शनिवार, ६ मार्च, २०२१

उथळपणाचा अतिरेक

जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना समोर आल्याने राज्यभरात बुधवारी खळबळ माजली. भाजपचे नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी यावरून लगेच राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे अशीही मागणी केली. त्यानंतर हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनातही चांगलाच गाजला. यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी केली होती. परंतु गुरुवारीच पोलिसांवरील आरोपात तथ्य नसल्याची माहिती देशमुख यांनी दिली. गृहमंत्र्यांनी याप्रकरणी क्लीनचिट दिली आहे. तसेच ज्या महिलेने तक्रार केली आहे, ती वेडसर असल्याची तक्रार याआधी समोर आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. एकूणच या विषयावरून झालेली चर्चा, प्रश्न उपस्थित करण्याची केलेली घाई आणि समोर आलेले वास्तव पाहता हा उथळपणाचा अतिरेक असल्याचे दिसले.


कसलं राजकारण चाललं आहे या राज्यात? कुणीतरी कसली तरी खोटी बातमी पसरवतो, त्यावरून लगेच हंगामा होतो. या असल्या प्रकारांशिवाय राज्याचे काही प्रश्न आहेत हे या सदस्यांना माहिती नाही का? व्हॉट्सअ‍ॅपवरून आलेल्या माहितीवरून एक नामांकित दैनिक त्याची बातमी बनवते आणि त्यावरून दंगा होतो. हे सगळे बेजबाबदारपणाचे खेळ आहेत. ज्या दैनिकाने अशी खोटी चुकीची बातमी अपुºया माहितीच्या आधारावर दिली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सभागृहात दिवसभर गोंधळ त्यामुळे झाला आणि कामकाजाचे तास वाया गेले. ही बातमी खरी की खोटी याची शहानिशा न करता विरोधकही लगेच त्यावरून थयथयाट करतात. त्यानंतर २४ तासांच्या आत गृहमंत्री चौकशीचा अहवालही सादर करतात. हे सगळंच अनाकलनीय असे आहे. बुधवारी दुपारी चौकशी समिती नेमल्यावर ही समिती काही तासांत गृहमंत्र्यांकडे अहवाल देते. ही तत्परता अन्यत्र कुठे कशी काय दिसत नाही? अन्य चौकशा या फक्त समिती करत राहते. हा प्रकार वेडसर बाईने केलेला होता हे इतक्या पटकन कसे काय जाहीर करता आले? ही तत्परता पूजा चव्हाण प्रकरणात दाखवली गेलेली नाही. या कथित घटनेमुळे तीन-तीन दिवस अधिवेशनाचे वाया जातात ही चांगली गोष्ट नाही. बाकीच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे आणि नको ते प्रश्न उपस्थित करायचे. काय टाइमपास करायला हे नेते जातात का सभागृहात? कोणाला काही भानच राहिलेले नाही असे स्पष्ट दिसते आहे.

या कथित प्रकाराचा खुलासा करताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, त्या वसतिगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते. महिला अधिकाºयांनी तिथे भेट देऊन सर्व कामकाज पाहिले, महिलांशी चर्चा केली. महिलांचे वसतिगृह असल्याने आतमध्ये एकही पोलीस कर्मचारी जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये आतमध्ये आल्याची नोंदही नाही. त्यामुळे नग्न व्हायला लावले आणि पोलिसांनी व्हिडीओ काढला. यामध्ये काहीही तथ्य नाही. तशा पद्धतीचा अहवाल महिला अधिकाºयाने दिला आहे. तसेच, ज्या महिलेने तक्रार केली तिच्या पतीनेही याआधी त्या महिलेविरोधात तक्रार केली होती, असेही देशमुख यांनी सांगितले. त्या महिलेला गरबा खेळताना झग्याचा त्रास होऊ लागल्याने तिनेच तो झगा काढला, असे गृहमंत्र्यांनी वाचून दाखवले. तरुणींना कपडे काढून डान्स करायला लावले गेले. त्याचा व्हिडीओ बनवला गेला. या गंभीर प्रकाराबद्दल दोषींवर कारवाई झाली पाहिजे. गृहमंत्र्यांना विनंती आहे की, या पोलिसांचे निलंबन करावे, अशी मागणी भाजप आमदार श्वेता महाले यांनी अधिवेशनात केली होती, पण एकूणच अपुºया माहितीच्या आधारे खळबळ माजवून द्यायची, प्रत्यक्ष काय घडले आहे याची शहानिशा न करता साप सोडून देण्याचा प्रकार करायचा. असला उथळपणा सभागृहात होताना दिसतो आहे. लोकशीहीची मंदिरे म्हणून आपण सभागृहाचा उल्लेख करतो, पण ही मंदिरे आहेत की तमाशाचा फड अशी अवस्था कधी कधी पहायला मिळते. रोजचा आपला कलगीतुरा करायचा. सवाल-जबाब करायचा. हे प्रकार थांबले पाहिजेत. सभागृहात चांगली भाषणे झाली पाहिजेत. विधायक चर्चा झाल्या पाहिजेत, पण गदारोळापलीकडे काहीच न करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते आहे हे फार वाईट आहे.


सध्या कोरोनाच्या परिस्थितीने अधिवेशन जेमतेम १० दिवस होत आहे. त्यात दोन दिवस सुट्टी. एक दिवस अर्थसंकल्पाचा. एक दिवस राज्यपालांच्या अभिभाषणाचा. दोन दिवस त्यावर चर्चा. उरलेल्या तीन दिवसांत नको ते विषय उपस्थित करून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा सभागृहाचा वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे आणि गॉसिपिंगचे विषय घ्यायचे. कोरोना काळात झालेले शैक्षणिक नुकसान आज कोणीच त्यावर बोलत नाही. शिक्षणाची पुरती वाट लागली आहे. गेल्या मार्चपासून मुले घरात बसून आहेत. त्यांचे काय नेमके करायचे आहे? हे एक वाया गेलेले वर्ष कसे भरून काढायचे यावर चर्चा नाही. शेतकºयांच्या प्रश्नांवर चर्चा नाही. वीजबिलाच्या तोडणीवरून दोन दिवस हंगामा झाला. फक्त दंगा करायला आपण सभागृहात येणार का? महागाई कमी करण्यासाठी, सामान्यांना दिलासा देण्यासाठी कशा सवलती देता येतील, यावर चर्चा नाही. दिशा कायदा नक्की कुठे आहे, त्याचे पुढे काय झाले, यावर कसलीही चर्चा नाही. फक्त गोंधळ आणि गोंधळ घालणे एवढेच सभागृहात होताना दिसत आहे, हे चुकीचे आहे. हा उथळपणा थांबला पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: