शनिवार, १६ मे, २०२०

हे पण देशकार्यच की...

दारूची दुकाने उघडल्याने तीन दिवसात शंभर कोटींपेक्षा  जास्त महसूल मिळाल्याचे वृत्त आले. त्यामुळे या देशात महसुली उत्पन्न देणारे मद्यपी हेच खरे देशभक्त की काय असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. असो बापडे, पण आता जर राम गणेश गडकरी असते तर त्यांनी आपल्या नाटकात  मद्याचा शेवटचा एकच प्याला असे न म्हणता, घ्या हो घ्या मद्याचा एकतरी प्याला असे म्हटले असते.म्हणजे, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असताना लॉकडाऊन काळात देशातील विविध राज्यांमध्ये महसुलापोटी दारूवरील बंदी उठवण्याचा घेतलेला निर्णय हा अनेकार्थांनी अनर्थकारकच म्हणायला हवा, असे अनेकांना वाटते. कारण या निर्णयानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत उडालेला गोंधळ, फिजिकल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी बघता पुढच्या टप्प्यातील दुष्परिणाम आणखी भयानक असू शकतील. त्यामुळेच या निर्णयाला अर्थकारणाचे लेबल लावले जात असले, तरी त्यातून नुकसानही तितकेचे संभवते. मद्य वा तत्सम घटकांच्या माध्यमातून राज्याला मोठया प्रमाणात महसूल मिळतो, यात कोणताही संदेह नाही. महाराष्ट्रासारख्या राज्याला मद्यविक्रीतून वर्षाकाठी 25 हजार कोटी वा त्यापेक्षा अधिक महसूल प्राप्त होत असल्याची आकडेवारी सांगते. त्यामुळे एवढा मोठा महसूल बुडवणे कोणत्याही सरकारला परवडणारे नाही हे नक्कीच. कारण भविष्यात आर्थिक चणचण उद्भवली तर करायचे काय हा प्रश्न पडेल. अन्य राज्यांनाही कमी-अधिक प्रमाणात दारूतून बक्कळ महसूल प्राप्त होतो. त्यामुळे कोरोनाने अर्थचक्र मंदावलेले असताना त्याला गती देण्यासाठी इंधन म्हणून मदिराच कामी येईल, असा एक समज दिसून येतो. त्यामुळे भविष्यात देशकार्यासाठी हातभार म्हणून एक प्याला घ्यायला काहीच हरकत नाही, असा विचार पसरल्यास आश्चर्य वाटायला नको. म्हणजे यामुळे सगळ्या संज्ञाच बदलल्या जातील.दारूचे बार यांना बार न म्हणता अल्कोहोलीक महसुली केंद्र असे म्हणावे लागेल. बदलत्या काळात दुकानांची आणि व्यवसायांची नावे बदलत जात असतात. तशी या व्यवसायाचीही नावे बदलत जातील.म्हणजे फार पूर्वी केशकर्तनालय असे म्हटले जायचे. नंतर हेअर कटींग सलून म्हटले जायला लागले. काम एकच पण गेल्या वीस वर्षात जेण्टस पार्लर झाली. म्हणजे सौदर्य साधना आणि केशभुषेसाठी आमच्याकडे पार्लर हा शब्द प्रचलीत झाला. पण कालांतराने आईस्क्रीम पार्लर आली. आणखीही कसल्या कसल्या दुकानांना पार्लर संबोधले जावू लागले. त्यामुळे देशसेवेसाठी आणि महसूलासाठी सुरू करण्यात आलेल्या दारूच्या दुकानांना, गुत्ता, दारूचे दुकान, बार म्हणणे हे तसे अन्यायकारकच ठरेल.त्यामुळे येत्या काळात गडकरींच्या एकच प्यालाप्रमाणे रेस्टॉरंट आणि बारला आर्य मदीरा मंडळ अशी काही नावे येउ शकतात. नावात काय आहे हे शेक्सपियरने म्हटले असले तरी आजकाल नावातच सर्व काही असते. म्हणूच मद्याचा शौकीन कुठेही जात असला तरी एखादे नाव त्याला आणखी सहज खेचू शकेल. किंबहुना सभ्य समजल्या जाणार्‍या, सुसंस्कृत समजल्या जाणार्‍या माणसांनाही या पेयाचे पान करून देशकार्यात हातभार लावण्यासाठी खेचू शकतील अशी नावे बारला येतील. यामध्ये युवक महसुली केंद्र मदिरालय, स्वाभिमानी मदिरा विक्री केंद्र, अखिल भारतीय मद्यालय, राष्ट्रीय मद्य विचारमंच वगैरे अशी नावे देउन बारचे पुनरूज्जीवन करता येईल. किंबहुना दोन महिने या व्यवसायाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी लोकांनी जास्तीत जास्त पिण्यासाठी तसेच नवीन भरती होण्यासाठी काही आकर्षक योजनाही सुरू होण्याची गरज असेल.म्हणजे, दारूबंदी उठल्यानंतर उत्तर प्रदेशात केवळ 9 तासात 100 कोटींची दारूविक्री झाल्याने तो अधिक दृढ झाला, असे म्हणता येईल. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी उत्पन्न वाढविण्यासाठी वाईन शॉप्स सुरू ठेवण्याचा सल्ला महाराष्ट्र सरकारला दिला होता. बिघडलेल्या आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर व्यावहारिकदृष्टया त्यांचा हा सल्ला योग्य असेलही. मात्र, आजचे समाज वास्तव बघता त्यातून अनेकविध प्रश्नच निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे असे अनेकांना वाटण्याची शक्यता आहे. पण आता मद्याकडे अहो पापं म्हणून बघण्याची गरज भासणार नाही. किंबहुना दारू न पिणारा भविष्यात देशद्रोही ठरू शकेल. कारण देशकार्यात, देशाचे महसुली उत्पन्न वाढीत कोणताही सक्रीय सहभाग नसणारे लोक हे त्या अर्थाने देशद्रोहीच ठरावेत. मद्य बंदी उठल्यानंतर त्यातील एकेक कंगोरे आता समोर येत आहेत. कोरोनाच्या संकटात ‘फिजिकल डिस्टंन्सिंग’ हा परवलीचा शब्द झाला. नव्हे, तो आपल्या जीवनशैलीचाच भाग झाल्याचे सांगितले गेले. हे आहेही खरे. पण मद्यालयात सोशल डिस्टन्सिंग कसे ठेवले जाणार? ग्लासाला ग्लास भिडून चिअर्स म्हटल्याशिवाय ते पाचवे इंद्रिय तृप्त कसे होणार? दारू ही काही भक्ती साधनेसारखी एक़ट्यानेच पिण्याची बाब असते का? आपण पिणे आणि जोडीदाराला पाजणे, त्याला चढली आहे हे पाहताना आपल्याला चढलेली नाही हे दाखवतानाची होणारी कसरत हे लांब राहून, सोशल डिस्टन्स ठेवून कसे पार पडणार? तोल जात असताना सावरायला येणारा लांबून कसा आधार देणार?म्हणजे, प्रत्यक्षात मद्यविक्रीचे स्वातंत्र्य दिल्यानंतर ज्या पद्धतीचा स्वैराचार वा ‘झिंगाट’गिरी पहायला मिळाली, त्याने या मूळ संकल्पनेलाच हरताळ फासला गेला. नालासोपारा वसईत जो धिंगाणा झाला, कुठे दुकानाची आरती केली हे काही सोशल डिस्टन्सींग ठेवून घडलेले नाही. म्हणूनच सरकारने याबाबतही नियमावली तयार करून या देशकार्याचा विचार करायला हवा. गर्दीचा महापूर, वादावादी, हाणामाऱया म्हणजे प्राशनापूर्वीच ताळतंत्र सुटल्याचे लक्षण. त्यामुळे हे तळीराम नंतर कसे वागतील, याची कोण हमी देईल? सामूहिक मद्योत्सव ही आपल्याकडील मानसिकता आहे. त्यात जबाबदारीने घेणारे विरळाच. त्यामुळे ठिकठिकाणी दहा-बारा टाळकी एकत्र येऊन झिंगाटगिरी केली, तर त्यातून कोरोनासाठीच पोषक स्थिती निर्माण होऊ शकते. यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. ज्येष्ठ नागरिक, लठ्ठ व्यक्ती व रोग प्रतिकारशक्ती कमी असणा़र्‍यांना कोरोनापासून अधिक धोका असल्याचे सांगितले जाते. पण मद्यपींना यापासून धोका नसावा. म्हणजे साधारणपणे जी सॅनीटराझर्स बाजारात आली आहेत ती अल्कोहोलयुक्तच आहेत. त्यामुळे मद्य याबाबतीत आतून स्वच्छता करणारे सॅनिटरायझरच असू शकते. मद्यपान म्हणजे काही टॉनिक नव्हे. त्यात अल्कोहोल असल्याने सातत्याने मद्यपान करणाऱयांची प्रतिकारशक्ती नक्कीच कमी असू शकते.  तरीही सरकारने देशसेवेसाठी मद्याला प्राधान्य दिले आहे, लोक आनंदी होत आहेत हे चित्रच रम्य म्हणावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: