महाराष्ट्रात सर्वत्र तुफान पाऊस झाला. अनेक शहरांतून पावसाचे पाणी तुंबले. अनेक शहरे पाण्याखाली गेली. सांगली, कोल्हापूर, चिपळूण ही शहरे पाण्याखाली गेली. मुंबईत तर पाणी साचण्याचे प्रकार दरवर्षीच घडतात. नेमेची येतो मग पावसाळा त्याप्रमाणे नेमेची होते इथे तुंबई असे समीकरण झाले आहे. कुठे धरणाचे पाणी सोडल्यामुळे, तर कुठे पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे, कुठे नदीला पूर आल्याने शहरात पाणी शिरले; पण हे समजण्यापूर्वी आम्ही लक्षात घेतले पाहिजे की, आमच्या लहानपणी आम्हाला हुशार कावळ्याची गोष्ट सांगितली ती आम्हाला कधी कळलीच नाही किंवा विज्ञानात आर्किमिडीजचा सिद्धांत मांडला गेला, तोही आम्हाला कळला नाही. त्यामुळे आम्हाला ना विज्ञान समजते ना तत्वज्ञान ना बोधकथा, अशी आमची अवस्था आहे, असे म्हणावे लागेल.
आर्कीमिडीजच्या सिद्धांताप्रमाणे अनियमीत वस्तूचे वस्तुमान मापण्यासाठी संपूर्ण भरलेल्या पात्रात तो अनियमित पदार्थ टाकल्यावर त्या पात्रातून बाहेर पडणारे पाणी हे त्या पदार्थाचे वस्तुमान असते. हा शोध लागल्यावर तो युरोका युरेका करत बाथ टबमधून विवस्त्रावस्थेत पळत सुटला. त्यानंतर हा सिद्धांत जगप्रसिद्ध केला; पण विज्ञानवादी आम्हाला तो कधी समजलाच नाही का? यावर्षी पाऊस खूप झाला असे आपण म्हणतो. हवामान खाते सरासरी इतका पाऊस झाला किंवा होणार असे म्हणते. थोडाफार पाऊस कमी जास्त होत असतो; पण खूप पडतो असे काही नाही. पण पडल्याचे भासते मात्र याचे कारण आर्किमिडीजचा सिद्धांत. याचे कारण आमच्या हुशार कावळ्याने, तहानलेल्या कावळ्याने सांगितलेली गोष्ट.
कावळ्याला तहान लागलेली असते. तो खूप उडतो, पाणी शोधतो. शेवटी त्याला कुठेतरी एक रांजण दिसते; पण रांजणाच्या तळाशी पाणी असते. तिथपर्यंत तो पोहोचू शकत नसतो. शेवटी तो एक एक खडा त्या रांजणात टाकतो आणि हळूहळू पाणी वर येते. पात्रातून पाणी वर येण्यासाठी दगड टाकले पाहिजेत हे आमच्या इसापनितीतील किंवा बोधकथांमधील कावळ्याला आर्किमिडीजच्याही आधी माहिती होतं. तो त्याची तहान भागवतो. पात्रात दगड टाकले की, पाणी वर येणार हे कावळ्याला समजते, पात्रात कोणतीही अनियमीत वस्तू टाकली की, पात्र पाणी बाहेर फेकणार हे आर्किमिडीज सांगतो; पण कोणासाठी? त्यांनी सांगितलेले आम्ही ऐकणार नसू, त्याचा अर्थ समजून घेणार नसू, तर त्या विज्ञानाला काय अर्थ आहे? त्या बोधकथेला तरी काय अर्थ आहे?
आज प्रत्येक शहरांची अवस्था हीच झालेली आहे. नदीकाठावर, ओढ्यांच्या काठावर, पाणस्थळांच्या काठांवर इतकी अनियमीत बांधकामे होत आहेत की, त्यांचे आक्रमण, अतिक्रमण पाण्याच्या पात्रांवर होत आहे. नदीपात्रांवर होत आहे. बांधकामांमुळे नदीच्या पात्रांची रुंदी कमी झाली की, पाणी बाहेर फेकले जाणार आणि ते अर्थातच शहरात घुसणार. हाच तर आर्किमिडीजचा सिद्धांत आहे. हीच तर तहानलेल्या कावळ्याची बोधकथा आहे.
पण प्रत्येक शहरातून तळाशी गेलेल्या नदीपात्रात आम्ही कावळ्याप्रमाणे नजर ठेवून एकेक बांधकामाचा खडा टाकला आणि तळाला गेलेले पाणी वर ओढून घेतले. कावळ्यानं एका डोळ्यानं जे शिकवलं ते आम्ही दोन डोळ्यांनी उघडपणे नाही समजू शकलो का? भरलेल्या पात्रात कोणतीही वस्तू पडली की, त्याच्या आकारमानाइतका द्रव बाहेर फेकणार. हे सांगण्यासाठी नग्नपणे धावत सुटलेल्या आर्किमिडीजचा सिद्धांत आम्हाला समजला नाही. आम्हाला अंगावरच्या वस्त्रानिशी बाहेर पडावे लागले. याचा नेमका अर्थ आम्ही कधी समजून घेणार आहोत?
माणसं वाढली. लोकसंख्या वाढली. राहण्याची जागा अपुरी पडली. बांधकामे वाढली; पण ही वाढलेली बांधकामे नदीच्या पात्रात, खाडीत, पाणस्थळाच्या काठावर केल्यामुळे पाणी आपल्याभोवती वेढले जाऊ लागले हे आम्हाला का नाही समजले? जमिनीत मुरणारे पाणी जमिनीत न मुरता नदी, नाले, ओढे यांच्या दिशेनेच वाहू लागले, कारण आम्ही रस्ते हे सिमेंट-काँक्रीटचे केले. टायर पंक्चर होऊ नये, पोटातलं पाणी हालू नये, म्हणून रस्ते काँक्रीटचे केले; पण पोटातलं पाणी हालू नये म्हणता-म्हणता पाण्यानेच आम्हाला इतके हालवून सोडले की, पोटाला खायलाही काही मिळणार नाही इतके बेघर केले. हे कशानं झालं?, तर आम्ही नदीपात्रात बांधकामे केली, आम्ही पाण्याचे प्रवाह बदलले, आम्ही अतिक्रमणं केली, आम्ही कावळ्याचा बोध घेतला नाही, आम्ही आर्किमिडीजचा सिद्धांत समजून घेतला नाही, म्हणून हे सारे घडले आहे. पाऊस आहे तितकाच आहे. थोडाफार कमी जास्त; पण आता दिवसेंदिवस ही अशीच कोंडी होत राहणार, कारण पात्रातील अनियमित आकाराच्या वस्तू म्हणजे वास्तू, रांजणातील पडणारे खडे म्हणजे बांधकामे ही वाढतच जाणार. पाणी वर येतच राहणार. रांजण मोकळा ठेवायचा की दगडांनी भरलेला हे आपल्या हातात आहे.
आज ज्या-ज्या शहरात पाणी साचले आहे, जी शहरे पाण्याखाली गेली आहेत तेथील नदी काठावर, पात्रात किती अतिक्रमणे आहेत, किती अनावश्यक बांधकामे आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे. कोणत्या आधारावर या बांधकामांना परवानगी स्थानिक संस्थांनी दिली हे तपासणे गरजेचे आहे. याचवेळीच आॅडीट केले नाही, तर दरवर्षी जून, जुलै, आॅगस्ट महिन्यात आम्हाला अशा शोकसागरात बुडावे लागेल. दु:खाचे अश्रू ढाळावे लागतील.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा