झी 24 तासच्या रोखठोक या कार्यक्रमात सोमवारी नरेंद्र मोदींच्या उपोषणाचा फायदा कोणाला होणार याबाबत चर्चा घेतली होती. यामध्ये काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी नरेंद्र मोदींना विरोध करताना एक वक्तव्य केले की मोदींनी केवळ दहा वर्षात गुजरातचा विकास केला आणि दहा वर्ष सत्तेत आहेत म्हणून त्यांचे कौतुक होत आहे पण आम्ही महाराष्ट्राती गेली 45 वर्ष सत्तेत आहोत तर आमचं कोणीच कौतुक करत नाहीत. भाई जगताप यांचे हे वक्तव्य म्हणजे काँग्रेसच्या निष्क्रीयतेची स्पष्ट कबूली आहे. आज गुजरातमध्ये जनतेला आणि उद्योगांना 24 तास वीज मिळते. या उलट गेल्या बारा वर्षात लोडशेडींग हा शब्द आघाडी सरकारने महाराष्ट्रात रूजवला. राज्य भारनियमनमुक्त करण्यासाठी काँग्रेस सरकारने का नाही महाराष्ट्रात प्रयत्न केले हे मात्र कोणाही काँग्रेस नेत्यांना सांगता येणार नाही. मोदींच्या उपवासामुळे संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. त्यामुळे त्यांची कर्तबगारी संपूर्ण जगाने पाहिली. पण महाराष्ट्रातल्या काँग्रेस सरकारने अशी कोणती कर्तबगारी केली की त्याचे कौतुक करायचे? मोदी हे जर रोल मॉडेल म्हणून या देशात पुढे आले तर या महाराष्ट्रातही भाजप सेना आणि मित्रपक्षांची सत्ता येईल. नरेंद्र मोदींचा कार्यक्रम भाजप सेना आणि मित्र पक्षांच्या युतीने राबवला तर काँग्रेसला लोक विसरतील याची भिती काँग्रेसने घेतली. त्यामुळे लहान मुलासारखे काँग्रेसचे नेते बोलू लागले. खरं तर भाई जगताप हे कामगार नेते आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची कामगारांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. त्यामुळे इतका काँग्रेसी लाचारपणा त्यांच्या कार्याला शोभत नाही. भाई जगताप म्हणाले की नरेंद्र मोदींनी 8 हजार कोटी रूपये केंद्राकडून घेतले आणि गुजरातचा विकास केला. तसाच निधी नितीशकुमार यांनी केंद्राकडून घेतला त्यामुळे त्यांनी विकास केला. पण त्याचबरोबर महाराष्ट्रानेही केंद्राकडून 13 हजार कोटींचा निधी घेउनही काय दिवे लावले? म्हणजे राज्य भारनियमनमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील आघाडी सरकारने का नाही प्रयत्न केले? हे 13 हजार कोटी काँग्रेस आघाडी सरकारने नेमके कोठे खर्च केले याचा हिशोब काँग्रेसने द्यावा. गुजरातला जमले, बिहारला जमले ते महाराष्ट्राला का जमू नये? आज महाराष्ट्रातील शेतकरी आणि कामगार, सर्वसामान्य माणूस आणि उद्योग, सहकार आणि बँकींग क्षेत्र मारून टाकायचे काम काँग्रेस सरकार करते आहे. संपूर्ण विश्वासार्हता काँग्रेस सरकारने महाराष्ट्रातून गमावलेली दिसून येते. वीजेची मागणी वाढली म्हणून भारनियमन करावे लागते असे सांगून महाराष्ट्र सरकार गप्प बसते. पण जसजशी लोकसंख्या वाढत आहे, तसतशी पाण्याची आणि विजेची मागणी ही वाढतच जाणार आहे. त्या नैसर्गिक वाढीबरोबर आपण विविध प्रकल्प राबवून पाण्याची आणि वीजेची निर्मिती करायला लागते हे महाराष्ट्र सरकारला का समजत नाही? आज संपूर्ण महाराष्ट्रातला पैसा हा फक्त आणि फक्त रस्ते दुरूस्ती आणि रस्ते बांधणी यात खर्च होतो. दर सहा महिन्यांनी एकाच रस्त्याचे काम पुन्हा पुन्हा केले जाते. त्याच त्याच रस्त्यावर पुन्हा पुन्हा खर्च केला जातो. इतके निकृष्ठ पद्धतीचे काम हे सरकार करते. त्यामुळे केवळ आलेला निधी हा विकास कामांवर नाही तर भ्रष्टाचारासाठी खर्च होतो. आज कोणताही चांगला उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास तयार होत नाही. कारण या राज्यात 24 तास वीज उपलब्ध होउ शकत नाही. तीन पाळींमध्ये कारखाना चालू ठेवला तरच उद्योगांवर खर्च करायला उद्योजकांना परवडते. दररोज आठ ते 12 तास कारखाने बंद ठेवायचे म्हणजे त्या कर्मचार्यांचा पगार हा अनुत्पादक म्हणून अंगावर पडतो. त्यामुळे संचित तोटा वाढतो. हा तोटा सहन करण्यासाठी कोण इथे उद्योग उभा करणार? पण गुजरातमध्ये उद्योगासाठी गुंतवणूक करण्यास देश विदेशातील उद्योजक तयार आहेत कारण नरेंद्र मोदी त्यांना 24 तास विज उपलब्ध करून देतात. नरेंद्र मोदींनी केंद्राकडून घेतलेल्या 8 हजार कोटींचा सदुपयोग केला. पण महाराष्ट्राच्या काँग्रेसला तो करता आला नाही. त्यामुळे भाई जगताप सरळपणे म्हणतात की केंद्राने निधी दिला म्हणून गुजरातचा विकास झाला. पण त्याचवेळी केंद्राने महाराष्ट्राला निधी देउनही तो योग्य ठिकाणी वापरता आला नाही हे कबूल करण्याचे धाडस काँग्रेस नेत्यांना का होत नाही? नरेंद्र मोदी हे जर गुजरातला 24 तास वीज देउ शकतात तर महाराष्ट्र सरकार का देउ शकत नाही याचे उत्तर भाई जगताप किंवा काँग्रेस नेत्यांकडे का नाही? युती सरकारच्या काळात कृष्णा खोरेसारखे प्रकल्प राबवून पाणी आणि वीजेचा प्रश्न सोडवण्यासाठी योजना आखल्या गेल्या. सत्तेवर आल्यावर गेल्या बारा वर्षात ते कोणतेही प्रकल्प आघाडी सरकारने पूर्ण केले नाहीत. त्यामुळे वीज आणि पाण्याचा कोणताही प्रश्न सुटला नाही. वीज प्रकल्प हे सातत्याने उभे करावे लागतात. वाढती वीजेची गरज पाहून नवेनवे वीजप्रकल्प उभे करायचे असतात. आज महाराष्ट्रात वीज निर्मितीसाठी अनेक स्त्रोत आहेत. पण सरकारची इच्छा नसल्यामुळे त्या मार्गांनी वीज निर्मिती केली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राला हजारो किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. पण आम्ही समुद्राच्या लाटांवर वीज निर्मिती करू शकलेलो नाही. जगातील अनेक देशात समुद्राच्या लाटांवर वीजनिर्मिती केली जाते. पण भारतात मात्र तसे प्रयोग केले जात नाहीत. सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि विविध रांगांवर गेल्या काही वर्षांपासून असंख्य पवनचक्क्या उभ्या केलेल्या दिसतात. त्यापासून आम्ही पवन उर्जा का निर्माण करू शकलेलो नाही? केवळ औष्णिक आणि कोळशावरच्या वीजेवर आम्ही महाराष्ट्र चालवायचा म्हटले तर ते कसे काय शक्य आहे? वीज निर्मितीचे प्रकल्प हे सातत्याने उभे करावे लागतात हे शहाणपण महाराष्ट्र सरकारला कधीच सुचले नाही. त्यामुळे भारनियमनाचा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नाही. अशा परिस्थितीतीत दहा वर्ष सत्तेवर राहिलेल्या नरेंद्र मोदी सरकारचे सगळेजण कौतुक करतात पण 45 वर्ष आम्ही सत्तेवर असून आमचे कोणी कौतुक का करत नाही हे भाई जगताप यांचे म्हणणे अत्यंत हास्यास्पद आणि पोरकटपणाचे आहे. कौतुक करावे असे गेल्या पंचेचाळीस वर्षात काँग्रेसने केले काय? आज आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतात. गुजरातमध्ये एकाही शेतकर्याने आत्महत्या केलेली नाही. महाराष्ट्रात हजारो शेतकरी दरवर्षी आत्महत्या करतात. अशा परिस्थितीत काँग्रेसचे काय म्हणून कौतुक करायचे हे भाईंनी सांगावे. आज आमच्या शेतकर्यांना भूमिहीन करून त्याला गुलाम करण्याचे धोरण हे सरकार आखत आहे. सेझसारखे प्रकल्प लादून शेतकर्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत. गुजरात सरकारने सेझला हाकलून लावले. जैतापूरसारख्या कोकणातील महत्त्वाच्या भागात अणू उर्जा प्रकल्प आणून तेथील शेतकरी आणि मत्स्य व्यवसाय नष्ट करण्याचे धोरण काँग्रेस सरकारने आखले आहे. त्यामुळे मत्स्य उत्पादक उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे. तरीही हा प्रकल्प काँग्रेस लादत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस सरकार जनहिताचे कोणते काम करीत आहे तेव्हा त्या सरकारचे कौतुक करावे? मोदींनी जे दहा वर्षात करून दाखवले ते काँग्रेसला 45 वर्षातही जमले नाही म्हणून त्यांचे कौतुक करायचे काय याच ेउत्तर भाई जगतापांनीच द्यावे. काँग्रेसला कधीही विरोधकांचे कौतुक करावे असे वाटत नाही त्यामुळे हा खोटेपणा हे नेते करताना दिसतात. बांगलादेश युद्धात विजय मिळवल्यावर अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींचे भरभरून कौतुक केले होते. दुर्गा म्हणून त्यांचा गौरव केला होता. हे मोठेपण काँग्रेसला जोपर्यत सुचत नाही तोपर्यत काँगे्रेसला जनता आता स्वीकारणार नाही. अण्णांच्या उपोषणानंतर मोदींच्या उपोषणाने जनतेला एक सक्षम पर्याय दिला आहे त्याचा धसका काँग्रेसने घेतला हेच यातून दिसत आहे.(21सप्टेंबर 2011)
शनिवार, १२ एप्रिल, २०१४
कौतुक कोणत्या गोष्टीचे करायचे भाई?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा