणिव तिला झाली.लॉकडाउनने अनेक लांब गेलेली माणसे जवळ आली. अनेक वेळा मनाने लांब गेलेली माणसेही जवळ आली. घरातील धुसफूस कमी झाली. एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळाली. कित्येकांच्या घरात आनंद आला. म्हणजे अनेकांना प्रायव्हसी मिळत नव्हती. आता चान्स घ्यायचा की नको याचा विचार होत होता. अनेक समस्या आहेत, खर्च आहेत याचा बाउ होत होता. पण  सोशल डिस्टन्सिंगच्या काळातही त्यांना शरीराने आणि मनाने जवळ आणले. अनेकांकडे त्यामुळे मोकळीक मिळाल्याने गुडन्यूजही आली.आता लवकरच सर्वांना अनलॉक व्हायचे आहे. निरोप घ्यायचा आहे. पण एकमेकांची दोन महिने एकत्र राहण्याची लागलेली सवय आता डोळ्यात पाणी आणते आहे. दीड दिवसांचा गणपती जातानाही आपल्या डोळ्यात पाणी येते.  आता दोन महिने घरात राहिलेला नवरोबा पुन्हा कामावर जाण्याची कल्पनाच डोळ्यात पाणी उभे करू लागली. सीमेवर लढणारे सैनिक वर्षातून कधीतरी दोन एक महिन्यांसाठी येतात आणि जाताना निरोप घेतात, तेंव्हा त्यांच्या  मनात काय असेल याची जाणिव यामुळे झाली.पण आता अनलॉक व्हायचे आहे. पुनश्च हरीओम म्हणायचे आहे. नव्याने जुना डाव सुरू करायचा आहे. चांगल्या बदललेल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत. आता बाहेर पडायचे आहे. हा विचार प्रत्येकाच्या मनात आज घोळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: