रविवार, २१ जून, २०२०

पाहु दे पंढरी । डोळा गळा॥

 वारकरी संप्रदायात जास्तीत जास्त शेतकरीवर्ग, ग्रामीण भागातील लोक असतात. अनेकांना वाटते की त्यांना काही काम नाही म्हणून ते चालले आहेत. पण मुळातच आमचा शेतकरी, भूमीपुत्र, शेतमजूर हे कर्मप्रधान आहेत. सगळी कामे करून मगच वारीला निघतात. पेरण्या वगैरे झाल्यावर ते बिज वर येण्याची प्रक्रीया पूर्ण होण्याच्या कालावधीत ही वारी करत असतात. कारण त्यांचे नियोजन योग्य असते. पावसाचे धरतीशी मिलन झाल्यावर त्यांनाही थोडासा एकांत मिळावा या विचाराने तो जात असतो. कारण जसे माणसाचे तसेच निसर्गाचे असते.संसार पसारा। विषयांचा मारा।दु:खांचा भारा। माझ्या डोई॥पाच पाच चवी। क्षणोक्षणी नवी।का कोण पुरवी। प्यास ध्यास॥तहान महान। जीव पिऊ लागे।रक्ताचेही धागे। फिके फिके॥आता विठू तारी। पुरी होवो वारी।पाहु दे पंढरी। डोळा गळा॥ ही संसाराची माया पूर्ण होईपर्यत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारी केली जाते. त्यासाठी प्रत्येकजण मदतीला धावून येत असतो. वारीचे स्वात करत असतो. अर्थात वारकरी हा कोणी मदत करेल या आशेवर जात नाही तर त्याला त्याचा पांडुरंगच तिथपर्यंत नेईल, कोणत्याही रूपात तो भेटेल हा विश्वास असतो.वारीसाठी भक्तांना वाहनांची सुविधा देण्यात येते. यासाठी शासकीय स्तरावर योजना राबविल्या जातात. पालखी मार्गाची पाहणी करणे, रस्त्यांची स्वछता, वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था महाराष्ट्र शासनातर्फेकेली जाते. कारण ही आपली एक समृद्ध संस्कृती आहे. ती टिकवली पाहिजे याचे भान सरकारला असते.आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्र्रचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे. त्यांच्या बरोबरच वारकरी समुदायातील एका दाम्पत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान मिळतो. असा मान मिळणे वारकरी संप्रदायात आदराचे समजले जाते. त्यामुळे या पंधरा दिवसात वारकरी चालत असतात तसे वारी पूर्ण करण्यासाठी अनेक हात, शक्ती कामाला लागलेल्या असतात. अनेक ज्ञात अज्ञात लोकही या वारीला मदत करण्यात धन्यता मानतात. म्हणूनच या वारीवर आपल्याकडे भरपूर अभ्यास केला जातो. वारीचे चित्रिकरण केले जाते. अनेक चित्रपटही यावर झालेले आहेत.देहू व आळंदीहून दरवर्षी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली आहे. त्यामुळे वारी आमच्याकडे साहित्य, संस्कृतील, कला यालाही प्रोत्साहन देणारी ठरली आहे. दशरथ यादव यांच्या कादंबरीवर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट तयार झाला आहे.पस्तीस वर्षांपूर्वी पंढरीची वारी हा वारीतच चित्रिकरण करणारा चित्रपट निघाला आहे. जयश्री गडकर आणि बाळ धुरी यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाच्या चित्रिकरणात, निर्मितीत अनेक अडचणी आल्या होत्या. सुरवातीला जयश्री गडकर आणि अरूण सरनाईक ही 1960 च्या दशकातील मराठी चित्रप्रेमींची आवडती जोडी या चित्रपटात काम करणार होती. पण अरूण सरनाईक यांचे अपघाती निधन झाले आणि ती वारी अपूर्ण राहिली. त्यामुळे या पंढरीची  वारी चित्रपटाची सुरवातच अरूण सरनाईक यांच्या फोटोवर कॅमेरा मारून तुमची अर्धी राहिलेली ही वारी पूर्ण करत आहोत असा संकल्प करून बाळ धुरी यांनी ती भूमिका साकारली आहे. एका वारकर्‍याच्या जीवनातील सुंदर चित्र रंगवलेला हा चित्रपट पाहताना अक्षरश: वारीचा अनुभव येतो. या वारीतील कण कण या चित्रपटात टिपला आहे. राजा गोसावी, अशोक सराफ, राघवेंद्र कडकोळ या दिग्गज अभिनेत्यांसह या चित्रपटात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी भूमिका केलेली आहे. भूमिका म्हणजे शासकीय पूजेचा तेंव्हाचा मान त्यांना होता, त्याचे चित्रिकरण आहे. अनुप जलोटा यांचे भजनसंध्या त्या काळात खूप गाजले होते. अनूप जलोटा यांनी मराठी वारकर्‍याच्या पोषाखात अभंग म्हणून या पंढरीच्या वारीत चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून काम केलेले आहे. कारण कलाकारांनाही पंढरीची वारी करण्याचे स्वप्न आहे. हा आनंद खरा आनंद आहे. क्षणभंगूर सुखात आपण नेहमीच असतो पण खरे सुख ते पंढरीचे दर्शन हा साक्षात्कार कलाकारांनाही झालेला दिसतो. हेच या वारीचे वैशिष्ठ्य आहे. हौशे गवशे या मार्गावर येतात पण तेही कसे सन्मार्गाला लागतात आणि देव त्यांना सदबुद्धी कशी देतो हे पंढरीच्या वारी या चित्रपटातून दाखवून दिले आहे.  वारीला जाणार्‍या वारकर्‍याना जागोजागी दानशूर लोक सोयी सुविधा प्राप्त करून देतात.    याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. 2003 साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.या वारीने प्रत्येक क्षेत्राला काही ना काही दिलेच आहे. साहित्य, कला या बरोबरच एक मोठी व्यापाराची संधीही यातून निर्माण झालेली असते. त्यामुळे केवळ परमार्थाचा हा मार्ग नाही तर चरितार्थाचाही हा मार्ग असतो. नित्य गरजांसाठी अनेक वस्तुंची खरेदी केली जाते. वारीत चहा पाण्यापासून अनेक छोटे छोटे स्टॉल, विक्री करणार्‍या विक्रेत्यांचीही गर्दी असते. जत्रेत जशी खरेदी होते तशीच वारीतही खरेदी होत असते. त्यामुळे व्यापाराला चालना देणारीही ही वारी सर्वसमावेशक आहे. आज या वारीला गर्दी नसल्यामुळे आणि कोरोनाने रोखल्यामुळे या विक्रेत्यांना यावर्षी हा व्यापार करता येत नाही. पण या बदलाचा स्विकार करून त्यांनी जशा चहा, माळा, गुलाल, बुक्का आणि पुजेचे साहित्या विकतो तसेच मास्क, सॅनिटायझर विकायची शक्कल लढवली तर त्यालाही तो पांडुरंग साथ देईल हा विश्वास असायला पाहिजे.  पंधरा दिवसांची ही वारी पूर्ण होण्यासाठी अन्य हात जसे लागलेले असतात तसेच मुख्य हातही महत्वाचे असतात. यामध्ये वारकर्‍यांच्या संस्था आणि संघटना या त्याचे नियोजन करत असतात. यामध्येवारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र राज्य, आम्ही वारकरी,वारकरी सेवा संघ, अखिल भारतीय वारकरी मंडळ, कर्नाटक वारकरी संस्था, कुंभमेळा वारकरी आखाडा परिषद, जागतिक वारकरी शिखर परिषद, तुकाराम महाराज पालखी सोहळा (संस्था)दिंडी, वारकरी, फडकरी संघटना, देहू गाथा मंदिर (संस्था),फडकरी-दिंडीकरी संघ, राष्ट्रीय वारकरी सेना, वारकरी प्रबोधन महासमिती, वारकरी महामंडळ ,ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा - दिंडी समाज, ज्ञानेश्वर महाराज संस्थान, सद्गुरु सेवा समिती , पंढरपूरधर्मसंस्थापना ग्रुप , मुंबई,समाजाच्या विविध क्षेत्रात वारी यासाठी परिश्रम घेत असतात.यात वारीचे नियोजन, प्रशिक्षण आणि स्वयंशिस्त हे तत्वज्ञान शिकवले जाते. कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही हे शिकवणारी ही सर्वसमावेषक अशी पंढरीची वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहेच पण जगाला आश्चर्य वाटेल अशी वारी असते. म्हणूनच परदेशी पर्यटकांचेही त्यात योगदान वाढू लागले आहे. परकीय लोकही याची अनुभूती घेत आहेत हाच हे विश्वची माझे घरचा सिद्धात आहे.प्रफुल्ल फडके/ 9152448055

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: