१२ मार्च हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस. यशवंतराव चव्हाण हे राजकारणी असले, तरी ते सुसंस्कृत आणि अभ्यासू राजकारणी होते. त्यांनी काळाच्या पुढचा विचार करून तत्कालीन परिस्थितीत महाराष्टÑाचे चित्र पाहिले होते. आज राजकारणात तमाशा चालला असताना या सुसंस्कृत राजकारण्याचा आदर्श घेण्याची हीच ती वेळ आहे. आठ वर्षांपूर्वी अजित पवारांची धरणातील पाण्यावरून भाषणात जीभ घसरली तेव्हा त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीपाशी बसून आत्मक्लेश आंदोलन केले आणि त्यांच्यात वेगळीच ऊर्जा आलेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आज अजितदादा ज्या परिपक्वतेने वागतात ती यशवंतराव चव्हाणांच्या आदर्शाची संस्कृती आहे.
असे कोणतेच क्षेत्र नव्हते की, त्या क्षेत्रातील दिग्गजांबरोबर यशवंतरावांचा वावर नव्हता. त्यामुळे त्यांच्या समृद्ध आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे अवलोकन नव्या पिढीने करणे काळाची गरज आहे. महाराष्टÑाच्या मुख्यमंत्रीपदाबरोबरच केंद्रातील संरक्षण, परराष्ट्र, गृह, अर्थ अशी महत्त्वाची खाती सांभाळत काही काळ त्यांनी उपपंतप्रधानपदही सांभाळले होते. वित्त आयोगाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते, पण वरच्या पदावर पोहोचूनही त्यांचे पाय जमिनीवर होते. यशवंतराव चव्हाण हे प्रागतिक विचारसरणीचे होते. पुस्तकांवर त्यांनी प्रचंड प्रेम केले. त्यांच्या खजिन्यातील पुस्तके ही आजही कराडच्या वाचनालयात आणि संग्रहालयात पाहायला मिळतात. युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ, ऋणानुबंध ही त्यांची साहित्यसंपदा अत्यंत अनमोल अशी आहे. मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. महाराष्टÑाच्या विकासाचे स्वप्न, यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादीशी निगडित आहेत. नव्याने निर्माण झालेल्या महाराष्टÑाचा विकास सहकाराच्या माध्यमातूनच होऊ शकतो हे लक्षात घेऊन त्यांनी सहकारी चळवळीला उत्तेजन दिले. ही चळवळ ग्रामीण भागातून उभी करण्याचे काम त्यांनी केले. हे करत असताना राज्यातील महत्त्वाच्या उद्योजकांनाही त्यांनी चांगले प्रोत्साहन दिले. खासगी क्षेत्रातूनही उद्योग चालले पाहिजेत यासाठीही त्यांनी प्रोत्साहन दिले. कारण, उद्योग वाढला तर रोजगार वाढणार आहे हे यशवंतरावांचे धोरण होते. महाराष्टÑाचा विकास हा शेतीचा विकास, रोजगार आणि उद्योगवाढीवर आहे हे ओळखून त्यांनी काम केले. आज त्या धोरणांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्या काळात सुबत्ता, तांत्रिक प्रगती नसतानाही त्यांनी करून दाखवले, मग आज का आपण अजून पुढे जात नाही, हा प्रश्न यानिमित्ताने उभा राहतो. त्यासाठी यशवंतरावांचे नियोजन सरकारने अभ्यासणे गरजेचे आहे. आज शेतकºयांच्या होणाºया आत्महत्या, त्यांना करावी लागणारी आंदोलने पाहिली तर वाटते की, या राज्यकर्त्यांनी एकदा यशवंतरावांच्या विचारांचा अभ्यास करावा.
यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. हे सगळे आपल्या सरकारच्या बळावर शक्य आहे. फक्त सरकारची इच्छाशक्ती आवश्यक आहे. यशवंतरावांनी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. सहा दशके ग्रामीण भागात काँग्रेस रुजण्याचे कारण यशवंतराव चव्हाणांचे धोरण हे आहे. कारण या विकासाच्या धोरणामुळे एक काळ असा होता की, ग्रामीण भागात काँग्रेसशिवाय कोणता पक्ष आहे तिथल्या जनतेला माहीत नव्हते. विकासाची एक बुलंद भिंत उभी करून यशवंतरावांनी विरोधकांना सीमेपार रोखले होते. पंचायतराज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात ही यशवंतराव चव्हाणांची संपूर्ण देशाला असलेली फार मोठी देणगी आहे. सत्तेच्या केंद्रीकरणाला आळा घालून विकेंद्रीकरणाची योजना या योजनेतून यशवंतरावांनी निर्माण केली. शासनाने कितीही चांगले निर्णय घेतले, तरी ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. याचे कारण या पंचायतराज या त्रिस्तरीय साखळीचा योग्य वापर कसा केला पाहिजे हे सरकारला लक्षात येत नसावे. पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ करून यशवंतराव चव्हाण यांनी आर्थिक विकासाचे नियोजन केले होते. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा या देशाला झाला पाहिजे, कृषी आणि सामान्य घटकाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे हे यशवंतरावांचे स्वप्न होते. यशवंतरावांनी आपल्या काळात एकूण १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना करण्यास प्रोत्साहन दिले. मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) आणि कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना हे फार मोठे काम यशवंतरावांच्या काळातील आहे. त्याशिवाय कृषी विकासासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग त्यांचा होता. केवळ इथेच न थांबता त्यांनी मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्वकोश मंडळाची स्थापना केली. आज मराठी भाषेला अभिजातचा दर्जा देण्यासाठी झगडावे लागते आहे, पण त्याची पार्श्वभूमी कित्येक वर्षांपूर्वी यशवंतरावांनी केली होती, कारण त्यांना साहित्याबद्दल, मराठी भाषेबद्दल प्रेम होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना. धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. प्रादेशिक समतोल आणि विकास साधून विकासाचे राजकारण करणारे, विकासासाठी बेरजेचे राजकारण करणारे यशवंतराव चव्हाण हे सुसंस्कृत नेते होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा