गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

लॉकडाऊनचा परिणाम मालिकांवर


लॉकडाऊनच्या काळात जनतेने टीव्हीपुढे फतकल मारून बसायचे, असेच सरकारचे आदेश आहेत. गेल्यावर्षी रामायण, महाभारतपासून अनेक जुन्या मालिकांचे पुन:प्रक्षेपण करून माणसांना बसवून ठेवले, परंतु यावर्षी पुन्हा चित्रीकरण सुरू होऊन रुळावर आलेल्या मालिकांचे चित्रीकरणात बदल करावा लागला. त्याचा परिणाम बहुतेक वाहिन्यांच्या मालिकांमध्ये आणि कथानकात झालेला दिसून येतो.


झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे मुंबई, सातारा वाई इथे चाललेले चित्रीकरणाची स्थळे राज्यातील लॉकडाऊनमुळे बदलली गेली आहेत. त्याचा कथानकावर परिणाम झालेला स्पष्टपणे दिसून येतो. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेचे चित्रीकरण सध्या दमणला सुरू आहे. त्यामुळे खानविलकरांचा मोठ्या प्रशस्त राजवाड्यासारखा असणारा बंगला आता दिसत नाही, तर तत्सम हॉलचे डिझाईन करून तिथे सध्या चित्रीकरण केले जात आहे. त्यामुळे अनेक पात्रांना सध्या सुट्टी दिलेली आहे. मागच्या आठवड्यात रॉकीने आतापर्यंतच्या सर्व भागांची उजळणी कॉमेंट्रीतून केली आणि एक भाग कसाबसा एडिट करून दाखवला गेला; पण नंतर पुन्हा पुन्हा मागचे कथानक सांगणे योग्य नसल्याने सोमवार ते शनिवार असणाºया मालिका पाच दिवसांच्या सोमवार ते शुक्रवार केल्या गेल्या. यात मोहितला मालविकाच्या कामासाठी बाहेर पाठवल्याचे सांगून त्याची भूमिका काही भागांसाठी कट करण्यात आली आहे, तर स्वीटूचे काका काकू, असेच कुठेतरी गायब केले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतला कुत्रा दमणला नेता आला नसावा, म्हणून आता जादूपण दिसेनासा झाला आहे. हा सगळा लॉकडाऊन इफेक्ट आहे.

देवमाणूस मालिका अखेरच्या टप्प्यातील तपासाजवळ पोहोचत असताना, चित्रीकरण थांबले. मागच्या आठवड्यातील दोन भागांत थोडासा फ्लॅशबॅक दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न इथेही झाला, तर एका भागात प्रत्येक जण स्वतंत्रपणे दाखवून फोनवरून संवाद दाखवण्याचा प्रयत्न केला; पण यात रटाळपणा येतो आहे म्हटल्यावर या आठवड्यात रेसॉर्टवर सगळ्यांना आणले आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कडेगांव गावातील वाड्यातून हे सगळे कलाकार बेळगांवच्या रेसॉर्टवर आणले आहे. हा रेसॉर्ट मंजुळाच्या जागेवर बांधल्याचे डॉक्टर सांगतो. इथे हॉस्पिटल बांधले, तर अंधश्रद्धेमुळे लोक येणार नाहीत, म्हणून रेसॉर्ट बांधल्याचे डॉक्टर अजित सांगतो. त्यामुळे वाड्यात शेणामातीच्या सारवलेल्या घरात राहणारे सरू आजी, टोण्या, बाबू, मंगल, डिंपल आणि डॉक्टर आता अलिशान रेसॉर्टमध्ये आले आहेत. आता लॉकडाऊन उठेपर्यंत इथेच हा मुक्काम असणार आहे. कथानक वाढवण्यासाठी इथे आता पूजेचा घाट घातला आहे. त्यामुळे सगळे गावातले विजय, बजा, नाम्या आणि अन्य गावकरी येतात. त्यांच्यासमोर विजयच्या हस्ते या रेसॉर्टचे उद्घाटन अजित करतो. मंजुळा आणि माझ्यातील निखण मैत्रीसाठी या रेसॉर्टचे नाव मैत्री ठेवल्याचा शिलालेख तिथे बसवला जातो; पण मंजुचा नवरा अमरला त्या कार्यक्रमाला बोलावले नाही? तो कुठे गायब केला हे मात्र कळले नाही. शेवटी आपल्यावर कसलाही संशय येऊ नये आणि वाड्याकडे दिव्याचे लक्ष जाऊ नये म्हणून अजितने सर्वांना इकडे आणले आहे; पण दिव्याही तपास कसून करत आहे. तिला हॉटेल बॉय भेटला आहे. त्याच्याकडून नवे धागेदोरे मिळाले आहेत; पण मूळ वाड्यात चित्रीकरण सुरू होईपर्यंत पुढचे काही भाग टोण्या आणि सरू आजीचा धिंगाणा पाहायला लागणार हे नक्की; पण राज्य सरकारने मालिकांच्या चित्रीकरणाला लॉकडाऊनच्या काळात परवानगी नाकारल्याने चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण अन्यत्र होण्यास सुरुवात झालेली आहे हे नक्की. प्रत्येकाने महाराष्ट्राबाहेर आपले काम मर्यादित कलाकारांमध्ये सुरू केले आहे हे नक्की.


याबाबतीत झी मराठीवर जे एकखांबी तंबू आहेत ते दोन कलाकार मात्र खºया अर्थाने वर्क फ्रॉम होम करत झी मराठीचा डोलारा पेलत आहेत. यात गेल्यावर्षीप्रमाणे आदेश भाऊजींनी आॅनलाईन साडीवाटपाचे काम सुरू केले आहे, तर भगरे गुरूजी झी मराठीच्या स्टुडीओत न येता आपले काम चोख बजावत आहेत; मात्र या लॉकडाऊनचा फटका कलाकार आणि वाहिन्यांना बसताना दिसत आहे हे नक्की. मालिकांच्या चित्रीकरण स्थळ बदलल्याने निर्मात्यांचा खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी मालिकांमधील कलाकारांना वगळणे हा प्रकार वाढला आहे. त्यामुळे अनेक कलाकारांची भूमिका कापली जात आहे. स्वीटूचे लग्न ज्या मोहितशी ठरवण्याचा घाट घातला आहे तो मोहित महत्त्वाचे पात्र आहे. भविष्यातील कथानकातील तो खलनायक असू शकतो; पण अचानक त्याची भूमिका कट करून पुढचे काही दिवस ओम आणि स्वीटूच्या प्रेमाच्या चाळ्यांना दिले जातील, असे दिसते. तर इकडे स्वीटूच्या आईला लग्नासाठी पैसा जमा करायचा आहे म्हणून ती स्वीटूच्या वडिलांना वसुली मोहिमेवर पाठवत आहे; पण या मालिकेतील असून अडचण नसून खोळंबा असलेल्या अनेक कलाकारांना डच्चू दिला गेला आहे. किंबहुना सर्व पुन्हा सुरळीत होईपर्यंत यांना घरीच बसावे लागणार आहे. यात मोहित, स्वीटूचे काका काकू, ओमचे वडील या दुय्यम कलाकारांना सक्तीची विश्रांती आहे. त्यामुळे एकूणच लॉकडाऊनचा मालिकांवर झालेला परिणाम हा कथानकावर बदल करण्यापासून ते काही कलाकारांना वगळून चित्रीकरण करणे इथपर्यंत पाहायला मिळत आहे. साहजिकच एकूणच मालिकांचे कथानक संथ गतीने पुढे जाताना दिसत आहे. एखादा भाग नाही पाहिला, तरी काही फरक पडत नाही, अशा मानसिकतेत प्रेक्षक आहेत. त्यामुळे जाहिरातींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. एकूणच या उद्योगालाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे हे नक्की.

प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: