शिक्षण हे माणसाला शहाणे करुन सोडणारे असले पाहिजे. परंतु आपल्याकडे शिक्षण घेतल्यानंतर नेमके काय करावे यामुळे अनेकजण गोंधळलेले असतात. याचे कारण तार्कीक कसोटीवर आणि व्यवहारात उपयोगी न पडणारे शिक्षण आपल्याकडे परंपरेने शिकवले गेले. त्या शिक्षणाचा ज्ञान म्हणून फारसा फायदा व्यवहारात झालेला दिसला नाही. म्हणून कालबाह्य गोष्टी काढून टाकून नव्याने आवश्यक असणार्या गोष्टी आत्मसात करणारे शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे शिक्षण खात्याचे धोरण असले पाहिजे.आता कोरोनामुळे एक फार मोठा बदल झालेला आहे. क्रांती झालेली आहे. त्यामुळे माणसाचे जीवन आणि जीवनशैलीच बदलून गेलेली आहे. अशा परिस्थितीत शाळा कॉलेज सुरू होण्याचे कोणतेही चिन्ह नाही. त्यामुळे शिक्षणाचा एकुणच अंधार आहे. अशा परिस्थितीत नव्या जीवनाचे शिक्षण आता दिले गेले पाहिजे. आजच्या या संकटात हे पारंपारीक शिक्षण काही कामाचे नाही, हेच अनुभवायला मिळाले आहे.विशेष म्हणजे गेल्या आठ दहा वर्षांपासून आपल्याकडे शिक्षणात अनेक बदल करण्यात आले. काही प्रयोग यशस्वी झाले तर काही बाबत नेमका उद्देश समजून न घेतल्याने गफलत झाली. त्यामध्ये नापास न करण्याचा सरकारचा निर्णय टीकेस पात्र ठरला होता. याचे कारण मुलांना सरसकट नापास करायचे नाही तर त्याला ज्ञानी करुन सोडायचे आहे, त्याला सक्षम करुन सोडायचे आहे, त्याला समजेपर्यंत शिक्षकांनी शिकवायचे आहे. कोणीही नापास झाला नाही पाहिजे हा त्याचा उद्देश होता. पण त्यामुळे परिक्षापद्धतीत बदल करुन, नाममात्र परिक्षा घेऊन विद्यार्थ्यांची ढकलगाडी सुरु झाली. त्याचा परिणाम शिक्षकांचे काही नुकसान झाले नाही पण विद्यार्थ्यांचे मात्र झाले. नंतर त्यात सुधारणा करुन सरकारचा हेतु समजवल्यावर त्यात बदल झाला. आता यावर्षी कोरोनामुळे कोणत्याच वर्गाच्या परिक्षा घेता आल्या नाहीत. सर्वांनाच पास करून टाकले आहे. पण दोन महिने अगोदर शाळा संपली, परिक्षा नाहीत तरीही मुले वरच्या वर्गात गेली आहेत. पण या कालावधीत त्यांना ज्ञान किती प्राप्त झाले? मुलांना तीन महिन्यात सवयी काय लागल्या आहेत? घरात टिव्हीसमोर बसायचे. जुन्या मालिका पुन्हा पुन्हा पहायच्या. 20 सेकंद हात धुवायचे. तोंडाला मास्क लावुन बसायचे. अंतर राखून वागायचे. सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटाईन, सॅनीटरायझेशन हे नवे शब्द त्यांच्या ज्ञानात पडले आणि अभ्यास कसलाही नसताना मुले हात चोळत बसली, धुवत बसली. घासुन अभ्यास केला नाही पण हात घासत बसायची वेळ मात्र आली. आता पुढची दोन वर्ष तर मुलांचे हात चोळत बसण्यातच जाणार का असा प्रश्न आहे. आताही नव्याने येत असलेली अभ्यासक्रमातील पुस्तके ही अत्यंत महत्वाची आणि व्यवहारी ज्ञानाची अशीच आहेत. व्यवहारात उपयोगी पडणारे शिक्षण देण्यासाठी आणि स्पर्धेच्या युगात पाऊल टाकण्यासाठी सरकार घेत असलेली ही झेप फार महत्वाची आहे. आपल्या दैनंदिन जीवनात जे काही घडते त्याची उदाहरणे घेऊन अभ्यासक्रम रचला तर विद्यार्थ्यांना त्यामध्ये अधिक रस निर्माण होतो. यामुळे विद्यार्थी परीक्षार्थी न राहता तो खर्या अर्थाने ज्ञानार्थी होतो. असाच प्रयत्न दोन वर्षांपूर्वी नव्याने प्रसिद्ध झालेल्या दहावीच्या पुस्तकांमध्ये करण्यात आला होता. म्हणजे शिक्षण खात्याने गणित विषयात जीएसटी, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, प्राप्तिकर या संकल्पनांपासून ते कोरडवाहू शेतीच्या व्यवहारांपर्यंत अनेक उदाहरणे देण्यात आली आहेत. हे खूप स्वागतार्ह आहे. पण या सुट्टीच्या काळात या मुलांनी त्याचा व्यवहारात काही उपयोग करून घेतला का हा खरा प्रश्न आहे. शालेय शिक्षण हे ज्ञान मिळवण्यासाठी नाही तर गुण मिळवण्यासाठी असते हे जे वर्षानुवर्ष बिंबवले गेले आहे ते चुकीचे आहे. कारण पूर्वीच्या बीजगणीतात ए प्लस बी बरोबर सी असले काहीतरी शिकवले जायचे. असे एबीसी किंवा एक्स वाय झेड देऊन व्यवहार पूर्ण होत नाहीत. व्यवहारासाठी रोकडाच लागतो. त्यामुळे बिजगणिताचा व्यवहारात कुठे उपयोग होतो हे कोणाला सांगताही येणार नाही. त्यासाठी आज हा केलेला अभ्यासक्रम नव्या विचारांचा आहे हे निश्चित. पण हे उपयोगात आलेले शब्द व्यवहारात आले तर मुले ज्ञानी होतील हे नक्की. आपल्या देशात 2010 मध्ये शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यापासून शिक्षणात ज्ञानरचनावादाला विशेष महत्त्व देण्यात आले. ज्ञानरचनावादामध्ये शिक्षकांनी शिकविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिकण्यात मदत करणे यावर विशेष भर देण्यात येतो. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी हा इयत्ता दहावीचा नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. सर्व विषयांच्या पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांना कृतिशील शिक्षणावर भर देण्यात आला आहे. पण प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांनी कृती केली का? प्रश्नपत्रिका आणि कृतिपत्रिका मुलांनी सोडवल्या. यात फक्त नावात बदल झाला. पण कृती पत्रिकेतील कृती खर्या अर्थाने केली जाईल तेंव्हा त्याला ज्ञान म्हणता येईल. आपल्याकडे कृतीपत्रिकेवर आधारीत शिक्षण हे पारंपारीक आहे. गुरूकुलात कृतीशिक्षणच दिले जात होते. अगदी जंगलात जाउन लाकडं तोडून आणण्यापासून ते शेती करणे, गुरे राखण्यापर्यंतचे शिक्षण गुरूकुलातील पाठशालेत विद्यार्थी करत असत. त्यावर घेतल्या जाणार्या परिक्षा म्हणजे ज्ञानकोष असायचा. पांडवांना शिक्षण देताना द्रोणाचार्य हातात धनुष्य देउन काय दिसते हे विचारायचे. तेंव्हा कुणाला गुरूंचे पाय दिसायचे तर, कुणाला झाड, कुणाला झाडावरची फळं दिसली तर कुणाला फळाजवळ पोपटही दिसला. फक्त अर्जूनाला पोपटाचा डोळा दिसला. कारण लक्ष ते होते. असे लक्ष देणारे शिक्षण कोण घेतो आहे? जून महिन्यात कोरोनाने शिक्षणपद्धतीत अमूलाग्र बदल होणार आहेत, घरातून शिक्षण घ्यावे लागणार आहे. अशा परिस्थितीत लक्षप्राप्ती देणारे व्यवहारी शिपण कसे मिळणार आहे?आता एखाद्या विषयावर संदर्भ शोधता यावे यासाठी विद्यार्थ्यांना इंटरनेटचा वापर करून काही माहिती शोधण्याचे या पुस्तकातून सूचित करण्यात आले आहे. याचबरोबर मागील इयत्तेमधील पाठाची उजळणी व्हावी म्हणून पाठाच्या सुरुवातीला काही प्रश्नही विचारण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे मत मांडता यावे किंवा एखाद्या विषयावर त्यांचे मत तयार व्हावे यासाठी त्यांना काही प्रसंगांचे चित्र किंवा उदाहरणे देण्यात आली आहेत. त्यावर विद्यार्थ्यांना त्यांचे मत नोंदविण्यास सांगण्यात आले आहे. असे विविध ज्ञानाधारित शिक्षणाला पूरक बदल नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात आले आहे. तसे माध्यमिक शिक्षणात प्रकल्पावर आधारीत अभ्यास गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेतच. त्यामुळे ही पद्धती नव्याने दहावीत जाणार्या विद्यार्थ्यांना अत्यंत सहजसोपी असेल. अनेकदा शिक्षक विद्यार्थ्यांना कृतीवर गुण देतात. मात्र तसे न करता विद्यार्थ्याला गणिताचा पाया समजला आहे ना हे पाहून त्याला गुण द्या, अशी सूचना गणित विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष मंगला नारळीकर यांनी शिक्षकांना केली आहे होती. हा फार मोठा विचार आहे. पाठांतर, घोकंपट्टी नको तर नेमके समजले पाहिजे हा त्याचा उद्देश आहे. प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने गणित सोडविणार्या विद्यार्थ्यांचे गुण कापण्यापेक्षा त्यांना शाबासकी द्या, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. दैनंदिन जीवनातील अनेक बाबींचा गणितात समावेश व्हावा या उद्देशाने गणितात दैनंदिन व्यवहारातील संकल्पना घेण्यात आल्या आहेत. तसेच त्यात अर्थशास्त्राचाही समावेश करण्यात आला आहे. म्हणजे व्यवहाराचे गणित सोडवता आले पाहिजे, समस्या, प्रश्न सोडवता आले पाहिजे, परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचे शिक्षण हा नवा विचार देतो आहे. गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना पुस्तकापेक्षा काही वेगळी माहिती मिळावी या उद्देशाने पुस्तकामध्ये क्यूआर कोड देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी तो स्कॅन केल्यानंतर त्या पुस्तकाच्या संदभार्तील बाह्य माहिती मिळू शकणार आहे. यात व्हिडीओच्या लिंक्सही मिळू शकणार आहे. जेणेकरून विद्यार्थी त्या विषयाशी संबंधित अधिक माहिती मिळवू शकेल. हे सारे आता व्यवहारात उपयोगी पडणारे शिकवले जात आहे हे चांगले आहे. संस्कृत भाषेची गेल्या वर्षी आठवी आणि नववी ची पुस्तके बदलली. यावर्षी दहावीची बदलली आहेत. त्यामध्ये चाकोरीबद्ध भाषांतरचा भार कमी करून संस्कृतभाषेच्या आकलन आणि प्रयोग यावर भर दिला आहे. संभाषण पद्धतीचा वापर केला आहे. प्राचीन भाषा आधुनिक माध्यमातून शिकविण्याचा प्रयत्न यातून केला आहे. त्याचप्रमाणेआजच्या विद्यार्थ्याला काय रुचेल याचा विचार करून व्हॉट्सअॅप संवादाचा लेआऊट करून त्यात संवाद लिहिले आहेत. विद्यार्थी आपल्या ग्रुपवर पिकनिकविषयी चर्चा करतात, कोण काय आणणार, काय करणार याबाबद्दलची चर्चा ईमोज सकट, त्यांच्या भावविश्वाशी जोडली आहेत. म्हणजे जे मुलांना चोरुन, आईवडिलांच्या नकळत करावे लागत होते ते आता सहजपणे उपलब्ध होणार आहे. अभ्यासातील सगळ्यात किचकट भाग म्हणजे व्याकरण. हे व्याकरण अध्ययन नीरस न होता अभिरुचीसंपन्न करण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमात केला आहे. त्यामुळे दहाविची पुस्तके ही फक्त दहावीसाठी न राहता सर्वांना वाचनीय आणि अभ्यासास योग्य अशी आहेत. हा नवा प्रयोग यशस्वी होईल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. पण आता कोरोनामुळे या प्रयोगाचे फलित समजलेले नाही. म्हणूनच ऑनलाईन शिक्षण किंवा कोरानानंतरचे बदललेले शिक्षण किती व्यवहारी असणार आहे यावर देशाचे भवितव्य असेल.
सोमवार, ८ जून, २०२०
परिस्थितीवर मात करण्याचे शिक्षण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा