रविवार, १७ मे, २०२०

आभाळ फाटलं तर शिवणार कसं?

संपूर्ण देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला दीड महिना उलटून गेला आहे. लॉकडाऊनचा हा तिसरा टप्पा मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी अत्यंत कठीण परीक्षेचा काळ असणार आहे. हा लॉकडाऊन मे महिन्याच्या अंतिम आठवड्यापर्यंत लांबवला जाऊ शकतो. याचवेळी स्वगृही परतणारे मजूर, कर्मचारी आणि पुन्हा रोजगार सुरू होईल म्हणून मुंबईकडे जाण्याची इच्छा असणारे लोक यांची अवस्था फार दयनीय अशी झालेली आहेे.
एकीकडे कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वाढते आहे, तर कोरोना बाधितांचे आकडे दर दिवशी राज्यासमोरचे संकट गडद करीत आहेत. पोलीस आणि आरोग्य विभागावरचा ताण गंभीरपणे वाढतो आहे. पोलिसांवर होत असलेले हल्ले, त्यांचे खचलेले मनोबल, त्यांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष आणि दुसरीकडे कोलमडलेली आरोग्य यंत्रणा अशी अवस्था आहे. आरोग्य सुविधा फक्त कोरोनाबाबतच असली पाहिजे असे सरकारचे असलेले मत हे नव्या आजारांना आमंत्रण देणारे ठरते आहे. कारण अन्य आजारांकडे सध्या डॉक्टरमंडळी लक्ष देण्यास तयार नाहीत. डोळे, दंतरोग या रूग्णांची अवस्था अत्यंत काकुळतीला आल्यासारखी झालेली आहे. त्यामुळे आतपा याकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
   यामध्ये नित्य दिसणार्‍या विक्रेते, सेल्समन यांची अवस्था फार वाईट झालेली आहे. मुंबई महानगर, उपनगरात लाखो सेल्समन आहेत की ज्यांचे पोट हातावर आहे. अगदी मॉलपासून ते रस्त्यावरची दुकाने, डोअर टू डोअर विक्री करणारे असे असंख्य सेल्समन हे आज बेरोजगार झाल्यासारखे झालेले आहेत. म्हणजे दिवसभर हिंडून पाच दहा घरात काही वस्तू कमवून त्यातून मिळणार्‍या मार्जीनवर स्वत:ची उपजिविका करणारे असोत वा फ्रँचायजी, मॉलमध्ये काम करणारे असंख्य सेल्समन तरूण यांची अवस्था फार बिकट झालेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना रोजगार मिळेनासा झालेला आहे. चित्रपटगृहातून इंटरवलला खाउची गरज भागवणारे असोत वा रस्त्यावर आईस्क्रीम विकणारे असोत. पण त्यांचाही फार मोठा रोजगार बंद झाल्याने हा वर्ग चिंतेत आहे. सामान्य माणूस काय किंवा श्रीमंत माणूस काय सेल्समन किंवा विक्रेता हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे हे कधी लक्षात घेत नाही. कारण तो आपल्या सहज अंगवळणी पडलेला असतो. जाता जाता आपल्या गरजा काही पैसे देउन आपण भागवत असतो. पण आता याच लोकांवर जी उपासमारीची वेळ आलेली आहे त्या परिस्थितीत त्यांना मदतीचा हात कोण देणार? मुंबईची बाजारपेठ ही फार मोठी बाजारपेठ आहे. तिथे असलेले लाखो विक्रेते, सेल्समन आज दीड महिना तोंड दाबून बसलेले आहेत. या लोकांची अवस्था ही खरं तर जोकर सारखी असते. हरतर्‍हेचे चित्र विचित्र ग्राहक त्यांना सामोर जात असतात. पण त्या प्रत्येकाचा राग आला तरी हासत स्वागत करावे लागते. मेरा नाम जोकरमध्ये जसे त्या जोकरची आई समोर मेली तरी डोळ्यातून पाणी काढता येत नाही, अशीच अवस्था या विक्रेते सेल्मनची असते. लोकांना चांगले वाटेल असे राहणीमान ठेवायचे, चांगले स्वच्छ कपडे घालायचे, त्यांना हसून सामोरे जायचे, त्यांचे काहीही म्हणणे ऐकून घ्यायचे. त्यांनी काही खरेदी केली की त्यातून मिळणार्‍या चार दोन रूपयांच्या समाधानाने त्यांना निरोप द्यायचा. ही दिवसभराची कसरत गेले दोन महिने बंद असल्याने आता या लोकांच्या चेहर्‍यावरचे हास्य पार लोपले आहे, ते रडवेले झाले आहेत. असे कितीतरी जण या लॉकडाउनने खितपत पडले आहेत. कोरोनाचा प्रसार होउ नये म्हणून अनेकांनी आपल्या घरच्या मोलकरणी, घरगडी यांना कामावरून कमी केले. सुट्टी दिली. पण आपल्यालाच कसले उत्पन्न नाही मग बाकीच्यांना का द्यायचे या विचाराने या मोलकरणी, घरगड्यांना काम न केल्याने पगार मिळालेला नाही. अशा लाखो घरगडी, मोलकरणींचे दु:ख कोण विचारात घेणार आहे का?  रामागडी असेल नाहीतर सखूमावशी आमच्या घरचा एक भाग बनलेली असते. पण तिचे घर चालते आहे का याचा विचार करणारे किती लोक असतील या मायानगरीत? त्यामुळे या कोरोनाचा त्रास किती जणांना वेगवेगळ्या प्रकारे झालेला आहे याचा विचार करणेच अवघड आहे.
या सावळ्या गोंधळामुळे सर्वसामान्यांसमोर अनंत प्रश्न निर्माण झाले आहेत. संपूर्ण राज्यात मोल मजुरीसाठी आलेल्या परराज्यातील मजूरवर्गाला आपल्या राज्यात परतण्याची ओढ लागली आहे. अनेक स्थलांतरित मजूर, विद्यार्थी परराज्यात अडकले आहेत. विशेष ट्रेन किंवा बसच्या माध्यमातून या मजुरांना आपापल्या राज्यात नेण्याची व्यवस्था हळुहळू केली जात आहे. देशाच्या विविध भागातून श्रमिक एक्सप्रेस निघाल्या आहेत. हे का करावे लागले आहे? कारण एक असुरक्षितता त्यांना खायला उठली आहे. काम केले तर पगार. पगार नाहीतर घरभाडे, महिन्याचा खर्च कसा करायचा? त्यापेक्षा गावाकडे जाणे हाच एक उपाय त्यांना शिल्लक राहतो. त्यांनी इथेच लॉकडाउन संपेपर्यंत थांबावे असे कोण काय करतो आहे? म्हणजे भूक, पैशांची कमतरता, कोरोनाची भीती आणि कुटुंबाची ओढ अशा विविध कारणांमुळे धीर सुटलेल्या मजुरांनी आधीच आपल्या घरची वाट धरली होती. काहीजण हजारो किलोमीटर आणि कित्येक दिवसांच्या प्रवासानंतर घरी पोहोचले, तर कोणाला वाटेतच प्राण सोडावे लागल्याच्या गोष्टीही ऐकायला मिळाल्या आहेत. यातल्या बहूतांश मजुरांना  शासन आपल्यासाठी काही उपाययोजना करेल याबद्दल आश्वासकता वाटत नाही.
एका माहितीनुसार साधारणपणे 25 हजारांपेक्षा अधिक मजूर पायी रस्त्याने प्रवास करीत आहेत. केंद्र सरकार रेल्वेसेवा देण्यास तयार आहे. पण या रेल्वेत आपला नंबर लागेपर्यंत त्यांना जगण्याचा प्रश्न भेडसावतो आहे इतके विदारक हे चित्र आहे.
या सर्व अस्थिरतेत भर घालणार्‍या अनेक घटनांतून  सरकारचे अपयश प्रकर्षाने समोर येते आहे.
याशिवाय सर्वाधिक हाल आहेत ते करोना नसलेल्या रुग्णांचे. आरोग्य सेवेतील अनेक डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना आता लागण होताना दिसत आहे. अविश्रांत मेहनत घेत काम करणारे प्रशासन, पोलीस, आरोग्य सेवक हे खर्‍या अर्थाने थकले आहेत. त्यांना विश्रांतीची गरज आहे. अशावेळी अतिरीक्त कुमक उपलब्ध कुठून करायची हा प्रश्न आहे.
हे सर्व कमी की काय म्हणून महागाईचा भडका प्रचंड उडाला आहे. काही कमी पडणार नाही असे म्हणत असलेल्या सरकारला सांगायची वेळ आली आहे की अनेक बाबींची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध असल्या तरी त्यांचे भाव इतके गगनाला भिडले आहेत की हातात पैसा कमी आणि खरेदी कसे करायचे अशी अवस्था झालेली आहे. आभाळ फाटले तर शिवायचे कसे अशी अवस्था या कोरोनामुळे झालेली आहे. त्यामुळे असेही मरायचे असेल तर काम करून, सगळे सुरू करून, लॉकडाउन उठवून पहिल्या सारखे जीवन सुरू करायला हवे असे प्रत्येकाला वाटल्यास नवल ते काय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: