चित्रपट पाहणे हा एक आनंद असतो. आता घराघरात शेकडो वाहिन्या आल्यापासून त्याचा आनंद लोकांना मिळत नाही हा भाग वेगळा, पण चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे, रांगेत उभे राहून तिकीट काढणे, आपल्या आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहणे, त्यातील डायलॉग तोंडपाठ होणे, हा एक तीस-चाळीस वर्षांपूर्वीचा प्रेक्षकांचा आवडीचा छंद असायचा. म्हणजे एखादा गाजलेला चित्रपट असेल, तर तो कितीवेळा पाहिला हे सांगताना अभिमान वाटायचा. ‘शोले’ २५ वेळा पाहिला, ‘पिंजरा’ १५ वेळा पाहिला, ‘रोटी कपडा और मकान’ १० वेळा पाहिला, ‘कर्ज’ ५ वेळा पाहिला, इथपासून ते ‘हम आपके है कौन’, ‘कहो ना प्यार है’ हे चित्रपट रिपिट आॅडियन्सचे किंग ठरले होते.
मग पुन्हा पुन: चित्रपट पाहिल्यावर त्यातील काही डोळेझाक करता येतील अशा चुका दिसू लागतात आणि त्यावर विनोदाचे मिम्स सुरू होतात. अर्थात मिम्स हे आजकाल बोलले जाते, पण पूर्वी त्याला पारावरच्या गप्पा म्हणायला हरकत नाही. कारण फक्त फिरकीच घेतली जाते, ती फार गंभीरपणे कोणी घेत नाही, पण या लक्षात न येणाºया मोठ्या दिग्दर्शकाच्या चुका या अभ्यासपूर्णच असतात. कारण त्या चित्रपटाची पारायणे केल्यामुळे त्या अभ्यासाने लक्षात आलेल्या असतात.
‘शोले’ हा माइलस्टोन म्हणतात, पण यातील पाण्याच्या टाकीवरचा धर्मेंद्रचा सीन आजही लोकप्रिय आहे. कोणी असा उंचावर गेला की शोलेस्टाइल आंदोलन म्हटले जाते, पण यातूनच प्रश्न पडला होता तो हा, की इतकी उंच पाण्याची टाकी असलेले हे रामगड गाव होते याचा अर्थ त्या टाकीत पाणी चढवण्यासाठी गावात वीज असणार. मग असे असताना गावातील सर्वात श्रीमंत मुखिया असलेला ठाकूर बलदेवसिंगच्या हवेलीत रॉकेलच्या बत्त्या कशा काय होत्या? चित्रपटात किमान तीनवेळा बत्ती लावताना किंवा बंद करताना जया भादुरी दाखवली होती. मग ठाकूरच्या घरात वीज नव्हती का? पण याकडे कथानकाच्या ताकदीने दुर्लक्ष करायचे असते.
‘कौन बनेगा करोडपती’च्या सेलिब्रिटी कार्यक्रमात धर्मेंद्र आला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन आणि दोघांची शोलेवरून चर्चा झाली. त्यावेळी धर्मेंद्रने सांगितलेली गंमत आणखी विनोदी आहे. यात बसंती टांगेवाली आपल्या घोडीला ‘चल धन्नो’ म्हणत असती. चल धन्नो हा तिचा डायलॉग गाजलेला होता. त्यावर विनोदही खूप व्हायचे. ‘चल धन्नो, तेरी बसंती का इज्जत का सवाल है’ म्हणत ती टांगा पळवत असते. त्यावर धन्नो म्हणते की, पळालंच पाहिजे कारण तुझ्या मागे डाकू, तर माझ्या मागे घोडे लागले आहेत, असे विनोदही होत होते. पण धर्मेंद्रने खुलासा केला होता की, धन्नो घोडी नव्हतीच, तर तो घोडा होता, पण इतक्या खोल जाऊन कोण विचार करतो? घोडी म्हणून टांग्याला घोडा लावला होता ही प्रेक्षकांना न दिसणारीच चूक होती, पण या चुकांचीही एक गंमत असते.
‘शक्ती’ या जी. पी. सिप्पी, रमेश सिप्पीच्या चित्रपटात दिलीपकुमार आणि राखी यांच्यातील प्रेमाचे खेळीमेळीचे संबंध दाखवायचा सीन आहे. यात राखी पोळ्या लाटत असते आणि ती तव्यावर भाजण्यासाठी टाकते, पण ती तव्यावरूनच दिलीपकुमार घेतो. हाताला भाजेल, मी देते असे काही संवाद आहेत तिथे, पण खालची चूल पेटलेली नाही हे प्रेक्षकांच्या सहज लक्षात येते. तव्यावर तयार पोळीच टाकलेली आहे ती उलटवली जात आहे ही चित्रीकरणाची सोय होती, पण त्यात खालचा स्टोव्ह बंद आहे हे दिग्दर्शकाच्या नजरेतून सुटते, पण प्रेक्षकांच्या सुटत नाही, पण या चुका गौण असतात, त्याकडे डोळेझाक करायची असते. एक गंमत म्हणून पहायचे असते.
राज कपूरनंतर ग्रेट शोमन अशी ख्याती मिळवली तो सुभाष घई. कथा, संवाद, गाणी सगळं काही धडाकेबाज असणारा चित्रपट निर्माण करणारा निर्माता दिग्दर्शक. १९८६ ला त्याचा ‘कर्मा’ हा चित्रपट आला होता. ऐन उमेदीच्या काळात म्हणजे राज, दिलीप आणि देव हे त्रिकुट ज्या सुवर्णयुगात काम करत होते तेव्हा नर्गीस, नूतन अशा अभिनेत्रीही व्यस्त असायच्या. नूतनचे विविध नायकांबरोबर चित्रपट येत होते, पण दिलीपकुमार आणि नूतन कधी एकत्र आले नव्हते, पण ‘कर्मा’ या चित्रपटात सुभाष घईने त्या दोघांनाही एकत्र आणले. डॉक्टर डँग दिलीपकुमारच्या मुलांची हत्या करतो तेव्हा धक्का बसून नूतनची वाचा जाते. मग सगळे कथानक झाल्यावर अखेरच्या टप्प्यात नूतन, जुगल हंसराज यांना डॉक्टर डँग पळवून नेतो आणि बांधून ठेवतो. नूतन जुगल हंसराज शेजारी शेजारी बांधून ठेवलेले असतात. यावेळी शोधायला आलेले दिलीपकुमार, अनिल कपूर, जॅकी, नसीर ही सगळी गँग हाक मारत असते, पण आम्ही इथे आहोत हे मुकी असल्यामुळे नूतनला सांगता येत नसते. शेवटी प्रयत्न करून तिला वाचा येते आणि दोघांची भेट होते, पण अशा परिस्थितीत जुगल हंसराज तिथे हाकेला प्रतिसाद देऊ शकला असता, पण ही चूक डोळेझाक करायची असते. या चुकांची गंमत घ्यायची असते. अर्थात त्यासाठी चित्रपट पुन्हा पुन: पहायला लागतो. मगच त्यातील चुका जाणवायला लागतात. वरवर पाहून ते लक्षात येत नाही. असे असंख्य चित्रपट सांगता येतील, पण वानगीदाखल तीन-चार चित्रपटांचा उल्लेख केलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा