आपल्या मराठी रंगभूमीने सातत्याने समस्याप्रधान नाटके आणलेली आहेत. किंबहुना जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रभावी नव्हता तोपर्यंत मराठी नाटकांनीच सामाजिक बांधिलकी जपत अनेक समस्यांना हात घातला आहे. सामाजिक वास्तव समाजापुढे आणून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. हे करत असताना रंजनाचा भाग कुठेही कमी पडू न देता ही कामगिरी केल्याचे दिसून येते. सामाजिक प्रश्न म्हणजे फक्त गरिबी, दारिद्र्य असेच नाही, तर समाजात राहताना कितीतरी प्रश्न असतात, जे मध्यमवर्गीयांचे असतात, पांढरपेशांचे असतात. त्यावर चर्चा होणे आवश्यक असते, असे विषय मराठी नाटकाने सातत्याने घेतल्याचे दिसते.
संगीत रंगभूमी असताना शारदा या नाटकाने बालविवाहाचा विषय हाताळला आणि त्यातून शारदा कायदा हा बालविवाह प्रतिबंधक कायदा तयार होण्यास मदत मिळाली. एकच प्यालामधून दारूचे दुष्परिणाम दाखवले, पण गायकांनी गाण्याला महत्त्व दिल्याने हा विषय मागे पडत गेला, पण ही चूक गद्य नाटकात झाली नाही. त्यात आशय आणि विषय प्रेक्षकांमध्ये सहजपणे पोहोचला.
जयवंत दळवींची बहुतेक नाटके ही अशीच समस्याप्रधान नाटके असायची. १९७० च्या दशकात आलेल्या संध्या छाया या नाटकाने वृद्धांचे प्रश्न मांडले. मुलांना शिकवायचे आणि त्यांनी नोकरीसाठी परदेशात निघून जायचे. आयुष्याची संध्याकाळ मुलांच्या सान्निध्यात घालवायची, तर मुले लांब. अशा अवस्थेत वेडीपिसी झालेली म्हातारा-म्हातारी म्हणजे नाना-नानी हे या नाटकातून अत्यंत प्रखरपणे दाखवले आहे. या वयातील असुरक्षितता, ही भीतीदायक संध्या छाया, कातरवेळ अंगावर शहारा आणणारी होती. या नाटकात विजया मेहता आणि माधव वाटवे या दोघांनी केलेल्या अजरामर भूमिका आजही वृद्धांच्या समस्या डोळ्यासमोर आणतात.
जयवंत दळवींचे आणखी एक समस्याप्रधान नाटक म्हणजे लग्न. वयात आलेली मुलगी, तिचे वेळीच लग्न होणे न होणे यांमुळे समाजात काय समस्या निर्माण होतात, लग्नाशिवाय मुलगी घरात असणे किंवा लग्नापूर्वीच तिला दिवस जाणे हे समाजातील धक्कादायक प्रसंग असतात. अशावेळी त्या कुटुंबाने जगायचे कसे यावर प्रकाश टाकणारे हे नाटक.
जयवंत दळवींनी सगळीच नाटके बहुदा समस्याप्रधान नाटके म्हणून लिहिली. असेच एक १९८० च्या दशकात आलेले नाटक म्हणजे नातीगोती. दिलीप प्रभावळकर, अतुल परचुरे, स्वाती चिटणीस आणि मोहन जोशी यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेले प्रेक्षकांना रडवणारे हे नाटक. अनेकांना वाटते की, हे नाटक गतिमंद मुलांच्या समस्या मांडणारे नाटक आहे, पण ते गतिमंदांच्या समस्या मांडणारे नाटक नव्हते, तर गतिमंद मूल घरात असल्यावर त्या घरातील माणसांना येणाºया समस्या दाखवणारे नाटक होते. हाच विषय घेऊन त्याअगोदर दळवींनी ऋणानुबंध नावाचे नाटक लिहिले होते. त्यावर चार वर्षांपूर्वी कच्चा लिंबू नावाचा चित्रपटही आला होता, पण असे मूल घरात जन्माला आल्यावर त्या कुटुंबाला काय तोंड द्यावे लागते यावर त्यांनी टाकलेला प्रकाश फार महत्त्वाचा आहे.
जयवंत दळवींच्याच महासागर या नाटकात सामान्य कुटुंब आणि श्रीमंत कुटुंब यातील तफावत दाखवत एक अतृप्ती दाखवली आहे. प्रत्येकाची सगळीच स्वप्न पूर्ण होत नाहीत, पण त्या अपूर्णतेतही तडजोड करत आयुष्य कसे जगले जाते यावर प्रकाश टाकला आहे. माणसाचं मन म्हणजे महासागर असते. अथांग. त्याचा कधीच कुणाला थांगपत्ता लागत नाही हे दाखवणारे हे नाटक.
जयवंत दळवींच्या अपूर्णांक या नाटकात तर अतृप्त राहिलेली इच्छा दाखवली आहे. म्हणजे आपण तरुण वयात, लहान वयात काही वाचतो, काही स्वप्न असतात. ती प्रत्यक्षात घडत नाहीत मग माणूस व्यवहारी अपूर्णांक राहतो. चित्रपटात आणि कादंबरीत लग्नाची पहिली रात्र म्हणजे केलेली कवी कल्पना असते. ती सगळ्यांच्याच आयुष्यात येत नाही. फुलांनी सजवलेली शेज, चहुबाजूंनी पलंगाला लावलेल्या माळा. यात पांढरे कपडे घालून बसलेला नवरदेव आणि त्याला दुधाचा ग्लास घेऊन येणारी त्याची नवी नवरी. हे रंगवलेले चित्र प्रत्यक्षात न घडलेल्या माणसाची कथा म्हणजे अपूर्णांक हे नाटक. त्यातून निर्माण झालेली अतृप्तीची समस्या यावर केलेले चिंतन. अशा कितीतरी न दिसणाºया समस्या जगात असतात. त्यावर अनेक नाटककार सातत्याने लिखाण करत असतात. करमणूक करता करता त्यावर कटाक्ष टाकतात.
आचार्य अत्रे, वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, रत्नाकर मतकरी, विजय तेंडुलकर, प्रेमानंद गज्वी या नाटककारांनीही अनेक समस्याप्रधान नाटके लिहिली आहेत. आचार्य अत्रे यांचे तो मी नव्हेच नाटकाची श्रेयनामावली सुरू करतानाच सामाजिक समस्याप्रधान नाटक असाच उल्लेख असायचा. शिरवाडकरांचे महंत किंवा कानेटकरांचे बेईमान हे नाटक मालक कामगार संघर्ष या समस्येवर भाष्य करणारे नाटक होते. कालेलकरांचे अपराध मीच केला, नाते युगायुगांचे या नाटकांतूनही सामाजिक, कौटुंबिक प्रश्न मांडले होतेच. रत्नाकर मतकरींनी जोडीदार, कर्ता करवता, घर तिघांचं हवं, माझं काय चुकलं? अशा नाटकांतून समाजात घडलेल्या घटनांवर भाष्य केले होते. विजय तेंडुलकरांच्या कन्यादान नाटकातून आंतरजातीय विवाहामुळे निर्माण झालेल्या समस्येवर कटाक्ष टाकला होता. प्रेमानंद गज्वींनी किरवंतमधून उपेक्षित अशा स्मशानकर्म करणाºया ब्राह्मणांचा विषय घेतला होता. अशाप्रकारे नाटककार आपल्या नाटकांतून सामाजिक समस्यांचा सातत्याने उहापोह करत आलेले आहेत.
प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा