रविवार, १४ मार्च, २०२१

अजून थोडे दिवस...


डॉक्टर रहेजांच्या लॅबमध्ये काही डॉक्टर सहकारी बसले होते. त्यांच्या सगळ्यांच्या चेहºयावर अतिशय आनंद दिसत होता. डॉक्टर रहेजा बोलू लागले, ‘मला अतिशय आनंद होतो आहे तुम्हा सर्वांना सांगायला. आपल्या कंपनीने गेल्या सहा महिन्यांत आपल्या उत्पादनात आणि उत्पन्नात दहापटीने वाढ केलेली आहे. पुढील दहा वर्षांचा नफा आपण अवघ्या सहा महिन्यांत कमावला आहे. अर्थात याचे सगळे बेनिफीट आपण शेअरहोल्डर्सना पण देणार आहोत. ’

सगळे जण खूश होऊन ऐकत होते. त्यातील दुसरे डॉक्टर रस्तोगी म्हणाले, ‘सर पण हे कसं काय शक्य झालं आहे आपल्या कंपनीला?’ त्यावर जोरदार हसत रहेजा म्हणाले, गेली पस्तीस वर्ष आपण आपली फार्मास्युटिकल कंपनी चालवत आहोत. आपले मार्जीन ५० टक्क्यांपेक्षा जास्त कधी गेले नव्हते; पण या कोव्हिड-१९च्या काळात आपण आपला उत्पादनखर्च कमी करत उत्पादनाचे मार्केट व्हॅल्यू मात्र दहापटीने वाढवले. अर्थात यामध्ये आपल्या मार्केटिंग टीमचा वाटा मोठा आहे. त्यांनाही त्याचे बेनिफीट आपण देणार आहोतच; पण पुढची पंचवीस वर्ष तुम्हा कोणाला चिंता करायला लागणार नाही इतके आपण आज कमावले आहे. या पंचवीस वर्षात नवीन संशोधन आणि आयडिया डेव्हलप करायला आपल्याला ही संधी निर्माण झालेली आहे.’


उपस्थित सगळे जण खूश होते. त्यात डॉक्टर भेदा हे थोडे साशंक होते; पण तरीही त्यांनी विचारले, ‘इफ यू डोंट माइंड सर, पण हा चमत्कार कसा काय घडला हे आपण विस्ताराने सांगू शकाल का? मला क्युरेसिटी आहे याची. तीच औषधे आपण फक्त लेबल आणि पॅकींग बदलून दहापट जादा दराने कशी काय विकू शकलो याची मला उत्सुकता आहे.’

डॉक्टर रहेजा जोरदार हसले आणि म्हणाले, ‘येस ... व्हाय नॉट? अ‍ॅज अ डायरेक्टर यू हॅव टु नो धीस फॅक्ट. मी जरूर सांगेन आणि रहेजा सांगू लागले.


गेल्या वर्षी जानेवारीपासूनच थोडी शंका वाटू लागली होती. चीन हा आपला शेजारी देश आहे. तिथे पसरलेला हा विषाणू इकडे सरकू शकतो, मग त्याचे सिन्ड्रोम नेमके काय आहेत. लक्षण काय आहेत? तर नॉर्मल सर्दी पडसे हेच आहेत. शेकडो वर्ष आयुर्वेद, अ‍ॅलोपॅथी आणि सगळ्या पॅथी सर्दीवर संशोधन करत आहेत; पण सर्दीवर औषध सापडलेले नाही. याचे कारण सर्दी हा रोग नाही. ती एक अवस्था. ज्याप्रमाणे आपण युरेन डिसचार्ज करतो, घाम येतो, तशाचप्रकारे सर्दी आहे. तुम्ही सर्दी बंद करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होईल, असे वैद्यकशास्त्र सांगते. तिचा कालावधी तीन दिवसांचा असतो. त्यासाठी कसलीही औषधे घेण्याची गरज नसते. म्हणजे स्त्रियांचे पिरीअड येणे हे जितके नैसर्गिक आहे ना तितकेच सहज सर्दीचे आहे. त्याकडे रोग म्हणून पाहायचे नाही; पण तरीही आपल्याकडे हजारो कंपन्यांची सर्दी-पडसे यावर औषधे गोळ्या तयार होत असतात. त्या केवळ काही वेळापुरता रिलीफ देत असतात; पण ती औषधे नसतात तर तो फक्त रिलीफ असतो. रहेजा सांगत होते त्याकडे सगळे जण लक्ष देऊन ऐकत होते. वैद्यक फार्मास्युटीकल क्षेत्रात त्यांच्या शब्दाला मान होता. त्यामुळे बहुराष्ट्रीय औषध कंपन्या याही रहेजांचे मत घेत होत्या. रहेजा पुढे बोलू लागले, माय फ्रेंडस, गेल्या काही वर्षांत सर्दीचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी सर्दी ही फक्त थंडीत व्हायची; पण आजकाल ती केव्हाही होते. ही अ‍ॅलर्जीक सर्दी आहे. रस्त्यावरून उडणारा धुरळा, हवेतील धुलीकण नाकात गेल्यावर सर्दी होते. ठिकठिकाणचे रस्त्यावरचे चायनीजचे स्टॉल इतक्या भयंकर तडका देतात की, त्याने उधसते आणि माणसांना सर्दी होते. सर्दी भावनेने होते. कल्पनेने होते. हाच तो व्हायरस आहे. आपला देश भावनिक आहे. लोकसंख्या मोठी आहे. इथे तंबाखू सेवन करणारे लोक खूप आहेत. अस्वच्छ लोक आहेत. जागोजागी थुंकणारे लोक आहेत. जंतुसंसर्ग पसरवणारी यंत्रणा आपल्याकडे फार मोठी आहे. त्यामुळेच आपण सर्वात प्रथम सॅनिटायझरच्या प्रॉडक्शनकडे लक्ष देण्यास सर्वांना सल्ला दिला. त्या सॅनीटायझर्सचा इतका अतिरेक झाला की, त्याच्या वासानेही अनेकांना सर्दी होऊ लागली. सर्दीचे लक्षण दिसले की लोक कोरोना चाचणी करू लागले. संशयीत गुन्हेगार पकडावेत तसे लोकांना धरून नेले जावू लागले. त्यांच्या संपर्कातले लोक उपचारासाठी, प्रिकॉशनसाठी औषधांची मागणी करू लागले. वेपोरायझर्स, बाम यांच्या मागण्या वाढल्या. जुना स्टॉक संपला. डॉक्टरांनी पेशंट स्वीकारण्यास नकार दिला. सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे लोक मेडिकल स्टोअर्समध्ये जाऊन वाटेल त्या किमतीला औषधे घेत राहिले. यामध्ये देशभरातील शेकडो औषध कंपन्यांचा तुफान फायदा झाला. जी टॅबलेट आपण फक्त ३० पैशांना देत होतो. १० टॅबलेटचे पॅकेट ३ रुपयाला होते ते ३० ते ३५ रुपयांना आपण विकू लागलो. कॅप्सूल, सिरप साठ रुपयांना २०० मिलीची बॉटल होती ती अडीचशे रुपयांना विकली जावू लागली. मार्केटींग टीमने मेडिकल दुकानात जाऊन, डॉक्टरांना डिस्पेन्सरीमध्ये भेटून या सर्व औषधांच्या शिफारसीसाठी जादा पॉइंटस, स्कीम, आॅफर दिल्या. त्याचा परिणाम आपण नफ्यात आलो आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्याला यापूर्वीच सांगितले आहे. यावर औषध असणार नाही. कोरोनाबरोबरच जगायचे आहे. त्यामुळे बस अजून थोडे दिवस जर लोक या दहशतीखाली राहिले, तर आपण आणखी पंचवीस वर्षांची कमाई करू शकतो.’

डॉक्टर रहेजांच्या टीमने सगळ्या सहकाºयांना फार मोठे यशाचे रहस्य सांगितले होते; पण त्यामध्ये असलेले भेदक सत्य तितकेच भयानक होते. औषध कंपन्यांनी, मेडिकल सेक्टरने या कोरोनाचा कसा गैरफायदा उठवला होता, याचे कटू सत्यही त्यातून स्पष्ट झाले होते.


-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: