रविवार, ३१ मे, २०२०

खबरदारीची आवश्यकता

  कोरोनाविरुद्धच्या लढाईतील चौथा टप्पा सुरू आहे. हा टप्पा अखेरचा असल्याचे मानायला हरकत नाही. 31 मे पर्यंत सरकारने लॉकडाऊन चारची घोषणा केली आहे. हे करताना सरकारने बर्याच बाबतीत शिथिलता दिली आहे. 22 तारखेपासून तर अनेकजण मोकाट सुटले आहेत आणि पुन्हा गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळेच जरी सवलत मिळाली असली, मोकळीक मिळाली असली तरी थोडा संयम बाळगला पाहिजे आणि गरज असेल तरच बाहेर पडले पाहिजे हे समजले पाहिजे. नाहीतर पुन्हा लॉकडाउन होण्याची वेळ येईल. 1 जूनपासून सगळे सुरू होईल अशी अपेक्षा करायची असेल तर आज संयम फार महत्वाचा आहे. लॉकडाऊन एक आणि लॉकडाऊन दोनच्या तुलनेत आता बर्यापैकी व्यवहार सुरळीत व्हायला हरकत नाही. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्येच नाही, तर रेड झोनमधील दैनंदिन कामकाज सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. आता रेड आणि नॉनरेड झोन असे प्रकार केल्यामुळे सवलती वाढल्या आहेत. अर्थात याचा अर्थ, कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकली वा कोरोनावर मात केली, असे अजिबात नाही. कोरोनाची लढाई दीर्घकाळ चालणारी आहे. जोपर्यंत कोरोनावर प्रभावी औषध वा लस येत नाही, तोपर्यंत आपण कोरोनावर मात करू शकत नाही. जोवर आपण कोरोनावर मात करू शकणार नाही, तोवर कोरोना आपल्यावर निर्णायक मात करणार नाही, याची काळजी सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे.लॉकडाऊन मध्ये सरकारने काही बाबतीत शिथिलता दिली असली, तरी ती अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प होऊ नये म्हणून. लॉकडाऊन एक आणि लॉकडाऊन दोनमुळे देशातील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. जवळपास 40 दिवस देशातील आर्थिक घडामोडी पूर्णपणे बंद होत्या. एवढा काळ आर्थिक चक्र पूर्णपणे ठप्प होणे कोणत्याच देशाला परवडण्यासारखे नाही. त्यामुळे किमान ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेच्या चक्राला किंचित गती देण्यासाठी सरकारने काही प्रमाणात व्यापार आणि उद्योग सुरू करायला परवानगी दिली आहे. अत्यावश्यक सरकारी सेवांची कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासोबत अत्यावश्यक नसलेल्या सरकारी सेवांसोबत खाजगी क्षेत्रातील कार्यालये 33 टक्के उपस्थितीसह सुरू करण्याची अनुमती सरकारने दिली आहे. याशिवाय अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेली दुकानेही काही मर्यादांसह सुरू करण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊन तीनच्या पहिल्याच दिवशी लोकांनी रस्त्यांवर गर्दी केली. जनतेच्या सोयीसाठी हा निर्णय सरकारने घेतला आहे. जनतेने याचा फायदा घ्यायला हरकत नाही, पण गैरफायदा घेऊ नये. रस्त्यावर येताना सर्वांनीच भौतिक दूरता ठेवण्याची गरज आहे. पण, गेल्या दोन दिवसात देशाच्या सर्वच भागात रस्त्यावर झालेली गर्दी आणि त्यात भौतिक दूरतेचा उडवण्यात आलेला फज्जा, हा चिंतेचा विषय आहे. कदाचित रमजान ईदमुळेे लोक बाहेरड पडत असतील पण गर्दी करताना भान जपणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी पोलिसांनी दंडा उगारल्यावरच नियम पाळण्याची लागलेली सवय लोकांनी सोडण्याची गरज आहे. सामाजिक जाणिवेतून स्वत:हून नेहमीच नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे, कोरोनासारख्या संकटाच्या काळात तर त्याची नितान्त गरज आहे.   देशाची अर्थव्यवस्था वाचवणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच वा त्यापेक्षाही जास्त देशातील जनतेचा जीव वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे लॉकडाऊन तीनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देताना सरकारने घाई तर केली नाही, असे वाटू शकते. आधीच्या लॉकडाऊनमध्ये कडक निर्बंध असतानाही लोक रस्त्यावर येत होते. आता तर शिथिलता म्हटल्यावर लोकांचा उत्साह ओसंडून वाहू शकतो. सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत कामाच्या निमित्ताने बाहेर जाण्याची परवानगी सरकारने दिली असली, तरी बाहेर जाण्याची आपल्यावर कोणतीच सक्ती नाही, याची जाणीव जनतेने ठेवण्याची गरज आहे. खूप आवश्यक असेल तरच जनतेने घराबाहेर पडावे, आवश्यक नसेल तर घराबाहेर पडणे टाळले पाहिजे. यात सरकारचे नाही, तर जनतेचेच हित आहे. सुदैवाने अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे कोरोनाच्या संक्रमितांची तसेच कोरोनामुळे मृत्यमुखी पडलेल्यांची संख्या खूप कमी आहे. ही बाब आपल्यासाठी दिलासादायक असली, तरी आता कोरोना आपले काही बिघडवू शकत नाही, असा समज करून लॉकडाऊनमधील निर्देशांचे पालन न करणे सगळ्यांसाठीच धोकादायक ठरू शकते. शिथिलता देण्याच्या आपल्या निर्णयाचा सरकारला पश्चात्ताप होणार नाही, याची काळजी जनतेनेच घेतली पाहिजे. कोरोना हा जात-पात-पंथ-भाषा-स्त्री-पुरुष-गरीब-श्रीमंत तसेच उच्चपदावरील तसेच कनिष्ठपदावरील असा कोणताही भेदभाव करत नाही. कोरोनाने रिक्षा चालवणार्यापासून ब्रिटनच्या पंतप्रधानांपर्यंत सर्वांनाच समान वागणूक देत आपल्या कवेत घेतले होते. त्यामुळे आपल्याला कोरोना होणारच नाही, असा समज कोणी करून घेण्याची गरज नाही. डॉक्टर, परिचारिकांसोबत कोरोनाची आतापर्यंत पोलिसांना लागण होत होती. आता केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल अशा निमलष्करी दलासह लष्करातील जवानांनाही कोरोनाने सोडले नाही. डोळ्यांत तेल घाऊन रात्रंदिवस सीमेवर देशाचे रक्षण करणार्यांना कोरोनाची लागण झाली तर केवढा अनर्थ होऊ शकतो, याची कल्पना केलेली बरी! त्यामुळे सगळ्यांनाच खूप जास्त खबरदारी घ्यावी लागणार आहे. जेमतेम आठ दिवस राहिले आहेत. 1 जूनपासून सगळे काही सुरळीत होण्यासाठी आता सावरले पाहिजे.   सरकारसमोर देशातील लोकांसोबत अर्थव्यवस्था वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळेच लॉकडाऊन तीनमध्ये सरकारने काही सवलती लोकांना दिल्या आहेत. देशातील जनता आणि अर्थव्यवस्था एकाच वेळी वाचण्याची गरज आहे. देशातील जनता वाचली आणि अर्थव्यवस्थेने शेवटचे आचके टाकले तरी चालण्यासारखे नाही, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्था वाचली आणि देशातील समस्त जनतेने राम म्हटला तरी चालण्यासारखे नाही. एकवेळ मरणोन्मुख असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत प्राण फुंकता येतील, पण एकदा हदयाचे ठोके बंद पडलेल्या माणसात कोणत्याही प्रयत्नाने प्राण फुंकता येणार नाही. देशातील जनता आणि अर्थव्यवस्था या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे दोघांनीही जिवंत राहण्याची गरज आहे आणि ही जबाबदारी विशेषत्वाने माणसांची आहे. कारण, माणसाने एकदा मनात आणले की तो काहीही करू शकतो. वाल्याचा वाल्मिकी आणि नराचा नारायण होण्याची क्षमता माणसातच आहे. त्यामुळे येत्या काळात माणसाने जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय सरकारने माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी घेतला आहे, त्यामुळे आपण बेजबाबदारपणे वागत आपले जीवनमान तर कमी करीत नाही, हे पाहण्याची जबाबदारी माणसाचीच आहे.   देशाचे भविष्य आपल्याला घडवायचे आहे, याची जाणीव लोकांनी ठेवली पाहिजे. त्यामुळे आपण घराबाहेर पडलो तर तो दिवस आपला आणि आपल्या कुटुंबाचा शेवटचा ठरणार नाही, याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. त्यामुळे लॉकडाऊन तीनमध्ये बाहेर पडताना सर्वांनी लॉकडाऊनच्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. मग तुमच्यावर कोणत्याही निमित्ताने बाहेर जाण्याची वेळ येवो. प्रत्येक वेळेला तुम्हाला भौतिक दूरतेचे पालन करावेच लागणार आहे. कोणाहीपासून मनाने दूर जाण्याची गरज नाही, पण स्वत:चा आणि त्याचाही जीव वाचवण्यासाठी भौतिक दूरतेचे पालन करणे आवश्यक आहे. काही काळासाठी भौतिक दूरतेचे पालन केले, तर दीर्घकाळ एकमेकांच्या सान्निध्यात राहण्याचे भाग्य आपल्याला मिळू शकते, याची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्यावर आपल्या स्वत:सोबत आपल्या कुटुंबाला, नातेवाईकांसोबत मित्रपरिवार आणि समाजासोबत देशाला वाचवण्याची जबाबदारी आहे, याचे भान सगळ्यांनी ठेवण्याची गरज आहे. कोरोना ही आपल्यासाठी आपत्ती नाही तर इष्टापत्ती आहे, हे आपल्या कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे. भारताची विश्वगुरू होण्याची वाटचाल सुरू झाली आहे, थोडी काळजी आपण घेतली तर भारत विश्वगुरू झालेला पाहण्याचे भाग्य आपल्याला लवकरच लाभू शकते. पण, त्यासाठी कोरोनाच्या साथीच्या निमित्ताने थोडा धीर, थोडा संयम आपल्याला पाळावा लागणार आहे.लॉकडाउन 4 चा कालावधी संपल्यावरही काळजी घेतच आपल्याला सगळे सुरू करायचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: