शनिवार, १२ एप्रिल, २०१४

लुंगीसाठी पगडीचा बळी

पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी दुरसंचार घोटाळ्यातील संशयीत गृहमंत्री पी. चिदंबरम यांची पाठराखण करुन काँग्रेसची परिस्थितीत आणखीच बिकट केलेली दिसते. पण पी. चिंदंबरम यांची पाठराखण पंतप्रधानांनी का आणि कशासाठी केली आहे याचा तपास करणे आवश्यक आहे. पी. चिदंबरम यांना पाठीशी घालण्यामुळे आपल्यावरही हे किटाळ येणार हे माहित असूनही डॉक्टर मनमोहनसिंग यांनी असा निर्णय का घेतला याचा विचार केला गेला पाहिजे. सोनिया गांधींच्या काँग्रेसने पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पूर्णपणे बळीचा बकरा करायचे ठरवलेले दिसून येते. एकतर झालाच आहात बदनाम, झालीच आहे प्रतिमा मलिन तर पार त्या टोकाची प्रतिमा होउ देत असे म्हणून त्यांना पी. चिदंबरमची पाठराखण करायला भाग पाडले आहे. झाले बदनाम तर मनमोहनसिंग आणि पी. चिदंबरम होतील. काँग्रेसला निवडणुका जिंकायला कोणा सिंग अथवा चिदंबरमची जरूर नसते. तर गांधी नाव खणखणीत असावे लागते. या गांधी नावाच्या करीष्म्याला जपले म्हणजे काँग्रेस सुरक्षित राहते. हे लक्षात घेउन या संपूर्ण लफड्यातून सोनिया गांधी आणि राहूल गांधींना बाजूला ठेवण्याचा प्रकार काँग्रेसने केला आहे. एवढा मोठा घोटाळा होतो आणि सोनिया गांधींचा त्यात सहभाग नाही असे मानणेच शक्य नाही. कारण काँग्रेसचे राजकारण हे सगळे संगनमताचे राजकारण असते. म्हणजे काँग्रेसचे नेते नेहमीच म्हणत असतात. की आम्ही लोकशाहीवर विश्‍वास ठेवणारे आहोत. लोकशाही मार्गाने आम्ही सर्व निर्णय एकमुखाने घेतो. त्यामुळे दूरसंचार घोटाळ्यात कोणीकोणी अडकायचे आणि कोणाला सोडवायचे याचे संगनमत झाले असल्याशिवाय राहणार नाही. फक्त सोनिया आणि राहूल यांची नावे कुठेही त्यात येणार नाहीत  याची काळजी घेत हा घोटाळा करायचे ठरवले गेले आहे. त्यामुळेच मनमोहनसिंग यांनी पी. चिदंबरम यांची पाठराखण केलेली दिसून येते. काँग्रेसने ज्यावेळी बिगर गांधी नेहरू पंतप्रधान दिला त्यावेळी नरसिंहराव यांच्या काळात नरसिंहराव असेच भरपूर बदनाम झाले होते. अनेक लफडी आणि भ्रष्टाचार त्यांच्या काळात झाले होते. तेव्हाही खासदार खरेदीचे प्रकरण झाले होते. हर्षद मेहताने तर एक कोटीची बॅग नरसिंहराव यांना दिल्याचा थेट आरोपच केला होता. आरोप नव्हे तर कबूल केले होते. या सगळ्या घोटाळ्यात काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी पक्षाला बदनाम होउन दिले नाही फक्त नरसिंहराव यांना बदनाम केले. तोच प्रकार आता मनमोहनसिंग यांच्या बाबत होणार आहे. पण एकूणच आत्ता काँग्रेस पी. चिंदंबरम यांना वाचवून मनमोहन सिंग यांच्यावर ठपका ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पी. चिदंबरम यांना वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून का चालला आहे? हा प्रयत्न करताना काल परदेश दौर्‍यावरून परत आलेल्या मनमोहनसिंग यांनी कधी नव्हे ती विरोधकांवरच आगपाखड केली. विरोधकांना निवडणुकांची चाहूल लागली आहे, मध्यावधीचे वेध लागले आहेत म्हणून हा प्रचार चालला आहे असे वक्तव्य करून मनमोहनसिंग यांनी मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. आपण आपला कार्यकाल पूर्ण करणार आहोत असे सांगून जी टू स्पेक्ट्रम घोटाळ्यात अडकलेले असतानाही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. कदाचित याठिकाणी एखादा अन्य प्रांतीय असता तर असा वाचवण्याचा प्रयत्न झाला नसता. पण केवळ पी. चिदंबरम होते म्हणूनच त्यांची पाठराखण केली जात आहे असे दिसते आहे. यामागचे एक कारण म्हणजे आज संपूर्ण देशभरात काँग्रेस विरोधी वातावरण तयार झाले आहे. काही झाले तरी काँग्रेस मध्यावधी निवडणुका होउ देणार नाही. कितीही घोटाळे उघडकीस आले आणि अराजक माजले तरी काँग्रेस सरकार ही पाच वर्षांची टर्म पूर्ण करणार आणि त्यासाठी धडपडणार हे निश्‍चित आहे. कराण सध्याच्या या वातावरणात निवडणुका घेतल्या तर काँग्रेसला हाताच्या बोटावर मोजाव्या लागतील इतक्या तरी जागा मिळतील की नाही याबाबत शंका आहे. संपूर्ण देशात प्रचंड बदनाम झालेला हा पक्ष असल्यामुळे या काळात निवडणुकांना सामोरे जाण्याची हिम्मत त्यांच्यात नाही. त्याचप्रमाणे अजून अडीच वर्षांचा काळ काढताना जनतेची स्मरणशक्ती कमी असते हे लक्षात घेउन उरलेल्या अडीच वर्षात जनतेला विसरता येईल असे काही तरी करता येते या हेतुने काँग्रेसने मध्यावधीचा विषय काढला आहे. खरं तर आज जे या देशात अराजक माजले आहे त्यामुळे या सर्व भ्रष्टाचारी मंत्र्यांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना तुरूंगात डांबले पाहिजे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस घाबरत आहे. त्याचबरोबर आज दक्षिण भारतातील पक्षांची काँग्रेसबाबत प्रचंड नाराजी आहे. काँग्रेसने सूडाने पेटल्याप्रमाणे फक्त दक्षिणेतील नेतेच टार्गेट केले. ए. राजा,  कनिमोळी , सुरेश कलमाडी असे अनेक दिग्गज नेते काँग्रेसने तुरूंगात जाणे भाग पाडले आहे. अन्य पक्षांशी पंगा घेतला आहे. यात जयललिता, करूणानिधी अशा दाक्षिणात्य नेत्यांची नाराजी आहे. अशातच जर पी. चिदंबरमची लुंगी काढून घेतली तर काँग्रेसला दक्षिणेत पुन्हा पंचवीस वर्ष शिरकाव करायलाही मिळणार नाही एवढा संताप दक्षिण भारतीयांमध्ये उसळेल याची जाणिव काँग्रेसला झाली आहे. दक्षिण भारतीय लोकांना विश्‍वास देण्यासाठी काँग्रेस चिदंबरम यांना वाचवत आहे. लफडी करूनही, ए. राजांना पाठीशी घालूनही काँग्रेसने पी. चिदंबरम यांना वाचवले असा संदेश दक्षिण भारतात गेला तर काँग्रेस काहीही करू शकते याची खात्री दाक्षिणात्य लोकांना पटेल. यासाठी दक्षिणेतील मतांवर डोळा ठेवून पी. चिदंबरम यांना वाचवण्याचा हा अट्टाहास चालला आहे. कारण उत्तरे कडच्या कोणत्याही राज्यात काँग्रेसला शिरकाव करता येईल याची शक्यता नाही.  बिहारमध्ये नितीशकुमार यांनी, गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी आणि उत्तर प्रदेशात मायावतींनी काँग्रेसला दरवाजे बंद केले आहेत. महाराष्ट्रात अशीच परिस्थिती होणार आहे. त्यामुळे सगळी मोठी राज्ये काँग्रेसच्या हातून गेली आहेत. अशा परिस्थितीत दक्षिण भारताचे दार बंद झाले म्हणजे काँग्रेस संपल्यातच जमा होईल. म्हणून हा धोका पत्करायला नको यासाठी लुंगी बचाव आंदोलन सुरू केले आहे. मनमोहनसिंग बदनाम झाले तरी चालतील पण पी. चिदंबरम यांना वाचवले पाहिजे असा काँग्रेसचा डाव यासाठीच आहे. लुंगी वाचवायची की पगडी या विचारात पडलेल्या काँग्रेसने पगडी गेली तरी चालेल. सर सलामत तो पगडी पचास. पण लुंगी निसटली तर अब्रू जाणार. यासाठी लुंगीसाठी पगडीचा बळी देण्याचे ठरवले आहे.(29 सप्टेंबर 2011)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: