गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोजचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा ३० हजारांच्या पुढेच आहे. देशाच्या एकूण रुग्णांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडत आहेत. देशातील कोरोनावाढीच्या १० प्रमुख जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्हे आहेत. त्यामुळे ही बाब अर्थातच चिंताजनक आहे. त्यामुळे ही संख्या कमी करण्यासाठी राज्याच्या पातळीवर नवीन निर्बंधांवर चर्चा सुरू आहे. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेकदा म्हणालेत. असं असलं तरी राज्यात पुन्हा लॉकडाऊन खरंच शक्य आहे का? तो घेतला तर सामान्यांचे हाल कुत्रा खाणार नाही, अशी परिस्थिती असेल. त्यामुळे सामान्यांच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे भविष्यात, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
राज्याच्या आरोग्य सर्वेक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये २४ मार्च रोजी ३१,८५५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता २ लाख ४७ हजार २९९ एवढी झाली आहे. महिनाअखेर हा आकडा साडेतीन लाखांच्या पुढे जाईल, असे बोलले जाते आहे. एकट्या मुंबईत दररोज पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घरातही कोरोना शिरलेला आहे. त्यामुळे असा काही कटू निर्णय मुख्यमंत्री घेणार असतील तर ती चिंतेची बाब असेल. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता २५ लाख ६४ हजार ८८१ एवढी झाली आहे. राज्यात बुधवारी (२४ मार्च) १५,०९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर कोरोनामुळे ९५ मृत्यूंची नोंद झाली. मुंबईमध्ये सोमवारी ५१९० नवीन रुग्णांची नोंद झाली. ही आकडेवारी काय सांगते आहे? कोरोनाची दुसरी लाट आल्याचे बोलले जात आहे त्याचप्रमाणे दोन नवे प्रकारचे स्ट्रेन आल्याचे सांगितले जात आहे. त्याचे नक्की चित्र कसे असणार आहे? परिणाम काय होणार आहे याची चिंता आज महाराष्ट्राला आहे. नंदुरबार दौºयावर असताना १९ मार्चला राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत भाष्य केलं होतं. मुख्यमंत्री म्हणाले की, कोविडचा धोका वाढला आहे. पुन्हा लॉकडाऊन करणं हा एक मार्ग आहे, पण मला जनतेच्या सहकार्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी आपल्या हातात काही नव्हतं. आता लस आली आहे. लसीकरण वाढवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे, पण जनतेने तितकीच साथ देण्याची गरज आहे. आज प्रत्येकाच्या मनात लॉकडाऊनची भीती आहे. शाळा परीक्षांची शाश्वती नाहीये. शिक्षणातील एक वर्ष प्रत्येकाचे पूर्णपणे बाद झालेले आहे. बेरोजगारीचे संकट वाढले आहे. लॉकडाऊनच्या भीतीने गुरुवारी शेअर बाजारातही पडझड झाली. अशा परिस्थितीत नेमके काय पुढे वाढून ठेवले आहे याची चिंता प्रत्येकाला ग्रासते आहे. यासाठी आपण जागृत राहणे हाच एकमेव पर्याय आहे. गर्दी अशीच कायम राहिली तर लॉकडाऊन लावला जाऊ शकतो, असे संकेत सातत्याने मिळत आहेत. बीड, मराठवाडा येथे अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागलेला आहे. त्यामुळे आता हे सहन करण्याची ताकद सामान्य माणसांमध्ये राहिलेली नाही. यासाठी सावधगिरी हाच पर्याय आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढवले जात आहे ही त्यात समाधानाची बाब आहे, पण पुढचे चार-पाच दिवस हे नवी दिशा देणारे असतील हे नक्की.
‘मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेतदेखील वाढती रुग्णसंख्या पाहता आणखी कठोर पद्धतीने पुढे जावं लागेल’, असं मुख्यमंत्र्यांचं मत असल्याचं राजेश टोपे यांनी २२ मार्च रोजी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन राज्यात लावावा, असा अनेकांचा विचार असला तरी तो जाहीर कोणी करायचा यावर अवलंबून आहे. प्रत्येक जिल्हापातळीवर स्थानिक जिल्हाधिकारी हा निर्णय आजमितीला घेत आहेत, पण राज्याचा निर्णय नक्की कोणी जाहीर करायचा यात सगळं थांबलं आहे, पण रुग्णवाढीचा आकडा असाच वाढत गेला, तर लॉकडाऊन अटळ आहे. म्हणूनच आपल्या भविष्यात आता काय वाढून ठेवलं आहे याची चिंता आज महाराष्ट्राला लागलेली आहे.
या सगळ्याचं खापर सामान्य माणसांच्या माथ्यावर फोडलं जाणार आहे. याचे कारण सध्या रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. नागरिक खबरदारी घेत नाहीयेत. विविध ठिकाणी गर्दी केली जात आहे. त्यात प्रशासनाकडूनदेखील फारशी कारवाई होत नाहीये. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी ३ ते ४ आठवड्यांचा लॉकडाऊन आवश्यक असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी म्हटले आहे. तसे झाले तर सामान्यांना पुन्हा उभे राहणे अवघड जाणार आहे.
लसीकरण हा एक उपाय आहे. त्याचे प्रमाणही वाढवले जात आहे. लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु सध्या सरसकट सर्वांना लस दिली जात नाहीये. आता एक एप्रिलपासून ४५ वर्षांच्या पुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, पण लस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी किमान २ महिन्यांचा कालावधी लागतो. सध्याची कोरोनाची लाट आणखी पुढे वाढत जाईल असं दिसतंय. त्यामुळे नाइलाजास्तव कमीत कमी ३ ते ४ आठवड्यांचा लॉकडाऊन करावा लागेल, परंतु हा लॉकडाऊन करताना नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजन करून करायला लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकारची कितपत तयारी आहे हे पहावे लागेल.