गेल्या दीड महिन्यांपासून लॉक डाउनमुळे अनेकांची पंचाईत झालेली आहे. विशेषत: नेहमीच टकाटक चकाचक आणि अप टू डेट असणार लोकही आता नैसर्गिक अवस्थेत आलेले दिसतात. हे लॉकडाउनमुळे बदललेले असली चेहरे हेच खरे वास्तव आहे. त्यामुळे अनेकांचा मुखवटा गळून पडला आहे हे नक्की. म्हणजे कोणताही मुखवटा गळून पाडण्यात कोरोनाचा उपयोग झाला असे म्हणावे लागेल. पण सौदर्यप्रसाधनांची सुविधा नसल्याने, ग्रूमींग बंद झाल्याने अनेकांचे लूक हे ओंगळ झाले आहेत तर काहींचे बदललेेले लूक हे चांगलेही दिसत आहेत. काहींना लूक बदलण्याची ही संधी मिळाली आहे.
सौंदर्यसाधना ही फक्त पूर्वीच्या काळात महिलांची मक्तेदारी होती. पण गेल्या पंचवीस वर्षात पुरूषही आपल्या सौदर्याकडे लक्ष देवू लागले. त्यामुळे स्त्रीयांप्रमाणेच पुरूषांची पार्लरही जोरात सुरू झाली. ब्लिचिंग, फेशियल, मसाज, स्पा, थ्रेडिंग, वॅक्सींग, पॅडिक्यूअर, मॅनिक्युअर असे काय काय महिलांप्रमाणे पुरूषही करू लागले. केसांचे रंगकाम तर नेहमीचे काम बनले. त्यामुळे गेल्या महिनाभरात एकदम आख्खी पिढी म्हातारी झाल्याचे दिसून आले.
जे चेहरे वर्षानुवर्ष आपण डोक्याला काळेभोर केस आहेत म्हणून बघत होतो, त्याच चेहर्यांवरील डोक्यात अचानक चांदी भरल्यासारखे झाले.
बहुतेक ठिकाणची सलून बंद झाल्यामुळे अनेकांचे केस वाढले आहेत. कोेणाला महिनाभरापूर्वीच कापायचे होते ते आणखी वाढल्याने अनेकजण अस्वस्थ आहेत. सलून बंद झाली साधारण 18 मार्चच्या सुमारास. पण त्यानंतर कोणाला आपल्या डोक्यावर इलाज करता आलेला नाही. दाढी एकवेळ घरी करणे जमते, सहज शक्य असते पण डोक्याचे काय? साधारणपणे उन्हाळ्यात वाढत्या उकाड्यामुळे अनेकांचा कल असतो तो जास्तीत जास्त बारीक केस करण्याचा. काहीजण तर सिंगल, दोन नंबरचे मशिन मारतात तर काहीजण चक्क झीरो मशिन मारूनच आपला भार हलका करतात. पण यावर्षी हा भार हलका करण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे केशकर्तनकारांच्या कारागिरींचे आणि त्यांच्या कामाचे महत्व या दीड महिन्यात अधिकच अधोरेखीत झाले आहे. हा वाढता केशसंभार ही पुरूषांची डोकेदुखी झालेली आहे. त्याचबरोबर वाढलेले केस हे त्यांचे खरे स्वरूप दाखवत असल्याने जास्त वैताग आलेला आहे. डोक्यावरची रंगरंगोटी न झाल्याने जुने रंगवलेले काळे केस थोडे फिके पडले आहेत. महिना दीड महिन्यात वाढलेले केस हे पांढरट दिसत आहेत. त्यामुळे अनेकांच्या डोक्यावरचे हे काळे पांढरे मिश्रण म्हणजे झेब्रा क्राँसिंगच्या पट्ट्यांप्रमाणेच दिसत आहे.
म्हणजे आजकाल गेल्या दोन चार वर्षांपासून तरूणांमध्ये फॅशन आहे. अस्ताव्यस्त वेडीवाकडी वाढलेली दाढी, मध्येच कुठेतरी ट्रीम केलेली, डोक्यात कुठून तरी लाईन मारून विराट कोहलीसारखा लूक ठेवण्याचा प्रयत्न. पण मध्यमवयीन माणसांना हा लूक अजिबात आवडणे शक्य नाही. कारण कार्यालयात अशा कळकटपणाने बसणे सोपे नाही. पण आता ही पण हौस पुरवावी लागत आहे. म्हणजे बहुतेकांचा प्रॉब्लेम असतो तो मिशीचा. दाढी करता येते. पण मिशी कशी सेट करायची? तिचा आकार कसा द्यायचा? ती सिमेट्रीकल, दोन्ही बाजून सारखी आहे ना हे कसे कळणार? त्यामुळे कधी इकडून थोडी कापा तर कधी तिकडून थोडी कापा. म्हणजे त्या दोन बोक्यांच्या भांडणात लोण्याच्या गोळ्याचे वाटप करताना एकदा इकडून थोडा कमी कर, तर एकदा यातला थोडा काढून घे. असे करत करत सगळेच लोणी माकडाने संपवून टाकण्याचा प्रकारही अनेकांबाबत झाला. कट चुकला म्हणून अनेक दिवसांची वाढवलेली मिशीची मेहनत वाया गेली आहे. कालपर्यंत भरगच्च मिशा असलेेल्या अनेकांचे मैदान हाताला सवय नसल्याने चकाचक झाले आहे. अर्थात तोंडावर मास्क लावायची सोय असल्यामुळे आपली इज्जत शाबूत असल्याचा साक्षात्कार होतो आहे. पण या लॉकडाउनमुळे अनेकांचे लूक बदललेले आहेत.
कोणाची दाढी अस्तावस्त वाढली आहे, कोणाचे केस कानामागून आता वळायला लागले आहेत, कोणी महाभारतातल्या भिष्म, द्रोणाचार्यांप्रमाणे अवघ्या दीड महिन्यात म्हातारे झाल्यासारखे दिसू लागले आहेत.
महिला वर्गांची अवस्था तर अत्यंत विचित्र झालेली आहे. कुठें लग्नसमारंभाला जायचे नाही म्हणून ठिक आहे, पण घरात बसूनही आपला चेहरा कोणी पाहू नये असे अनेक महिलांना वाटते आहे. कारण दर आठ पंधरा दिवसांनी फेशियल करणार्या, ब्लिचिंग करून चकाचक राहणार्या महिला या दीड महिन्यात अक्षरश: कल्हई गेलेल्या भांड्यांप्रमाणे अवकळा आल्यासारख्या दिसू लागल्या आहेत. अनेकांचे चेहरे तेलकट झालेले आहेत. कित्येकांच्या चेहर्यावर डाग पडले आहेत, फोड आले आहेत. त्वचेला कायम विविध क्रिम, वाफारे यांची सवय लागल्यामुळे वर्षानुवर्ष त्वचेला लावलेल्या सवयीने ती आता बंडखोरी करताना दिसत आहे. त्यामुळे अनेक सौदर्यवती या नेहमी आपल्याला लोकांनी पहावे म्हणून पुढे येत असतात त्याच आता तोंड लपवून बसत आहेत. अर्थात त्याला कोरोनाच्या मास्कचा आधार आहे.
काहीजण मात्र कधीच मेकअप करत नाहीत, फक्त स्वच्छ पाण्याने आंघोळ करतात. ते लोक मात्र या दिवसात टवटवीत दिसत आहेत. हे वास्तव या एकुणच कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात समोर आले आहे.
आपण नेहमी टीव्हीवर पाहणारे चेहरे, सेलीब्रेटी आज कसे दिसत आहेत पहा. कोरोनापासून बचावासाठी आवाहन करण्यासाठी येणारे सेलिब्रेटी, वाहिन्यांचे वृत्तनिवेदक नेहमीसारखे दिसत नाहीत हे लक्षात आले असेल. म्हणजे अगदी किमान टाल्कम पावडर जरी लावायची झाली तरी तिचा स्टॉक महिनाभरात संपला असेल तर ती अत्यावश्यक सेवेत येत नसल्यामुळे मिळत नाही. त्यामुळे चेहरे तेलकट दाखवण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच राहिलेला नाही.
आज कोरोनामुळे पुकारलेल्या या लॉकडाउनमुळे अनेकांचे लूक बदलले आहेत, तर अनेकांचे खरे चेहरे समोर आले आहेत. तर अनेकांनी याची मौजही घेतली आहे. म्हणजे अनेकांची अनेक वर्षांची फॅशन करायची राहिलेली इच्छाही या निमित्ताने पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे दाढी वाढवणे, मिशा काढणे, केस वाढवणे, टकला करणे अशा आवडीही अनेकांनी पूर्ण करून घेतल्या आहेत. या बदललेल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो या संकटातही ते सेल्फी काढून व्हॉटसअप, फेसबुकवर शेअर करत आहेत हे विशेष.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा