भारतीय जनता पक्ष गेल्या दोन दिवसांपासून एकाएकी आक्रमक झालेला आहे. राज्यातील ठाकरे सरकारवर भाजपच्या विविध नेत्यांकडून टीका होत आहे. शरद पवारांनी एखादे पत्र मुख्यमंत्र्यानाही लिहावे असे वक्तव्य करून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर कटाक्ष टाकला. राज्यात राष्ट्रपती राजवट हाच पर्याय आहे असे म्हणून वादग्रस्त भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी वक्तव्य केले. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तर रणांगणात उतरले असून आज 22 मे रोजी ते आंदोलन करत आहेत. कर्नाटक आणि इतर राज्यांप्रमाणे पॅकेज जाहीर करा अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. त्यामुळे भाजपचे नेते अचानक चौफेर तुटून पडले आहेत. पण तुटून पडण्याची हीच ती वेळ आहे का असा प्रश्नही सामान्यांना पडला आहे. महाराष्ट्र आणि मुंबईतल्या कोरोना संसर्गाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातली आरोग्य व्यवस्था कोसळली आहे असा आरोप करत महाराष्ट्र भाजपाने आता राज्य सरकारविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणावीस यांनी याबाबत नुकतेच राज्यपालांना निवेदन दिलं. त्यानंतर ’महाराष्ट्र बचाओ’ असं आंदोलन पुकारत भाजपाचे राज्यातले वेगवेगळ्या ठिकाणचे नेते जिल्हाधिकारी, तहसिलदार, आयुक्त यांना भेटत आहेत आणि निवेदन देत आहेत. त्यामुळे भाजपचा हा आक्रमकपणा राज्यातील राजकारणाला कोणती दिशा देणार आहे? हे आंदोलन करण्याची हीच वेळ होती का असाही प्रश्न आहे. तसेच हे आंदोलन असेल तर त्यातून नेमके काय साध्य होणार हाही प्रश्न आहे. ते सामान्यांसाठी आहे का ऑपरेशन लोटसचा काही भाग आहे? सुरुवातीला कोरोना संकटाच्या काळात विरोधी पक्ष राजकारण करतो आहे या आरोपाच्या भीतीनं सरकारवर मर्यादित टीका करणार्या भाजपानं आता अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचं चित्र आहे.कोरोना संकट हाताळणीत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस विनोद तावडे, आशिष शेलार या नेत्यांसह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना जाऊन भेटले. कोरोनामुळे जे संकट उभे ठाकले आहे त्याचा सामना करण्यासाठी जी प्रभावी पावले टाकण्याची गरज होती ती टाकलेली दिसत नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या आहे आणि ही संख्या दररोज वाढते आहे, असा आरोप फडणवीस यांनी केलेला आहे. त्याचबरोबर राज्यात आणि राज्याबाहेर जाणार्या मजुरांचे होणारे हाल, शेतकरी आणि इतर वर्गांना राज्य सरकारनं अद्याप जाहीर न केलेलं आर्थिक पॅकेज यावरूनही त्यांनी ठाकरे सरकारला टीकेचं लक्ष्य केलं आहे. राज्यात सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही असा गंभीर प्रश्न तयार झाला आहे, असंही फडणवीस म्हणाले. पण खरोखरज सामान्य माणसांची आणि राज्याची कळकळ या भाजप नेत्यांना असेल तर हे आंदोलन दिखाउपणाचे असता कामा नये. त्यातून सामान्यांना लाभ पदरात पाडून घेण्याची ताकद असली पाहिजे. म्हणजे एकटे फडणवीसच नव्हे तर भाजपाचे इतर नेतेही पुढे सरसावले आहे असं दिसतं आहे. ’महाविकास आघाडी’ सरकारसोबतच भाजपा उद्धव ठाकरेंवरही टीका करते आहे. पण हे सगळे विधानपरिषदेचे आमदार म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर, बिनविरोध निवडून आल्यानंतर झालेले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे हीच ती वेळ आहे काय याचे हे एक उत्तर आहे की सहा महिन्यांची मुदत संपून जाईल आणि हे सरकार अडचणीत येईल याची वाट भाजप पहात होते. तोपर्यंत गप्प बसले. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रपती राजवट लागेल अशी अपेक्षा केलेली होती. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून ठाकरे यांची निवड केली गेली नाही. हे त्याचेच एक कारण होते. त्यामुळेच सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एक़दा राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली आहे. आपोआप कोसळते आहे काय ते पहायचे, नाहीतर कोसळवायचा प्रयत्न करायचा ही भाजपची नीती यातून दिसते आहे. त्यामुळेच यात जनहित, राज्यहित किती आणि भाजपहित, राजकारण किती हे तपासायला लागेल. भाजपचे आज म्हणणे आहे की, कोरोनाच्या संकटात राज्यातल्या जनतेला दिलासा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री फेसबुकवरच संवाद साधतात. त्यामुळे सरकारचा कारभार आता फेसबुकवरच चालणार का?, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.हाच प्रश्न गिरीश महाजनांनीही विचारला आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारकीची शपथ घेतली. त्यांचं मुख्यमंत्रीपद कायम राहिलं. त्यासाठी त्यांचं अभिनंदन. मात्र राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ज्यापद्धतीनं काम झालं पाहिजे तसं होतांना दिसत नाही. मुख्यमंत्री तर घराच्या बाहेरच पडत नाहीत. शपथविधीसाठी मात्र ते कुटुंबासह बाहेर पडल्याचं पाहिलं, अशी बोचरी टीका गिरिश महाजनांनी केली आहे. भाजप हा अनेक दशके विरोधी पक्ष राहिलेला आहे. त्यामुळे आंदोलने करणे, जनतेला हाताशी धरणे, रस्त्यावर उतरणे हे भाजपला सहज जमते. त्यातून ते आपली चांगली ताकद दाखवू शकतात. किंबहुना राज्यात भाजप सरकार होते तेंव्हा किंत्येकवेळा विरोधीपक्ष नेते असल्याचा आभासच त्यांच्या भाषणातून होत होता. आपण सत्ताधारी आहोत याचा विसर त्यांना तेंव्हा पडला होता असेही दिसून आले होते. त्यामुळे आज ते आपल्या मूळ भूमिकेवर आलेले दिसत आहेत. त्यामुळेच फडणवीसांपासून विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी केलेल्या या टीकेला आणि ’महाराष्ट्र बचाओ’ आंदोलनाला उद्धव ठाकरे वा त्यांच्या सरकारमधल्या अन्य कोणी अद्याप उत्तर दिलं नाही आहे. अर्थात आज उद्या शिवसेनेचे तारणहार संजय राउत काहीतरी बोलतील, लिहीतील कदाचित. पण ती भूमिका शिवसेनेची असणार की सरकारची हा प्रश्न आहे.भाजपाचे केवळ राज्यातले नेतेच आता महाराष्ट्रातल्या स्थितीवरून आक्रमक झाले नाही आहेत, तर दिल्लीतले नेतेही काँग्रेसवर टीकेची झोड उठवत आहेत.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काँग्रेसला मजुरांच्या प्रश्नांवर राजकारण करण्याची ही वेळ नाही आहे असं सुनावलं, पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेसला महाराष्ट्राकडे पहायला सांगितलं. महाराष्ट्रातली कोविड 19 परिस्थिती चिंताजनक आहे आणि मी अपेक्षा करतो की काँग्रेस त्यांची शक्ती पत्रकारांना शांत करण्यापेक्षा लोकांना बरं करण्यासाठी लावेल. अर्थात कोरोनाचं संकट सुरू झाल्यावर विरोधी पक्ष म्हणून भाजपाने सरकारवर टीका केली. पण त्याच्यावर तीव्र प्रतिक्रियाही आल्या. महाराष्ट्रात सत्तेपासून दूर व्हावं लागल्यानं या संकटाच्या काळात भाजपा राजकारण करतं आहे का असे प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यामुळेच आता लॉकडाउन उठायची वेळ, 31 मे नंतर सर्व सुरळीत सुरू होण्याची शक्यता गृहीत धरता भाजप आक्रमक झालेली आहे. पुढील महिन्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. त्याचीही ही झलक असू शकते. पण भाजपने रणांगणात उतरण्याची ही वेळ साधली आहे हे नक्की.उद्धव ठाकरेंपासून महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी अशा काळात राजकारण करु नये असं म्हणत भाजपाला उलटं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परिणामी आम्ही सरकारला मदत करायला तयार आहोत पण जिथं चुकत आहे तेही दाखवणं आमची जबाबदारी आहे असं भाजप म्हणत राहिली.यावर समाजमाध्यमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया आल्या आणि भाजपला टीकेला सामोरं जावं लागलं. भाजपच्या नेत्यांवरची ही टीका ट्रोलिंगपर्यंतही गेली. फडणवीसांनाही त्याचा सामना करावा लागल्यानंतर विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना ट्रोलर्सविरोधात कारवाई करावी असं निवेदन मुंबई पोलिसांना द्यावं लागलं. त्याचवेळी गेल्या दोन तीन दिवसांपासून कोणा एका पोलीसाने फडणवीस यांना तुम्ही मुख्यमंत्री असायला हवे होता असे म्हटल्याची बातमीही पसरत आहे. हे नेमके काय चालले आहे? हे जनहीत आहे की राजकारण आहे? म्हणूनच प्रश्न पडतो आहे की आंदोलन करण्याची हीच ती वेळ आहे का?हे सारं होत असतांनाच दुस-या बाजूला मुंबई आणि महाराष्ट्रातली वाढत जाणारी रुग्णांची संख्या जनमानसावरही परिणाम करते आहे. लोकांच्या चिंतेत भर घालते आहे.सामान्य लोकांना अनेक प्रकारच्या अडथळ्यांना सामोरं जावं लागतं आहे. रुग्णांना इलाजासाठी होत असणा-या त्रासाची उदाहरणं समोर आली आहेतच, पण सोबत एवढ्या मोठ्या लॉकडाऊननंतर भेडसावणारे आर्थिक प्रश्न आता घराघरात पोहोचले आहेत. अशी चिंता सरकारवरच्या नाराजीच्या दिशेनंच जाते हे पाहून भाजप आता अधिक आक्रमक होताना दिसते आहे. ही वेळ योग्य का अयोग्य माहिती नाही, पण आज ती वेळ भाजपने साधली आहे हे नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा