मराठी रंगभूमीला संगीत नाटकांची जशी परंपरा आहे, कौटुंबिक नाटकांची जशी परंपरा आहे तशीच फार्सिकल नाटकांचीही परंपरा आहे. फार्सिकल नाटके ही एव्हरग्रीन राहतात. वेगवेगळ्या संचात पुन्हा पुन: उभी राहतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. फार्स पाहणारा एक प्रेक्षक आहे. जसा संगीत नाटकांचा प्रेक्षक वेगळा आहे तसा फार्सचा प्रेक्षकही आहे. अर्थात संगीत नाटकाचा प्रेक्षक फार्सिकल नाटके पहायला येईल, पण फार्सिकल नाटकांचा प्रेक्षक हा संगीत नाटकांकडे वळेल असे नाही.
ज्या प्रेक्षकांना डोक्याला ताप नको आहे, मस्तपैकी करमणूक हवी आहे. नाटकांकडे करमणूक म्हणूनच बघायचे आहे ते प्रेक्षक समस्याप्रधान, सत्यघटनेवर आधारित, संगीत नाटकांकडे न वळता तीन तास मनसोक्त हसायला म्हणून फार्सिकल नाटके बघतात. फार्स आणि विनोदी नाटके यात फरक आहे. फार्सला आपल्याकडे प्रहसन म्हणतात, पण फार्समधल्या अतिशयोक्तीकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही, तर टायमिंगचे विनोद म्हणूनच बघतो. फटाक्यांची लांबलचक माळ लागते तशी फार्समध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला घडणाºया घटनांमधून हास्याचे फटाके फुटत असतात. आजकाल मनापासून हसावे असे विनोदच पहायला मिळत नाहीत. त्या ‘चला हवा येऊ द्या’मध्ये आल्यावर कलाकारांना खोटे खोटे हसावे लागते हे पाहून किव करावीशी वाटते. लोकांना रडवणे सोपे आहे, पण हसवणे अवघड असते, पण १९७० च्या दशकात आपल्याकडे अनेक फार्स आले आणि त्यांनी प्रेक्षकांना मनापासून हसवले.
आपल्याकडे प्रहसनाचा किंवा फार्सचा बादशहा म्हणता येईल असे लेखक, अभिनेते म्हणजे बबन प्रभू. बबन प्रभूंनी मराठी रंगभूमीवर फार्स ही कल्पना रुजवली. त्यांचे ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, ‘पळा पळा कोण पुढे पळेतो’, ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे फार्स तर अप्रतिम असेच होते. फार्सिकल नाटकांमधून खºया अर्थाने धमाल उडवून दिली ती आत्माराम भेंडे, बबन प्रभू, किशोर प्रधान या कलाकारांनी. विनोद किती ताणायचा आणि तो जेवढा ताणला जाईल तेवढे प्रेक्षक जास्त हसतात हे या तिघांनी अत्यंत टायमिंगने सिद्ध करून दाखवले आहे. ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’मध्ये ‘डॉक्टर नाय’ची भूमिका आत्माराम भेंडेंनी केली होती. त्यात त्यांचे आडनाव ‘नाय’ आहे. पेशाने तो डॉक्टर आहे. आपली ओळख करून देताना ‘मी डॉक्टर नाय’ असे ते सुरुवात करतात. त्यावर ‘मी कुठं म्हटलं तुम्ही डॉक्टर हाय ते’. त्यावरून ‘तसं नाही, मी डॉक्टर हाय, पण डॉक्टर नाय’. हा विनोद इतका ताणला जातो की, प्रेक्षक प्रचंड गडाबडा लोळेपर्यंत हसतात. बबन प्रभूंनी ताकदीने लिहिलेले नाटक आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू त्याला न्याय देत अभिनय करायचे.
हा ‘डॉक्टर नाय’ अनेक उद्योग करत असतो. तो दिनूकडे येतो आणि म्हणतो, ‘मी एक असे खुराडे तयार केले आहे की त्यात कोंबडी अनेक अंडी घालते. कोंबडीला त्यात ठेवल्यावर तिनं अंडं घातलं की ती मागे वळून पाहते, तोपर्यंत अंडं अलगद खाली पडतं. कोंबडीला वाटते आपण अंडे घातलेच नाही. म्हणून ती पुन्हा अंडं घालते. पुन्हा मागे वळून पाहते, तर अंडे खाली पडलेले असते. मग पुन्हा अंडे घालते’. असे भयानक विनोद या नाटकात पहायला मिळतात, पण ते सादर करताना जे अंगविक्षेप असतात ना ते अगदी वॉल्ट डिस्नेच्या कार्टूनलाही जमणार नाहीत इतके जबरदस्त असायचे. बबन प्रभूंच्या ‘घोळात घोळ’ या फार्समध्ये एकाच नावाची दोन पात्रं आहेत. शोशानपºया शृंगारपुरे नावाची दोन पात्रं आहेत. एक पुरुष आहे, तर दुसरी महिला आहे. या खुर्चीवर ठेवलेले कपडेच फक्त धुवायला न्यायचे. अन्य कुठलेही कपडे धुवायचे नाहीत, अशा सूचना गड्याला दिलेल्या असतात. त्यामुळे त्याचे काम त्या खुर्चीवर कपडा दिसला की तो धुवायला टाकायचा. यावरून निर्माण झालेली एक घोळाची मालिका म्हणजे खºया अर्थाने पोटात दुखेपर्यंत हसायचा कार्यक्रम असायचा. प्रेक्षकांच्या हसून हसून डोळ्यात पाणी यायचे, गडाबडा लोळायचे, कधी कधी प्रेक्षकांच्या जोरात हसण्यामुळे अनेक विनोद सुटूनही जातात किंवा शेजारी प्रेक्षकाने जोरात हसण्यामुळे आपल्याला डायलॉगही ऐकायला येत नाहीत असा प्रकार होत असे. ही धमाल ताकद फार्सिकल नाटकात होती.
राजा गोसावी, अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी फार्सिकल नाटकांची चांगली परंपरा जोपासली होती. १९८० च्या दशकात तर विनोदी नाटकांची म्हणजे फार्सिकल विनोदी नाटकांची लाटच आलेली होती. त्यामुळे कौटुंबिक, सामाजिक ताईमाईच्या नाटकांकडे प्रेक्षकांचे दुर्लक्षच झाले होते, पण मराठी रंगभूमीवर फार्सिकल नाटकांनी प्रचंड नावलौकीक मिळवला आहे. यामध्ये बबन प्रभू यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
खरं तर फार्सिकल नाटके हा आपल्याकडे पचनी पडणारा प्रकार नव्हता, पण चार्ली चॅप्लीनचे चित्रपट किंवा लॉरेल हार्डीचे चित्रपट प्रेक्षक बघत होता. त्यातील निरागस विनोदांना, अंगविक्षेपांना, फटफजितीला प्रेक्षक दाद देत आहेत म्हटल्यावर रंगभूमीवरही देतील हा विश्वास निर्माण झाला. त्या ताकदीने बबन प्रभूंनी मराठी फार्स लिहिले. ते यशस्वी केले. ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, ‘पळा पळा कोण पुढे पळेतो’ हे फार्स तर अनेक स्पर्धांमधून गाजले. त्याला जेवढे व्यावसायिक यश मिळाले तेवढेच हौशी रंगभूमीवरही मागणी होती, ही त्या नाटकांची ताकदच म्हणावी लागेल. नंतरच्या काळातही केदार शिंदे, संतोष पवार या कलाकारांनी फार्सचा चांगला वापर करून घेतला. ‘बॉम्ब ए मेरी जान’ यासारख्या नाटकातून त्याची झलक दिसली होतीच, पण भरत जाधवसारखा एक चांगला कलाकार अशा फार्समधून पुढच्या पिढीत तयार झाला, पण फार्स हा एव्हरग्रीन असा नाट्यप्रकार मराठी रंगभूमीवर आहे, हे नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा