सध्या राज्यातील सगळे प्रश्न सुटले आहेत. फक्त सचिन वाझे हे प्रकरणच राज्यात महत्त्वाचे आहे, पण ज्या सचिन वाझेंना अटक झाली आहे, त्यांची आजवरची कारकीर्द वादग्रस्तच आहे. तरीही त्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न का केले गेले हे अनाकलनीय आहे. २००२ साली ख्वाजा युनूस प्रकरणात ते निलंबित झाले होते. जवळजवळ ५८ दिवस त्यांना तुरुंगाची हवाही खावी लागली होती व नंतर २००४ साली ते जामीनमुक्त झाले, परंतु तब्बल सतरा वर्षे निलंबनाखाली राहिल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार येताच त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले, पण आता मुकेश अंबानी घराजवळील स्फोटकांनी भरलेली कार, मनसुख हिरेन मृत्यू या प्रकरणाने वाझे पुन्हा पकडले गेले. अशा वादग्रस्त अधिकाºयाला कशासाठी जवळ केले हे अनाकलनीय आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा झाला पाहिजे. पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग होणे हे जनहिताचे नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
कंगना राणावत, अर्णब गोस्वामींचा टीआरपी घोटाळा अशा अनेक महत्त्वाच्या व राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांचा तपास त्यांच्याकडे सोपविला गेला. येथे आणखी एक बाब लक्षात घ्यावी लागेल. ती म्हणजे निलंबनाच्या काळात हे वाझे राजकारणात येण्यासाठी शिवसेनेत सामील झाले होते व पक्षाचे प्रवक्तेही बनले होते. त्यामुळे पुन्हा पोलीस दलात सामील झाल्यावरही ते शिवसेनेच्या मोहºयागत वावरत होते का व म्हणूनच शिवसेनेचे राजकीय वैर असलेल्या कंगना राणावत, अर्णब गोस्वामी यांची प्रकरणे त्यांच्याकडे सोपविली जात होती का, असा प्रश्न कोणाला पडला तर चुकीचे म्हणता येत नाही. पण नुकताच कुठे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जम बसवला असताना हे प्रकरण घडणे चुकीचे होते. वर्षभरात कोरोनाची हाताळणी प्रकरणात त्यांची कामगिरी चांगली होती. अतिशय संयमाने ते काम करत होते. राज्यातील जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी होत असतानाच हा प्रकार घडणे हे वाईट आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी वाझेंच्या अटकेची मागणी करताच स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाझे म्हणजे काही लादेन नव्हे. असे सांगत त्यांची जाहीर पाठराखण केली होती. एखाद्या सहाय्यक पोलीस अधिकारी पदावरील व्यक्तीच्या समर्थनार्थ थेट मुख्यमंत्र्याने असे वक्तव्य करणे निश्िचतच भुवया उंचावणारे होते. आता एनआयएच्या हस्तक्षेपामुळे वाझे अडचणीत आलेले आहेत आणि केवळ वाझेच नव्हे, तर त्यांची पाठराखण करणाºया महाराष्ट्र सरकारलाही आता काही गंभीर प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत, पण सगळं सुरळीत चाललेले असताना हे बनावट प्रकरण घडवण्याची दुर्बुद्धी का सुचली हे अनाकलनीय आहे. खरं तर मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणाला मिळालेली कलाटणी धक्कादायक आणि एखाद्या रहस्यपटातच शोभावी एवढी विस्मयकारक आहे. या स्कॉर्पिओच्या सोबत जी पांढरी इनोव्हा सीसीटीव्हींत आढळली होती, ती दुसºया तिसºया कोणाची नसून मुंबई पोलिसांचीच होती आणि स्फोटके ठेवणारा त्यातूनच पळाला अशा निष्कर्षाप्रत येऊन एनआयएने ती इनोव्हा तर मिळवलीच, शिवाय त्या प्रकरणाचे मुंबई पोलिसांचे तत्कालीन तपास अधिकारी सचिन वाझे यांना केवळ मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातच नव्हे, तर थेट स्फोटके पेरल्या प्रकरणात अटक केली आहे. हे नक्की कशासाठी केले गेले हे लवकरात लवकर समोर येणे गरजेचे आहे. आपल्याकडे असलेल्या यंत्रणांचा दुरुपयोग कोणत्याही सरकारने करणे चुकीचेच आहे. मग ते केंद्र सरकार असो वा राज्य सरकार असो. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग हा जनहितासाठी घातक आहे. यामुळे पोलिसांवरचा विश्वास उडण्याची भीती आहे. तसे होता कामा नये. म्हणूनच भ्रष्ट अधिकाºयांना पाठीशी घालणे थांबवले पाहिजे.
स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर सुरुवातीला ती आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न झाला, परंतु नंतर त्यांच्या तोंडात रुमाल कोंबलेले आढळल्याने तसेच खाडीत फेकल्या गेलेल्या त्या मृतदेहाच्या पोस्टमार्टेममध्ये त्याच्या पोटात पाण्याचा वा वाळूचा कणही न आढळल्याने अन्यत्र हत्या करून मग ते प्रेत पाण्यात फेकले गेले असावे, असा संशय बळावला आहे. हिरेन यांच्या पत्नीने जी तक्रार दिली आहे, त्यात तिने थेट सचिन वाझे या तपास अधिकाºयाचेच नाव घेतले होते. या संशयाला प्रथमदर्शनी तरी बळकटी देणारे पुरावेही नंतर समोर आले. या मनसुख हिरेनचा वाझे यांच्याशी पूर्वपरिचय होता व ज्या स्कॉर्पिओत स्फोटके पेरली गेली होती, ती हे वाझे चार महिने वापरत होते, अशी धक्कादायक माहिती नंतर समोर आली. त्यामुळे एकीकडे वाझे यांची पाठराखण करणारे महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष तीव्र झाला होता. त्यामुळे एनआयएने हे प्रकरण परस्पर हाती घेतल्याने केंद्रातील भाजप सरकार आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संघर्षात आता तीव्र झाला आहे. त्यामुळे सध्याच्या तपासकामाचे गंभीर राजकीय परिणामही येणाºया काळात अटळ असतील, पण तरीही हे सारे कशासाठी केले याचा उलगडा होणे आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा