भारत चीन सीमेवर गेल्या काही दिवसात कुरबुरी वाढलेल्या आहेत. भारतात कोरोनाचा हैदोस सुरू असताना गाफील भारतावर चाल करण्याची चीनची रणनीती दिसते आहे. त्यासाठीच नेपाळसारख्या यतकींचीत देशाला भडकावून युद्ध करण्याचे काम चीन करत आहे. या चिनी नकट्यांची नाके आत्ताच ठेचली पाहिजेत. त्यासाठी अमेरिकेचे मांडलिकत्व न पत्करता पंतप्रधान मोदींनी हालचाल केली पाहिजे. एवढासा नेपाळ की ज्याला दशकानुदशके भारताने जोपासले आहे तो जर चीनच्या फूस लावण्याने भारताशी गद्दारी करत असेल तर या दोन्ही नकट्या नाकांना ठेचावेच लागेल हे लक्षात घेण्याची ही वेळ आहे. चीनचा आपला अनुभव काही फारसा चांगला नाही. किंबहुना दोस्ती करण्याच्या लायकीचाही तो देश नाही. त्यांना आपले बाजारपेठेचे दरवाजे खुले हेच चुकले होते. पण आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. 1960 च्या दशकात हिंदी -चिनी भाई भाई’ असा नारा पंडित नेहरूंनी दिला होता आणि त्यांचे हे शब्द हवेत विरत नाहीत तोच, चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता. चिनी भाई नाही तर कसाई आहे, हे त्यानंतर सिद्ध झाले होते. तरीही त्यांच्या फाजील जवळीक साधण्याचे काम आपल्याकडून होत असेल तर आपल्यासारखे मूर्ख दुसरे कोणी नाही असेच म्हणावे लागेल. असंगाशी संग अन प्राणाशी गाठ म्हणतात तोच प्रकार इथे होताना दिसतो आहे. गेल्या वीस पंचवीस वर्षात जागतिकीकरणाच्या रेट्यात भारत हा चीनची बाजारपेठ झाला. मधल्या काळात आर्थिक शक्ती वाढविल्यावर आता चीन नव्याने त्याच्या साम्राज्यवादी भूमिकेचे काम करत आहे. चीनच्या सीमा भारतीय उपखंडातील अनेक देशांशी लागून आहेत, मात्र त्यांच्याशी त्याचा वाद नाही. एकतर हे देश चीनसारख्या महाकाय देशाशी भांडण करूच शकत नाहीत. दुसर्या बाजूने दक्षिण आशियातील राजकारणावर पकड ठेवण्यासाठी चीनने नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान... वगैरे देशांना मदतीच्या ओझ्याखाली दाबून ठेवले आहे. त्यामुळे या छोट्या देशांना भारतविरोधी भडकावून त्यांच्यात भांडण लावून मध्यस्ताची भूमिका करण्याचे आणि मोठे होण्याचे काम चीन करतो आहे. हा कावा खोडून काढला पाहिजे. दुसर्या महायुद्धानंतर आणि विशेषत: जागतिकीकरण भारतासारख्या विकसनशील देशाच्या दुर्गम भागापर्यंत पोहोचण्याइतका त्याचा विस्तार झाल्यानंतर, कुठला देश भूभागांवर साम्राज्य गाजविण्यास भुकेला असेल असे वाटत नव्हते. चीनला केवळ जागतिक महासत्ताच व्हायचे नाही, तर त्यांना हवा तो भूभाग आपल्या अधिपत्याखालीदेखील हवा आहे. त्याच्या या साम्राज्यवादाचे हादरे अधूनमधून भारतालाच बसत असतात. आता नव्याने नेपाळच्या मार्फत सीमावाद उकरून काढत असताना चीनने भारतीय सीमेवर आगळीक सुरू केलेली आहे. सारे जग कोरोना विषाणूशी लढत असताना चीनचा गुंतवणुकीतून आर्थिक विस्तार करण्याचा प्रयत्न आणि भारतासारख्या देशाशी सामरिक छेडखानीही काढत राहणे बरेचसे सूचक असे आहे. कोरोना हे चीनचे जगाशी छेडलेले विषाणू-युद्धच आहे, ही जगाला असलेली शंका यामुळे स्पष्ट होते.आताही भारताच्या लडाखच्या सीमेवर चीनने भारतीय सैनिकांना ताब्यात घेण्याचा उद्दामपणा केलाच होता. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले असले, तरीही या सार्या क्षेत्रावर आपला प्रभाव आहे, असे सांगत ताबा वाढवीत नेण्याचा हा प्रकार आहे. लडाखमध्ये या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर ही घटना घडली. भारतीय जवानांना ताब्यात घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. पण, दोन्ही बाजूच्या कमांडर्समध्ये बैठक झाल्यानंतर परिस्थिती सामान्य झाली. भारत चीन युद्ध पेटण्याची ही छोटी मोठी कारणे बनू शकतात. त्यामुळे वेळीच चीनला आवर घालणे आवश्यक आहे. चीनला भारताच्या पूर्वोत्तर राज्यांचा भाग आपलाच वाटत आला आहे. त्या भागातून रस्ता तयार करून भारताला घेरण्याचा त्यांचा डाव आहे. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी डोकलाम येथे लष्करी तणाव निर्माण करण्यात आला होता. भारताने त्या वेळी तडजोड केली नाही, अखेर त्यांना माघार घ्यावी लागली. त्या भागात त्यांना 20 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करायचा आहे. त्या वेळी भारताने भूतानला मदत केली. त्यानंतर चीनने डाव्या विचारांची सरकारे भारताच्या शेजारी देशांत येतील, याची काळजी घेतली. अगदी नेपाळ, श्रीलंका, भूतानला मदतीच्या ओझ्याखाली दाबून टाकले. पाकिस्तानचा त्यासाठी सर्रास वापर केला. आता पाकिस्तान खंगला आहे. आर्थिकदृष्ट्या खचला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तसा एकटा पडला आहे. त्यामुळेे चीनने नेपाळसारखा छोटा देश शस्त्र म्हणून भारताविरोधात उभा करण्याचा डाव टाकला आहे. भारताने 370 कलम हटवून आणि काश्मीरचे त्रिभाजन करून काश्मीरच्या मुद्यातली हवाच काढून घेतली होती. त्यानंतर अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांना दहशतवादाचा फटका बसल्यावर त्यांनी पाकिस्तानवर दबाव वाढविणे सुरू केले. त्यामुळे पाकिस्तानची अडचण झाली. कारण अमेरिकेला नाकारू शकत नाही अन चीनला उघडपणे स्वीकारू शकत नाही, अशी पाकड्यांंची अवस्था झाली. त्यामुळे चीनने कोरोनाचे अस्त्र सोडून जगाला वेठीस धरले. जेणेकरून यावरून अमेरिका आणि युरोपीय देश युद्धात उतरले तर त्यामुळे भारताचा नाश होईल. या युद्धात अमेरिका भारताची भूमी वापरणार हे चीनने ओळखले. त्यामुळे आता चीनने नवी प्यादी समोर केली आहेत. काही ठिकाणी स्वत:च समोर येण्याशिवाय चीनला पर्याय राहिलेला नाही.आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीन तसा जागतिक पातळीवर एकटा पडत चालला असताना भारतीय उपखंडात कुरापती काढण्याशिवाय त्याला पर्याय राहिलेला नाही. त्यासाठी त्याने नेपाळचा वापर करणे सुरू केले आहे. वास्तविक नेपाळसारख्या टीचभर देशाचे पंतप्रधान ओ. पी. शर्मा ओली भारताबरोबर असलेला सीमावाद उकरून काढतात, त्यासाठी मग वादग्रस्त नकाशा प्रसृत करतात, हे पुरेसे बोलके आहे. भारताचे लष्करप्रमुख म्हणाले तसे नेपाळचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे आणि मग तो कोण आहे, हे सांगण्यासाठी फार आंतरराष्ट्रीय राजकारण कळण्याचीही आवश्यकता नाही. ‘ मोदी सरकारच्या काळात भारताने चीनशी तडजोेडीचे वागणे ठेवले आहे. चीनने आंतराष्ट्रीय व्यासपीठावर भारताशी नेहमीच असहकार्याचे धोरण ठेवले आहे. दक्षिण आशियायी समुद्रात चीनला हातपाय पसरायचे आहेत, त्याला भारताने साक्षेपी भूमिकेनेच योग्य उत्तर दिलेले आहे. आता 8 मे रोजी धारचुला-लिपुलेख रस्त्याचे उद्घाटन केले. त्यामुळे नेपाळने तसे नाराज होण्याचे कारण नाही. एकतर नेपाळचा या रस्ताबांधणीने कुठेच नुकसान होत नाही. कोरोनानंतरच्या वातावरणात भारताने चीनला थारा दिलेला नाही. एकतर त्यांच्या पीपीई किटसही भारताने परत केल्या. भारतात गुंतवणूक करण्याचे मार्ग सोपे केले. आता चीनमधून काढता पाय घेणार्या उद्योगांसाठी भारताने पायघड्याच अंथरल्या आहेत. त्यामुळे चीनला धडकी भरणे स्वाभाविक आहे. भारतातील चिनी वस्तूंचा व्यापारदेखील आता इतर देशांप्रमाणेच कमी होत जाणार, हे नक्की. अशा वेळी निर्माण झालेली अस्वस्थता काढण्याचा मार्ग म्हणजे नेपाळ आहे! नेपाळचे शस्त्र वापरून भारतावर कुरघोडी करण्याचा डाव चीन करतो आहे. कारण नेपाळ हा भारतात, इथल्या संस्कृतीत इतका मिसळून गेला आहे की नेपाळमध्ये नाहीत एवढे नेपाळी भारतात आहेत. इथे लष्करात गुरखा बटालियन आहे. गाव शहरांपासून सगळीकडे नेपाळी व्यवसाय आणि संरक्षण, गुरखा म्हणून काम करण्यासाठी फिरत आहेत. त्यामुळे भारतात घातपात करण्यासाठी या जमातीचा वापर करण्याचे षडयंत्र आहे. कारण ही एक अत्यंत कडवी जमात आहे. त्यामुळे हे नेपाळ नामक चीनने उगारलेले अस्त्र वेळीच निष्प्रभ करण्याची गरज आहे.आता भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमावादाचे बघू... भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान 1800 किलोमीटर लांबीची सीमा आहे. पैकी दोन टक्के म्हणजे साधारण 90 किलोमीटर लांबीच्या भागाबद्दलच काय तो वाद आहे, म्हणजे त्यावर चर्चा सुरू आहे. हा रस्ता झाल्याने कैलास मानसरोवर यात्रेच्या मार्गावरची चीनची वाटमारी कमी होणार आहे. त्यामुळे या यात्रेला लागणारा वेळही कमी होणार आहे. वेळ, पैसा, श्रम यात बचत होणारा मार्ग 80 टक्के भारतीय हद्दीतून जाणारा आहे. आताच या मार्गाचे काम सुरू झाले असे नाही. गेले कित्येक महिने या मार्गाचे काम सुरू आहे. असे असताना आताच अचानक नेपाळला सीमावादाची आठवण का झाली? या निर्धारित रस्त्याचे केवळ चार किलोमीटरचेच काम शिल्लक आहे. पण चीनने भडकावले म्हणून हे सगळे घडते आहे. म्हणून या चीनचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
रविवार, ३१ मे, २०२०
चीनच्या हातात नेपाळचे अस्त्र
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा