बुधवार, ३ जून, २०२०

कोरोनाचे वादळ आणि पर्यावरण

कोरोनाच्या संकटाने माणसाला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगपासून ते स्वच्छता, सोवळे हे सगळे काही शिकवले आहे. यात प्रदुषण, पर्यावरण या गोष्टींचे महत्वही पटले आहे. निसर्गाच्या सानिध्यात, स्वच्छ हवेत राहणे किती फायद्याचे असते इथपासून ते मोकळा श्वास घेणे किती आवश्यक असते हे सगळे यातून आपल्याला दिसून आले आहे. पण या सर्वांशी निगडीत आहे तो निसर्ग. निसर्ग आणि पर्यावरण हा महत्वाचा दिवस आहे. जून महिन्यातील पाच तारीख ही आपल्याकडे पर्यावरण दिन म्हणून साजरी केली जाणारी तारीख आहे. या निमित्ताने आपण वृक्षारोपणासारखे अनेक उपक्रम राबवतो आणि पर्यायवण समतोलाचा प्रयत्न करत असतो. पण हे काम सातत्याने केले पाहिजे याचीच जाणिव कोरोनाने दिली आहे. आज मी जाईन तर दुसरा कोणी राक्षस येईल. त्यासाठी लढण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती चांगली असली पाहिजे. तुमचे आरोग्य चांगले असले पाहिजे. ते सर्वस्वी पर्यावरणावर अवलंबून आहे असाच संदेश या कोरोनाने दिलेला आहे. म्हणून यावर्षीचा पर्यावरण दिन महत्वाचा आहे. कारण दोन महिने लॉकडाउनमुळ कारखाने बंद राहिले. उद्योग बंद राहिले. विमाने, रेल्वे आणि असंख्य वाहने बंद झाल्यामुळे वातावरणात सुटणारा दुषित वायू कमी झाला. वातावरणातील होणारे प्रदुषण दोन महिने कमी झाले. त्यामुळे निसर्गातील असंख्य प्राणीही मानवी वस्तीतून मोकळा श्वास घेत हिंडू लागल्याच्या बातम्या आपण पाहिल्या. कारण माणसापेक्षा अन्य प्राण्यांची श्वास घेण्याची, ग्रहण करण्याची, गंध आकलनाची शक्ती जास्त असते. कुत्र्याला तर कित्येक किलोमीटर लांबचा वास येतो. त्यामुळेच पोलीस तपासात त्यांची मदत घेतली जाते. पण या प्रदुषणामुळे हे प्राणी लांब लांब जात होते. माणसांची गर्दी असलेली जागा त्यांना श्वास घेण्यास त्रासदायक होत होती. पण वाहने बंद झाली, धूर कमी झाला आणि प्राणी रस्त्यावर फिरू लागले. हवा शुद्ध झाली. नकळत 60 दिवस पर्यावरणाचा समतोल साधला गेला.          आज पृथ्वीतलावर प्राणिमात्राला सभोवताली शुद्ध हवामानाची गरज असते. सशक्त जीवन जगण्यासाठी हवामाना इतकेच पर्यावरणही महत्त्वाचे आहे. पर्यावरण निसर्गाचा एक घटक असून त्यात मानव हा जैविक घटक आहे. तो निसर्गातील घडामोडीला समजावून घेऊन त्यावरून कृती करू शकतो. पृथ्वीवर सर्वात बुद्धिमान जर कोणी असेल तर तो मानव! त्यामुळे त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला मात्र परतफेड करण्याचे साफ विसरला. त्यामुळे अशी संकटे आपल्याकडे येउ लागली.एखाद्या व्यक्तीकडून किंवा समाजाकडून जेव्हा आपण मदत घेतो तेव्हा त्याच्या प्रती नेहमी कृतज्ञ राहतो हा नियम पर्यावरणाशी मानवाने  कधीच पाळला नाही. पर्यावरण म्हणजे विविध प्रकारची जीवसृष्टी तसेच मानवी समूह, समाज ज्या परिसरात राहतात त्या परिसरातील घटकांना पर्यावरण असे म्हणतात. पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलत असतात. दरवर्षी पाच जून हा जगभर ‘पर्यावरण दिवस’ ‘ म्हणून साजरा केला जातो. पण यावर्षी निसर्गाशी संबंधित असणारा पर्यावरण दिवस हा वेगळ्या वातावरणात येत आहे. विशेष म्हणजे पर्यावरण दिनाच्या दिवशीच यावर्षी वटपौर्णिमेचा दिवस आलेला आहे. ज्याप्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाचा एक घटक असल्याचे भान ठेवून वागतो त्यामुळे त्या कुटुंबामध्ये सुख, समृद्धी व स्थिरता दिसून येते. कुटुंबातील एकजरी व्यक्ती बेजबाबदारपणे वागला तर संपूर्ण कुटुंबाला त्याचे फळ भोगावे लागते. पर्यावरणाचे सुद्धा थोडेफार तसेच आहे असे वाटत नाही का? पर्यावरणाचे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे आणि ते कर्ज मला फेडायचे आहे हेही ध्यानात असू द्यावे. पर्यावरणाचा र्‍हास होण्यामागे वाढती लोकसंख्या हे एक प्रमुख कारण आहे. कुटुंबातील संख्या वाढू लागली की सध्याची जागा अपुरी वाटू लागते आणि घर बांधण्यासाठी जमीन अधिग्रहण करणे व झाडे तोडणे क्रमप्राप्तच ठरते. त्यामुळे जंगलतोड होऊन मानवाची वस्ती वाढू लागते आणि पर्यावरणाचा संतुलन बिघडतो. निसर्गाचे  संतुलन बिघडण्याला तोच कारणीभूत आहे आणि तोच त्याला आळाही घालू शकतो. वाढत्या उद्योगधंद्यांमुळे बेलगाम जंगलतोड होत आहे. वृक्ष नष्ट झाले म्हणजे वनव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक नष्ट झाला. वन्य पशुबरोबर पक्षी जीवनही धोक्यात आले. पक्षी पर्यावरणाचा समतोल साधण्यास फार महत्त्वाची भूमिका बजावतात. कृषिप्रधान देशात कृती संतुलनात पक्षी व सूक्ष्म जिवाणू महत्त्वाचे कार्य करतात.    आपण अन्नाशिवाय काहीकाळ ,पाण्याशिवाय काही तास जिवंत राहू शकतो मात्र हवेतील ऑक्सिजन शिवाय क्षणभरसुद्धा जिवंत राहू शकत नाही. तसेच ऑक्सिजन निर्मितीचे सर्वात मोठे कार्य परिसरातील वृक्ष करीत असतात. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड शोषून मानवास उपयुक्त असा ऑक्सिजन हवेत सोडतात. त्यामुळे वनस्पती,वृक्ष यांची लागवड व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वृक्ष नष्ट होत असल्यामुळे पाऊस सुद्धा कमी होत चालला आहे. त्यामुळे सृष्टीचे वैभव संकटात पडले आहे. पाऊस कमी पडल्यामुळे पाणीटंचाईची समस्या तीव्रतेने जाणवत आहे.वृक्षाचे महत्त्व अपरंपार आहे हे आपले पूर्वज सुद्धा जाणून होते.  संत तुकाराम महाराजांनी ‘ वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे, असा संदेश दिला आहे. पण हे फक्त अभंग गाण्यापुरते मर्यादीत ठेवून कसे चालेल? त्या वृक्षवल्लींशी असलेली सोयरीक टिकवण्याचे प्रयत्न आम्ही करतो काय याचा विचार केला पाहिजे.  आपला देश हा शेतीप्रधान देश असल्यामुळे सत्तर टक्के जनतेचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये सौरऊर्जा हे कधीही न संपणारी संपत्ती आहे. भविष्यात सौरऊर्जेच्या वापरात वाढ करणे म्हणजे एक प्रकारे पर्यावरणाला हातभार लावण्यासारखे आहे. पेट्रोल, डिझेल  यासारख्या इंधनाचा मर्यादित साठा भविष्यकाळात संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा जपून वापर करण्यातच शहाणपण आहे. सोबतच अमर्यादित अशा सौर ऊर्जेचा इंधनासाठी पर्याय म्हणून वापर करण्यासाठी सुरुवात केल्यास भविष्यातील अनेक संकटापासून मुक्तता मिळू शकेल. शुद्ध वातावरण व हवामान राहण्यासाठी समाजातील सर्व तरुण वर्गाने पर्यावरणाचे महत्त्व ओळखले पाहिजे.हवामान निरोगी राहण्यासाठी जे घटक महत्त्वाचे आहेत त्याचा विचार केला पाहिजे. शाळेत विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयीचे  जागृत धडे दिले पाहिजे. यासाठी गल्लोगल्ली फेर्या  काढून हवामान शुद्ध कसे राहील याविषयीची माहिती समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे. कृत्रिम शेतीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. हवामान दूषित झाले आहे. प्रदूषण म्हणजे दूषित वातावरण. जसे आपल्या सभोवताली वातावरण तसे आपल्या शरीराचे आरोग्य. आज विज्ञान युगात जितके औद्योगिकरण तितके नवनवीन आजार. त्याचे मुख्य कारण कारखान्यांमधून निघालेले प्रदूषित धूर आणि रासायनिक पाणी जी वातावरणाला प्रदूषित करीत आहे. प्रदूषण तीन माध्यमांद्वारे प्रसारित होते. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, आणि  ध्वनीप्रदूषण या तिन्ही प्रकारच्या प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊन आजार होतात. या प्रदूषणामुळे मानवाचे आयुष्यमान निरनिराळ्या प्रकारे कमी होत आहे. स्वच्छ व शुद्ध पाणी तसेच शुद्ध हवा प्रत्येकालाच मिळाली तर मानवाचे आयुष्यमान नक्कीच वाढेल. परंतु शुद्ध हवा व पाणी हे आता दुर्मिळच! माणसाने प्रगती केली परंतु प्रगती करताना प्रदूषणाकडे किरकोळ बाब म्हणून दुर्लक्ष केले. त्याचा दुष्परिणाम भोगावे लागत आहे असे हे पर्यावरणाचे महत्त्व आहे.     आपल्या भारतात हिंदू धर्मानुसार अनेक सण समारंभ साजरे होतात. पण त्याचा रूपकात्मक अर्थ समजून घेतला पाहिजे. आपले सगळेच सण निसर्गाची पूजा करण्याचा संदेश देणारे आहेत. पण निसर्गाची पूजा याचा अर्थ त्याचे जतन करणे हा आहे. त्याला संकुचित करण्याचा प्रयत्न आजकाल पहायला मिळतो. म्हणजे मराठी महिन्यातील ज्येष्ठ महिन्यात दरवर्षी येणारी पौर्णिमा ही ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते. हा दिवस उद्या आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया वटपौर्णिमा साजरी करतात. वटपौर्णिमेला वटवृक्षाला अत्यंत महत्त्व आहे. हिंदू पुराणांनुसार वटवृक्षाच्या मुळांमध्ये ब्रह्मदेव स्थित असतात, खोड आणि फाद्यांमध्ये विष्णू असतात आणि शेंडयामध्ये भगवान शंकर स्थित असतात. म्हणून वटवृक्ष हा शिवरूपी असून त्याची पूजा करून म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरनेच! नवीन लग्न झालेल्या स्त्रियांची वेगळीच मजा असते. त्यादिवशी पतीसाठी उपवास धरतात. सर्व स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुषी लाभावे आणि आपला संसार सुखाचा जावा म्हणून वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वडाचे झाड हे दीर्घायुषी झाड आहे. हे व्रत केल्याने पुढील सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे. वटपौर्णिमेचे व्रत हे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या व्रताने पतीवरील संकटे, अडचणी दूर होतात आणि पतीला दीर्घायुष्य लाभते.   अशा या दैवगुणी वृक्षाच्या छायेखाली साधना व्रत केल्यास पूर्ण होतात. या वृक्षाची षोडपचार पुजा करून या वृक्षाला सुती धागा बांधण्याची प्रथा असून  वटवृक्षाजवळ पाच फळे ठेवतात. सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. त्यामुळे अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया स्वतःला व आपल्या पतीला  आरोग्यसंपन्न, दीर्घायुष्य लाभु दे, धनधान्य, मुले व नातू यांनी माझा प्रपंच विस्तृत व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात. अशाप्रकारे वटपौर्णिमेचे महत्व आहे.  पण हल्ली शहरामधून यादिवशी घरोघरी वडाच्या झाडाची फांदी आणून पूजा केली जाते ही एकप्रकारे पर्यावरणाला घातकच नाही का?पण आता लॉकडाऊनमध्ये कुठे सण-समारंभ? जे करायचे ते घरीच पूजा-अर्चा करून समाधान मानायचे!कोरोनाने आपोआपच वृक्षतोडीवरच बंदी आणून निसर्गाचे संरक्षण केले आहे आणि माणसाला डांबून ठेवले आहे. आज धकाधकीच्या शहरी जीवनात आपणाला रोजच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतात. प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आज प्रत्येक शहरवासीयांना भोगावे लागत आहे. पण या लॉकडाऊनमुळे निसर्गाला नक्कीच आनंद झाला असेल. सगळीकडे मोकळीक, निरभ्र आकाश, शुद्ध हवा तसेच स्वच्छ आणि संथ वाहणार्या नद्या, मोकळे रस्ते त्यामुळे निसर्ग समाधानी.  अशी स्वच्छ हवा आपल्या सर्वांना मिळत आहे. सगळीकडे  रंगीबिरंगी फुले, पक्ष्यांचा किलबिलाट आणि प्राण्यांचा मुक्त संचार मनाला आनंद देत आहेत. म्हणून पर्यावरण ही काळाची गरज आहे आणि ती टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. पण त्यासाठी आपण योग्य पावले उचलली नाहीत तर आपल्यावर कोरोनासारखी संकटे येतील. नाहीतर निसर्ग सारखे वादळ घोंगावत येईल. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: