डझनभर खून करणारा आणि समाजात उजळ माथ्यानं मिरवणारा देवमाणूस अर्थात डॉक्टर अजितकुमार देव याला सबळ पुराव्या अभावी न्यायालय निर्दोष मुक्त करतं. भर कोर्टात हा देवमाणूस पोलिसांची, वकिलांची आणि त्याच्याविरोधात साक्ष देणाºयाची नाचक्की करतो. आयपीएस अधिकाºयांची मती कुंठीत होते; पण चंदासारखी एक दारूचा अड्डा चालवणारी बाई आपल्या अक्कल हुषारीने अजितकुमारला पकडण्यासाठी सापळा रचते. पोलीस आणि तपासयंत्रणा मूर्ख आणि दारूचे गुत्ते चालवणारी यंत्रणा मात्र हुशार. काय मस्त संदेश दिला ना या मालिकेनं?
एकूणच या कथानकाकडे पाहिल्यावर खूप काही चमत्कार यात दिसतात. झी मराठीवरची ही मालिका आता अखेरच्या टप्प्यात आहे; पण त्यात अनेक अनाकलनीय घटना घडताना दिसतात. अर्थात या अनाकलनीय घटनांपेक्षा टोन्याचा अगावपणा आणि सरू आजीच्या शिव्या ऐकायलाच जास्त मजा येते.
अजितकुमारला म्हणे एक जुळा भाऊ होता. आई-बापाबरोबर काम करत असताना, रस्त्याने जाणारी एक गाडी धडक देते आणि त्यात या दोन मुलांचे हे आई-बाप मरतात. ही जुळी मुलं अनाथ होतात. त्यातला एक सज्जन आहे. अनाथ आश्रमात जाऊन तो शिकतो. दुसरा मात्र आपण शिकणार नाही. आपल्याला शाळा आवडत नाही, म्हणून गुन्हेगारी, उनाड जगात चोºया माºया करून मोठा होतो. आश्रमात शिकणाºयाला कोणीतरी दत्तक घेते. डॉक्टर करते. मुंबईत हॉस्पिटल सुरू करतो. नाव कमावतो. त्याचे नाव अजितकुमार देव. हा दुसरा देवीसिंग आपल्या भावाचा अजितकुमारचा खून करून येतो आणि अजितकुमार नावाने वावरायला सुरुवात करतो. कधीही शाळेत गेलेला नाही, लिहिता वाचता येत नाही, इंग्रजी कुठे शिकलेला नाही; पण अजितकुमार देव म्हणून बदलून आलेला देवीसिंग व्ययस्थित उपचार करतो आहे. औषधे लिहून देतो आहे. त्याचा सायकॉलॉजीचा अभ्यास आहे, म्हणजे सारखा दिसणाºया भावाचा चेहरा, नाव घेऊन वावरणाºया देवीसिंग उर्फ अजितकुमारने आपल्या भावाचे ज्ञान कसे मिळवले याचे उत्तर या मालिकेच्या लेखकाने प्रेक्षकांना दिले पाहिजे.
कपडे घालून कोणी ज्ञानी होतो का? कसलेही शिक्षण न घेतलेला हा देवीसिंग आपली केस आपणच लढतो आणि पोलीस आणि न्यायव्यवस्थेला पद्धतशीर गुंडाळतो, म्हणजे शिक्षणाशिवाय माणूस काहीही करू शकतो. देवमाणूस होण्यासाठी शिक्षणाची गरज नाही, असाच संदेश ही मालिका देते का? निष्णात वकिलासारखी प्रश्नांची सरबत्ती करून समोरच्याला जाळ्यात पकडण्याचे काम एखादी न शिकलेली व्यक्ती कशी काय करू शकते? पोलिसांचे वाभाडे काढून, दिव्यासिंहची पुरती बदनामी करून अजितसिंह निर्दोष सुटतो; पण त्याला पकडण्यासाठी पुढचे जाळे टाकायला कोण येते तर चंदा.
लोफर असताना हा अजित चंदाच्या जिवावर जगत होता. ही चंदा दारूचा गुत्ता चालवते. भल्या भल्या दारूड्यांना फटकावून हाणामारी करून जगणारी चंदा हिला फसवून तिचे पैसे घेऊन दुबईला जातो सांगून तो पळून जातो. अजितकुमारच्या खटल्याची बातमी टीव्हीवर पाहून ती निकालादिवशी तिथे येते; पण काहीही न करता बाहेर थांबते. त्याचवेळी निकाल वाचनापूर्वी ती थेट कोर्टात आली असती, तर किती सोपे झाले असते. पोलीस, वकिलांना ती सगळे पुरावे सहज देऊ शकली असती, कारण तिला समोर पाहून अजितकुमारला चक्करही आली होती. मग ही लांबड का लावली गेली? अजितकुमारच्या पाठोपाठ वाड्यावर येऊन मला त्याची सेवा करायची आहे, म्हणून घरात घुसण्याचा आणि सरू आजीशी हातमिळवणी करून याला फासावर लटकवण्याचा केलेला प्लॅन पोरकट वाटतो.
आर्या जर हायकोर्टात अपिल करणार आहे, तर त्यासाठी चंदाची मदत तिला झाली असती. तिने सरळ पोलिसात जाऊन माहिती देण्याची गरज होती; पण वाड्यात घुसून जो प्रकार चालवला आहे आणि तिने तपासकार्य सुरू केले आहे ते म्हणजे पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे. पोलीस तपास करू शकणार नाहीत, ते निकम्मे आहेत, तर दारूचा अड्डा चालवणारी चंदाच त्याला पुरून उरते हे दाखवण्याचा हा अट्टाहास अनाकलनीय आहे; पण मालिकांमध्ये कुछ भी चलता हैं. कथा म्हणून सोडून द्यायचे आणि मालिका कधी संपते याची वाट पहायची. अजून तीन आठवडे १४ आॅगस्टपर्यंत ही मालिका चालणार आहे. त्यामुळे अखरेच्या भागात पोलिसांपेक्षा गुंडच किती हुशार हे बिंबवण्याची संधी ही मालिका साधते हे नक्की.
अर्थात पडत्या काळात झी मराठीला या देवमाणूसच्या टीआरपीने सांभाळले आहे; पण त्यात असलेला अस्सल ग्रामीण बाज प्रेक्षकांना आवडतो, म्हणून ही मालिका रंजक झाली. कुठलेही पात्र कृत्रिम वाटत नाही. प्रत्येक पात्राचा अभिनय चांगला आहे. अस्सल ग्रामीण ठसका आहे. नणंद-भावजयींची भांडणे आहेत. साधेपणा आहे तोच प्रेक्षकांना भावला आहे. जे-जे कृत्रिम होते, ते मात्र प्रेक्षकांनी नाकारले होते. दिव्यासिंग ही पोलीस अधिकारी आहे. तिला तिची चोख कामगिरी करायला, तपासासाठी विशेष पाठवले आहे; पण ती तपासापेक्षा सुंदर दिसण्यात आणि दाखवण्यात लेखक-दिग्दर्शक गुंतले. सुरुवातीला तिची सौंदर्यस्थळे पाहून झाल्यावर प्रेक्षकही कंटाळले आणि तिच्यापेक्षा सरू आजीच लोकांना अधिक आवडू लागली; पण बºयाचवेळा जे काही दाखवले जात होते ते अत्यंत अतर्क्य आणि अनाकलनीय होते; पण एकूणच पोलीस निष्क्रिय आहेत, हा संदेश देतानाच दारूचे अड्डे चालवणारे जास्त चलाख आहेत, हे या मालिकेने दाखवले हे नक्की.
छोटा पडदा/ प्रफुल्ल फडके
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा