‘गावाकडनं निरोप आलाय’. प्रकाश बायकोला सांगत होता. त्यावर फणफणत त्याची बायको सविता म्हणाली, ‘पैसे हवे असतील... दुसरं काय काम असणार नायतर? यांची सदानकदा दरिद्री असत्या... आज काय पाऊस जास्त झाला, उद्या काय दुष्काळ पडला.... कधी समाधानानं यंदा भरपूर पीक झालंय कळवलं का इतक्या वर्षात.’
हे ऐकून प्रकाश चिडलाच. ‘लई बोललीस... तुझं ऐकून गेल्या पंधरा वर्षांत गावाकडं कदी गेलो न्हाय... आई-बाप होते तवा किमान जत्रंला तरी जात होतो. पण नंतर गावाकडचं तुटलं ते तुटलंच.’
‘काय उपेग हाय हो तुमच्या गावाचा? जमीन आहे मोप... पण त्याचा आपल्याला काय फायदा? तुमचा भाऊच तर ती पिकवतो आणि आपला संसार चालवतो. कधी पोतभर धान्य घिऊन जा म्हणून कळवलं का आपल्याला? मस्त पन्नास शंभर पोती धान्य येत असल. बाजारात जाऊन विकत असतील; पण कधी आपल्याला विचारलं का त्यांनी? त्या जमनीवर आपला बी हक्क हाय ना?’
‘अगं कसला हक्क अन् कसली जमीन घिऊन बसलीस? जमिनीचा हिस्सा त्यानं दिला, तरी आपण काय शेती करायला जाणार हाय का तिकडं? का गावाकडं ºहायला तुला आवडणार हाय? शेतात कसं पिकवतात यातलं काय तरी आपल्याला समजतंय का? मग कशापायी हा हट्ट?’ प्रकाशनं समजावण्याचा प्रयत्न केला. तशी फणकारत सविता म्हणाली, ‘काय नाय....जमिनीचा तुकडा मागाच त्यांच्याकडं... आपल्याला नसेल येत शेती करायला... पण आपण तो तुकडा विकून त्याचे पैसे करू शकतो ना?’
प्रकाश निरुत्तर झाला; पण गावाकडचा विषय आला की, नेहमी असाच संवाद असायचा. गावाकडं मदत करायची इच्छा असूनही बायकोमुळं त्याला कधी मदत करता यायची नाही. भाऊ रमेश आणि त्याच्या बायकोला हे सगळं माहिती होतं; पण त्यांनी कधी तक्रार केली नाही. दरवर्षी जत्रा असली, गणपती गौरी असले की, एखादं पत्र पाठवून जत्रेला या, ग्रामदेवतेचं दर्शन घेण्यासाठी या, गौरीगणपतीच्या कुळाचाराला या असे निरोप यायचे; पण प्रकाश आणि त्याची बायको मुलं कधी यायची नाहीत; पण रमेशनं आपलं कर्तव्य कधी सोडलं नव्हतं. त्यांना यायचे तर येतील; पण आपलं आमंत्रण देण्याचं कर्तव्य तो कधी विसरला नाही.
आज असाच एक निरोप आला होता. गावात सरकारकडून अनेक प्रकल्प येत आहेत. जमिनीला चांगला भाव मिळेल. तुलाही तुझा हिस्सा मिळेल. एकदा सवड काढून गावाकडं येऊन जा.
डोंगराच्या बाजूला वसलेलं गाव. आता नव्या विकासकामात या गावातून महामार्ग जात होता. डोंगर जणू कापायलाच सुरुवात झाली होती. डोंगराकडेच्या बाजूला काही गावं होती, त्यांनी विस्थापित न होता तिथंच राहणं पसंत केलं होतं. त्यापैकीच रमेशचं एक घर होतं. रमेशचं वारंवार आमंत्रण येऊनही प्रकाश बायकोमुळं जाऊ शकत नव्हता. गेल्या पंधरा वर्षांत भावाभावांचं दर्शन झालं नव्हतं.
शुक्रवारचा दिवस होता. गेल्या चार दिवसांपासून धो-धो पाऊस पडत होता. सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडत होता. तसा प्रकाशच्या गावातही पावसाने थैमान घातले होते. प्रकाश आणि सविता मुंबईतल्या खोलीत बसून टीव्ही पहात होते. आपल्या गावाकडं खूप पाऊस पडत होता हे पाहून प्रकाश थोडा चिंतेत होता. मध्येच आपल्या गावाकडं कसा दरवर्षी पाऊस असायचा, आम्ही लहानपणी पावसात कसा खेळायचो, आनंद घ्यायचो, भिजून आल्यावर कांबळ वाकळ घेऊन गरगटून कसे बसायचो, हे सगळं प्रकाश बायकोला सांगत होता. सविताला त्यात काडीचाही रस नव्हता. तिला मुळी ते गावाकडचे जगणेच रानटी वाटायचे. शहरात वाढल्यामुळे तिला मुंबई सोडून कुठेही जायचं नव्हतं. त्यामुळे निवृत्तीनंतर गावाकडं जायचं, असा विचार जरी प्रकाशनं बोलून दाखवला, तरी ती आकांडतांडव करायची. त्यामुळे प्रकाशनं असं बालपणात रमणं, लहानपणाच्या पावसातल्या आठवणी सांगणं, म्हणजे तिच्या दृष्टीने थट्टेचा विषय होता. ती त्याची टरच उडवायची.
शुक्रवारी रात्रभर पाऊस पडला. न भूतो न भविष्यती असा पाऊस पडला. सकाळी उठल्या उठल्या पुन्हा टीव्ही लावला आणि प्रकाश हादरूनच गेला, कारण टीव्हीवर बातमी झळकली होती की, आपल्या गावावर दरड कोसळली आणि आख्खं गाव गाडलं गेलं आहे. त्याला आतून भरून आलं. त्यानं ओरडतच सांगितलं, ‘अगं ए सविता... ऐकलंस का... अगं आपलं आख्ख गाव दरडीखाली गाडलं गेलं. गावातली सगळी माणसं गाडली गेली.’ तरीही सविताचा तोरा कमी झाला नाही. ती म्हणाली, ‘आपलं नाही.. तुमचं गाव... आपलं हेच गाव आता.’ असं म्हणत बाहेर आली. टीव्हीवर सतत गावाकडची बातमी दाखवत होते. प्रकाशच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या.
सविता मात्र नाकं मुरडत होती. ‘आता समजलं ना? मी का गावाकडं जायचं न्हाई म्हणत होते ते? नशीब समजा आपण जित्तं हाओत ते.’
प्रकाश आतून कोसळला होता. त्याला सारखी भाऊ, वहिनी, भावाची दोन मुलं असा चार माणसांचा संसार डोळ्यापुढं येत होता. तो ताडकन उठला. ‘सविता चल... आपल्याला जायला हवं... गावाच्या मदतीला जायला हवं.’
तशी सविता पुन्हा फणकारली, ‘आता काय हाय तिथं? सगळं गाव गाडलं गेलं ना? कुणाची मदत करणार आहात तिथं जाऊन. गप्प बसा इथंच. इतक्या पावसाचं तिकडं जाऊन काय करायचं हाय?’
प्रकाशचा जीव कळवळला. भाऊ अंतरवैरी ठरला. आता घरच्या कुणाचं अंत्यदर्शनही आपल्याला होणार नाही, म्हणून कळवळला आणि बिछान्यावर जाऊन झोपला. सविता मात्र टीव्हीपुढेच होती. इतक्यात बातमी आली, ‘मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मृतांच्या वारसदारांना सरकारतर्फे ५ लाखांची मदत जाहीर झाली आहे. पंतप्रधानांनीही प्रत्येकी दोन लाख जाहीर केले आहेत. तिचे डोळेच दिपून गेले. दीर जाऊ आणि पुतणे चार माणसं खपली असतील, तर २८ लाख रुपये मिळतील. खूश झाली.
टीव्ही बंद केला. गुपचूप प्रकाशपाशी आली. रडवेला चेहरा केला. ‘अहो, ऐकलंत का? मला पटलंय तुमचं म्हणणं. चला आताच्या आता आपण तिथं जाऊ. आपल्या गावात इतकी वाईट घटना घडली असताना, आपण इथं थांबणं बरं नाही. स्पेशल गाडी करून जाऊ; पण लगेच जायला हवं.’
प्रकाशला बरं वाटलं. त्यानं समाधानानं तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाला, खरंय... आपण लगेच निघू. प्रकाशला गावाकडं जाऊन मदत करायची दिसत होती, तर मृतांच्या वारसांना मिळणारा आर्थिक मदतीचा पैसा सविताला दिसत होता. चार प्रेतं सापडतील आणि आपण हंबरडा फोडून आपले नातेवाईक असल्याचे सांगू आणि २८ लाख रुपये मिळवू हे एकच स्वप्न सविताच्या डोळ्यात तरळत होतं.
- प्रफुल्ल फडके/ रविवारची कथा
9152448055
\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा