कोणत्याही कुंडलीत जी घरं असतात ती बारा असतात. ती बारा घरंही कमी पडतील असे गुण असलेले आगळे वेगळे व्यक्तिमत्व म्हणजे रत्नाकर मतकरी. गूढ रंजक लेखक अशी त्यांची ओळख असली तरी तो त्यांच्या साहित्याचा एक गुण होता. पण त्याहीपेक्षा त्यांच्यात खूप काही होतं. म्हणूनच कुंडलीतील प्रत्येक घरात एक गुण टाकायचा म्हटलं तरी तो कमी पडेल असे ते व्यक्तीमत्व होते. ते आपल्यातून आज गेल्याने नाट्य आणि साहित्य सृष्टीचे फार मोठे नुकसान झाले आहे. ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री निधन झालं. त्यांचे ज्येष्ठत्व हे वयानं नव्हतं तर त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यकृतींनी होते. गेली अनेक दशके ते लढवत असलेल्या खिंडीमुळे हे निर्माण झालेले ज्येष्ठत्व होते. त्यांच्या निधनानं साहित्य, चित्रपट, नाट्य विश्वावर शोककळा पसरली आहे.1955 मध्ये त्यांनी ‘वेडी माणसं’ या एकांकीकेपासून लेखनाचा श्रीगणेशा केला होता. त्यावेळी ते अवघे 16 वर्षांचे होते. ती एकांकीका मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती.गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील गोदरेज रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. त्या ठिकाणी त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली. त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील सेव्हेन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं. त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या हयातीत गूढ साहित्य समृद्ध करणारे हे व्यक्तिमत्व जगाचा निरोप घेतानाही एका गूढ व्हायरनसे व्यापलेल्या आजाराने निरोप घेउन गेले. त्यातून जाताना त्यांनी साहित्य विश्वाला संदेशच दिला आहे की या कोरोनाचे काही तरी करा. ‘लोककथा 78’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा’ आणि मतकरी यांची काही अन्य नाटकं प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. तसंच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या लहान मुलांच्या, तसंच ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमीवर आपली छाप सोडली.गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवला. आतापर्यंत त्यांनी मोठ्यांसाठी 70 तर लहान मुलांसाठी 22 नाटकांचं लेखन केलं आहे. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका लोकांच्या अद्यापही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या ‘इन्वेस्टमेन्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. 2018 या वर्षासाठी रत्नाकर मतकरी यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला होता. रत्नाकर मतकरी यांनी बाल साहित्यात लिहिलेल्या कथा आणि गोष्टी प्रचंड गाजल्या. बालमनावर एक वेगळाच संस्कार करणार्या या कथा होत्या, अलबत्या गलबत्या हे नाटक आणि त्यातली चेटकिण आणि मधुमंजिरी ही पात्रे अजूनही बालगोपाळांच्या लक्षात आहेत. सध्या हे नाटक नव्याने रंगभूमीवर आले आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. संगीत नाटकाचा अस्त होत असताना आणि अखेरचा टप्पा असताना मराठी रंगभूमी ज्यांनी विकसीत केली, तिला नवसंंजीवनी दिली त्यामध्ये रत्नाकर मतकरींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 1970 च्या दशकात रंगभूमीला नवी दृष्टीकोन देणारी नाटके लिहीताना त्यांनी समाजातील घडणार्या घटनांचा वेध सातत्याने घेतला आहे. बालरंगभूमीला त्यांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. लहानमुलांसाठी लिहीलेल्या अलबत्या गलबत्या या नाटकाने तर अनेक दशके कहर केला. यातील चेटकीण आजही लोकांना आवडते आहे. 1970 च्या दशकात दिलीप प्रभावळकर यांनी गाजवलेली ही भूमिका गेली दोन वर्ष वैभव मांगले गाजवत आहे. हे संपूर्ण यश मतकरींच्या लेखनाचे आहे. त्याचप्रमाणे महाभारताचा वेध घेणारे त्यांचे अरण्यक हे नाटकही आज गाजते आहे. यामध्ये सगळे ज्येष्ठ कलाकार आपले वय विसरून काम करत आहेत. हे त्या संहितचे यश आहे. समाजात घडणार्या घटनांचा वेध घेणारे माझं काय चुकलं हे नाटक त्यांनी 1980 च्या दशकात आणले. सासू सुनांच्या भांडणामुळे त्या घरातील पुरूषाची काय अवस्था होते हे या नाटकात स्पष्टपणे दाखवले आहे. आईला जपू की बायकोला या घालमेलीत नेमके कुणाचे चुकले याचा हिशोब करता येत नाही आणि त्या माणसाला आत्महत्या करण्याची वेळ येते. एकीचा मुलगा आणि दुसरीचा नवरा गेल्यानंतर दोघींना आपल्या चुकीची जाणिव होणे हे अत्यंत भीषण सत्य त्यांनी सत्य घटनेच्या आधारे या नाटकात मांडले होते. त्या नाटकाचे नेपथ्यही इतके सुंदर होते की उभा संसार त्यात मांडलेला होता. काकडा लावून स्टोव्ह पेटवून चहा करण्याचा प्रसंग आणि त्याचवेळी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम इतका जीवंत होता की कुठेही ते नाटक वाटत नाही. आपल्या जवळपास घडणारी घटनाच आहे असेच त्या नाटकात जाणवते. भावना, दिलीप कुलकणी आणि मीनल जोशी यांनी या भूमिका केल्या होत्या. याच नाटकावरून त्यानंतर काही वर्षांनी माझं घर माझा संसार हा चित्रपट आला होता. अजिंक्य देव, मुग्धा चिटणीस यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या, पण चित्रपट संपूर्ण चालला तो कथेवरच. ही त्या लेखकाची ताकद होती. 1990 च्या दशकात चार दिवस प्रेमाचे हे नाटक आले. मानवी मनाचे विविध प्रकार चार कलाकारांनी आपल्या अभिनयांनी या नाटकातून दाखवून दिल्या होत्या. रत्नाकर मतकरींच्या या नाटकातून खर्या अर्थाने प्रशांत दामले, कविता लाड, अरूण नलवडे आणि सविता प्रभुणे यांना अभिनयाची संधी मिळाली होती. कारण सगळ्यांच्या मिळून जवळपास 65 भूमिका या नाटकात होत्या.रत्नाकर मतकरी यांचे बाल साहित्यामध्ये चाटगावची अफाट मावशी, अलबत्या गलबत्या, गाऊ गाणे गमतीचे (बालगीते),चटकदार, चमत्कार झालाच पाहिजे, यक्षनंदन, राक्षसराज जिंदाबाद, शाबास लाकड्या, सरदार फाकडोजी वाकडे ही पुस्तके अजरामर झाली. तिसर्या पिढीपर्यंत ती पोहोचत आहेत. नाट्य आणि एकांकीका स्पर्धांसाठी त्यांची नाटके हे कलाकार, दिग्दर्शकांना एक आव्हान असायचे. म्हणूनच स्पर्धेत त्यांच्या एकांकीका टिकून राहायच्या. 1980 च्या दकशात त्यांच्याच कळकीचं बाळ या कथेवर आधारीत कळकींचं बाळ ही एकांकीका तुफान गाजली. कोकणातील बाबा वर्दमच्या गृपने तर ती संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय केली. ते माणूस म्हणूनही अत्यंत संवेदनशील होते. झोपडपट्टीतील मुलांना एकत्र करून त्यांनी बालनाट्याची चळवळ उभी केली होती. प्रस्थापितांबरोबरच सर्वांना बरोबर प्रवाहात घेतले पाहिजे हे त्यांनी जपले होते. मोठ्या मनाचा माणूस म्हणून त्यांचा अनुभव तर माझ्या दृष्टीनं अनमोल आहे. तो अनुभव आहे 1988 चा. सातारच्या शामण्णा शानभाग प्रतिष्ठानच्या एकांकीका स्पर्धेसाठी मी त्यांनी लिहिलेली मी तुमचं भूत ही एकांकीका बसवली होती. एकांकीकेची निवड झाल्यावर मतकरींशी रितसर पत्रव्यवहार केला आणि प्रयोग सादरीकरणाची परवानगी मागितली. त्या एकांकीकेचे मानधन रूपये 25 त्यावेळी मनी ऑर्डरने त्यांना पाठवले. पण काही केल्या त्यांची परवानगी आलेली नव्हती. मनी ऑर्डरची पोहोच आल्यामुळे परवानगी मिळणार हे नक्की होते. त्यामुळे प्रॅक्टीस सुरू केली. पण प्रयोग सादर करण्यापूर्वी परवानगीचे पत्र संयोजकांना द्यावे लागते. ते मिळाले नव्हते. स्पर्धा दोन दिवसांवर आलेली होती. या स्पर्धा दरवर्षी 1 ते पाच जानेवारीला असत. मला 3 जानेवारी तारीख मिळाली होती. त्यामुळे मी 31 डिसेंबरच्या रात्री सातारहून मुंबईला आलो. दादरच्या हिंदु कॉलनीतील राधा निवास या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो. मला लेखी परवानगी अजून मिळालेली नाही हे त्यांना सांगितले. तेव्हा ते अत्यंत दु:खी झाले. सरकारने त्यावेळी सुरू केलेल्या अपना उत्सव कार्यक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे परवानगी पाठवणे राहून गेले होते. पण परवानगीशिवाय मी प्रयोग सादर करणार नाही याचे त्यांना खूप कौतुक वाटले. त्यांनी मी केवळ सातारहून परवानगी पत्रासाठी आलो आहे हे समजल्यावर भारावून जाउन कौतुक केले. त्यांना वाईट वाटत होते. त्यावेळी सातारा ते मुंबई तिकीट होते 29 रूपये. एवढा खर्च करून तुम्ही एका परवानगी साठी आलात? तेही माझ्या चुकीमुळे तुम्हाला यावे लागले याचे त्यांना वाईट वाटले. त्यांनी मला जाण्यायेण्याचा भाडेखर्च देउ केला. अर्थात मी तो नम्रपणे नाकारला आणि त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेउन त्यांचे पत्र घेउन सातारला परतलो. एवढ्या मोठ्या माणसाच्या घरी जाणे, त्यांना समक्ष पाहणे, बोलणे हेच माझ्यादृष्टीने खूप होते. पण त्यांनी दिलेला तो आशिर्वाद मला स्पर्धेतील बक्षिसापेक्षा मोठा होता. कारण माणूसच महान होता. त्यांच्या गूढ कथांमध्ये पुलावरचा माणूस, खेकडा, कळकीचं बाळ, इंटरव्ह्यूव, वशिकरण अशा कथा वाचणाराला वेगळा आनंद देणार्या आहेत.घर तिघांचं हवं सारखं नाटक एका समाजसेविकेच्या पडद्यामागचे जीवन आहे. समाजातील व्यंग, विचित्रता टिपण्याचे काम करताना त्यांनी कधीही कुणाचा तिरस्कार केला नाही. किंबहुना ज्यांचा तिरस्कार केला जातो अशी व्यक्तिमत्व त्यांनी कथेसाठी निवडली आणि त्यांची मानसिकता समाजापुढे आणण्याचे काम केले. हे त्यांच्या साहित्यातून, नाटकातून उपेक्षितांना दिलेले दानच होते. सामान्य वाचकांसाठी त्या कथा, नाटके, एकांकीका गूढ आणि रंजक असल्या तरी त्यामागचा हेतु उपेक्षितांचे अंतरंगं दाखवणे हा होता. अशा या महान साहित्यिक, लेखक, नाटककाराला भावपूर्ण आदरांजली.
सोमवार, १८ मे, २०२०
गूढ रंजनाचा बादशहा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा