पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी या देशाचे आणखी केलेले फार मोठे नुकसान म्हणजे तिबेटचा प्रश्न वादग्रस्त बनवला. चिघळवला. याबाबत सरदार वल्लभाई पटेल यांनी सावध करूनही पत्र पाठवूनही नेहरूंनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामागे नेहरूंचा देशाचे नुकसान करण्यामागे काय हेतु होता किंवा त्यांना देशाचे नुकसान केल्यामुळे काय फायदा झाला हे कायम गुलदस्त्यात राहिले आहे. आज तेच या देशातील जनतेपुढे येणे आवश्यक आहे. दीर्घकाळ सत्तेवर राहिलेली काँग्रेस ही खरोखरच देशासाठी काम करीत होती की पुर्वी जसे मोगल राजे, इंग्रज या देशावर येउन राज्य करीत होते त्याप्रमाणे काम करते आहे का याचा विचार आता केला पाहिजे. साठीनंतरचे वर्ष निवृत्तीचे असते. गध्देपंचवीशीत असताना आणीबाणीचा प्रकार आणून लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार केला होता. तेव्हा ही काँग्रेस जनतेने उखडून फेकली होती. पण तीची मुळं या मातीत राहीली होती. आता ती मुळासकट उपटायला पाहिजेत. नाहीतर ही काँग्रेसची भुतं काश्मिरपाठोपाठ या देशाचे आणखी तुकडे पाडायला कमी करणार नाहीत. पंडीत नेहरुंनी तिबेट प्रश्नी चीनबरोबर फाजील लगट केली. तिबेटींनी भारताला चीनी अत्याचारांपासून वाचवा असे सतत सांगितले होते. आम्ही भारतीय आहोत. आम्हाला भारतीय म्हणूनच जगायचे आहे असे तिबेटींना वाटत होते. पण चीनला पोषक असे वातावरण पंडीतजींनी केले. तिबेटला लष्करी संरक्षण देण्याची जबाबदारी भारताची आहे अशी मागणीही तिबेटने केली होती. सरदार वल्लभाई पटेल यांनीही त्यास अनुकुलता दाखवली होती. त्यांनी नेहरूंना तसे पत्राने कळवले होते. पण नेहरूंनी त्या पत्राला केराची टोपली दाखवली. आज जे चीनी आक्रमण या देशावर झाले आहे. बाजारपेठेपासून भूखंडापर्यंत त्याचे जनक हे काश्मिरी गुलाबराव पंडीत आहेत. पोलादी पुरूषाला गुलाबी मनाने वाकवण्याचा इतिहास या देशात पंडीत नेहरूंनी केला. 9 नोव्हेंबर 1950 ला सरदार वल्लभभाइ पटेल यांनी नेहरूना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात त्यांनी स्पष्ट म्हटले होते की , चीन हा भारताचा मित्र आहे असे आपण मानता. पण तसे मानतो आहे काय? पंडीतजी हे कलियुग आहे. या कलियुगात अहिंसेचे उत्तर अहिंसेने द्यायचे असते. पण कोणी आपल्यावर हल्ला करीत असेल तर अहिंसेचा उपयोग नाही. आपल्याला ठोस उत्तर द्यावे लागेल. पण नेहरूंनी पटेलांच्या या पत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. भारताचे अहित आणि चीनचे हित लक्षात घेतले. याला देशप्रेम म्हणायचे की देशद्रोह हे जनतेनेच ठरवायला पाहिजे. हा तिबेटचा प्रश्न अजूनही आजही जळतो आहे. ती आग लावणारे आहेत थंड डोक्याचे पहिले पंतप्रधान. काँग्रेसचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू. ज्या निर्दयपणे ब्रिटीशांनी बंगालची, भारताची फाळणी केली त्याच निर्दयपणे काश्मिर, तिबेटसारखे भाग पंडीतजींनी घालवले आहेत. हा इतिहास लक्षात घेतला पाहिजे. पंधराव्या शतकात बाबर या देशात राज्य करून गेला. त्याने काही वास्तू, जमिनी वादग्रस्त केल्या. त्यासाठी आत्ता लढा देत आहोत. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातील शत्रूविरोधात लढण्याआधी स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या या स्वकीय शत्रूंविरोधात आधी लढले पाहिजे. काही शतकांपुर्वीच्या बाबरावरून वाद घालण्याअगोदर अलीकडच्या काळातीलच स्वातंत्र्योत्तर घटनेकडे पाहून या काँग्रेसी राजवटीचा बरबटलेला कारभार लक्षात घेतला पाहिजे. घोटाळा, गोंधळ, भ्रष्टाचार, वादग्रस्त विषय निर्माण करणे या सुत्रांचे धोरण करूनच काँग्रेस कायम सत्तेवर पोहोचली आहे. नेहरूंच्या या प्रवृत्तीमुळे हिंदी चीनी भाई भाईच्या बावळटपणामुळे भारत चीन युध्द झाले. त्यात आपण आपली जमीन गमावून बसलो. युध्द सपशेल हरलो. यासगळ्या गोष्टींना नेहरू जबाबदार आहेत. पण त्यानंतर पाठोपाठ झालेले पाकीस्तानचे युध्द, पंडीत नेहरुंचे निधन, लालबहादूर शास्त्रींचे निधन या थोड्या थोड्या काळाने घडलेल्या घटनांमुळे या देशात सत्तेचे परिवर्तन होउ लागले नाही. काँग्रेसच्या अपयशाला त्यांच्या मृत्यूच्या सहानुभूतीच्या लाटेने झाकून टाकले. त्यामुळे त्यांच्या कन्या इंदिरा गांधी या दीर्घकाळ पंतप्रधान म्हणून या देशात टिकल्या. पाकीस्तानशी दोन युध्द करून आणि पाकीस्तानचे तुकडे करून बांग्लादेशाची निर्मिती करण्याच्या श्रेयातून या देशाचे तुकडे करण्याचे पाप झाकण्याचा प्रयत्न काँग्रेसने या काळात केला. त्या लाटेवर इंदिरा गांधी दीर्घकाळ टिकल्या. पण नंतर सत्तेची धुंदी त्यांना चढली. 1975 साली आणिबाणी पुकारली. या आणीबाणीचे निमित्त देशाला शिस्त लावणे आहे असे त्यांनी भासवले. त्यासाठी वीस कलमी आर्थिक योजना असा कार्यक्रम राबवल्याचे त्यांनी जाहीर केले. पण आणिबाणी पुकारण्यामागे काँगे्रेस सरकारचा एक घोटाळा कारणीभूत होता हे लपवून ठेवले गेले. आणि बाणी पुकारण्यामागचे नक्की कारण देशातील जनतेपुढे येणे आवश्यक आहे. ज्या राजनारायण यांनी इंदिरा गांधी यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केले होते त्यांनी इंदिरा गांधीविरोधात निवडणुकीच्या काळात केलेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची चौकशी करण्याची केस न्यायालयात टाकली होती. या खटल्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या दोषी असल्याचे अलाहाबादा उच्च न्यायालयाचे लक्षात आले. इंदिरा गांधी यांनी सरकारी यंत्रणेच्या निवडणूक प्रचारासाठी दुरूपयोग केल्याचे न्यायालयाने मान्य केले. त्यामुळे इंदिरा गांधी यांची निवड अलाहाबाद उच्च न्यायालयाने अपात्र ठरवली होती. लोकसभेत त्या बसू शकत नाहीत असा शेरा मारला होता. त्याचबरोबर लोकसभेची मुदत सहा वर्षापर्यंत वाढवण्याच्या त्यांच्या प्रकाराबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. इंदिरा गांधींच्या या भ्रष्ट आणि अत्याचारी राजवटीविरोधात जयप्रकाशनारायण यांनी रान उठवायचे ठरवले आणि ते रस्त्यावर उतरले. ही आपली पापं झाकण्यासाठी त्यांनी तातडीने आणीबाणी जाहीर केली. अत्यंत लाजीरवाणी परिस्थिती निर्माण करून या देशातील लोकशाहीचा खून तत्कालीन काँगे्रेस सरकारने केला. स्वातंत्र्यानंतर पहिल्या पंचवीस वर्षातच या देशाचे जेवढे म्हणून मातेरे करता येईल, जेवढे म्हणून अहित चिंतता येईल तेवढे काँग्रेसने केले आहे. खरं तर भविष्यात या गोष्टी अभ्यासक्रमात यायला पाहिजे. काँग्रेसचा पराभव करून जर नवे सरकार सत्तेवर आले तर त्यांनी इतिहासाच्या अभ्यासक्रमात याबाबत समावेश करायला पाहिजे. मोगल राजवट, ब्रिटीश राजवट यावर इतिहासात अभ्यास आहे. तशीच काँग्रेसची जुलमी राजवट या देशातील पिढीपुढे आणला पाहिजे. विकास कामे काळाच्या ओघात होत जातात. पाकीस्तान या देशाच्या एक विसांशही नाही. पण आज भारतात जे जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते ते तिथेही आहे. कारण जागतिकीकरणाच्या रेट्यात तंत्रज्ञान सर्वत्र गेले आहे. अगदी नेपाळसारख्या देशातही भारतातील अद्यावत तंत्रज्ञान आहे. त्यामुळे काँग्रेसने विकास केला, देश प्रगतीपथावर नेला हे संागून देशाची फसवणूक केली जात आहे. बाजारपेठेच्या नियमाप्रमाणे असा विकास आपोआप होत असतो. त्याचे उगाच श्रेय काँग्रेसने घेउ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आदिलशहाचे, औरंगजेबाचे मोगली राजवटीतील अत्याचार दाखवतो. ब्रिटीश राजवटीचे दाखवतो तसेच काँग्रेसी अत्याचाराचा इतिहासही अभ्यासक्रमात आलाच पाहिजे. काँग्रेसने काही चांगली कामे केल्याचा डंका पिटला असेल तर ब्रिटीशांनी काय कमी सुधारणा केल्या? रेल्वे, तार पोस्ट या दळणवळणाच्या साधनांची देणगी ब्रिटीशांचीच आहे. अजून काही चांगले पूल ब्रिटीशांनी बांधलेले आहेत. सतीची प्रथा बंद करण्याचे काम ब्रिटीशांनीच केले. पण अंधश्रध्दा निर्मूलनाचा कायदा करायला काँग्रेस सरकार पुढे येत नाही. कारण प्रत्येकाचा एक कोणीतरी बाबा आहे. नाहीतर बाई आहे. बाई आणि बाबाच्या जाळ्यात अडकलेले हे सरकार देशाचे वाटोळेच करणार आणि केले आहे हे भावी पिढीलाही समजले पाहिजे. भ्रष्टाचार घोटाळ्याचे आणि गैरव्यहाराचे, अंदाधुंद कारभाराचे बिज पंडीत नेहरूंनी पेरले. त्याला त्यांच्या कन्येने खतपाणी घातले. त्याला आता चांगलीच भ्रष्टाचाराची फळं लगडली आहेत. निवडक 31 महाघोटाळ्यापैकी सर्वाधिक 10 घोटाळे हे मनमोहनसिंग यांच्या कारकीर्दीत एकट्या 2010 या वर्षात आहेत यावरून ही फळं कशी लगडली आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. त्या लगडलेल्या फळांची बिजे पुन्हा या जमिनीत रूजून नवे अंकूर फुटण्यापूर्वीच ते बिज हटवण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे सुराज्याच्या दिशेने पावले टाकणे आहे.( 12 आक्टोबर 2010)
शुक्रवार, १८ एप्रिल, २०१४
गुलाबी मनाने पोलादी पुरूषाला वाकवले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा