शुक्रवार, १६ जुलै, २०२१

बुब्ज आणि ब्रामागचे कवित्व

 


गेल्या दोन दिवसांपासून हेमांगी कवींची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. ती म्हणजे, बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही, पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉईस असू शकतो! जबरदस्तीने स्तन झाकून ठेवणे म्हणजे जीव गुदमरतो. त्यामुळे किमान घरात तरी मोकळा श्वास घेण्यासाठी ब्रा वापरू नका असे सुचवले आहे. त्यावरून हेमांगी कवी सोशल मीडियावर ट्रोल होत आहे, म्हणूनच या बुब्ज आणि ब्रामागचे नेमके कवित्व काय आहे, हे समजून घेतले पाहिजे.


खरं तर हा विषय अत्यंत नाजूक आहे, पण कपडे कुठले घातले आणि कुठले नाही घातले यावरून कामुकता किंवा पुरुषी नजरांची वाईट नजर पडणार नाही असे समजणेही चुकीचे आहे. मनात पाप असल्यावर भरझरी अंगभर पायघोळ कपडे घातलेली स्त्री समोर आली तरी एखादा पुरुष मनाने कल्पना करून अंतर्बाह्य दर्शन करत असतो, तर नग्न स्त्री समोर आली, तरी तिच्याकडे एखादा मातृत्वाच्या नात्यानेही पाहील. त्यामुळे कपड्यातून स्तनाचा फुगवटा दिसू नये म्हणून ते झाकण्याचा प्रयत्न करणे आणि स्तनांना मोकळे सोडणे या चर्चेत तसे काही तत्थ्य नाही.

हेमांगी कवी म्हणतात, ब्रा, ब्रेसीयर(अंतर्वस्त्र)चा चार लोकांसमोर किंवा वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती स्ट्रगल करायचाय हे लक्षात येतं! खरं तर हेमांगी कवींची ही मते न पटणारीच आहेत. ती त्यांनी मोकळेपणाने मांडली हे स्वागतार्ह आहे, पण एखाद्या तरुणीने स्तन झाकून ठेवलेम्हणजे काही तिला स्तन नाही आणि कुणी तिच्याकडे कामुकतेने किंवा कसल्याही भावनेने बघणार नाही, असे समजणे फारच भाबडेपणाचे होईल. मुळात जीवशास्त्राप्रमाणे सस्तन प्राण्यातील सर्वोच्च विकसीत प्राणी म्हणजे मनुष्य आहे. आपण सस्तन आहोत हे निसर्गाने मान्य केले, तर ती नाहीत म्हणणे म्हणजे आपण मनुष्य नाही म्हणण्यासारखे आहे ना. जीममध्ये जाऊन आजकाल पुरुषही आपला छातीचा भार कसा मोठा आहे हे दाखवून आपल्या स्तनांचेच दर्शन करत असतात, पण पुरुष त्या स्तनांवर कसलेही आवरण घालून झाकून ठेवत नाहीत याचे दु:ख हेमांगी कवींना होते, म्हणून त्या किमान घरात तरी आपल्या वडील, भाऊ यांच्यासमोर स्तन दिसली म्हणून काही हरकत नाही असे सुचवतात. अर्थात, कुणी काय उघडं ठेवावं आणि काय झाकावं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. आपल्याकडे स्त्रीच्या सौंदर्याच्या ज्या पारंपरिक कल्पना आहेत आणि पुरुषांना मोहात पाडतील अशा ज्या कल्पना आहेत, त्यात चाफेकळीसारखे नाक, लांब केशसंभार, बारीक कंबर, गौर वर्ण याबरोबरच उरोभार म्हणजे स्तनांना महत्त्व दिलेले आहे. स्त्रीयांचे ते सौंदर्याचे, मानाचे आणि आदराचे स्थान आहे. त्यामुळे त्याचे ओझे कुणाला वाटत असेल, तर तो स्त्री जातीचा अपमान आहे. हे स्तन पुरुषांना जितके आकर्षक करण्यासाठी आहेत असे हेमांगी कवींना वाटते, त्याहीपेक्षा ते आमच्या मातेचे आहेत, आम्ही अशाच मातेचे दूध पिण्यासाठी जन्म घेतला यात कृतज्ञतेची भावनाही आहे. त्यामुळे त्या स्तनांचे ओझे वाटून घेण्याची गरज नाही.


हेमांगी कवींनी हा विषय फार मनावर घेतला हे ठीक आहे, पण निसर्गाने जी गोष्ट प्रत्येक जीवाला दिलेली आहे ती टाळता आणि झाकता कधीच येणार नाही. पुरुषांना वयात आल्यावर दाढी-मिशा येतात. दाढी केली, मिशा काढल्या, तरी त्यांचे पुरुषत्व काही लपून राहात नाही, तसेच हेमांगी कवींनी काही मुली स्तनाग्रांवर टीश्यू पेपर लावून ती लपवण्याचा प्रयत्न करतात असे म्हणतात, पण स्त्रीच्या पोषाखाच्या पद्धतीतच त्याला महत्त्वाचे स्थान असल्याने चोळी, पोलके, ब्लाऊज, झंपर यापैकी कशाच्याही आतून ब्रा घातली काय, नाही घातली काय, आत काय आहे हे सर्वांना माहिती असते. त्यामुळे या गोष्टीचे ओझे वाटण्याची काही गरज नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक जीवाचे एक बलस्थान आहे, तसे हेही एक बलस्थान आहे. त्या स्थानाचा अपमान करण्याची गरज नाही. त्याला अश्लीलतेचे वळण देण्याची तर बिलकूल गरज नाही.

हेमांगी कवींना स्तनांवरील निपलची टोके कपड्यामुळे पुढे दिसू नयेत म्हणून ब्रा वापरली जाते असे म्हणायचे आहे. ती दिसली तरी काही बिघडत नाहीत, ती कपड्यात झाकलेलीच असतात. त्यामुळे ब्रा घालायची गरज नाही असे त्यांचे म्हणणे आहे, पण कित्येक मुलींना निपल्स किंवा स्तनाग्रे मोठी असावीत, असेही वाटते. त्यामुळे अनेक मुली पॅडिंगही करतात. गरोदर महिलांना स्तनाग्रे तयार करण्याच्या सूचना डॉक्टर देत असतात. त्यासाठी प्रसंगी दोरा गुंडाळून मोठी करण्याच्याही सूचना देतात. त्यामुळे निपल्सशिवाय स्तन असतात असे कोणीच म्हणू शकत नाही. त्याचे इतके ओझे बाळगायची गरज नाही. जे काही असते ते आपल्या दृष्टीत असते. तसं जगात चांगलं किंवा वाईट असं काहीच नसतं. आपण कोणत्या नजरेतून त्याकडे पाहात आहोत, त्यावर त्यांचे चांगुलपण अथवा वाईटपण ठरत असतं. त्यामुळे मोकळा श्वास घेण्यासाठी ब्रा काढून टाका असा हेमांगी कवींचा आग्रह तसा अनाठायी आहे. समोर स्तन दिसत असताना एखाद्याला त्यात माता दिसेल, तर एखाद्याला त्यात उर्वशी दिसेल. हा नजरेचा प्रश्न आहे. ब्रा काढली आणि घातली तरी नजरा बंद करता येतील का? याचा विचार हेमांगी कवींनी केला पाहिजे. तिथे त्यांना त्याचे उत्तर मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: