कोणताही पाहुणा आला तरी तो केव्हा ना केव्हा तरी जातोच. कायमचा रहात नाही. त्यामुळे पाहुण्याची चिंता करण्याचे कारण नाही. काही पाहुणे कंटाळवाणे असतात, कधी जाणार याची चिंता लागते. तसाच कोरोना हा पाहुणा आहे. पण तो जाणार आहे हा भाव मनात ठेवला पाहिजे. ब्रिटीशांसारखा पाहुणाही इथे राज्य करायला आला आणि दीडशे वर्ष राहिला पण आपण त्यांना जाण्यास भाग पाडले होते. तसेच याही संकटाला आपण हाकलून लावू शकतो हा विचार करायला हवा. परंतु जोवर आहे तोवर त्याच्याबरोेबर अॅडजस्ट करत जगायचे आहे. पाहुण्यासारखे हे लक्षात घेण्याची गरज आहे. गेले दोन महिने मात्र, ना वडापाव मिळाला, ना पाणीपुरी, ना टपरीवरचा चहा. इतकेच कशाला, अपवाद वगळता दवाखान्यांकडेही फिरकले नव्हते लोक तर. एरवी पाय ठेवायला जागा नसायची रुग्णालयात. डॉक्टरांना जेवणाची फुरसत न देणारे रुग्ण अचानक गेले कुठे, असा प्रश्न पडावा इतकी ओस पडलीत खाजगी रुग्णालये. लोकांचे आजार अचानक नाहीसे झालेत, की डॉक्टरांची लुबाडणूक थांबली, कळत नाही. पंचेवीस-तीस लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार, पन्नास लोकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ... थाटमाट, झगमगाटाची सवय जडलेल्या समूहासाठी तर कल्पनेपलीकडचे आहे सारे. त्यामुळे यातून काही चांगले निर्माण होईल असावी विचार करायला हरकत नाही. म्हणजे आपण अनावश्यक खर्चाला फाटा देण्याची सवय यानिमित्ताने लावून घेवू शकतो हे या पाहुण्यानेच शिकवले आहे. पाहुणा कधी कधी शिकवून जातो ते असे. आजकाल धार्मिक समारंभदेखील घरातून साजरे करू लागले आहेत अनेकजण. अर्थात पर्यायच नाही. पण कपडा, हार्डवेअर, सौंदर्यप्रसाधनं, भांडीकुंडी... कशाची म्हणून कशाचीच गरज पडली नाही जनसामान्यांना या काळात. इथून तिथून भाजीपाला अन किराणा. दिवसातून तिन तिन कपडे बदलणारे आजकाल अनेक दिवस एकच कपडा घालत आहेत. परिटघडीचे कपडे कपाटात बंदिस्त झाले आहेत. कित्येेकांच्या पँटी गेल्या दोन महिन्यात अंगावरही चढलेल्या दिसत नाहीत. बर्म्युडावरच अनेकजण अनेक दिवस आहेत. कारण फक्त गरजेच्या वस्तुंचीच चर्चा आहे. मागच्या आठवड्यात दारू उपलब्ध करून देण्यासाठीची पावलं सरकारी पातळीवरून उचलली गेली नसती, तर त्याहीविना दिवस निघालेच असते की लोकांचे! पण, भिकेला लागलेल्या सरकारला तिजोरी भरण्यासाठी तोच एकमेव मार्ग मिळाला. तसे लोक अजूनही न पिता राहिले असते. दोन महिने राहिले ना? पण ही माणसांची गरज नव्हती तर सरकारची गरज होती. त्यामुळे पाहुण्यांची सरबराई करायला पुन्हा दारूचे निमित्त मिळाले. त्यामुळेच राज्य सरकारने दारू ‘जीवनावश्यक वस्तूं’च्या रांगेत नेऊन बसवली. अगदी घरपोच देण्याचीही तयारी दर्शविली अन लोकांच्या जिवावर उदार होऊन पैसा कमावण्याचा स्वत:साठीचा मार्ग सुकर करवून घेतला.गेले काही दिवस पंतप्रधानांपासून अनेक मान्यवर हेच सांगताहेत की, येत्या काळात आपल्याला कोरोनासोबतच जगायचे आहे. त्यामुळे कालपर्यंत बाळगलेली शिस्त हा पुढील काळात आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे. कदाचित मास्क, सॅनिटायझर, सार्वजनिक ठिकाणी वावरताना बाळगायचे एकमेकांपासूनचे शारीरिक अंतर, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, स्वत:चे आरोग्य आणि शरीर सुदृढ राखणे, शरीराची प्रतिकार शक्ती वृद्धिंगत करणे, या बाबी अंगीकारण्याशिवाय दुसरा पर्यायच असणार नाही आपल्याकडे. परिणामी, नाइलाजाने का होईना, पण या गोष्टीही आपल्या दैनंदिन आचरणाचा भाग झालेल्या असतील पुढील काळात. आता प्लेग, मलेरिया, डेंग्यू अशा साथीच्या रोगांचा, महामारीचा सामना करून झाला आहे संपूर्ण जगाचा. मलेरिया, डेंग्यूने तर अजूनही पिच्छा सोडलेला नाही. कोरोनाचेही तसेच होईल कदाचित. सध्या सुरू असलेल्या संशोधनाला यश मिळून येत्या दिवसांत त्यावरील औषधही हाती पडलेले असेल आपल्या. पण, म्हणून अमुक एका तारखेनंतर कोरोना अथवा त्याचा प्रभाव संपलेला असेल, असे कुणाला म्हणता येणार नाही. म्हणजे सध्याची कोरोनाबाधितांची आकडेवारी मात्र धक्कादायक आहे. आजघडीला साडेतीन लाखांहून अधिक लोक कोरोनाच्या बाधेने मृत्यू पावले आहेत. हा आकडा अजून वाढण्याचा संभव आहे. आता त्या आकड्यांवर नजर फिरवून उर्वरितांना बाधित होण्यापासून वाचविणे, लोकांनी स्वत:ला त्यापासून जपणे, एवढेच काय ते आपल्या नि सरकारच्या हातात आहे. स्वत:ची काळजी स्वत: घेण्याचा एकमेव नामी उपाय या महामारीवर आहे. त्याचेच अनुसरण करायचे आहे. अर्थात जगण्याची विवंचना सर्वांच्याच पुढ्यात आहे. काही लोक दोन महिने घरात बसून कंटाळले आहेत, तर दुसरीकडे काही लोक त्याच घराच्या ओढीने वाट्टेेल तिथून, वाट्टेेल तितके अंतर पायी निघाले आहेत. काहींना या कालावधीत कुठल्या चमचमीत पदार्थांचे प्रयोग सिद्ध करावेत असा प्रश्न पडलाय, तर काहींसमोर दोन वेळ पोटाची खळगी भरण्याचा प्रश्नही जटिल होऊन बसलाय हा सगळा विरोधाभास या लॉकडाउनच्या काळात दिसून आलेला आहे. तरीपण सर्वांसमोरच आपापल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचे आव्हान आहे. हे संकट काही निवारणाची मुदत जाहीर करून अवतरलेलं नाही. किंबहुना त्याच्या निवारणाची शाश्वतीही देता येणे शक्य नाही. अशात, काळजी घेत, स्वत:ला, सभोवतालच्या सर्वांना जपत पुढील मार्गक्रमण करणे, हाच पर्याय शिल्लक राहतो. स्वार्थ आणि समाजभानाची सांगडही या काळात अतिशय महत्त्वाची ठरावी. त्याचा प्रत्यय तर कित्येक सामाजिक संस्थांनी अलीकडे आपल्या वर्तणुकीतून घालून दिला आहे. कम्युनिटी किचन्सपासून तर अन्नवाटपाच्या विविध उपक्रमांपर्यंत अन मेडिकल किटपासून तर वापराच्या उपयुक्त वस्तूंच्या वितरणापर्यंतचे सारे उपक्रम जनतेच्या समाजभानाचा परिचय देणारे ठरावेत असेच आहेत.भविष्यकाळ स्वाभाविकपणे अधिक आव्हानात्मक असणार आहे. सर्वांसमोरच जीवनमरणाचा प्रश्न आहे. घरात सुरक्षित राहणे योग्य असले, तरी कामासाठी घराबाहेर पडणे ही अनेकांसाठीची अपरिहार्यता आहे. आज अस्तित्वाच्या भीतीने गावाकडे परतलेली माणसं उद्या पोटाच्या प्रश्नापुढे नमते घेत पुन्हा शहरांकडे फिरकतील कदाचित. पण, तिथेही कालपर्यंत होतं ते सारं उद्या असेलच असं नाही. पण या पाहुण्याबरोबर पुढचे दिवस आपल्याला काढावे लागतील. पाहुणा कधीतरी जाईल या विश्वासाने माणसाला इथून पुढचे दिवस काढावे लागतील.या संकटाने ज्या अनेकानेक बाबी शिकवल्यात, त्यातील एक म्हणजे गरजूंसाठी धावून जाण्याची. खाली चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी न मागताही वरच्या मजल्यावरून चहाचा थर्मास येणे असो, रेल्वेने गावाकडे निघालेल्या मजुरांना दोन वेळच्या भोजनासाठी शिदोरी बांधून दिली जाण्याचा उत्कट प्रसंग असो, की मग चौकात तासन्तास काम करणार्या शासकीय कर्मचार्यांचा तणाव घालवण्यासाठी भर रस्यावर चाललेली कुणाची संगीत साधना. माणूस त्यातही आनंद मानतो आहे. कारण त्याने या दोन महिन्यात या पाहुण्याला स्विकारले आहे. त्याच्याबरोबर पुुढचे आयुष्य काढायचे आहे. तरीही तो कधीतरी जाणार आहे, नक्की जाणार आहे हा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे. |
रविवार, ३१ मे, २०२०
पाहुणा आला, राहिला, पण जाणारच
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा