बुधवारची सकाळ ट्रॅजेडी किंगच्या दी एंडने झाली, म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं ही बातमी घेऊन आली. वयाच्या ९८व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ असलेल्या काळात आपली सहज अभिनय आणि ट्रॅजेडी किंग, अशी ओळख निर्माण करणाºया दिलीप कुमार यांचा अभिनय मला मात्र अँग्री ओल्ड मॅनच्या भूमिकांमधील जास्त आवडला, कारण कृष्णधवल चित्रपटांच्या काळापासून अगदी नायक म्हणून असलेल्या बैरागपर्यंतच्या चित्रपटांना दिलीप कुमार यांच्या अभिनयाने समृद्ध केले होते तितकेच त्या चित्रपटांचे यश त्यातील गाण्यांमध्ये होते. मोहंमद रफी, मुकेश, तलत मेहमुद, मन्ना डे, किशोर कुमार, महेंद्र कपूर अशा गायकांनी दिलेल्या आवाजामुळे त्या काळातले अनेक नायक गाजले. प्रेक्षक ती गाणी पाहण्यासाठी चित्रपटगृहात येत होते. त्यामुळेच चित्रपटांचा ढाचा बदलला तो १९७०च्या दशकात. गायकांनी मोठा केलेला चित्रपट नायकांनी मोठा करण्याचे दिवस आले होते. त्याच काळात अमिताभ बच्चन या अँग्री यंग मॅनचा उदय झाला होता. सगळीकडे त्याची चर्चा सुरू झाली होती. आता अविट गोडीची गाणी पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात जाणार नाहीत, कारण प्रत्येकाच्या घरी रेडिओ, कॅसेट रेकॉर्डर, टेप रेकॉर्डर, ग्रामोफोन, रेकॉर्ड प्लेअर असे काही ना काही होते. गाणी ऐकण्यासाठी चित्रपटगृहात जाण्याची गरज नव्हती. चित्रपटातून लोक अभिनय बघतील, चांगले संवाद ऐकतील. अशा परिस्थितीत पाच वर्षांच्या ब्रेकनंतर दिलीप कुमार यांची सेकंड इनिंग सुरू झाली. ती अतिशय सुंदर होती.
मनोज कुमारच्या क्रांती या चित्रपटातून दिलीप कुमार यांचे पुनरागमन झाले. एका क्रांतिकारकाचा पडदा व्यापून टाकणारी भूमिका दिलीप कुमार यांनी केली आणि या मल्टिस्टारकास्ट असलेल्या चित्रपटातील अँग्री ओल्ड मॅन प्रेक्षकांना तुफान आवडला. मनोज कुमार, शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, असे स्टार असताना संपूर्ण चित्रपटावर दिलीप कुमार यांचे वर्चस्व राहते हे खरे यश होते. त्यामुळे दुसरी इनिंग अतिशय प्रभावी असे म्हणावे लागेल, कारण इथे संवादफेक, टायमिंग, अॅक्शन, आक्रमकता, स्टाइल याला जास्त वाव होता. गाणी दुय्यम ठरत होती. गाण्यांमुळे कृष्णधवल चित्रपटात यशस्वी ठरलेले दिलीप कुमार अँग्री ओल्ड मॅन म्हणून अँग्री यंग मॅन सुपरस्टार अमिताभ बच्चनसमोर ठाकला होता.
शक्ती हा अँग्री यंग मॅन आणि अँग्री ओल्ड मॅन यांच्यातील अभिनयाच्या जुगलबंदीचा चित्रपट. जी. पी. सिप्पी, रमेश सिप्पींनी या दोघांना एकत्र आणले. प्रामाणिक पोलीस अधिकारी असलेल्या अश्विनी कुमारची भूमिका दिलीप कुमार यांनी केली होती. कर्तव्यासाठी मुलाकडे दुर्लक्ष करणे आणि आपल्यापेक्षा नोकरी महत्त्वाची वाटण्याने नाराज झालेला मुलगा. खºया अर्थाने इथे नक्की कोणता अँग्री मॅन यात वरचढ ठरतो हे सांगणेही अवघड; पण दुसरी इनिंग अँग्री ओल्ड मॅनच्या स्वरूपात यशस्वी होत होती, तसेच चित्रपट दिलीप कुमार यांच्या वाट्याला येत होते.
मग काय अशा अँग्री ओल्ड मॅनला वाव मिळेल असे मजदूर, मशाल, विधाता, कर्मा अशा दिग्गज निर्मात्यांचे चित्रपट येत राहिले. त्या-त्या काळातील नामांकीत कलाकारांबरोबर दिलीप कुमार यांना झळकायची संधी मिळत होती. मजदूर हा बी. आर. चोप्रा यांचा चित्रपट. मील मजदूरांचा विषय असलेल्या या चित्रपटात सुरेश ओबेरॉयला आव्हान देत स्वत:ची मील सुरू केली जाते. यात राज बब्बर, पद्मीनी कोल्हापुरे, रती अग्निहोत्री हे कलाकार होते. कापडाला बाजारपेठ मिळू नये, म्हणून कोंडी केल्यावर दिलीप कुमार राज बब्बर आणि सगळं कुटुंब मीलमधले कपडे गाणं म्हणत रस्त्यावर विकायला उतरतात आणि बाजारपेठ काबीज करतात. यातही हा अँग्री ओल्ड मॅन भाव खाऊन जातो.
मशाल हा १९८४ साली प्रदर्शित झालेला दिलीप कुमारचा अँग्री ओल्ड मॅनचा सुपरहिट चित्रपट. यश चोप्राचे दिग्दर्शन व निर्मिती असलेल्या या चित्रपटात दिलीप कुमार, वहिदा रेहमान व अनिल कपूर, रती अग्निहोत्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वसंत कानेटकरांनी लिहिलेल्या अश्रूंची झाली फुले या प्रसिद्ध मराठी नाटकावर हा चित्रपट आधारित आहे. प्रामाणिकपणे वर्तमानपत्र चालवणाºया आणि अन्यायाविरोधात लेखणीने आवाज उठवणाºया एका संपादकाची भ्रष्ट प्रवृत्ती कशी वाताहात लावतात आणि सन्मार्गावरून वाईट मार्गाला कसे लावतात हे या चित्रपटात दिसते. त्याचवेळी सडा फटींग असलेल्या अनिल कपूरला वाममार्गावरून सन्मार्गाला लावणारा दिलीप कुमार वाममार्ग निवडतो, तेव्हाचा संघर्ष फार जबरदस्त. दिलीप कुमार व वहिदा यात एकत्र आले होते. वहिदा रेहमान शेवटच्या घटका मोजत असताना, मदतीची याचना मागणारा अरे कोई हैं करून आवाज देणारा आणि टॅक्सी, वाहनांना थांबवण्याची चाललेली दिलीप कुमारची धडपड लक्षात राहणारी आहे.
यानंतर आला तो सुभाष घई यांचा कर्मा हा चित्रपट. सुवर्ण युगाच्या काळात दिलीप कुमार आणि नूतन हे इतके व्यस्त असायचे की, त्यांना एकत्र भूमिका करता आली नव्हती; पण सुभाष घर्इंनी या दोघांना एकत्र आणलं. इतकंच नाही, तर दोघांचे प्रेमगीतही यशस्वी केले. डॉक्टर डँग या अनुपम खेरने उध्वस्त केलेल्या आपल्या कुटुंबाच्या खुनाचा बदला घेणारी ही कथा. कथा तशी जुनीच; पण घई स्टाईलने मांडल्याने त्यात नाविन्य होते. शोलेत ज्याप्रमाणे संजीव कुमार गब्बर सिंगचा बदला घेण्यासाठी गुंड असलेल्या अमिताभ, धर्मेंद्र यांची मदत घेतो तशाच प्रकारची सूड कथा. त्यामुळे यातही दिलीप कुमारच्या अँग्री ओल्ड मॅनला चांगला वाव. अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, नसिरुद्दीन शहा, श्रीदेवी, पूनम धिल्लन या कलाकारांबरोबर ही सूड कथा दिलीप कुमारने साकारली होती.
राज कपूर नंतर ग्रेट शोमन, अशी ख्याती मिळवलेल्या सुभाष घर्इंना दिलीप कुमार हे १९८०च्या दशकात भेटलेली फार मोठी देणगी होती. त्यामुळेच या अँग्री ओल्ड मॅनचा पुरेपूर वापर करत त्यांनी तसे चित्रपट काढले. यात विधाता या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. शम्मी कपूर, संजीव कुमार, संजय दत्त या कलाकारांना घेऊन काढलेला हा चित्रपट. गुन्हेगारी जगताशी लढा देणारा आणि नकळत त्यात गुरफटलेला समशेर सिंग ही दिलीप कुमारची जबरदस्त भूमिका होती.
दिलीप कुमारच्या सेकंड इनिंगमध्ये तत्कालीन आणि समकालीन दिग्गजांबरोबर काम करत त्यांनी रंगत आणली होती. असाच एक चित्रपट म्हणजे सौदागर. या चित्रपटात राजकुमार, दिलीप कुमार आमने-सामने आले होते. इक जंगल में हम दो शेर, म्हणत या दोघांमधला संघर्ष फार मस्त होता. दिलीप कुमारला घेऊन केलेला सुभाष घर्इंचा हा आणखी एक यशस्वी चित्रपट होता. यात मनिषा कोईराला आणि विवेक मुश्रन ही नवी जोडी होती. भव्य कथानक असलेल्या या चित्रपटात दिलीप कुमार यांनी आपली हुकूमत दाखवली होती.
त्यामुळे दिलीप कुमार यांच्या अभिनयाला खºया अर्थाने स्कोप मिळाला तो सेकंड इनिंगमध्ये. सेकंड इनिंगमध्ये राजवट होती ती दोन अँग्री मॅनची. यातला अँग्री ओल्ड मॅन यशस्वी करण्यात दिलीप कुमार यांना शक्य झाले होते. उतरत्या वयात चढता आलेख लिहित काम करणारा हा कलाकार आपले दीर्घायुष्य संपवून काळाच्या पडद्याआड गेला आहे.
- प्रफुल्ल फडके/द स्क्रीन\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा