मंगळवार, १३ जुलै, २०२१

बरबटलेले

 राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार गेले दीड वर्ष चालवले आहे. त्यांचे एकेक मुखवटे आता गळून पडायला लागले आहेत. चालवले म्हणजे राज्याच्या जनतेवर लादलेले आहे, असे अधिक संयुक्तिक ठरणार आहे. कारण सरकार स्थापण्यासाठी जनतेने जो कौल दिला होता त्या कौलाचा अवमान करत हे सरकार गलिच्छ राजकारणाने अस्तित्वात आले, पण आता त्यांच्या बरबटलेल्या चेहºयाची लक्तरं गेल्या तीन महिन्यांत समोर येत आहेत. त्यांच्याच पक्षातील नेते काढत आहेत. आघाडीतील घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. त्यामुळे हा भ्रष्ट बरबटलेला चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी विरोधकांना काही करावेच लागत नाहीये अशी अवस्था आहे.


गुरुवारी अजित पवार या उपमुख्यमंत्र्यांची बातमी आली. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याचसंदर्भात ईडीनं मोठी कारवाई करत साताºयातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता, इमारत आणि जमीन जप्त केली आहे. सगळी जवळपास ६५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा या व्यवहारातील सहभाग पाहता संशयाची सुई खुद्द अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचं आता बोललं जात आहे. माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी मोठ्या हिमतीनं उभारलेला हा साखर कारखाना कुरघोड्या करून पवारांनी त्यांच्या हातून काढून घेतला आणि आता बेकायदेशीर व्यवहारांमुळे ही जप्तीची वेळ आली. २०१० मध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा व्यवहार झाला होता. हा कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने लिलाव करून गुरू कमॉडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला विकला. हा व्यवहार बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरामध्ये झाला असून, त्यासाठी घेण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये नियमांचं पालन न केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. त्यावेळी राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष होते, मात्र हे प्रकरण इतक्यावरच थांबत नाही. ईडीनं दिलेल्या माहितीनुसीर, गुरू कमॉडिटीजनं हा कारखाना लागलीच जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला लीजवर दिला. या कंपनीमध्ये स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे बहुतांश शेअर आहेत. इथे पुन्हा अजित पवारांचा या प्रकरणात संदर्भ लागतो. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं ईडीचं म्हणणं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यावर अशा प्रकारे होणारी कारवाई ही अत्यंत शरमेची बाब आहे.

कसले सरकार आज राज्यावर लादले आहे हे जनता उघड्या डोळ्याने पाहते आहे. एकीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कचाट्यात सापडले आहेत. अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर आहे. त्यांच्यामुळे जेजे अटक केले गेले त्यात सचिन वाझे, प्रदीप शर्माअशा पोलीस अधिकाºयांचा समावेश आहे. हे सगळे शिवसेनेत एकेकाळी कार्यरत असलेले होते. मार्चमधल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खुद्द मुख्यमंत्र्यांनी वाझे म्हणजे काही लादेन नाही असे म्हणून यांची पाठराखण केली होती. आज तेच अटकेत आहेत. त्यामुळे याचीच ढाल करत अनिल देशमुख पळवाटा शोधत आहेत. त्यांना अटक केली तर ते हा डाव मुख्यमंत्र्यांवर ढकलण्याचाा प्रयत्न करतील, अशी अवस्था आहे. त्यामुळे सरसकट बरबटलेले आणि वादग्रस्त असे नेते आज सरकार चालवत असतील, तर राज्याचा कारभार चालणार कसा?


यापूर्वी एका महिलेच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. आता काँग्रेसचे नाना पटोले खनीकर्म विभागात झालेला घोटाळा असल्याबाबत संशय व्यक्त करत आहेत. त्यात शिवसेनेच्या नेत्यांची नावे पुढे येत आहेत, तर दुसरीकडे ऊर्जा खात्यातील गैरकारभारावर खापर फोडण्यावरून नितीन राऊत यांच्यावर आरोप होत आहेत. हे सगळं अत्यंत लज्जास्पद असे आहे. तीन पक्षांचे सरकार असले, तरी प्रत्येक पक्षातील नेते, आमदार, मंत्री कसल्या तरी चौकशी आणि घोटाळ्यात अडकत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात स्वच्छ सरकारची गरज आहे. मागच्या सरकारवर कितीही कोणीही टीका केली, तरी एकही घोटाळा त्यांच्या काळात झाला नव्हता. एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी प्रकरणात, दाऊद प्रकरणात संशय व्यक्त केल्यावर त्यांचा तातडीने राजीनामा घेतला गेला होता. आपले निर्दोषत्व सिद्ध करा आणि मग तुमचे पुनर्वसन करू, हा मागच्या सरकारचा बाणा होता. पण आता प्रत्येकजण बरबटलेला असताना एकमेकांना वाचवायला बघतो आहे, पाठराखण करण्यात मग्न आहे. त्यात राज्याचा कारभार ठप्प आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष. लोकांचा रोजगार गेला आहे. उपासमार होते आहे. जनता घरात बसून आहे आणि मंत्री भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकत आहेत. ही काय महाराष्ट्राची अवस्था झाली आहे? खरं तर मुख्यमंत्र्यांची अवस्था असंगाशी संग अशी झालेली आहे. इच्छेविरोधात त्यांना या भ्रष्ट लोकांची पाठराखण करावी लागत आहे. सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन नाही असे म्हणून त्यांना या लोकांची पाठराखण करावी लागते, यासारखी नामुष्की ती काय? दलदलीत फसल्यासारखी अवस्था झालेली आहे. त्यामुळे आपणही घरात बसू आणि सगळ्यांनीच घरात बसा, बाहेर पडू नका, उपाशी राहिलात तरी चालेल. बाहेर पडू नका, सरकार काम करत नाही, जनतेनेही घरात बसून राहावे, अशी मते व्यक्त केली जातात. यासारखे महाराष्ट्राचे महादुर्दैव ते काय?

3 july

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: