रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तिसरा टप्पा आता लवकरच सुरू होत असल्याची बातमी आहे. त्याचा टीझरही लाँच झाला आहे. विशेषत: त्यासाठी मुंबई लोकलचा वापर केलेला आहे. लोकलमध्ये अण्णा नाईकांचं भूत पाहून सगळे चक्रावून जातात; पण यातून ही मालिका अधिक थरारक, भयानक असेल असे दिसते. पहिल्यापेक्षा दुसरे पर्व अधिक छान होते, आता त्याच्यापेक्षा अधिक भयंकर असे काहीतरी या मालिकेत पहायला मिळेल हे त्या मालिकेच्या वेळेवरूनच समजते. ही मालिका २२ मार्चपासून रात्री ११ वाजता सुरू होणार असल्याचे जाहिरातीत म्हटले आहे. रात्री अकराची मालिका म्हणजे मोठी माणसे बघतील, अशी व्यवस्था असेल. याचा अर्थ ती अधिक भयानक असेल, असे समजायला काहीच हरकत नाही.
पण एकूणच भयानक मालिका, भूतखेत, प्रेत, जादुटोना असले काही तरी रंजक बघायला प्रेक्षकांना आवडते हे नक्की. टीव्ही वाहिन्यांचे जाळे पसरू लागले तेव्हापासून झी टीव्हीने प्रेक्षकांची नस ओळखली आहे. सुरुवातीला फक्त झी टीव्ही एवढेच होते. त्यानंतर अगदी झीट येईल इतक्या त्यांच्या ब्रँचेस झाल्या. झी न्यूज, झी मराठी, झी २४ तास, झी युवा, झी वाजवा अशा ढिगाने वाहिन्या आल्या. प्रत्येक प्रादेशिक पातळीवर झी वाहिन्या आल्या; पण सुरुवात झी टीव्ही हीच होती. या झी टीव्हीवर १९९३च्या सुमारास सर्वात प्रथम झी हॉरर शो हा कार्यक्रम सुरू केला. अर्थात हॉरर शो म्हटल्यावर आपल्याकडे पूर्वी रामसे बंधूंचीच मक्तेदारी होती. त्यामुळे या झी हॉरर शोमध्ये रामसे कुटुंबीय दिसायचे. केसू, रामसे, शाम रामसे, तुलसी रामसे, अशा रामसेंच्या रामभरोसे हे हॉरर शो दाखवले जायचे. रामसेंनी आपली हयात भयपटात घातल्याने त्यांना हे २५ मिनिटांचे भाग सादर करणे काही अवघड नव्हते. भयानक चेहरे, मुखवटे, रक्तमांस चिकटवलेले भयानक चेहरे, बाहेर आलेले दात हे सगळं मटेरियल त्यांच्याकडे होतेच. त्यांचा फॉर्म्युलाही ठरलेला असायचा. कुठून तरी दोन-तीन जोड्या एका वाड्यात, हवेलीत आणायच्या. त्यांची प्रेमगीते, आंघोळ झाल्यानंतर भूताकडून एकेकाचे खून आणि नंतर कुठल्यातरी त्रिशूलाने त्या भूताचा नाश करणे. तेच प्रकार त्यांनी झी हॉररमध्ये सुरू केले; पण तो रक्तामासाचा चिखल, फाटलेले रक्ताळलेले भुताचे चेहरे बघायला प्रेक्षक गर्दी करू लागले; पण त्याचाही प्रेक्षकांना कालांतराने कंटाळा अला. त्यामुळे काहीतरी छान स्टोरी आणि वेगळे अद्भूत असले पाहिजे, यासाठी शोधाशोध सुरू झाला.
त्याच सुमारास सोनी टीव्हीने आहट ही मालिका आणली. ही मालिका वेगळीच होती. भयानक होती, म्हणजे त्यात प्रत्यक्ष भूत न दाखवता कोणत्याही रूपात भूत असायचे. पाठलाग करण्यासाठी पाणीच मागे लागायचे. भूताचा पाण्यासारखा चेहरा असायचा. हे पाणीच माणसांचा पाठलाग करायचे. भरधाव गाडी एखाद्याचा पाठलाग करते, तसे जिने चढून पाणी पाठलाग करत येते, असले काही तरी गिमिक दाखवले होते. त्यात भयानकता कमी होती; पण भीतीचे वातावरण निर्माण केले जात होते. आहटने बिनचेहºयाचे भूत दाखवून बरीच लोकप्रियता मिळवली होती; पण आहटची स्पर्धाझी हॉरर शोला होऊ लागल्यानंतर ही मालिका झी टीव्हीने बंद केली. रामसे बंधूंचाही स्टॉक संपला होताच; पण तरीही भूत-प्रेत, मंत्र-तंत्र असल्या मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात, त्यामुळे टीआरपी वाढवण्यासाठी अशी एखादी मालिका असली पाहिजे हे झी ग्रुपला वाटू लागले.
झी, कलर्स, सोनी, स्टार प्रवाह अशी वाहिन्यांची स्पर्धा सुरू झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांत झी मराठीने पुन्हा आपला हा हुकमी एक्का बाहेर काढला. २०१६ मध्ये रात्रीस खेळ चाले ही मालिका आणली. या मालिकेतील पात्र, त्यांची नैसर्गिक अभिनय आणि भाषा, संवादफेक याने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीची ठरली. पहिल्या भागाचा शेवट जरा घाईघाईत झाला. अतर्क्य झाला असला, तरी दुसरा भाग सुरू करताना एकही चूक राहणार नाही याचा कसोशिने प्रयत्न केला गेला. त्यामुळे दुसरा भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. विशेषत: मालिका संपवताना पहिल्या भागाशी त्याची केलेली जुळवणूक अत्यंत कौतुकास्पद होती. यातील शेवंता आणि अण्णांनी भाव खाल्लाच; पण जी भुतं होती त्यामध्ये शोभा, पाटणकर, शेवंता, काशी, चोंगट्या यांनीही दाद मिळवली होती. त्यामुळे दुसरा टप्पा यशस्वी झाला. २९ आॅगस्ट, २०२०ला ही मालिका संपली आणि त्या जागी देवमाणूस ही खुनमालिका सुरू केली; पण त्यावर कुरघोडी करण्यासाठी आता तिसरा भाग येत आहे. तो अधिक भयानक असेल. याचा अर्थ प्राईम टाईम प्रमाणेच झी मराठीने आता लेट नाईट टाईमही प्रेक्षकांना खूश करण्यासाठी ठेवले आहे, हे दिसून येते. आता हा तिसरा टप्पा किती भयानक असेल ते जाहिरातीतील अण्णांचा चेहरा बघूनच लक्षात येते; पण ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी २२ तारखेची वाट पाहावी लागेल.
अण्णा नाईकाबरोबरच आता पुन्हा एकदा आई, पांडू, दत्ता, शेवंता पहायला मिळणार हे नक्की. पहिल्या भागात प्रत्यक्षात भूत दाखवले नव्हते. फक्त शेवंताचा वावर हा वारे, वादळ यातून दाखवले जात होते. अंगात येणे असले प्रकार दाखवले होते; पण दुसºया भागात सर्वात प्रथम भिवरीचे भूत दाखवले. तिचे भयानक पांढरी बुबुळे असलेला चेहरा दाखवला आणि मालिकेने वेग घेतला, मग अण्णांनी मारलेल्या सगळ्यांचीच भुते थयथयाट करू लागली. त्यात अगदी पोस्टमनही होता. त्यामुळे आता हा धिंगाणा पहायला पुन्हा प्रेक्षक सज्ज झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा