सव्वा वर्षापूर्वी सत्तेवर आल्यापासून राज्यातील सरकारला ठाकरे सरकार म्हणून संबोधले जात आहे. कागदोपत्री महाविकास आघाडी असली तरी सर्वजण त्याचा उल्लेख ठाकरे सरकार म्हणून करत आहेत, पण दोन दिवसांपूर्वी पंढरपुरातील प्रचारसभेत राष्ट्रवादीच्या भूमिकेने हे सरकार ठाकरे सरकार नसून पवार सरकार आहे हे स्पष्ट झाले. म्हणजे अजित पवारांचा अंकुश या सरकारवर कायम आहेच, पण शरद पवारांचा रिमोट असल्याने हे पवार सरकार आहे हे आता पंढरपुरात अधोरेखित झाले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना या सरकारचा उल्लेख गायक आनंद शिंदेंच्या मुखातून ठाकरे सरकार नाही, तर हे पवार सरकार आहे, असा करून मुख्यमंत्री नाममात्र आहेत, असे अधोरेखित केले. त्यामुळे आता महाराष्ट्राला समजले आहे की, सरकार कुणाचे आहे, पण तरीही काहींना प्रश्न पडला आहे की सरकार सांगा कोणाचे. असे म्हणत ते चाचपणी करताना दिसत आहेत.
एकीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या मैदानात उतरत ‘अरे सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा’, असे विधान केले व महाविकास आघाडी सरकार आता औटघटकेचे आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरून लोकगायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गाण्यातून टोलेबाजी केली. त्यात त्यांनी स्पष्टपणे हे सरकार पवार सरकार आहे. असा उल्लेख केल्याने सरकार सांगा कोणाचे असा प्रश्न पडला तर आश्चर्य वाटायला नको. कदाचित पवारांच्या हातात सगळे असल्यामुळेच राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना प्रत्येक बाबतीत निर्णय घेण्यास विलंब लागत आहे हे दिसून येत आहे. पाच दिवसांपासून लॉकडाऊनबाबत अनेकांशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यासाठी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले, त्याचे कारणच हे ठाकरे सरकार नाही तर पवार सरकार आहे हे स्पष्ट होते. पंढरपूर मंगळवेढा येथील प्रचारसभेत हे पवार सरकार असल्याचे उघड केले गेले.
लोकगायक आनंद शिंदे हे मूळचे मंगळवेढ्याचे आहेत. त्यांचे आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याच प्रेमाखातर आनंद शिंदे हे भारत भालके यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ सोमवारी मंगळवेढ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी स्वर्गीय भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा देताना भगीरथ भालके यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. आनंद शिंदे यांच्या सभेच्या आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवेढ्यात सभा झाली होती. त्या सभेत फडणवीस यांनी सरकार पाडण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. तोच धागा पकडत गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता ‘त्यांना सांगायचंय मला’ असे म्हणत फडणवीसांच्या वक्तव्याचा एका गाण्याच्या माध्यमातून समाचार घेतला.
तुम्ही चिडवताय,
आम्ही चिडणार नाय.
तुम्ही लय काय करताय,
तसं काय घडणार नाय.
तुम्ही रडवताय
पण आम्ही रडणार नाय.
हे पवार साहेबांचं सरकार हाय,
तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय.
आनंद शिंदे यांनी हे गाणे वाचताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला. यावेळी धुरळा चित्रपटातील ‘नजर धारदार माणूस दमदार’ हे गाणे गात शिंदे यांनी भगीरथ भालके यांच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार उपस्थित होते, पण एकूणच या सरकारवर पवार कुटुंबाचे वर्चस्व आहे हे स्पष्ट आहे. शरद पवार, अजित पवार, रोहित पवार आणि अधुनमधून सुप्रिया सुळे सरकारची बाजू मांडत असतात. राष्ट्रवादी आणि शरद पवारांशी सतत जवळीक असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेही पवारांचीच भूमिका मांडत असतात. त्यामुळेच उल्लेख ठाकरे सरकार असला तरी या सरकारचे भवितव्य पवारांवर अवलंबून आहे. पवारांची इच्छा असेल तोपर्यंत हे सरकार टिकणार यात शंकाच नाही.
या सरकारमध्ये काँग्रेस अस्वस्थ आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी आपल्याला विश्वासात घेत नाहीत, अशी त्यांची कायमच तक्रार असते. हा त्यांचा राग शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीवर जास्त असतो. अर्थात पंधरा वर्ष आघाडी सरकार असताना काँग्रेसने राष्ट्रवादीला असेच छळले होते. दुसºया टर्ममध्ये जास्त आमदार राष्ट्रवादीचे असूनही राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद दिलेले नव्हते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे समदु:खी एकत्र आले आणि ठाकरे सरकार नावाने पवार सरकार स्थापन केले. यात ठाकरेंच्या आडून पवारांनी काँग्रेसला धडा शिकवला, तर पवारांच्या आडून ठाकरेंनी भाजपला धडा शिकवला. त्यामुळे हे सरकार नक्की कोणाचे आहे हे आता स्पष्ट झाले आहे. त्याच पवारांच्या कार्यकर्त्यांनी हे पवारांचे सरकार आहे, हे तुमच्या बापाच्यानं पडणार नाही हे सांगून भाजपला जागा दाखवून दिलेली आहे. हे पवारांचे सरकार असल्यामुळेच टिकले आहे. कारण कोणते सरकार कसे पाडायचे हे पवारांना चांगले जमते, पण पवारांचे सरकार पाडणे हे भाजपला अजून जमले नाही. त्यांनी वेगवेगळ्या तारखा दिल्या, तीन महिन्यांत जाईल, लवकरच पडेल अशी भाकिते केली, पण ते सरकार काही पडले नाही. ठाकरे-पवार यांची जोडी म्हणजे फेविकॉलचा जोड आहे, तो असा तसा तुटणारा नाही हे भाजपला यानिमित्ताने दाखवून दिले गेले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा