मंगळवार, १३ जुलै, २०२१

झी मराठीला आधार लिटील चॅम्प्सचा


एकापेक्षा एक भंगार, टुकार मालिकांमुळे संपूर्ण चॅनेलचाच टीआरपी घसरलेल्या झी मराठीला आता तारण्यासाठी मागच्या गुरुवारपासून लिटील चॅम्प्स हा सारेगमपचा कार्यक्रम सुरू झाला आहे. पहिल्या तीन भागांतच चौदा छोट्या गायकांनी प्रेक्षकांची मर्जी संपादन केली. त्यामुळे झी मराठीचा विस्कटलेला सूर आता लावायला ही मालिका, सारेगमप लिटील चॅम्प्सचे नवे पर्व उपयोगी पडेल असे दिसते.


आज झी मराठीवर आवर्जून पाहिली जाते ती म्हणजे फक्त ‘देवमाणूस’ ही मालिका. ती पण अंतिम टप्प्यात आहे. ती संपल्यानंतर या वाहिनीकडे चांगले काय बघण्यासारखे असेल हा प्रश्नच आहे. ज्या बºयापैकी मालिका होत्या त्या बंद पडल्या. ‘रात्रीस खेळ चाले 3’ ही मालिका रात्री ११ ला होती, तरी प्रेक्षक पाहत होते. अण्णा आणि शेवंताच्या भूतांचा रोमान्स ही कल्पनाच भन्नाट होती, पण दोन महिन्यांपूर्वीच ती चित्रीकरण थांबल्यामुळे बंद पडली. त्यामुळे आता पहायचे काय? ‘काय घडलं त्या रात्री’ ही आठवड्यातून तीन दिवस असलेली मालिका चांगली होती, पण तीही दोन महिने झाले अचानक बंद पडली. त्यानंतर झी या वाहिनीवरील मालिकांना घसरण लागली ती थांबली नाही. ढिसाळ, रटाळ, ओंगळ कथानकं चालवत वाहिनी चालवली जात आहे इतकंच त्या वाहिनीवर पहायला मिळत आहे. त्यामुळे आता सारेगमप लिटील चॅम्प्सचं हे नवं पर्व थोडं जीवदान देईल अशी अपेक्षा आहे.

‘माझा होशील ना’ या मालिकेत अतुल परचुरेनं अत्यंत गलिच्छ असा खलनायक रंगवला आहे. त्याचं बोलणं, त्याचं वागणं हे अत्यंत किळसवाणे वाटते. त्या आदित्यला तो बूट पुसायला काय लावतो, काहीही कामं करायला लावतो हे काय दाखवतात मालिकांमध्ये? ‘पाहिले न मी तुला’मध्ये तो शशांक केतकर असलेच काही प्रकार करताना दिसतो. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मध्ये ती मालविका आदिती शारंगधर काय वाटेल ते कारस्थान करत असते, आपल्या पीएला थपडा मारत असते. हे किती न पटणारे प्रकार दाखवले जात आहेत.


दोन दिवसांपूर्वी दाखवलेल्या भागात ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मध्ये मालविका स्वीटूला कोंडूनच ठेवते. काय हा प्रकार आहे? शकूसाठी ओमनं मीटिंग आयोजित केली आहे ती उधळवून लावते. हे लोक बिझनेस काय करतात नक्की? एवढा आलिशान बंगला आहे, प्रॉपर्टी आहे असे दाखवले जाते, पण धंदा काय यांचा? स्वीटूला मुंबईत लागलेली नोकरी सोडायला नलू भाग पाडते आणि ब्युटीपार्लरमध्ये कामाला लावते. ब्युटीपार्लरमध्ये असे कोणालाही कामाला ठेवतात का? काम नाही म्हणून दोºयाचे गुंडे सावंतबाईकडून गुंडाळायला आणते. त्यातून तिला एक हजार रुपये काही मिनिटांत कमाई होते. किती गमतीशीर ना? काहीही दाखवतात. त्यामुळे एकेक मालिका पाहणे लोकांनी बंद केले आहे. ‘अग्गबाई सुनबाई’मध्ये तो अद्वैत दादरकर पाहणे म्हणजे सहनशक्तीचा कडेलोट असतो. ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेचाही अतिरेक होतो कधी कधी. तिथे बोलावलेले लोक खळखळून, पोट धरून हसत असतात, पण प्रत्यक्षात प्रेक्षकांना मनापासून हसायला येत नाही. इतके टुकार विनोद कधी कधी असतात. त्यामुळे सगळी वाहिनीच न पाहण्यासारखी असताना आता हे नवे आलेले लिटील चाम्प्सचे पर्व या वाहिनीला थोडी संजीवनी देण्यास कारणीभूत ठरणार आहे.

या सारेगमप लिटील चाम्प्समध्ये पहिले लिटील चाम्प्स हे परिक्षकाची भूमिका करत आहेत. यात रोहित राव अवधूत गुप्तेची स्टाईल मारताना दिसतो आहे, तर प्रथमेश लघाटे हा अकाली प्रौढ झाल्यासारखा वागतो आहे, पण जे चौदा स्पर्धक गायक पहिल्याच फेरीत आहेत ते खरोखरच कमाल आहेत. त्यांचा कसा वापर केला जातो हे पाहणे फार महत्त्वाचे आहे. कारण अशा प्रकारचे जेवढे कार्यक्रम असतात त्यात तीच तीच गाणी पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतात. हजारो-लाखो गाणी आपल्याकडे असताना निवडक गाणीच पुन्हा पुन्हा येतात. कोणी वेगळा प्रयत्न करत नाही हेच दिसून येते, पण काही असो या कार्यक्रमाने झी मराठीचा निघून जात चाललेला प्रेक्षक किमान थांबवला आहे हे नक्की. मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर आणि कार्तिकी यांचे पुन्हा होत असलेले दर्शन आणि त्यांचे मार्गदर्शन हे प्रेक्षकांना सुखावते आहे. मृण्मयी देशपांडे याचे सूत्रसंचालन करते आहे. मृण्मयीने यापूर्वी युवा सिंगरचे सूत्रसंचालन केले होते. खरं तर मृण्मयी ही चांगली कलाकार आहे. ती काही गायिका नाही. पूर्वी अशा कार्यक्रमांचे सूत्रसंचालन साधारणपणे कोणीतरी गायक करताना दिसायचा. अगदी यशस्वी पार्श्वगायक नसला तरी संगीताची चांगली जाण असणारे सूत्रसंचालन करत. परंतु आता सूत्रसंचालनासाठी गायकच पाहिजे असे नाही, तर स्क्रीप्ट लिहून देणारा कोणी असेल तर कोणीही ते काम करतो. कलर्सच्या ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये हे आपण पाहिले होतेच. पहिल्या पर्वात तेजश्री प्रधान होती, तर नंतर स्पृहा जोशी ते काम करू लागली. त्यामुळे मृण्मयी युवा सिंगरनंतर आता लिटील चॅम्प्सच्या सूत्रसंचालनात आली आहे. तिच्या यातील ओव्हर अ‍ॅक्टिंगचेही प्रेक्षक कौतुक करतील यात शंका नाही, पण या स्पर्धेतील गायक कलाकार हे खºया अर्थाने परफॉर्मर आहेत. एक नाशिकची कलाकार स्केटिंग करत गाते, कोणी मिमिक्री करते, असे प्रत्येकाकडे काही ना काही वेगळेपण आहे. म्हणूनच हा कार्यक्रम लोकप्रिय होईल आणि झी मराठीला तारक ठरेल असे वाटते.


प्रफुल्ल फडके/छोटा पडदा

9152448055

1 july

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: